वर्तमानपत्रामध्ये कुंभमेळ्यासंदर्भात शाहीस्नान करणार्या साधुंच्या फोटोकडे पाहाता लहान मुलाने मला प्रश्न केला की, “काका ही प्रचंड संख्येने जटा वाढवलेली, राख फासलेली मोठी माणसं नदीच्या पाण्यात नागडी आंघोळ करून पाणी का प्रदुषित करतात? शाळेत बाईंनी तर आम्हाला दुष्काळ आहे. पाणी काटकसरीनं वापरा,पाण्यात घाण टाकू नका, असं सांगितलेलं आहे.” शाहीस्नान करणार्या आणि वयानं मोठ्या असणार्या राजनाथसिंह, अनिल अंबानी, मिराकुमारी, साधु अशा तब्बल तीन कोटी जनतेला हा प्रश्न पडत असेल का? किंवा ते लहान होते त्यावेळेस त्यांना असले प्रश्न पडत होते का? का ते कधीच लहान नव्हते? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात.
कुंभमेळ्याची अख्यायिका तर फारच मनोरंजक आहे. ती ऐकल्यानंतर मनाला प्रश्न न पडले तर नवलच! फार फार वर्षापूर्वी देवांनी समुद्र मंथन सुरू केले. समुद्रमंथनासाठी वासूकी नागाचा आणि मंथनदंड म्हणून पर्वताचा वापर करण्यात आला. समुद्रमंथनासाठी दानव (राक्षस) सुद्धा आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून देवांच्या मदतीला आले. एका बाजूला देव तर दुसर्या बाजूला दानव समुद्रमंथनासाठी उभे होते. बराच काळ मंथन झाल्यावर अमृत बाहेर आले. दोघांच्या प्रयत्नातून अमृत मिळाले. त्यामुळे ते दानवांनाही द्यावे लागणार हे लक्षात आल्यावर देवांनी एक युक्ती केली. त्यांनी इंद्राचा पुत्र जयंता याला अमृत कुंभ घेऊन स्वर्गाच्या दिशेने पळून जायला सांगितले. जयंत अमृताचा कुंभ घेऊन पळतोय हे लक्षात आल्यानंतर दानव जयंतांच्या पाठीमागे धावू लागले. नंतर अमृतकुंभासाठी देव आणि दानवांच्यात घनघोर लढाई झाली. लढाईच्या काळात कुंभातून अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले. प्रयाग, उज्जैन, हरिद्वार व त्र्यंबकेश्वर ही ती चार ठिकाणे. त्यांना तीर्थक्षेत्र असा दर्जा देण्यात आला. बरीच वर्षेलढाई चालूच होती. कुंभ फुटू नये यासाठी सूर्याने व चंद्राने देवांना मदत केली. गुरूनेही देवांच्या बाजूने लढत दानवांशी संघर्ष केला. बारा वर्षाच्या युद्धानंतर देवांचा विजय आणि दानवांचा पराभव झाला. गुरु जेंव्हा कुंभ राशीत असतो तेव्हा हरिद्वारला, वृषभ राशीत असतो तेव्हा प्रयागला (अलाहाबाद), सिंह राशीत असतो तेंव्हा त्र्यंबकेश्वरला आणि वृश्चिक राशीत असतो तेव्हा उज्जैनला कुंभमेळा भरतो. गंगा नदीवरील हरिद्वार, गंगा यमुना व सरस्वतीच्या संगमावरील प्रयाग, गोदावरीवरील (नाशिक) त्र्यंबकेश्वर आणि क्षिप्रा नदीवरील उज्जैन या चारही ठिकाणी कुंभमेळा भरू लागला.
अशाप्रकारच्या अनेक मानवनिर्मित कथानकांनी कुंभमेळ्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. किंबहुना मार्केटींग केलेले आहे. लहान मुलांना जर हे कथानक ऐकवलं तर निश्चितच त्यांना काही प्रश्न पडणारच. समुद्र घुसळल्यानंतर मिठाऐवजी अमृत कसे तयार झाले? देव सुद्धा चोरी करत होते का? चोरी करून पळून जात होते का? अमृताचे थेंब पृथ्वीवर पडताना त्याची वाफ का झाली नाही? थेंब फक्त भारतातच कसे पडले? देव दानवांचे युद्ध पृथ्वीवर सुरू होते की अंतराळात? देव दानवांच्या युद्धात नेहमी देवांचाच विजय का होतो? गुरू हा दगड धोंड्यांचा ग्रह आहे तो देवांच्या मदतीला कसा आला? बारा वर्षानंतर कुंभमेळा का भरतो? पाप धुवन जावे म्हणून आंघोळ करण्यापेक्षा पापच करू नये हे मोठ्यांना कळत नाही का? सिंहस्थ पर्वणी म्हणजे काय व ती बारा वर्षानंतरच का येते?
सध्या गुरू वृषभ राशीत आहे. त्यामुळे लाखो (संधी) साधू सध्या अलाहाबादजवळील प्रयाग येथे (नग्न) शाहीस्नान करून नदीचे पाणी सरकारी खर्चाने अक्षरश: घाण करत आहेत. नदीत स्नान करणारा केवळ स्नान करून थांबत नाही तर शरीरातील बरेचसे टाकावू पदार्थ पाण्यात सोडून देत असतो. आंघोळ केल्यानंतर हेच पाणी भक्तगण तिर्थ म्हणून प्राशन करतात किंवा कमंडलूमध्ये गंगेच पाणी म्हणून साठवून ठेवतात. स्नान करण्याचा आणि गुरूचा वृषभ राशीत प्रवेश याचा काही संबंध? विचारच करायचा नाही असे ठरवले तर धर्माच्या नावाखाली आपण काहीही करायला तयार असतो. सदर शाही स्नानाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण केले जाते. आंघोळीला निघालेले नग्न साधू पाहण्यात सार्थकता मानणारे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार आपल्या मुलांमध्ये कितपत रुजवतील याबद्दल शंका आहे, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, गाडगे महाराज, कबीर यांनी कधीही शाही स्नान केल्याचा उल्लेख नाही. पुरोगामी महाराष्ट्रात कुंभमेळ्याच्या शाही स्नानाचे दूरदर्शनवरून प्रक्षेपण करणारे राज्यकर्तेसंतांच्या विचाराची खिल्ली उडवत आहेत असे वाटते. दूरदर्शनवरून प्रक्षेपण केले म्हणून तेच बरोबर आहे असे समजणे म्हणजे विज्ञानाची चेष्टा केल्याचा प्रकार आहे. काही साधु गांजा ओढत बसलेले, काहीजण जटा वाढवून एका पायावर उभे, तर काहीजण खाली डोके वर पाय केलेल्या अवस्थेत अतात. अशा अवस्थेत असलेल्या साधूंचा समाजाला काय उपयोग? समाजाच्या कोणत्या प्रश्नावर त्यांनी अशा प्रकारचे आंदोलन केलेले असते? याचे उत्तर नकारार्थीच आहे. 2003 सालच्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी व साधूंच्या सुखसोयीसाठी महाराष्ट्र सरकारने 400 कोटी रूपये खर्च केले होते. तेच पैसे शेतकर्यांसाठी खर्च केले असते तर नंतर झालेल्या शेतकर्यांच्या आत्महत्या तरी वाचल्या असत्या. पण असे होणे शक्य नव्हते. नाशिकच्या याच कुंभमेळ्यात एका साधूने चांदीची नाणी फेकली. ती नाणी गोळा करण्यासाठी जी झुंबड उडाली त्यामध्ये 40 जण मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेनंतर ना पोलीसात तक्रार, ना साधूला अटक, ना कुंभमेळा रद्द! सारेच अतर्क्य ! आणि आताही फेब्रुवारी 2013 मध्ये प्रयाग येथे 37 जणांचा मृत्यु झालेला आहे. दुर्घटनेनंतर मृतांना पाच लाख रूपये सरकारी मदत, रेल्वेची पाच लाख रु. अतिरीक्त मदत देऊ करण्यात आली आहे. समाजाची दैनंदिन भूक भागवण्यासाठी अन्नाची पैदास करणार्या शेतकर्याने आत्महत्या केली तर मात्र एक लाख रू. मदत. हा भेदभाव ज्याला कळत नाही त्याच्या हेतूबद्दल आणि राजकारणाबद्दल शंका येते. आपण किती दिवस धार्मिकतेच्या दंभामध्ये अडकून पडणार.
सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे गुन्हा ठरतो मात्र साधुच्याकडून धर्माच्या नावाखाली गांजा, अफु आदी मादक द्रव्याचा व्यापार व वापर खुलेआम सुरू असतो. मनावर ताबा मिळवण्यासाठी अथवा चिंतनासाठी आणि विश्वशांतीसाठी मौन व्रत धारण करणारे काही मौनी साधू या मेळ्यात आहेत. विद्वान होण्यासाठी मौनव्रत धारण करावे लागते हा नैसर्गिक दृष्ट्या विचित्रच प्रकार आहे. मौनव्रत पाळून जर एखाद्याचे प्रश्न सुटले असते तर जनावरांचे कोणतेच प्रश्न शिल्लक राहिले नसते. कुंभमेळा म्हणजे महाभिक्षुकांची, व्यापार्यांची, संधीसाधुंची साधुवेष चढवून फिरणार्या चोर दरोडेखोरांची चंगळच चंगळ. यात राजकारणी व उद्योगपती, सेलीब्रीटी असतील तर नवल वाटू नये. गंगेचं पाणी जर एवढं पवित्र असेल तर ते फिल्टर न करता या लोकांनी पिण्यासाठी अथवा आंघोळीसाठी कायमस्वरूपी वापरावे. लोकसभेच्या अध्यक्ष महिलेने कुंभमेळ्यात आंघोळ करणं आणि त्याचं समर्थन करणं हे लोकशाहीतील आधुनिक आणि वैज्ञानिक विचारांची एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. ज्या महिलेला धर्माने तुच्छतेची वागणूक दिली त्याच धर्माच्या कर्मकांडाची भलावण करून समाजसुधारकांनी मिळवून दिलेल्या वैचारीक ठेव्याची पायमल्ली केली असंच म्हणावं लागेल.
सरकारने कुंभमेळ्यासाठी राहुट्या, रस्ते, वीज, पाणी यांची सोय करून एवढा का रस घ्यावा हेच कळत नाही. धार्मिक कर्मकांडासारख्या ठिकाणी राबवण्यात येणार्या योजना पाहिल्या तर कष्ट करणार्या या शेतकरी, कष्टकरी शेतमजूरांना या गरजांसाठी का झगडाव लागत हेच समजत नाही. तीन कोटी लोकांनी स्नान केल्यानंतर नदीचे पाणी पवित्र झाले म्हणायचे की आंघोळ करणारा. कुंभमेळ्यात तीन कोटी लोकांनी स्नान करून गर्दीचा आजवरचा उच्चांक केला यात भारतीयांनी धन्यता मानायची? का ऑलिंपीकमध्ये पदकांचा उच्चांक संशोधनात उच्चांक, नोबेल पुरस्कार मिळवण्यात उच्चांक, साहित्याच्या क्षेत्रात उच्चांक यामध्ये धन्यता मानायची!
परदेशातील लोक कुंभमेळ्याच्या संशोधनासाठी आले असा हाकाटा पिटला जातो. आपल्याला सुद्धा हे ऐकून मन भरून येत. आपल्या संस्कृतीचा हेवा वाटतो. ते संशोधनासाठी येतात का आपण किती भंपक आहोत याचा वेध घेण्यासाठी येतात हे लक्षात घेण्याची गरज आहे. इतर वेळेला परदेशातील नागरिकांच्या विषयी तुच्छ बोलायचं आणि यावेळेला त्यांचं कौतुक करायचं. घाण पाण्यात आंघोळ करणार्या या तीन कोटी आणि त्यातील बहुसंख्य नग्न, जटाधारी व्यक्तींना चांगल्या हेतून पहायला येणार्या व्यक्तीच्या बुद्धीची किव करावीशी वाटते.
दक्षिण कोरीयातील सेऊल येथे हानयांग विद्यापीठात 2011 साली संशोधनासाठी मी काम करत असताना एक दिवस नदी किनारी फिरायला गेलो. बरोबरच्या मित्राला म्हटलं की, नदीचं पाणी किती स्वच्छ आहे आणि परिसर फारच सुंदर आहे. तर मित्र म्हणाला, “सर ही नदी नाही हा नाला आहे आणि ते गटाराचं पाणी आहे.” अचंबीत होण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. परदेशातील माणसं गटारीच्या आसपासचा परिसर पिकनिक स्पॉटमध्ये रूपांतरीत करीत असतील तर ते आपल्याकडील नदीत आंघोळ करणार्या माणसांना पाहायला कोणत्या उद्देशाने येत असतील हे सांगण्याची आवश्यकता भासू नये.
गुरू हा ग्रह आकाशामध्ये सायंकाळी तेजस्वी चांदणीच्या रूपात दिसतो (साधु काय किंवा तीन कोटी स्नान करणारे महाभाग काय यापैकी कोणीही गुरु निश्चितच पाहिलेला नाही. याबद्दल मला निसंशयपणे खात्री आहे.) गुरुला सुर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी बारा वर्षेलागतात. ग्रीकांनी म्हणजे पाश्चात्यांनी आकाशाचे बारा भाग केले व प्रत्येक भागामध्ये येणार्या तार्यांच्या समुहाला रास म्हणून संबोधले. एकूण बारा राशी पाश्चात्यांनी केलेल्या आहेत. बारा राशींतून एक फेरी पूर्ण करण्यासाठी गुरुला बारा वर्षेलागतात याचाच अर्थ गुरु दरवर्षी एका राशीमध्ये वास्तव्य करतो. सिंहस्थ पर्वणी म्हणजे गुरूचा सिंह राशीत प्रवेश. 2003 साली नाशिक येथे कुंभमेळा भरला होता आता बारा वर्षानंतर 2015 साली तो भरणार आहे. कारण सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर परत सिंह राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी गुरूला बारा वर्षेलागतात. नक्षत्र ही संकल्पना भारतीयांची तर रास ही संकल्पना पाश्चात्यांची. मग भारतीय संस्कृतीमधील एखादा सण अथवा उत्सव साजरा करण्यासाठी पाश्चात्यांच्या संकल्पनेचा वापर तथाकथीत संस्कृती रक्षकांना करावा लागतो हे अनाकलनीय वाटते.
गुरू ग्रह आपल्यापासून 63 कोटी किलोमीटर अंतरावर तर वृषभ राशीतील तारे आहेत जवळपास 68 प्रकाशवर्षे दूर (68,00,00,00,00,00,000 किलोमीटर) या अंतरांची कल्पनाच न केलेली बरी. गुरुचा आणि वृषभ राशीचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, त्याचा आंघोळीशी आणि पाप धुवून जाण्याशी तर बिलकुल नाही. परंतु धार्मिक रंग चढला कि कशाचा उपयोग कशासाठी करतील याचा नेम नाही. स्वत:च्या आर्थिक, सामाजिक, राजकीय फायद्यासाठी मानवनिर्मित कथा पिकवून आपली तुंबडी भरण्याचा हा बिनभांडवली उद्योग.
धर्म आणि विज्ञान यांचा नेहमी संघर्ष होत आलेला आहे. यात विज्ञान हे नेहमीच वरचढ ठरलेले आहे. परंतु धर्माला ते कदापीही मान्य झालेलं नाही आणि मुख्यत्वे विज्ञानही त्याबद्दल आग्रही नसते. विज्ञान हे सत्य आणि वस्तुस्थितीवर आधारीत एक विचारप्रणाली आहे. तिचा हेतू मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करणे एवढाच आहे. परंतु स्वार्थीवृत्तीच्या काही प्रवृत्ती विज्ञानाचा गैरवापर करत भारतीय समाजाला धार्मिक क्षेत्रात गुंतवणूक ठेवण्यात यशस्वी होत आहेत असे खेदाने म्हणावं लागतं.
– प्रा. डॉ. नितीन शिंदे