Categories
विशेष

सामाजिक कृतज्ञता निधी

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

1977 साली जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर व कोसळल्यानंतर चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांना जो उत्स्फुर्त पठिंबा सर्वसामान्य जनता व मध्यमवर्गीय वर्गातून मिळत होता तो कमी होऊ लागला. कार्यकर्त्यांचे हाल होऊ लागले. या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे, समाजाची मान्यता असणे, समाजाने या कार्यकर्त्यांचे प्रश्न मान्य करावे, यांच्या

प्रतिकृतज्ञ असावे त्या भावनेतून आर्थिक योगदान दयावे; यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना पुढे आली. 1985 साली पुण्यातील शिवाजी मराठा हायस्कुल येथे सामाजिक परिषदेच्या शताब्दीनिमित्त विषमता निर्मूलन परिषद आयोजित केली होती त्यात या विषयाला वाचा फोडली गेली. हाच विचार इतरांच्याही मनात रेंगाळता-जळगावचे डॉ. राम आपटे हे त्यापैकी एक होते. सामाजिक कृतज्ञता निधी स्थापन करून इतर म्हणून नोंदणी केली गेली पण त्याला खरा आकार व खरी गती. ”लग्नाच्या बेडी” या नाटकाच्या प्रयोगामुळे आली. मराठी जगातील ज्येष्ठ कलाकार यांनी ”लग्नाच्या बेडी” या नाटकात विना मोबदला काम केले. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, सुहास जोशी व इतर अनेक कार्यकर्तेयात सहभागी झाले. या सर्वांना सांभाळणे, ज्या शहरात प्रयोग असेल त्या ठिकाणी या कलाकारांबरोबर प्रतिष्ठित लोकांची भेट घडवून आणून निधी गोळा करणे हे काम फार अवघड होते. कलाकारांचे मूड सांभाळणे, लोकांचा अतिउत्साह आवरणे, निवास भोजनाची नीट व्यवस्था करणे या सर्व आघाडयावर डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी जवळपास एकहाती लढाइ केली. ङ्गलग्नाची बेडी”चा दौरा हे डॉ. दोभोळकरांच्या आयुष्यातील एक महत्वाची मोहिम होती. संघटन कौशल्य, व्यवस्थापन, सामाजिक बांधीलकी सर्वच गोष्टी पणाला लावल्या. फक्त निधी गोळा न करता सामाजिक कृतज्ञता निधी ही नेमकी संकल्पना लोकांपर्यंत पोचवायचे भान त्यांनी नेहमी ठेवले. या निधीतून तुम्ही कशा कार्यकर्त्यांना मदत करून असे विचारल्यावर ते रजिया पटेल, भीमराव म्हस्के, अन्वर राजन (मी) यांचे नावे सांगायचे. सुदैवाने सामाजिक कृतज्ञता निधीचे मानधन प्राप्त कार्यकर्त्यांच्या यादीत माझे नाव आले नाही. लग्नाची बेडीचे प्रयोग होत असताना जळगावच्या प्रयोगाच्या वेळी मी मुद्दाम तिथे गेलो होतो. तसेच कोल्हापूरला ही गेलो होतो. डॉ. दाभोळकरांची धडपड जवळून पहाण्याची संधी मिळाली. सामाजिक कृतज्ञता निधी या कल्पनेचे स्वागत सर्व धरावर झाले याला वेगवेगळ्या उपक्रमाची जोड डॉ. देत राहिले. ङ्गएक उपवास कृतज्ञतेचा” ही संकल्पना त्यांनी साकृनिसाठी राबवली. शालेय विद्यार्थ्यांनी एक दिवस उपवास करून खाऊचे म्हणून 5 रूपये या निधीसाठी दयायची ही अभिनव कल्पना. यातील पैसेपेक्षा मुलांना सामाजिक कार्य करण्याविषयी आपली सद्भावना व्यक्त करण्याची संधी आहे यावर त्यांचा भर होते. या उपक्रमाची त्यांनी जबरदस्त तयारी केली होती. प्रतिसाद पण अपेक्षेप्रमाणे उत्तम होता. नेमके त्याच वेळी कच्छ येथेे प्रचंड मोठा भुुकंप झाला. मोठ्या प्रमाणात जिवित व वित हानी झाली. शाळेतील मुलांकडून मदत साकृनिला मिळणार होती त्यातील काही मदत कच्छला वळवली गेली. पण या मोहिमेच्या निमीत्ताने हा विचार लोकांसमोर मांडला गेला शिवाय दोन लाखापेक्षा जास्त निधी मुलांकडून मिळाला; एरवी तो जास्त मिळाला असता. सामाजिक कृतज्ञता निधीमध्ये तळागळातील लोकांच्या प्रश्नावर काम करणार्‍या कार्यकर्त्यांना दरमहा ठराविक रक्कम देऊन त्यांना पाठबळ देणे ही कल्पना होती. कार्यकर्त्यांनी फक्त आपल्या कामाचा अहवाल साकृनिकडे पाठवणे अपेक्षित होते. काही वेळेलाही तेही घडत नसे पण कार्यकर्त्यांना दरमहा मानधन पाठवणे नियमीतपणे होत असे. कार्यकर्त्यांचे अहवाल वाचून चर्चा व्हावी यासाठी दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानधन प्राप्त कार्यकर्त्यांचे शिबीर घेण्याची प्रथा प्रारंभापासूनच होती. कालांतराने या शिबीरात तोचतोपणा येऊन त्यात शैदिल्य आले. 7-8 वर्षापूर्वी मी आणि आमच्या काही मित्रांनी या शिबीरात कार्यकर्त्यांच्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काही उपक्रम जोडून कार्यकर्त्यांची क्षमता वाढेल असे पहावे असे सुचवले. डॉ. दाभोळकरांना ती कल्पना आवडली. त्यांनी मान्यता दिल्या नंतर या शिबीरात आम्ही अतुल पेठे, राजु इनामदार, राजु बहाळकर, प्रकाश कांबळे, संजय आवटे इ. मान्यवरांना निमंत्रित करून त्यांच्या ज्ञान व कौशल्याचा लाभ कार्यकर्त्यांना मिळवून दिला. कार्यकर्त्यांच्या कामात व कामाच्या अहवाल लिखाणात लक्षणीय सुधारणा दिसू लागली. आताही ते उपक्रम नियमीत रूपाने चालू आहे. साकृनिधीमध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी विश्वस्त म्हणून काम करीत आहेत, करीत होती पण या विश्वस्तामध्ये चळवळीत सक्रिय असलेल्या तरूणांना सहभागी करून दयावे ही डॉ. दाभोळकरांची कल्पना; त्या प्रमाणे उल्का महाजन, प्रतिभा शिंदे, सुभाष वारे, पुर्णिमा चिकरमाने, विलास भोंगाडे इ.; तरूण कार्यकर्त्यांना विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निमंत्रीत म्हणून बोलावले गेले. मी जरी प्रारंभापासून साकृनिमध्ये असलो तरी विश्वस्त नव्हतो; या निमंत्रितांच्या यादीत माझेही नाव समाविष्ट करण्यात आले. कालांतराने या निमंत्रितापैकी काही जणांना विश्वस्त म्हणून स्वीकारले गेले. संस्था ती अंधश्रद्धा र्निमूलन समिती असो वा सामाजिक कृतज्ञता निधी; ती दीर्घकाळ व खर्‍या अर्थाने जीवीत ठेवायची असल्यास; त्यात दुरदृष्टी, चळवळीबदल निष्ठा व कष्ट करायची तयारी असलेल्या तरूणांना त्यात सहभागी केल्याशिवाय तरणोपाय नाही याचे भान डॉ. दाभोळकरांना होते व तरूणांना आकर्षित करून घेण्याची किमया त्यांना साध्य झाली होती. अलीकडच्या काळात सर्वात जास्त तरूण सहभागी असलेली संघटना म्हणजे अंधश्रद्धा र्निमूलन समिती आंतच म्हणावे लागेल व त्याचे श्रेय डॉ. दाभोळकरांना दयावे लागेल.

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या नेतृत्वाचा लाभ परिवर्तन चळवळीतल्या अनेक संस्था संघटनांना मिळाला. मुस्लीम समाजातल्या परिवर्तनवादी विचार धारण करणार्‍या विविध तरूण-तरूणींना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. सामाजिक कृतज्ञता निधी ही संस्था तर डॉ. दाभोळकरांनीच स्थापनेपासून त्यात लक्ष घालून, त्याचे नेतृत्व करीत ती वाढवली. या सर्व काळात त्यांचा अमूल्य सहवास मला लाभला, माझ्या आयुष्यातल्या तो ठेवा अमोल आहे. डॉ. दाभोळकर आपल्यात नाहीत हे मान्य करायला मन तयार होत नाही. ते सदैव आपल्या सोबत आहेत.