Categories
विशेष

सनातन्यांच्या विरोधातील लढा

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

चळवळीत प्रत्यक्ष संघर्ष करत असताना कार्यकर्त्यांवर अनेक वेळा जीवघेणे प्रसंग गुदरत होते. अशा प्रसंगात दाभोलकर या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपली व संघटनेची संपूर्ण ताकत सर्व पातळीवर उभी करत. अशाच काही जीवघेण्या प्रसंगात सापडलेल्या कार्यकर्त्यांचे मनोगत.

जुलै 2007 ची घटना. माझ्या आयुष्यातील महाभयंकर म्हटली तरी चालेल. या घटनेने अख्या महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये मोठी खळबळ उडवून दिली. अंबाजोगाई, बीड ते थेट विधान भवनापर्यंत, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व ठिकाणी अंनिसची चर्चा होती. अंनिसवर बंदी घाला. दाभोलकरांना महाराष्ट्रातून हद्दपार करा. अशी मागणी विधानसभेत करण्यात आली होती. काही आमदार उपोषणालासुद्धा बसले होते.

त्याचं असं झालं की, त्यावेळी अंबाजोगाई शाखेचा कार्यवाह म्हणून मी काम पहात होतो. तालुक्यात शिक्षकांचे वैज्ञानिक जाणिवा शिबीर घेण्यासाठी आम्हाला अंबाजोगाई डायटकडून पत्र मिळाले. दोन दिवसांचे वेळापत्रक तयार करून मी शिबीर लावले. अशी शिबीरे आम्ही मागील दहा वर्षांपासून घेत होतो. परंतु या शिबीरामध्ये प्रतिगामी शक्तींकडून अंनिसच्या विचारधारेच्या विरूद्ध विचारांचे कार्यकर्ते सामील केले गेले. शिबीराला मी, डॉ. डी. एच. थोरात, प्रा. मदनसुरे, निळकंठ जिरगे, हनुमंत भोसले, प्रा. लाहोटी, अनंत चव्हाण इ. साधन व्यक्ती होतो. आमच्या भाषणातील मुद्यांच्या आधारे एका कार्यकर्त्याला हाताशी धरून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या अशी तक्रार एका शिबीरार्थीकडून आमच्या विरोधात केली होती. धर्मचिकित्सा करणे म्हणजे धर्म भावना दुखावणे होत नाही हे पोलीस प्रशासनाने लक्षात न घेता एफ. आय. आर. दाखल करून घेतला. मी, हनुमंत भोसले, डॉ. थोरात, मदनसुरे व जिरगे या पाच वक्त्यांवर एफ. आय. आर. दाखल केला गेला.

शिबीराच्या दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मला एका पत्रकाराचा फोन आला. फोन करून त्याने मला शिबीरात काय घडले याबाबतचा वृत्तांत विचारला व शेवटी आमच्या विरूद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एफ. आय. आर. दाखल झाल्याचे सांगितले. मी लगेच दाभोलकरांना फोन केला. आमची अटक टाळण्यासाठी गृहमंत्र्यांशी बोला, काहीतरी करा असे म्हणू लागलो. तिकडून डॉक्टरांचा आवाज आला. त्याने काय होणार आहे रे, मी बघतो काय करायचं ते, तुम्ही एक काम करा. लातूरला जा, मी गोपाळराव पाटलांशी बोलतो. ते तुम्हाला मदत करतील. मी जरा जास्तच घाबरलो आहे हे त्यांनी ओळखले, ते मला म्हणाले, काय चळवळी करता रे!

माझ्याकडे वेळ फार कमी होता, पोलीस कुठल्याही क्षणी अटक करू शकत होते. मी मनोमन पत्रकार मित्राचे आभार मानले. कारण त्याच्यामुळेच मला ही बातमी कळाली होती. मी अटकपूर्व जामिनासाठी धडपडत होतो. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे मी व जिरगे सर जि. प. शिक्षक होतो. तुटपुंज्या पगारावर आमचा संसार चाललेला. त्यात अटक होऊन 48 तासांपेक्षा जास्त काळ तुरूंगात राहिल्यास सस्पेंशनची भीती वाटत होती. आमच्या संसाराचं आर्थिक गणित धोक्यात येणार होतं. हे आमच्या कुटुंबाला परवडणारं नव्हतं. नंतर आमच्या एका पत्रकार मित्रानं आमच्या या अटकपूर्व जामिनाच्या धडपडीवर एक कविता छापून आमच्यावर टीका केली होती. चळवळी करण्यापेक्षा घरी बायकांची लुगडी धुत बसा अशा आशयाची ती कविता होती. लपून बसण्यापेक्षा अटक करून घ्यावी व प्रसंगाला सामोरे जावे असा त्यांचा विचार होता. चळवळीसाठी अटक होणे ही अभिमानाची बाब आहे. हे आम्हाला माहिती असूनसुद्धा आमचा नाईलाज होता.

संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. काय निर्णय घ्यावा या विचारात मी होतो. माझ्यासमोर एक पर्याय होता तो म्हणजे अ‍ॅड. बाबू तिडके साहेब. कोर्ट कचेरीचा मामला होता आणि तिडकेसाहेब म्हणजे एक सच्चा मित्र. चळवळीतले साथीदार. त्यांनी व मी अंबाजोगाई तालुका, धारूर तालुका, गंगाखेड या परिसरात किमान शंभरावर व्याख्यानाचे कार्यक्रम घेतले होते. तिडके साहेबांच्या भाषणातील बरेच मुद्दे मी माझ्या भाषणात वापरत असे. अनेक ठिकाणी भांडणे झाली. कटकटी झाल्या. आमच्या कार्यक्रमावर दगडफेक सुद्धा झाली. तरी आम्ही आमचा कार्यक्रम करत असू. तिडके साहेब म्हणजे एक खंबीर व्यक्तिमत्व! त्यांच्याकडे जाण्याचा मी लगेच निर्णय घेतला. थोरात सर व जिरगेसर यांना फोन केला. सर्व परिस्थितीची त्यांना माहिती दिली. तिडके साहेबांकडे यावयास त्यांना सांगितले.

तेथून पुढे तिडके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रवास सुरू झाला. मी, थोरात व जिरगे सर अज्ञातस्थळी थांबलो. आमचे मोबाईल बंद झाले. घरांकडे साध्या वेशातील पोलीस येऊन विचारपूस करून गेले होते. घरच्या फोनवर आमची चौकशी करत होते. विविध कार्यकर्ते आमचा मोबाईल लागत नसल्याने घरी फोन करत होते. हनुमंत भोसलेला अटक झाली होती. प्रा. मदनसुरे सर लातूरमधून भूमिगत झाले होते.

नवर्‍याचा शोध पोलीस घेत आहेत. बनावट नावाने फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न चालू होता. त्यामुळे पत्नी घाबरली होती. एवढ्यात फोन खणखणला. तिकडून आवाज आला, मी दाभोलकर बोलतोय. मोठ्या भयभीत आवाजात माझ्या पत्नीने विचारले, कशावरून तुम्ही दाभोलकर आहात मला काही विचारू नका. मला काही माहिती नाही. तुम्ही दाभोलकर असाल तर माझा नवरा मला सुरक्षित हवाय. आम्ही गरीब माणसं आहोत. हे ऐकून दाभोलकरांचा नाईलाज झाला. त्यांनी फोन ठेवून दिला. लातूरला बावगे सरांकडे त्यांनी फोन करून माझ्या घरी फोन करण्यास सांगितले. बावगे सरांनी घरी फोन करून सांगितले की, आता जे बोलले ते दाभोलकरच होते. आता फोन आला तर व्यवस्थित बोला. तिला काही कळत नव्हते. ती अतिशय घाबरलेली होती. फोनवरसुद्धा रडणे चालू होते.

इकडे आमचा संपर्क होत नसल्याने दाभोलकर कमालीचे अस्वस्थ होते. पोलिसांनी आम्हाला उचलले किंवा काय त्यांना काहीच मेळ लागत नव्हता. रात्री एक वाजेपर्यंत दाभोलकर आमच्या शोधात होते. शेवटी माधव बावगे, तिडके साहेब व डॉक्टर यांचे एकमेकांशी बोलणे झाल्यावरच डॉ. दाभोलकरांचा फोन शांत झाला.

दुसर्‍या दिवशी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी आमच्या निषेधाचे मोर्चे निघाले होते. आमचे पुतळे जाळले जात होते. छोटे मोठे नेते आमच्यावर तोंडसुख घेत होते. काही हौशी कार्यकर्ते घरे जाळण्यासाठी गल्लीपर्यंत येऊन गेले. अंबाजोगाईत बंद पुकारण्यात आला होता. इकडे भूमिगत ठिकाणी आम्ही सुरक्षित जरी असलो तरी दाभोलकरांना मात्र आमच्या कुटुंबियांची काळजी वाटत होती.

आमच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी दाभोलकर अंबाजोगाईसाठी पुण्याहून निघाले. माझ्या पत्नीशी झालेला संवाद त्यांना अस्वस्थ करत होता. परंतु बीड पोलिसांनी त्यांना जिल्ह्यात प्रवेश करायला बंदी घातली होती. नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवर त्यांना अडवण्यात आले. रस्ता बदलून दाभोलकरांना लातूरला जावे लागले. शेवटी लातूर येथे माधव बावगे सरांकडे दाभोलकर थांबले. अंबाजोगाईला गाडी पाठवून आमच्या घरच्यांना भेटीसाठी लातूरला बोलावून घेतले. सगळ्यांशी चर्चा केली. सर्वांना धीर दिला. आम्ही भूमिगत असलेल्या ठिकाणी येऊन आम्हाला भेटले. आमच्याशी चर्चा करून पुढील कार्यक्रमाची दिशा ठरविली. दोन दिवस दाभोलकर लातूरात होते. पोलिसांची गाडी सतत त्यांचा माग काढत होती. एवढी सगळी पळापळी करत असतानासुद्धा ते बीडच्या कलेक्टरशी एस.पी.च्या संपर्कात होते. कार्यकर्त्यांसोबत कसे चुकीचे होत आहे हे त्यांना सांगत होते. मीडियामध्ये मुलाखती देऊन आमची पाठराखण करत होते.

तिकडे अंबाजोगाईच्या कोर्टाने हनुमंत भोसलेला न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. अ‍ॅड. तिडके आमच्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होते. त्यांना आवश्यक ती कागदपत्रे, पुरावे व इतर लागणारी मदत करण्यासाठी माधव बावगे, आमचे मित्र प्रमोद चरखा, राजेसाहेब किर्दंत व माझा मुलगा सोहन अहोरात्र मेहनत घेत होते. चरखा सरांनी माझ्या कुटुंबाची काळजी अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे घेतली. या सर्वांचे शाब्दिक आभार मानून मोकळे होण्यापेक्षा कायम त्यांच्या ऋणात राहणे मी पसंत करेन.

पाच दिवस भूमिगत राहिल्यानंतर पाचव्या दिवशी जिल्हा सत्र न्यायालयाने आम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर केला. अ‍ॅड. तिडके साहेबांनी अगदी मेहनत घेऊन अतिशय प्रभावी बाजू मांडली. त्यांचा युक्तीवाद ऐकण्यासाठी कोर्ट खचाखच भरले होते. तिडके साहेबांमुळेच अटकपूर्व जामीन मिळविण्यात आम्हाला यश आले होते. पुढे डॉ. दाभोलकरांच्या सूचनेवरून व तिडके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही औरंगाबाद खंडपीठातून एफ. आय. आर. क्रॅश करून घेतला. खटल्याचा निकाल अर्थात आमच्या बाजूने लागला. कोर्टाने आम्हाला निर्दोष तर सोडलेच पण विचारस्वातंत्र्य हा गुन्हा होत नाही म्हणून पोलीस यंत्रणेवरच ताशेरे ओढले.

या सर्व घटनेमध्ये दाभोलकर केंद्रस्थानी होते. कार्यकर्त्यांच्या कुटुंबाच्या भावनाची कदर करणारा, नाती हळूवारपणे जपणारा, प्रसंगी त्यांच्यासाठी झोप न घेणारा हा समाजकारणी मी प्रत्यक्ष अनुभवला होता. माझ्या वडिलधार्‍या माणसांनी माझी व माझ्या कुटुंबाची एवढी कधी काळजी केली नाही तेवढी काळजी माझ्या दाभोलकरांनी घेतली.

राजेसाहेब चव्हाण