Categories
कविता

कविता

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

पेन

बिनटोपणाचा तुमचा पेन
खुर्चीवर पडलेला,
विखुरल्या कागदांमध्ये….
घाईघाईत तुम्ही लेखन थांबवले
अन् घराबाहेर पडला
असावा….!
एवढी घाई कशासाठी होती डॉक्टर?
-कुणी साद घातली होती रामप्रहरी?
कशासाठी?
तुम्ही परत आलाच नाही
बिचारा पेन…
आता खुर्चीवरून माझ्या टेबलावर-
पण इथे तो अस्वस्थ,
कायमचा अशांत….
तुमचे उरलेले शब्द आता कुठे गवसणार त्यास?
तुम्ही जाणताच डॉक्टर,
की माणसापेक्षा पेन माणसावर अधिक प्रेम करतो!

सरस्वती

“बरं का सर, काल गंमतच झाली….”
-सकाळी दाढी करताना तुम्ही
अशा प्रारंभाने नमुनेदार गंमत सांगू लागला;
-मुलींच्या कॉलेजातील तुमचे भाषण
विषय स्त्रीमुक्ती,
स्टेजजवळ टेबलावर सरस्वती देवीची मूर्ती
हारफुलांनी सजविलेली….
तुम्ही म्हणाला, “या सरस्वती पूजनाबरोबरच
सावित्रीबाई फुल्यांची प्रतिमा पूजिली असती,
तर मला खूप आनंद झाला असता… तुम्ही
आज एवढ्या मोठ्या संख्येने शिकत आहात,
त्याचे कारण सरस्वती नसून सावित्रीबाई आहेत,
हे तुम्हाला माहीत आहे ना?”
सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला…..!
-त्या दिवशी तुम्ही घराबाहेर पडल्याबरोबरच
मला गौरवार्थ मिळालेली सरस्वती ब्राँझची मूर्ती
मी लगेचच एका मित्राला देऊन टाकली….!


भाकरीसाठी लढाया आता होत नाहीत
धर्माच्या नावाखाली मात्र रोज मरतात
धर्मांधांना अक्कल शिकवायला गेल्यास
ते डॉ.नरेंद्र दाभोलकरांसारखे मरतात

हे भ्याड सुपारीबाज
समोरून हल्ला नाही करत
हत्या करून काही साध्य नाही
कारण दाभोलकरांचे विचार नाही मरत

भीष्मप्रतिज्ञा करणार्‍या निशस्त्र माणसावर
शस्त्राने हल्ला करणारे हे आजचे “शिखंडी”
शहीद दाभोलकर खरे धर्मचिकित्सक
हे आणि ह्यांचा साला धर्मच पाखंडी.

दाभोलकर गेले तरी
विचार त्यांचे कायम राहतील
एक दिवस अंधश्रद्धेचेच शेवटचे श्राद्ध
हे “सनातनी” आपल्या डोळ्याने पाहतील.

-प्रशांत गंगावणे


गोळी बंदुकीची सुटली वेध घेती हाय रे
पडे रक्ताच्या थारोळ्यात माझ्या साथीचे प्रेत रे
माझ्या भाईचे प्रेत रे॥धृ॥

हा कलंक महाराष्ट्राला ह्या पुरोगामी किल्ल्याला
हा विरोध विज्ञानाला आणि घटनेच्या मूल्याला
शाहू-फुल्यांच्या भूमीत चालली खुनाखुनीची बात रे॥1॥
पडे रक्ताच्या थारोळ्यात….

नव वारसा विचाराचा त्याने कृतीतून दावला
नव्वदीच्या पिढीला त्याने समाजकार्यात गोवला
अंधनद्देला गाडण्याची मागत होता साथ रे॥2॥
पडे रक्ताच्या थारोळ्यात…

सनातनी धर्मगंडांचा होतो जळफळाट रे
शोषक धर्मासाठी त्यांचा चाले तडफडाट रे
बंदुकीला डरणार नाही कार्यकर्त्यांची जात रे॥3॥
पडे रक्ताच्या थारोळ्यात….

त्याची शुचिता साधनेची वैरी परशुचा दांडा रे
हृदयात साने गुरूजी आता आंबेडकर मांडा रे
त्याच्या रक्ताने प्रबोधनाची नवी पेटली वात रे॥4॥
पडे रक्ताच्या थारोळ्यात….

थेरं…!

अध्यात्माच्या नावाखाली कित्येक
थेरं दुकानदारी चालवतात।
भाबड्या भाविकांना सर्रास
आपल्या मोहपाशात आवळतात॥

आधुनिक युगातही अंधश्रद्धेला
सरेआम खतपाणी घालतात।
कायद्याचा बडगा उगारला तर
अध्यात्माची ढाल पुढे करतात॥

राजकारणीही बुवा-बाबांचे
जेव्हा चेपू लागतात पाय।
अनितीचे पापार्जन म्हणूनी
अर्पण करतात काय-काय॥

कायद्याला धाब्यावर बसवत
धर्मपिसाटांनी कहरच केला।
श्रद्धेचा विषय असल्याने
इथे कायदाही नरम झाला॥

अध्यात्माच्या कवचाखाली
एकच माजले रान।
विवेकाचा जागर करणार्‍याला
मात्र गमवावा लागला प्राण….!

-अनिल शिंदे, जळगाव