जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी आता सर्वत्र सुरू झाली आहे. या कायद्यातील अनुसूचीमध्ये जी 12 कलमे आहेत त्यांचे अधिक स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. या कलमासंदर्भात विविध शंका व प्रतिवाद निर्माण केले जातील. यांचे समर्पक स्पष्टीकरण देणारे ‘अभिरूप न्यायालय’ हे सदर आम्ही या अंकापासून सुरू करीत आहोत.
माय लॉर्ड! आजची केस जरा विचित्रच आहे, असे म्हणता येईल. कारण ज्याला आरोपी म्हणून पिंजर्यात उभे केले आहे तो अशील या पंचक्रोशीत एखाद्याच्या अंगातील भूत उतरविण्यात प्रसिद्ध असलेला आहे. गेली अनेक वर्षेया भागात भूत, भानामती, करणी, वशीकरणांच्या अनेक केसेस पुढे आल्या. व लोक हैराण झाले. परंतु माझा अशील करत असलेल्या उपचारामुळे अनेक कुटुंब समाधानी जीवन जगत आहेत. यावरून माझा हा अशील एका प्रकारे लोकसेवा करत आहे असे म्हणावयास हरकत नसावी. परंतु नुकत्याच पास झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्यातील अनुसूची, कलम 1 मुळे माझ्या अशिलाला विनाकारण तुरूंगात डांबले जात आहे. त्यामुळे माझ्या अशिलाची त्वरीत मुक्तता करावी.
तथाकथित भूत उतरविण्याच्या बहाण्याने तुमच्या अशिलाने पीडित व्यक्तीवर जादूटोणा कायद्यातील अनुसूची, कलम 1 मध्ये उल्लेख केलेले अनेक प्रकारचे अघोरी कृत्य केले आहेत, ते तुम्हाला मान्य आहे का?
माय लॉर्ड! अशा प्रकारचे कृत्य केल्यानंतरच पीडित व्यक्ती भूतमुक्त होते. अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेले अलोपथीचे डॉक्टर्स ज्या प्रकारे कडू औषध पिण्यास भाग पाडतात वा वेदना देणार्या इंजेक्शनचा मारा करत असतात, वा पोट फाडून शस्त्रक्रिया करत असतात तशाच प्रकारची ही उपचार पद्धती आहे. त्यामुळे त्यात काही गैर नाही असे मला वाटत नाही.
निष्णात डॉक्टर्स जेव्हा कडू औषध घेण्यास भाग पाडतात वा इतर उपचार करत असतात ती उपचार पद्धती वा औषध, कित्येक रूग्णांची कित्येक वर्षे केलेल्या क्लिनिकल चाचणीचे फलित असते. ज्या काही वेदना होत असतात त्या तात्कालिक असतात. या उपचार पद्धतीमुळे रूग्ण ठणठणीत बरा होऊन सामान्य जीवन जगू शकतो. परंतु तुमच्या अशिलाच्या कृत्यांना कुठलाही बेस नाही. त्याच्या मनात येईल ते कृत्य करण्याची मुभा त्याला असते. त्यामुळे या आरोपीला अशा गोष्टीतून असुरी आनंद मिळतो की काय असा माझा संशय आहे. त्याची विकृत मानसिकता आहे असे मला म्हणावेसे वाटते. केवळ सेडिस्ट व्यक्ती असे काही तरी करू शकते, हे माझे स्पष्ट मत आहे. त्याचबरोबर हा माणूस आर्थिक शोषणही करतो, हे तुम्हाला पटते का?
माय लॉर्ड, जर एखाद्या पीडित व्यक्तीला अशा मारहाणीबद्दल तक्रार नाही, त्याच्या नातेवाईकांनाही त्यात काही गैर आहे असे वाटत नाही व हे लोक राजीखुशीने माझ्या अशिलाला मोबदला देत असल्यास इतरांनी त्यात का म्हणून मधे पडावे? हा त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे स्वैर स्वातंत्र्य नव्हे. कुणीही, कुठेही, केव्हाही काहीही करायला मुभा असणे हा असा अर्थ काढणे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय ही जी उपचार पद्धती आहे ती एका कपोलकल्पित, अस्तित्वातच नसलेल्या, व केवळ काहींच्या मनातील भास अशा बेसिसवरून जनसामान्यात केवळ भीतीपोटी मान्यता मिळालेली उपचार पद्धती आहे. या जगात भूत, भानामती, चमत्कार अशा गोष्टी नाहीत, हे वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेली गोष्ट आहे. त्यामुळे हा आरोपी समाजात काही तरी खोटे नाटे पसरवून स्वत:चे भले करून घेत आहे. असे मला वाटते.
माय लॉर्ड! जरी तुमचा वा माझा अशा गोष्टीवर विश्वास नसला तरी भूताखेतावर, त्या आपल्याला त्रास देतात यावर, विश्वास ठेवणारे या समाजात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यावर उपचार म्हणून कलम 1 मध्ये नमूद केलेली कृत्ये वापरून त्यांच्या मनातील भीती दूर होत असल्यास चुकते कोठे?
जगात भूत नाहीत याची पूर्ण कल्पना आरोपीलासुद्धा असावी. फक्त भूत उतरविण्याच्या बहाण्याने तो अशा प्रकारची दुष्कृत्ये करत रूग्ण व्यक्तीला हैराण करत पैसे कमावतो. या दुष्कृत्याची यादी थक्क करणारी आहे. या गोष्टी अमानुष व अत्यंत निर्दयी आहेत याची कल्पना आरोपीला नसेल का? अशा गोष्टी ज्या समाजात घडतात तो सुसंस्कृत समाज म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. एखाद्याच्या अज्ञानाचा, दुर्बलतेचा अशा प्रकारे फायदा घेणे क्रूरतेचे लक्षण आहे.
माय लॉर्ड! बाहेरची बाधा झाली आहे असे अनेकांची पक्की समज असते. व त्यावर अशा प्रकारची अघोरी उपचारातूनच भूत पळून जाते याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्र संशय नसतो. मग त्याचे काय?
आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला ‘बाहेर’ची बाधा झाली आहे असे वाटत असल्यास हा समज अज्ञानातून झालेला आहे असे म्हणावयास हरकत नसावी. शिवाय पिढ्यान्पिढ्या अशा गोष्टी ऐकत असल्यामुळे त्यांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. व इतर कुठलेही कारण शोधण्याच्या भानगडीत न पडता या सुलभ व सर्वमान्य कारण पुढे करून रूग्णावर उपचार सुरू करत असतो. रूग्ण व्यक्ती चित्र-विचित्रपणे वागत असल्यास त्याची कारणं मनोविकारात शोधता येतात व मानसिक आरोग्यावर उपचार उपलब्ध आहेत. म्हणून मनोरूग्णाच्या नातेवाईकांना अशा प्रकारे अघोरी उपचार करणार्या आरोपीकडे जायची गरज नाही.
माय लॉर्ड! माझ्या अशिलाने ज्या ज्या लोकांना मारहाण गेली, चाबकाने मारले, छताला टांगले, नको त्या गोष्टी खायला लावल्या, चटके दिले, ते सर्व रूग्ण व त्यांचे नातेवाईक भूत उतरले म्हणून माझ्या अशिलाला दुवा देतात, बक्षीस देतात. आता ते रूग्ण विचित्रपणे वागत नाहीत. याची कारणं काय असू शकतील?
आपल्या देशातील लोकांना माणसाचे मन आजारी पडू शकते हेच अजूनही माहीत नाही. चांगला धडधाकट तर दिसतोय, आणि याला काय झालंय अशी वाक्ये बहुतेक मनोरूग्णांच्या बाबतीत काढले जातात. त्यामुळे मनोरूग्ण हा मुद्दाम असा वागतोय, आम्हाला त्रास देण्यासाठी वागतोय, ढोंग करतोय असा समज घरातले करून घेत असतात. घरातला कुणी तरी काही कारणामुळे थोडेसे विचित्रपणे वागू लागला की, बाहेरची बाधा झाली असे बिनदिक्कतपणे मानले जाते. व घरातल्यांना व खुद्द त्या व्यक्तीलासुद्धा बाहेरच्या बाधेमुळे असे झाले आहे अशी खात्री पटते. कारण पिढ्यान्पिढ्या याच गोष्टी व त्याचे नानाविध प्रकार ऐकून आपण वाढलेलो असतो व हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोचत जातात. एका प्रकारे याला समाज मान्यता मिळत असल्यामुळे वेगळा विचारच सुचत नाही. भूतबाधेचे ‘भूत’ एकदा मानगुटीवर बसल्यानंतर या भूताला वा प्रेतात्म्याला बाहेर काढण्यासाठी दैवी वा अघोरी उपाय सुचवले जातात. व असले उपाय करणारे तरबेज गावा-गावात असतात. खरे पाहता दैवी उपचारसुद्धा एका प्रकारचे अघोरी उपायच असते. फक्त ते उपचार, धार्मिकस्थळाच्या ठिकाणी केल्यामुळे त्याला दैवी उपचार म्हटले जाते. हा आजार बाहेरच्या गोष्टीमुळे झाला आहे हे एकदा मनात ठसवून घेतल्यानंतर भूत वा प्रेतात्म्याला बाहेर काढण्यासाठी संबंधिताला उपाशी ठेवणे, चाबकाने मारणे, साखळदंडाने बांधून ठेवणे, तापत्या सळईचे डाग देणे अशा सारखे भयानक कृत्यांचा सर्रासपणे अवलंब केला जातो. अशा वेळी रूग्ण जोरजोराने ओरडत असला तरी, गयावया करत असला तरी तुमच्या अशिलासारखे मांत्रिक वा भगत हा छळ रूग्णाला होत नसून त्यांच्यातील भुताला होत आहे आणि ते लबाडी करत आहे, असे म्हणून सगळ्याचे तोंड बंद करतो. या अघोरी उपचारामुळे रूग्णाच्या शारीरिक प्रकृतीवर व त्याच्या मनावरसुद्धा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अति-थकवा, डीहायड्रेशन, व त्यातून ताप, जखमामध्ये सेप्टिक झाल्याने जंतुसंसर्ग व ताप अशा प्रकारचे विविध आजार उद्भवण्याची शक्यता असते. धनुर्वातही होऊ शकतो. शारीरिक वेदना असह्य झाल्यामुळे रूग्ण भूत उतरून गेल्याने ढोंग करू लागतो व मांत्रिक त्याचे श्रेय घेत कुटुंबियांना लुबाडतो. परंतु मनोरूग्णाची ती अवस्था काही काळानंतर पुन्हा दिसू लागते व चेव आल्यासारखे हे मांत्रिक काहीही करायला तयार होतात. हे दुष्टचक्र कुठे तरी थांबायला हवे.
परंतु, माय लॉर्ड अशा प्रकारच्या उपचारामुळे काही मानसिक आजार काही प्रमाणात, काही काळापुरते बरे होतात असा अनुभव आहे. ही जर उपचार पद्धतीच नाही असे म्हणत असल्यास असे का होते?
याचाही वैज्ञानिकरित्या अभ्यास केलेला आहे. जे आजार काही प्रमाणात काही काळापुरते बरे झाल्यासारखे वाटत असतात ते या बाहेरच्या शक्तीमुळे नव्हे तर त्यामागची कारणेसुद्धा मानसिकच असतात. मनात दाबून ठेवलेल्या भावना, शारीरिक वा मानसिक एनर्जीवाटे बाहेर पडल्यामुळे काही रूग्णांच्या अंतर्गत मनातील ताण कमी होतो व त्यामुळेही रूग्णाच्या लक्षणात प्रगती झाल्यासारखे वाटते.
जर या बाहेरच्या इलाजामुळे काही प्रमाणात का होईना, जर फरक पडत असेल तर तो उपचार करण्यास हरकत का असावी?
हा युक्तीवाद अतिशय धोक्याचा आहे. कोणताही उपचार हा पूर्णपणे रोग बरा करण्याकडेच उद्दिष्ट असलेला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे असा काही प्रमाणात आजार बरा झाल्यासारखे वाटल्यामुळे आजाराच्या खर्या ट्रिटमेंटकडे रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे दुर्लक्ष होऊ लागते. आजार जरी सुधारल्यासारखे वाटत असला तरी तो शरीरात राहून जास्त क्रॉनिक होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच अशा व्यक्तींच्यावर मानसिक आरोग्यावरील उपचार करण्याची गरज आहे व हे उपचार आता उपलब्ध आहेत.
माय लॉर्ड! आपण याविषयी इतक्या विस्तृतपणे सांगितल्याबद्दल धन्यवाद. मुळात अशा प्रकारच्या उपचारांना समाजमान्यता मिळत गेल्यामुळे ही अंधश्रद्धा इतकी वर्षेटिकून आहे व त्याचाच बाजार मांडल्यामुळे माझ्या अशिलासारख्यांची चंगळ होत असते. माणसातील मनातील भीतीचा फायदा वर्षानुवर्षेघेत असल्यामुळे माझा अशीलसुद्धा याला बळी पडला व त्यांनी दुकान थाटले. अज्ञानापोटी केलेल्या या कृत्याला न्यायालयाने माफ करावे अशी मी विनंती करतो.
आरोपी जेव्हा रूग्णांचे उघडपणे अनन्वित छळ करत होता तेव्हाचे त्याचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे होते. या प्रकारचे कृत्य समाजस्वास्थ्यास हानीकारक आहेत व हा संदेश समाजात पोचवण्यासाठी कोर्ट आरोपीला कायद्यातील तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा देणार आहे. याचबरोबर रूग्णावरील अन्याय निवारण्यासाठी रूग्ण शारीरिकरित्या व मानसिकरित्या पूर्णपणे बरा होण्यापर्यंतचा खर्च आरोपींनी स्वत:च्या खिशातून द्यावा अशी आज्ञा मी देत आहे.
या निकालानंतर पुढील कामकाज स्थगित करण्यात आले.
–प्रभाकर नानावटी
मोबा. 9503334895