Categories
परिसंवाद

समाजाबद्दलच्या अगदी वेगळ्या जाणिवा विकसित करणारे हे साहित्य संमेलन

वार्षिकांक – २०१३

दाभोलकर म्हणतात ते बरोबर आहे की, महाराष्ट्रात खूप काहीतरी चाललेलं आहे. म्हणजे लोकांना अलिकडे असं वाटायला लागलं आहे की, आपला जो काही सामाजिक, राजकीय अजेंडा असेल तो पुढे रेटण्यासाठी म्हणून जे अनेक मार्ग आहेत, त्याच्यामध्ये साहित्य संमेलन हा सुद्धा एक मार्ग आहे. त्यामुळे आता जवळ जवळ 150 साहित्य संमेलनं मराठीमध्ये होतात. त्यामध्ये परस्परविरूद्ध अशी सुद्धा साहित्य संमेलनं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ – मध्यंतरी उद्योगपतींचे साहित्य संमेलनाच्या आयोजनास प्रारंभ झालेला होता. तेथे सारे उद्योगपती एकत्र जमत असत व साहित्यावर(?) चर्चा करीत असत. सध्या उद्योगपतींचे संमेलन भरतं की नाही ते माहीत नाही. पण पूर्वी ते भरत असे. त्या पाठोपाठ कामगार साहित्य संमेलन. ते मात्र आजही नियमितपणे भरतं. तर आम्हा लेखकांची एक गंमत असते. ते जिथे बोलावतील तिथे जातात. म्हणजे महिन्यापूर्वी उद्योगपतींच्या संमेलनात जे असतात, तिथे कविता वाचतात, कथा सांगतात, परिसंवादामध्ये भाग घेतात आणि उद्योगधंदे कसे वाढले पाहिजे हे तिथे सांगतात आणि आणि मग दोन महिन्यानंतर कामगारांचं साहित्यसंमेलन होतं तर त्या कामगारांमध्ये जाऊन ते पुन्हा तेच तिथे बोलतात….. म्हणजे तिकडे जे बोलायला पाहिजे ते तिकडे बोलत नाहीत- म्हणजे उद्योगपतींच्या संमेलनात त्यांनी असं बोलायला पाहिजे की, अरे बाबा जरा लोकांना नीट जगता येईल असं तरी काही पैसे वगैरे देत जा. पण तिथे सांगतात-उद्योग वाढला पाहिजे. व्यापार वाढला पाहिजे इत्यादी. आणि इकडे(कामगारांमध्ये) जाऊन ते शोषणाच्या नावाने वगैरे त्या कामगारांना सांगतात. ही दोन उदाहरणे ही मराठीमधल्या बहुसंख्य लेखकांना स्वत:ची काही मते आहेत की नाहीत याबद्दल संभ्रम निर्माण करणारी आहेत. आता तर जातींची संमेलनं सुरू आहेत. संमेलनाचे आयोजक मोठे चतुर असतात. ते असं सांगतात की, जातींचं नाव जरी असलं तरीही हे काही एका जातीचं संमेलन नाही. त्यात तुम्हाला यायला हरकत नाही असं ते सांगतात. ब्राह्मण साहित्य संमेलन असो की, मराठा साहित्य संमेलन असो की, माळी साहित्य संमेलन असो, त्यांना जर तुम्ही विचारले की, ही संमेलने कशासाठी? तर ते सांगतात – ‘अहो दलित साहित्य संमेलन नाही का? आणि तिथे तुम्ही सगळे जाता, अगदी आवर्जून?’ एकंदरीत काय की आता जवळ जवळ 140-150 साहित्य संमेलनं होतात ठिकठिकाणी.

पण जे साहित्यसंमेलन या ठिकाणी होत आहे, ते मला असं वाटतं की जरा अधिक महत्वाचं आणि ज्याला व्यापक असं उद्दिष्ट आहे अशा प्रकारचं हे संमेलन आहे. म्हणजे ते कुठल्या जातींचं, कुठल्या धर्माचं नाही. कारण आता धर्मांची साहित्य संमेलनं सुरू झाली आहेत. ख्रिश्चन साहित्यसंमेलन, मुस्लिम साहित्य संमेलन आहेत आणि इतरही आहेत; तेव्हा अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांच्या पलिकडे जाऊन जीवनाचा आणि सामाजिक जीवनाचा विचार केला पाहिजे. आपल्या कार्यस्थळी भिंतीवर जी वेगवेगळी वचने लावली आहेत, ती निश्चितच वेगळी आहेत. वेगळ्या जाणिवा निर्माण करणारी आहेत. एकंदरीत काय की समाजाबद्दलच्या अगदी वेगळ्या जाणिवा विकसित करणारे हे साहित्य संमेलन आहे. आणि पिंपरी चिंचवड अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त हे संमेलन सुरू होत आहे. मी असं गृहीत धरतो की आता हे संमेलन दर वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी होत राहील कारण ती काळाची गरज आहे. आणि आवश्यक आहे.

साधारणत: आपल्याला असं दिसतं की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपण पुष्कळ काही प्रमाणात उदार होतो असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं की, आपल्या सबंध स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे काम करीत होते त्या लोकांचा काही प्रभाव असेल आपल्यावर, काही संस्कार असेल. पंडीत नेहरूंशी कितीही मतभेद असले तरीही पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जे सगळे लोक स्वातंत्र्याच्या आसपास होते आणि स्वातंत्र्यानंतरही काही काळ होते-गांधी लगेचच गेले स्वातंत्र्यानंतर- तेव्हा त्यांचा काही प्रभाव असेल, पण पुष्कळसा तो उदार विचारांचा काळ होता. म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी घडत होत्या. समाजामध्ये अनुदार अशा प्रकारच्या घटनाही घडत होत्या पण त्याबरोबरच एक त्या घटनांच्या तिथे त्वरीत जाऊन काही दिलासा देणं, मदत करणं, तो प्रश्न लावून धरणं, हेही घडत होतं. याचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. दलित शिष्यवृत्ती वाढावी यासाठी समाजातल्या सर्व स्तरांतील आणि जातीतील लोकांनी आंदोलने केली होती. तसेच ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळही त्या दृष्टीने महत्वाची होती असे म्हणावे लागेल. या चळवळीचे नेतृत्व बाबा आढाव करीत होते. आज अशी परिस्थिती आहे की, लोक स्वयंकेद्रित झालेले आहेत. आणि त्यांना त्यांचा प्रश्न सुटेल तिथे जाण्याची त्यांची तयारी असते याचा अर्थ असा की, पूर्वी जे आदानप्रदान होत होतं ते जवळजवळ गेल्या 20-25 वर्षांमध्ये थांबलेलं आहे. म्हणजे नव्या काळामध्ये एक दाभोलकर जर सोडले तर समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये जाऊन काही सामुहिक भूमिका घेण्याचा प्रयत्न करणारे आता कमी झालेले आहेत. असं आपल्याला दिसतं. स्वयंकेंद्रीत वृत्ती आणि लाभापलिकडे पाहावयाचे नाही अशी आजची मानसिकता झाली आहे. सामुहिक उन्नयनाच्या ठिकाणी लोक जाऊ इच्छित नाहीत. तेव्हा विचार, पुनर्विचार इ.सार्‍याच बाबी थांबल्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

विचार दुबळा ठरत असल्याची जाणीव आणखी एका ठिकाणी होते. आपला समाज सेलिब्रेटीजकडे अधिक आकर्षित होतो. त्यांचे अनुकरण करतो. तेव्हा हे सेलिब्रेटीज काय करतात? तर ते तीर्थक्षेत्री जातात, देवळांमधून सोने अर्पण करतात. उदाहरणार्थ पहाटे पाचला उठून अमिताभ बच्चन हा सिद्धीविनायकाच्या देवळात अनवाणी पायी जातो किंवा आणखी कुठेतरी जाऊन 1-2 किलो सोनं अर्पण करतो. मग लोकांना असं वाटायला लागतं की – ‘अरे हे लोक, म्हणजे अमिताभ बच्चन, ज्याला आपण अँग्री यंग मॅन म्हणत होतो तो हे सगळं करतो आहे. तेव्हा हेच आदर्श असेल असा विचार सामान्य माणूस करतो. आणखी एका वस्तुस्थितीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर समाजातील ‘जैसे थे वादी’ मंडळी अतिशय प्रभावीपणे करून घेत आहेत. त्यामुळे ‘बुवा’ आणि ‘बाया’ फार निर्माण झाल्या. सकाळी उठल्याबरोबर कुठलंही चॅनल घ्या तुम्ही; तर या चॅनलवरती तुम्हाला असं दिसेल की कुठलातरी एक बुवा आणि कुठलीतरी एक बाई असते; आता ही बाई देखणी असली तर अधिक चांगलं ऐकलं जातं. म्हणजे कुणीही येऊन चालत नाही. त्यांचा चांगला नट्टापट्टा, डोक्याला एक छान फडकं बांधून-मग ती काय बोलणार हाही एक संशोधनाचा मुद्दा आहे- ती काय बोलणार आणि लोक काय ऐकणार? आता दूरदर्शन हे जे आधुनिक माध्यम आहे, विज्ञानानेच दिलेले माध्यम आहे आणि त्याचा वापर तुम्ही आम्ही जे समाजामध्ये बदल व्हावा असं म्हणतो तर त्यांना(तुम्हा आम्हाला) नीटपणे करता आलेला नाही. मग त्याला वेगळी वेगळी कारणं असतील. आर्थिक कारण असेल, इतर कारणं असतील, पण त्यांना ते करता आले नाही. याच्यावर या सगळ्या बुवांच्या ताब्यामध्ये जवळजवळ सगळी माध्यमं गेलेली आहेत. आणि अत्यंत हिणकस प्रकारच्या गोष्टीसुद्धा ते सांगतात. आता हे सगळं काही बुद्धीला पटत नाही. पण मी आपल्याला सांगतो ह्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या महाराजांच्या कार्यक्रमाला लोक दोन/दोन हजारांचं तिकीट काढून 20/20 हजारांची गर्दी करतात. आणि मग सी.डी.असतेच, व्हिडीओ, ऑडिओ अशा प्रकारची साधनं असतात; दूरदर्शन चॅनलचा वापर केला जातो. म्हणजे विज्ञानाच्या सगळ्या साधनांचा वापर करून आपल्या समाजाला पुन्हा एकदा मागे नेण्याचा प्रयत्न किंवा बुद्धीचा वापर करू न देण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली 25 वर्षेजी उदार वृत्ती मी जी म्हणालो ती आता तशी राहिलेली नाही. उलट आज समस्या अतिशय तीव्र झालेल्या आहेत.

आता या सगळ्याच्या मुळाशी जी कारणं आहेत- त्यांचा मी इथे उहापोह करणार नाही- पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की जिला आपण अंधश्रद्धा असं म्हणतो, या सगळ्या अंधश्रद्धांच्या मुळाशी असणार्‍या ज्या गोष्टी आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि ती फार अवघड आणि वेळखाऊ अशा प्रकारची गोष्ट आहे. पण यश येणारच नाही असं नाही पण ही प्रदीर्घ प्रकारची प्रक्रिया आहे. ती कोणती? तर माझ्या दृष्टीने आपल्या देशामध्ये(इतर देशांमध्येसुद्धा) अंधश्रद्धांचा जो स्त्रोत आहे तो मुख्यत: धर्म या नावाच्या गोष्टीमधूनच निघतो. व्यवहाराच्या पातळीवर असे सांगणे ही अवघड गोष्ट आहे. परंतु हेच खरे आहे. आपली अडचण अशी आहे की, आपल्या भोवती असणारे 90% लोक हे धर्म या कल्पनेने प्रभावित झालेले आहेत. खरं तर धर्म या गोष्टीने जगामध्ये जेवढा हिंसाचार केला तेवढा हिंसाचार कुणीही कुठल्याही गोष्टीने केला नाही ही वस्तुुस्थिती आहे. मग ख्रिश्चन धर्मियांनी वेगवेगळ्या जागी जाऊन जे काही केलं ते आपल्याला दिसेल; ग्रीक धर्मियांनी केलं ते दिसेल; म्हणून या संदर्भात कुणीच मागे आहे असे समजण्याचे काही कारण नाही. हिंदू हे फार हुशार लोक असतात. ते इतक्या कुशलतेने काम करतात की आपल्या लक्षातच येत नाही. आपली मूर्ती ठेवून द्यायची. असा प्रकार ते करतात. म्हणून मी म्हटलं की, हिंदू फार चातुर्याने आक्रमण करतात. त्यांनी मंदिरं लुटलीच नाहीत असं नाही; त्यांनी मंदिरं लुटलेली आहेत. पण जगभरामध्ये धर्म या नावाची जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीने जगभरामध्ये जेवढी हिंसा केली तेवढी कदाचित दोन्ही महायुद्धांमध्ये सुद्धा झाली नाही. हे इतके असूनही एकूण समाज म्हणून विचार करता समाजाला वाटतं की धर्म या नावाची गोष्ट आवश्यक आहे. आणि त्यामुळेच कदाचित आपल्याकडे जे मोठे लोक आहेत, त्या मोठ्या लोकांनी धर्माचाच वापर करून घेतला. त्यात मग महात्मा गांधी असतील, न्यायमूर्ती रानडे असतील; यासारखे जे लोक आहेत हे सगळे लोक या धर्माचाच वापर करून समाजपरिवर्तन कसे घडविता येईल याचा विचार करीत राहिले असावेत असे वाटते.

थोडक्यात सांगायचे तर असे सांगता येईल की, समाजातल्या अनेक कुप्रथांचे मूळ आणि कूळ तथाकथित धर्मामध्येच असते. आपल्याकडच्या अनेक प्रथा परंपरा यांचा आधार काय? तर धर्म हाच त्यांचा आधार असतो. आणि या धर्माचंच एक अंग आपल्या देशामध्ये जात हे आहे-किंबहुना असं दिसतं आहे की प्रत्येक जात हा एक स्वतंत्र धर्म वाटावा अशी परिस्थितीसुद्धा पुष्कळशी आहे. म्हणजे उदाहरणार्थ अलिकडच्या काळामध्ये जे काही घडलं आहे, ज्या काही बातम्या येत आहेत ते तर आहेच आहे. पण त्यापेक्षासुद्धा एका प्रकारे या जात नावाच्या गोष्टी ह्या तुमच्या मनाला, बुद्धीला अत्यंत कुशलतेने आपल्या ताब्यात ठेवतात. आणि त्याबरोबरच एक दहशतसुद्धा असते. म्हणजे आता खाप पंचायतीबद्दल मी बोलत नाही. पण एकूण भारतीय माणसावर किती संस्कार झाले, गेल्या हजारो वर्षांपासून; तर त्याला अनैसर्गिक गोष्टीसुद्धा नैसर्गिक वाटायला लागतात; अपवित्र गोष्टी सुद्धा पवित्र वाटायला लागतात. जातीच्या परिघातच राहू इच्छिणार्‍या लोकांच्या हे लक्षातच येत नाही. हे वाईट आहे, क्रूर आहे, अमानवी आहे असं वाटण्याचा विवेकच हरवून गेलेला असतो. ही एका प्रकारची दहशतच असते. परंतु या दहशतीचा विशेष असा की, ती दहशत आहे, असे वाटतच नाही. या दहशतीतून अनेक गोष्टी निर्माण होतात. म्हणून मला असं वाटतं की, एकंदरीत आपल्या सगळ्याच जगण्यावर, किंवा एकंदरीत आमच्या सगळ्याच वागण्यावरती आमच्या देशामध्ये जर कोणाचा प्रभाव असेल, जर कुठल्या गोष्टीचा प्रभाव असेल, तर या जातींचा आणि जास्त धर्माचा आहे. आणि 21 व्या शतकामध्ये आपण आलो आहोत. आपला माणूस मंगळावरती जाणार आहे, जातो आहे- हे सगळं आहे; किंवा महासंगणक आपल्या देशाने बनवला वगैरे वगैरे. आणखी काही बनवलं आणि जगाचं जे महत्वाचं ज्ञान आहे ते आमच्याकडे यायला लागलं, असं खूप छान छान बोलता येतं. पण मी आपल्याला सांगतो की त्याच वेळी भारतीय माणूस आपल्या जातीच नव्हे तर पोटजातीही पाळतो. आणखी ज्याला आपण दलित समाजसमूह असे म्हणतो त्यांच्यामध्ये सुद्धा जाती आहेत, पोटजाती आहेत त्या अत्यंत निष्ठेने पाळल्या जातात. आणि ते सुद्धा सामान्य, न शिकलेले वगैरे लोकच पाळतात असं नाही; तर अगदी उच्चशिक्षित अशा प्रकारचे लोकही पाळतात. मध्यंतरी एकदा- म्हणजे उच्च जातीची गोष्ट आहे- मध्यंतरी एकदा, राजस्थानमधल्या ब्राह्मणांमधल्या एका पोटजातीचं संमेलन झालं. तर त्या संमेलनाला राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही हजर राहिले. आता माझ्या दृष्टीने अशा प्रकारे एका जातीच्या संमेलनाला न्यायमूर्तींनी जावं की नाही? तर त्याचे उत्तर माझ्या मते नाही असं आहे. पण त्यांना त्यामध्ये काही चुकीचं आहे असं वाटलं नाही. म्हणून उच्च जातींचं नाही तर बारक्या बारक्या पोटजातीसुद्धा आपापल्या जातींच्या रूढी, परंपरांनी बांधलेल्या राहतात. व्यक्ती जातीच्या आज्ञा पाळत राहतात. आणि हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे की जातींमध्ये आपण विभागून राहणं. त्यांच्यामध्येच आपल्याला सुरक्षितता वाटते, समाधान वाटतं; आणि त्याचबरोबर या जातींनासुद्धा जे एक पांघरूण ज्या धर्माने दिले आहे, त्या धर्मामध्येच अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाचा संकोच करतात; ज्या तुमच्या एकंदरित सामाजिक जीवनाचा संकोच करतात. म्हणून एका अर्थाने आपल्याला छोट्या छोट्या प्रथांच्या विरूद्ध, छोट्या छोट्या अन्यायांच्या विरूद्ध किंवा घटनांच्यामध्ये भूमिका घेतलीच पाहिजे.

म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये जातीय तणावातून काही घडलं तर तिथे आपण गेलंच पाहिजे; बोललंच पाहिजे. व्यापक अशा प्रकारचा जर खर्‍याखुर्‍या अर्थाने लढा द्यायचा असेल, तर धर्माचं कितीही कौतुक केलेलं असलं लोकांनी, तरीही आपल्याला त्यांच्याशीच लढा द्यावा लागेल. आणखी बघा – ही मात्र अतिशय अवघड अशी गोष्ट आहे आणि त्याचा अनुभव आपण अनेक कार्यकर्त्यांनी घेतलेला असतो. आपल्या सर्व रोगांचं मूळ हे धर्मामध्येच आहे. आणि त्याच्याशी संघर्ष करायचा, त्याच्याबरोबर लढा द्यायचा म्हणजे अत्यंत अवघड गोष्ट आहे. कारण सगळी मनेच जातीच्या आणि धर्माच्या मुशीतून घडून बाहेर पडलेली असतात. त्यामुळे धर्माविरूद्ध थोडंही बोललं की लोक चिडतात. बोलणार्‍याचं म्हणणं नेमकं काय आहे, तेही ऐकत नाहीत. याचा सर्वाधिक अनुभव मार्क्सवादी कार्यकर्त्यांना येतो. म्हणजे कम्युनिस्ट कार्यकर्ता कितीही चांगला असला तरी, कितीही प्रामाणिक असला, कितीही सत्वशील असला, कितीही करप्शन न करणारा असला तरी निवड करताना लोक(म्हणतात), ‘त्याचं काय आहे, तो धर्मच मानत नाही. मग त्याचा उपयोग काय? म्हणजे देवाच्या दारात बसणारा, धर्माच्या नावानं घोषणा देणारा करप्ट माणूस चालेल आम्हाला, बदमाश माणूस चालेल आम्हाला, गुंड माणूस चालेला आम्हाला, पण इमानदार माणूस नको कारण तो केव्हाही धर्माच्या विरोधात बोलतो.’ तर ही मानसिकता आहे, म्हणून आपल्या समाजातला अंतिम लढा मुळामध्ये धर्मकल्पनेशी आपल्याला लढावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीने एक पाऊल म्हणून मी या संमेलनाकडे पाहतो. म्हणजे ही चळवळ तर आहेच आहे. गेल्या 20-30 वर्षांपासून चालू आहे. आता या चळवळीने साहित्य संमेलन सुरू केलेलं आहे. म्हणजे संघर्षाचं हे एक पाऊल आहे असे म्हणता येईल.

आता साहित्य जेव्हा निर्माण होतं तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारचं निर्माण होत असतं. आज तर विपुल प्रमाणात निर्माण होत आहे. गरजेप्रमाणे निर्माण होतं. म्हणजे उदाहरणार्थ असं झालंय की उत्तम कांबळे यांची पुस्तकं किंवा माझी पुस्तकं जेवढी खपतात त्याच्या पस्तीस पट पुस्तकं ही स्वयपाकावर खपतात. खरी गोष्ट आहे. म्हणजे पुण्यामधल्या कमलाबाई ओगले नावाच्या ज्या लेखिका आहेत. त्यांचं स्वयंपाकाचं पुस्तक आहे त्याच्या कदाचित 60-70 आवृत्त्या निघाल्या असतील. आता जर तुम्ही असं म्हणालात की जे खूप खपतं ते श्रेष्ठ, तर स्वयंपाकावरची पुस्तकं सगळ्यात श्रेष्ठ! पण ती एक समाजाची गरज आहे. काय गरज आहे? त्याला मी वाईट म्हणत नाही. ती गरज अशी की एक काळ असा होता की घरामध्ये मुलींना स्वयंपाक शिकविण्यात येत असे. 8-9 वर्षांची मुलगी झाली की तिला आपल्या स्वयंपाक घरामध्ये न्यायचं, तिला थोडं थोडं शिकवायचं आणि मग लग्न होईपर्यंत तिला सगळा स्वयंपाक येत असे. आता नव्या काळामध्ये मुली शिकायला लागल्या; त्यांना आपलं करियर म्हणून व्हावसं वाटायला लागलं; आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना स्वयंपाक म्हणावा तसा येत नाही. आणि ते गृहीत आहे. पण स्वयंपाकाची जबाबदारी सामुहिक कार्य आहे असे अजून आपल्या समाजाला वाटत नाही. म्हणजे दोघे नोकरी करणार असतील आणि ती(दोघे) जर घरी आली तर नवरा असा आराम खुर्चीवर पाय ताणून बसतो आणि म्हणतो, ‘फार थकलो बुवा; आता जरा चहा आला तर बरं होईल.’ अरे पण तुझी बायको सुद्धा थकून आली आहे ना? तिचं काय? पण ते काही त्याच्या ध्यानी येत नाही. म्हणून मग नव्या काळामध्ये स्वयंपाकावर पुस्तकं खपणार याचं काही वावगं वाटून घेण्याचं कारण नाही. कारण ती एक काळाची गरज आहे. तशीच मॅनेजमेंटवरती येत असतील पुस्तकं तर तीही खपणार. कारण ती काळाची गरज आहे. या लाटेचा फायदा घेऊन आमचे हुशार लोक ‘रामदासांचे व्यवस्थापनशास्त्र’ वगैरे पुस्तके प्रकाशित करीत आहेत. पण जीवनाचा गंभीरपणे विचार करणारं आणि आविष्कार करणारं जे साहित्य असतं त्याला आपण साहित्य म्हणतो. कुठल्याही समाजामध्ये गंभीरपणे विचार करणारं, जीवनाचं अन्वेषण करणारं ललित साहित्य किती येतं यावरच त्या समाजाचं मोठेपण अवलंबून असतं. ललित साहित्य-फारसे न खपूनही-महत्वाचे असते. कारण ते समाजाची घडण करू शकतं. पण जीवनाचा आविष्कार करणारं असं जे साहित्य असतं त्याच्यामधील एकच गोष्ट महत्वाची वाटते. ती कोणती तर कुठलाही लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याची म्हणून एक जीवनाकडे पाहण्याची दृष्टी असते. आणि ही दृष्टीच महत्वाची असते. आपण लेखकांना जेव्हा समजावून घेतो किंवा लेखक वेगवेगळे आहेत असं म्हणतो, त्याचं कारणच मुळी हे असतं. म्हणजे एका संप्रदायात अनेक लेखक असतात. म्हणजे वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर आहेत आणि तुकारामही आहेत. पण तरीही तुकाराम वेगळे आणि ज्ञानेश्वर वेगळे असं आपण म्हणतो त्याचा अर्थ ती त्यांची जीवनाकडे पहाण्याची वेगळी दृष्टी असते. याला मी अन्वेषण दृष्टी असं म्हणतो. म्हणजे जीवनाचं विश्लेषण जेव्हा लेखक करतो, तेव्हा त्यामागे त्याची स्वत:ची अशी विशिष्ट दृष्टी असते. आणि या जीवनाच्या विश्लेषणामधून त्याला जीवनाचं सत्य सापडतं. हे सत्य सांगण्यासाठी तो साहित्य निर्मिती करतो. त्याची म्हणून जी एक अन्वेषणदृष्टी असते त्याच्या अनुषंगाने तो जीवनाचं विश्लेषण करतो आणि त्यातून पुन:निर्माण करतो. आता ही जी अन्वेषण वृत्ती आहे ती माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. मराठीतल्या बहुसंख्य लोकांच्या, लेखकांच्या अन्वेषण दृष्टीमध्ये जे जे पारंपरिक आहे ते ते पवित्र आहे, असे त्यांच्या अन्वेषण दृष्टीलाच वाटतं. याचं एक उदाहरण म्हणजे सिनेमा-नाटकं. आपल्याला दिसतं की सिनेमामध्ये नेहमी संकट एकीकडे येतात आणि त्याच वेळी नायकाची आई ही गणपतीची पूजा करीत असते. म्हणजे इकटे संकट अन् तिकडे पूजा. संकट गेलं म्हणजे देव पावला. जीवनाचा अर्थ लावण्याची काही एक दृष्टी त्या लेखकाजवळ असली पाहिजे. पण अशा प्रकारची काही एक अन्वेषण दृष्टी काही लेखकांकडे असते; पण असे लेखक फार थोडे असतात. बहुसंख्य लेखक परंपरावादी दृष्टीने विचार करतात. आणि लिहीत राहतात. याच्यापलिकडे जाऊन काही वेळी वेगळं शोधून होऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या झोपडपट्टीमध्ये मोठा आजार, साथीचे रोग येतात- त्यात एक पारंपरिक दृष्टिकोन असा आहे, ‘ठीक आहे; झालं त्यांच्या नशीबाने; इत्यादी.’ पण आपण एक असा प्रश्न करायला पाहिजे की बाबा इथेच का साथ आली? ही साथ जिथे अत्यंत उच्चभ्रू असे लोक राहतात तिथे काही नाही आली? असा आपण विचार करायला लागलो की मग तिथलं दारिद्र्य आणि अस्वच्छता लक्षात येते. हे सगळं आपल्याला दिसायला लागतं. म्हणून लेखकाकडे महत्वाची जर कोणती गोष्ट असेल-असायला पाहिजे- तर ती अन्वेषण दृष्टी. तो जीवनाकडे काय पाहातो. कसा पाहातो-त्याने किती पुस्तकं लिहिली हे सोडून द्या. 50 पुस्तकं लिहिली की 200 याच्यापेक्षासुद्धा तो जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहातो, जीवनाकडे आणि एकूण आपल्या अवतीभवतीच्या संस्कृतीकडे, अवतीभवतीच्या समाजाकडे तो कोणत्या पद्धतीनं पाहातो हे फार महत्वाचं असतं. आणि अशा प्रकारचा दृष्टिकोन लेखकांच्यामध्ये विकसित होण्याचीही एक आवश्यकता असते. याचं एक उदाहरण म्हणजे सरळ सरळ महात्मा फुल्यांचेच उदाहरण आपल्याला देतो. महात्मा फुल्यांनी जो काही इतिहास सांगितला तो काही सगळा इतिहासतज्ञांनी सिद्ध केला आहे असं काही कुणी म्हणणार नाही. आणि असं कुणी म्हणतही नाही. पण आमच्या सगळ्या सांस्कृतिक गोष्टींच्या मागे एक वर्णवर्चस्ववादी दृष्टिकोन कसा आहे हे मात्र त्यांनी बरोबर सांगितले आहे. तपशील आपण सोडून देऊ. पण जे सूत्र आहे ते सूत्र मात्र बरोबर आहे. त्यामुळे झाले असे की कुठेतरी हिंदू समाजाकडे, जीवनाकडे, संस्कृतीकडे पाहण्याची एक अन्वेषण दृष्टी दिली गेली. म्हणून मुख्य मुद्दा असा आहे की, पारंपरिक अशा प्रकारच्या धर्मकल्पनांच्या मधून सुटून, जातीच्या दहशतीमधून सुटून लेखकांनी लिहिले पाहिजे. असे लेखनच समाजाचे जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखवू शकते. या दृष्टीने लेखन झाल्यास मराठीतील लेखन जागतिक पातळीवर पोचावयास वेळ लागणार नाही. परंतु अशा प्रकारचे लेखन करण्यासाठी हिंमत लागते. अशी हिंमत किती मराठी लेखकांमध्ये आहे हाच महत्वाचा प्रश्न आहे. हे मी यासाठी म्हणतो की, अशीच हिंमत राजकीय लेखन करण्यासाठीही लागते. आणि त्यामुळेच मराठीमध्ये राजकीय लेखन अतिशय कमी आहे. खरे म्हणजे आज राजकारण्यांनी लेखकापुढे केवढे मोठे विश्व निर्माण करून ठेवले आहे! परंतु लेखक या विश्वापासून बिचकूनच राहतात. तेव्हा असे लेखन करण्यासाठी एक हिंमत लागते. जातीच्या, धर्माच्या संकल्पनांवर क्ष किरण सोडणे किती अवघड आहे, ते आपण जाणतोच. परंतु ते करणे एकूण मानवी जीवनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. धर्माची जातीची हिंस्त्र बंधने तोडून जे लेखक पुढे जातील तेच मोठे व कालातीत लेखक ठरतील.

शेवटी मी एक लेखकाची जगातली एक सुंदर व्याख्या काय आहे ते सांगतो आणि थांबतो. ही व्याख्या जगातल्या कुठल्याही मोठ्या माणसाने-म्हणजे पाश्चात्य माणसाने केलेली नाही. ती आपल्या मराठी कवीने केली आहे- म्हणजे संत तुकाराम महाराजांनी.

‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता॥’

मला असं वाटतं की, मराठी लोकांनी जर अशा प्रकारची प्रतिज्ञा केली तर आपलं जीवन चांगलं होईलच होईल; बुद्धीच्या आधारे, विवेकाच्या आधारे आपण जलद जाऊच जाऊ. पण त्यापेक्षासुद्धा मराठीमध्ये जी श्रेष्ठ साहित्याची वानवा आहे ती सुद्धा कमी होईल असं मला वाटतं आणि या साहित्य संमेलनापासून असा एक दृष्टिकोन जर विकसित होत गेला तर या साहित्यसंमेलनाच्या आयोजनाचं सार्थक झालं असं मी म्हणेन आणि ते व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो.

धन्यवाद!

नागनाथ कोत्तापल्ले