Categories
मानसमित्र

प्रेमळ, जाणकार व विज्ञानवादी मानसमित्र बनूया!

ऑगस्ट - २०१३

            सर्वमंगल, सर्वज्ञ, सर्वशक्तीमान देव आपला प्रतिपाळ करतो, सर्वांचे कल्याण करतो अशी कल्पना लोक का करतात? संकटकाळी सर्व आपल्यापासून दूर पळत असताना नेमके देवाने आपल्याबरोबर असणे, मदतीला धावून येणे यापरता दुसरा दिलासा नसेल. माणसे व निसर्ग आपल्याला फसवीत असताना, आपले नुकसान करीत असताना, त्या सर्वांना कंट्रोल करू शकणारा देव आपल्याला मदत करील याची आशा असण्याने माणसे स्वत: खचून जाण्याचे थांबविताना दिसतातही. एक वेळ स्वत:च्या मनाचा पत्ता नसला तरी चालेल, पण देवाचे नाव, पत्ता फोटो, मूर्ती वा देवाचे कुठलेही प्रतीक जवळ असणे पुरेसे असते. देव उपलब्ध नसेल तर देवाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट व कॉन्ट्रॅक्ट (contacts and contracts) असणारी पुरोहित मंडळी, बाबा, बुवा, माता, गुरू आपल्याला परिचित व आपल्याशी संपर्कात असतील तरी पुरेसे असते. देवाकडे तक्रार नोंदवायची, फिर्याद दाखल करायची, न्याय मागायचा, आपली बाजू न्यायाची नसेल तर वशीला लावायचा. एवढे सगळे करण्यासाठी देऊळ, मूर्ती, फोटो वा एजंट कुणी वेळेवर सापडले म्हणजे झाले. प्रत्यक्ष भेटता येत नसेल तर नुसताच संदेश, आदेश, दृष्टांतही पुरेसा असतो. मनात जाणीव एवढी हवी की, त्या त्या संकटातून तात्पुरती (भ्रामकही चालेल) सुटका झाली तर श्रेय स्वत:ला वा बाजूच्या मदतकर्त्यांना देण्याऐवजी ‘त्या ईश्वरी शक्तीला’ ते श्रेय देण्याइतका समजूतदारपणा व अक्कल असायला हवी. ही अक्कल नसेल तर अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांसारखे स्वत:ला एकट्यालाच(जमल्यास इतर विज्ञाननिष्ठांच्या मदतीने) संकटाशी झगडावे लागेल. स्वत:तली ताकद ओळखण्याचे कष्ट न घेता दैवी ताकदीला जोडून घेऊन तिलाच कामाला लावणे हे म्हणून देव मानल्यावर सहजसोपे जाते. संकट का आले तेही तज्ञ एजंटांकडून लगेच कळू शकते. येऊन जाऊन कुणी तरी दैवी शक्तीच्या डोक्यात आपल्याविरूद्ध नाही नाही ते भरवून तिला आपल्याविरूद्ध कामाला लावल्यानेच तर संकट आले असणार हे दैववादी अचूक जाणून असतो. आपल्या आजूबाजूला मित्रांपेक्षा मत्सरी शत्रूच फार आहेत हे चाणाक्षांना ठाऊक असतेच. त्यातल्याच कुणीतरी पाशवी दैवी शक्तीला लालूच दाखवून, मूठ, करणी, भानामती इ.द्वारे आपली वाट लावण्याचा प्रयत्न केला आहे, हे तर माणसांच्या जगात वावरणार्‍या कुणाही यशस्वी व त्यामुळे झालेल्या हलक्या काना-मनाच्या माणसाला वाटणे फारच सोपे असते. पुन्हा यावर उपाय(खर्चिक, अमानुष, बेकायदेशीर का असेनात) तयार असल्यामुळे पूजा, बळी, विधी, उतारा करण्यासाठी माणसे तत्परतेने कामाला लागतात.

            देव, दैव, मंगल व पाशवी सनातन वावर व संघर्ष कित्येक वर्षेमाहीत असल्याने संकटात सापडलेल्या, भांबावलेल्या व्यक्तीला अघोर विद्येच्या ‘जाणकारांचा’ आधार त्वरीत दिलासा देतो, सहज स्वीकारता येतो, सुखावह वाटतो. दु:खाच्या अंधारात अशी ठिणगी, मिणमिणता प्रकाश देत असेलही. अंतिमत: ती ठिणगी घर संसार पेटवून त्याची राखच करते. दु:ख बाजूलाच, दु:खितालाच संपविणार्‍या या अमानुष, अघोरी उपचारांचा आधार माणसे निर्विचार अधिरतेने घेतात. पुढचे सारे दु:ख पुढचा सत्यानाश दैववादाच्या संमोहनाने बधीर निर्विकारपणे स्वीकारतात. बळी घेऊन, मग तुरूंगात फाशी/जन्मठेपेची वाट पहात पहात हे अंधश्रद्ध खुनी तेव्हाही काळ्या जादूच्या संमोहनातून बाहेर आलेले असतीलच, असे नाही. डाकिणीचा नाश केल्याचे समाधान, नरबळी देऊन दैवी संपत्तीची प्रतिक्षा करणारे तुरूंगातही आगामी सुखद काळाकडे आशाभूत दृष्टी लावून फिरताना दिसतात.

            प्रयत्नवाद सोडून दैवी शक्तींचा सहारा घेणार्‍यांना जगण्याची विविध अंगे-भौतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जाणण्याचा त्रास घेण्याची जरूरी वाटत नाही. जगात आपल्या आकलनापलिकडचे काही तरी आहे, हे वाक्य तर भल्याभल्या विचारवंतांना डोके खाजविण्याच्या त्रासापासून मोकळीक देते. सृष्टी जाणण्यासाठी अध्यात्माने, ध्यान धारणेने, समाधीने, साक्षात्काराने मदत केली की, गणित, भूमिती, पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र इ.वैज्ञानिक ज्ञानशाखांनी मदत केली हा प्रश्नच त्यांना पडेनासा होतो. माणसे, निसर्ग व सजीव निर्जीवांचा परस्पर संबंध आपल्याला आत्मा, परमात्माविषयक ब्रह्मज्ञानाने समजला की, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अनुवंशिकशास्त्र इ.विज्ञान शाखांनी तो स्पष्ट मांडला, हाही प्रश्न त्यांना टाळावासा वाटतो. सृष्टीचा चालक आहे, निसर्गाला स्वत:ची बुद्धी आहे. सर्व काही पूर्वनियोजित व म्हणून ‘निश्चित’ आहे, असे ते बिनदिक्कत म्हणतात. देव असा का वागतो हा अडचणीत टाकणारा प्रश्न विचारणार्‍यांना ते निर्बुद्ध समजून वाळीत टाकतात. मानसमित्राला या तथाकथित ‘मित्रां’पासून वा अमानुष गुलामी मनोवृत्तीला प्रोत्साहन देणार्‍या ‘दैवी एजंटांपासून’ साध्या माणसांना वाचवायचे आहे, त्यांचे मानसिकच नव्हे तर शारीरिक व सामाजिक आरोग्यही जपायचे आहे. ‘स्पिरीट वा स्पिरिच्युअल अंगा’चे पुरावे नसताना, त्यात समाजाला गुदमरून टाकणार्‍या गूढवाद्यांपासून शोषितांना वाचविले पाहिजे.

            अहंकारी, हुकूमशहा, दैववादी, शोषक एजंटासारखे न बनता आपल्याला प्रेमळ, जाणकार, विज्ञानवादी ‘मानसमित्र’ बनायचे आहे. अपार भूतदयेने प्रेरित, माणसामाणसामधील वैचारिक मतभेदांना समजून घेत, या संघर्षात माणसांना शोषणापासून वाचवीत आपण विवेकी समाजनिर्मितीचे प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी मैत्री, आपुलकी, जिव्हाळा, करूणा यांची आवश्यकता जास्त आहे. आपली माहिती व विचार खरे असले तरी समोरच्या पिचलेल्या माणसाला ते आधारभूत वाटले, आपले प्रयत्न त्याला त्वरीत उपयुक्त ठरले तरच तो मानसमित्राचा आधार घईल व या खर्‍याखुर्‍या मानसमैत्रीचा स्वत:चा एक आधार बनेल! हे कसे जमविता येईल, याबद्दल सर्वांनी आपापल्या सूचना एकमेकांना कळवीत आपापसात संवाद घडवूया.

डॉ.प्रदीप पाटकर

patkar.pradeep@gmail.com