Categories
कायदा

प्रबोधनाच्या चळवळीला कायद्याची जोड हवी!

जानेवारी - २०१४

अंनिस वार्तापत्राच्या संपादकांचा फोन मला आला. “जादूटोणा विरोधी कायदा विशेषांक जानेवारी 2013 काढायचा आहे. डॉ. शैलाताई दाभोलकरांची मुलाखत घेऊन लगेच पाठवून द्या.” मी शैलाताईंशी संपर्क साधला. त्या दापोलीत आणि मी सातार्‍यात शैलाताईंनीच मार्ग काढला, “मी रविवारी दुपारी चारला तुमच्या घरी येते. आपण बोलू.”

शैलाताई प्रवासांने खूप दमून गेल्या होत्या. विश्रांती घेतील. नंतर बोलता येईल. असा माझा होरा होता. लगेच त्या आल्या “आता विश्रांती नाही. अगोदर अंनिसचं काम, नंतर इतर गोष्टी” वेळ न घालवता मी विचारले “शैलाताई! डॉक्टर, सतत नवीन नवीन उपक्रम सुरू करत असत. त्यावेळी तुमच्याशी बोलत असत का?” यावर त्या म्हणाल्या, “डॉक्टर कुशल संघटक होते. ते संघटन पूर्ण लोकशाही पद्धतीने चालवत असत. ते सतत फिरत असत. फिरताना जो जो भेटेल त्याच्याशी बोलत. कायद्याच्या बाबतीत तर त्यांनी अनेक पातळीवरील लोकांशी चर्चा केली. त्याच्या प्रचारासाठी कायद्याच्या गरजेवर भाषण करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रवृत्त केले. त्यासाठी अनेक मोहीमा राबविल्या. रक्ताच्या सह्या गोळा केल्या. थोबाडीत मारून घेतले. अनेकदा उपोषण केले. धरणे धरली. या प्रत्येक कृतीत प्रत्येक कार्यकर्ता सहभागी होत गेला. कारवा बनता गया.”

“हे सर्व करण्यात डॉक्टरांना कोणता फायदा होत होता? असा प्रश्न विचारताच शैलाताई म्हणाल्या, “ते म्हणायचे या सर्वातून मला आनंद मिळतो. माझे जीवन समृद्ध होते. आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आनंदासाठी काम करा. असा त्यांनी पाठ दिला होता. आणि हे सर्व करण्यासाठी लागणारा कणखरपणा त्यांच्यात होता. ते सतत शासन दरबारी, मंत्रालयात हेलपाटे घालत राहिले. बर्‍याच वेळा प्रा.एन.डी.पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असत. एन.डी.सरांनीसुद्धा या वयात कधी कंटाळा केला नाही. मंत्रालयात जाण्याची वारंवारता अलिकडे खूप वाढली होती. अशा वेळी अविनाश पाटील न थकता त्यांच्या बरोबरच असे. या कायद्यासाठी दिवसच्या दिवस मंत्रालयात बसून रहात. भुकेची शुद्ध नसे. लागलीच तर कँटिनमध्ये थोडे खाऊन घेत. असेच एकदा ते मला सांगत होते, जेवण घेत असताना एक गृहस्थ त्यांच्याजवळ आले. क्षणभर थांबले आणि म्हणाले, “आपण नरेंद्र दाभोलकर का?” यावर डॉक्टर उत्तरले, “हो! बोला!”

ते गृहस्थ अतिशय आदराने म्हणाले, “खूप दिवसाची माझी इच्छा होती तुम्हाला जवळून पाहावं. तुमच्याशी बोलावं.” पुढे ते म्हणाले, “मी एक शिक्षण संस्था चालवतो. आमची पाच सहा कॉलेजेस आहेत आमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांत तुमचे विचार रूजवायचे आहेत. त्याची सुरवात करायला तुम्ही आमच्याकडे याल का?” डॉक्टर लगेच हो म्हणाले. संबंधित व्यक्तींचा मोबाईल नंबर, पत्ता स्वत:च्या पॉकेट वहीत नोंदवून घेतला. त्या भागात गेल्यानंतर वेळ काढून त्या कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी बोलत. अशा प्रकारे प्रबोधनाचे बीज रूजविण्यासाठी अनेक जागा मिळत गेल्या. अशी ठिकाणे कितीही अडचणीच्या ठिकाणी असोत. डॉक्टर तेथे जात. तेथील तरूणांना स्वत:च्या विचारांशी जोडून घेत. आणि पुढे सतत त्यांच्या संपर्कात रहात.”

बोलणे पुढे चालू ठेवत मी कायद्याचा विषय काढला. म्हणालो, “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1989 मध्ये झाली. आणि लगेच दोन तीन वर्षांत त्यांना कायद्याची निकड का भासू लागली?”

शैलाताई क्षणभर थांबल्या. आणि म्हणाल्या “सुरवातीच्या काळात अशा काही घटना घडल्या की, कायद्याच्या बडग्या शिवाय आपण अघोरी अंधश्रद्धेचे बळी थांबवू शकत नाही. एकदा ते म्हणाले होते, “कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळील नांदणीचा रमजान गुंडू शेख पिसाळलेले कुत्रे चावलेल्या रोग्यास झाडपाल्याचे औषध खायला देत. पिसाळलेले कुत्रे चावले असता रेबीज नावाचा रोग होतो. त्याला जगात औषध नाही. रोग्याचा मृत्यू हमखास ठरलेला असतो. कुत्रे चावले असता प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन 14 इंजेक्शन्स देणे हाच त्याला खात्रीचा उपाय आहे. हे डॉक्टर असल्याने आम्हाला माहीत आहे. डॉ. दाभोलकरांनी डॉ. प्रदीप पाटील यांच्या मदतीने, सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये रेबीजने मेलेल्या रोग्यांचे घरचे पत्ते मिळविले. कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांच्या घरी भेटी दिल्या. चौकशी केली. मेलेल्या प्रत्येक व्यक्तीने नांदणीचे औषध घेतले होते. रोग बळावल्यानंतर त्यांना सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. तेथेच त्यांचा शेवट झाला होता. समितीने कोर्टात केस घातली. हे औषध देण्यावर स्टे द्यावा. त्यासाठी पुरावे सादर केले. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कोर्टाने या देशी औषधांवर बंदी घातली नाही. लोक औषध खात राहिले. आणि मृत्यूला जवळ करत राहिले. अशा वेळी प्रबोधनाच्या चळवळीला कायद्याची निकड जाणवू लागली. आणि म्हणून डॉ. दाभोलकर कायदा होण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्याचसाठी ते वीस वर्षे झगडले. यातच त्यांची आहुती गेली.”

“अविनाश पाटील यांना कायद्याची ही प्रक्रिया पूर्ण माहीत होती. डॉक्टरांच्या नंतर सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या कायद्यासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. कार्यकर्ते समविचारी संघटना, हितचिंतक कायद्याच्या पाठीशी उभे केले. पुढील सर्व नियोजन अविनाश पाटील टीमने पूर्ण केले. डॉक्टरांच्या वाटचालीतील पुढचे रूप म्हणजे ही टीम होय.”

“शैलाताई! डॉक्टरांच्या खूनानंतर जगभर कायद्यासाठी सह्यांची मोहीम राबविली गेली. याबाबत सांगू शकाल?”

यावर उत्साहाने शैलाताई बोलू लागल्या. “यासाठी अतिश दाभोलकर, सुगत दाभोलकर आणि अविनाश पाटील यांनी खूप मेहनत घेतली. त्यासाठी www.Actnow Bharat, Vivek ही साईट निर्माण केली. सर्व वैयक्तिक कामे बाजूला ठेवून फक्त या साईटसाठी वेळ काढला. त्यावर जगातील हजारो मान्यवरांनी पहिल्या दोन दिवसांत कायदा व्हावा म्हणून सह्या केल्या. यामध्ये जगातील सहाशे नामवंत व मान्यवर शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत.”

“शैलाताई वारकर्‍यांनी बर्‍याच अडचणी निर्माण केल्याचे ऐकले होते त्याचे काय झाले?”

“अहो सर! काय सांगायचं तुम्हाला. हा कायदा अखेरच्या टप्प्यात आला तेव्हा अनेक संकटे उभे राहिली. सनातन्यांनी या कायद्याविषयी खोटानाटा प्रचार केला. वारकर्‍यांची दिशाभूल केली. यावेळी वारकर्‍यांचे खरे नेते आणि प्रा.डॉ.सदानंद मोरे मदतीला धावून आले. त्यांनी वारकर्‍यांचे गैरसमज दूर केले. कायदा समजावून सांगण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून मोहिमा काढल्या. त्यामुळे वारकर्‍यांत घुसलेले सनातनी मागे पडले. सर्व वारकर्‍यांनी एकमतांने कायद्याला मान्यता दिली.”

“डॉक्टरांच्या जन्मदिनी नोव्हेंबरमध्ये मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली होती. प्रचंड संख्येने विवेकवादी जनता रॅलीत सामील झाली होती. हे कसे शक्य झाले?” असा प्रश्न विचारताच शैलाताई म्हणाल्या, “रॅलीत जनता सामील झाली. परंतु त्याची प्रचंड जुळणी करावी लागली होती. मोठमोठे फ्लेक्स बोर्ड तयार करून लावणे. मुंबईतील विवेकवादी, समविचारी आणि पुरोगामी संघटना एकत्र करणे, घोषणा तयार करणे, मार्ग आखणे. इत्यादी नियोजन अनीश पटवर्धन आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांनी केले होते. त्यामुळे हे शक्य झाले. डॉ.एन.डी. पाटील त्यामध्ये सहभागी होते.”

शैलाताईंचा मूड पाहून हळूच मी प्रश्न केला. “शैलाताई, प्रत्येक वेळी कायदा होऊ घातला जात होता. पण तो मागेही टाकला जात होता. यामुळे डॉक्टरांना नैराश्य आल्याचे आपणास कधी जाणवले का?”

यावर शैलाताई म्हणाल्या, “डॉ. दाभोलकर निराश कधीच झाले नाहीत. कारण त्यांना माहीत होते की, हा लोकशाहीचा भाग आहे. लोकांना पटवावे लागणार. काही वेळेला मागेही सरकावे लागणार. लोकशाहीत सहनशीलता असावी लागते. त्यांची सहनशक्ती प्रचंड होती. त्या सहनशक्तीचा वापर कसा करायचा हेही त्यांना माहीत होते. कार्यकर्त्यांच्या ज्या गोष्टी टोचल्या, तेथे त्यांनी सहन करणे पसंत केले नाही. त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या.”

मुलाखतीचा शेवट आला होता. शैलाताईंना शेवटचा प्रश्न विचारला, “शैलाताई, अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून आता आपल्या काय अपेक्षा आहेत?”

शैलाताई उत्तरल्या, “डॉक्टरांनी कार्यकर्त्यांसाठी खूप लिहून ठेवले आहे. ते आत्मसात करावे. उदाहरणार्थ संघटना बांधणी पुस्तिका. वैचारिक तयारी वाढवावी. त्यासाठी खूप वाचावे, कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे की, संघटनेत कोणी मोठा नाही. कोणी छोटा नाही. आपली भूमिका ठरवून आपले शाखेचे काम विभागून घ्यावे. झाडू मारणारा असो की मीडियावर जाऊन मुलाखत देणारा असो. दोघेही तितकेच महत्वाचे आहेत. चळवळीमध्ये आपापसात कधीही स्पर्धा नसते ही विवेकी वृत्ती सर्वांनी बाळगली पाहिजे.”

डॉ. शैला दाभोलकर

मुलाखतकार : कुमार मंडपे. मोबा. 9527003548