Categories
विशेष

माझ्या कुटुंबासाठी केलेली अमोल मदत

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

माझा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा परिचय घडून आणला तो माझे प्रेरणास्थान कॉ. बाबा आरगडे यांनी मी व बाबा आरगडे आणि डॉ. दाभोलकर असा आमचा त्रिवेणी संगम औरंगाबादमध्ये समितीच्या कामानिमित्त झाला आणि मी माझ्या मुलाचा विवाह सत्यशोधकीय पद्धतीने करू का? असा प्रश्न मी डॉक्टरांना विचारला. यावर ते प्रभावित झाले आणि अंतर्मुख होऊन ते मला म्हणाले, “हे पहा तुमचे नातेवाईक ह्या सर्व गोष्टीला मान्यता देतील असे मला अजिबात वाटत नाही.” त्यावर मी त्यांना विश्वास दिला की, अभिजीतचा सत्यशोधकीय पद्धतीने विवाह करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.

यावर डॉक्टर म्हणाले की, समितीचा हा पहिला सत्यशोधकीय विवाह असणार आहे. तुमची जर मान्यता असेल तर मी सत्यशोधकीय विवाहाला मा. निळूभाऊ फुले, राम नगरकर आणि प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित करू का? त्यावर मी होकार दिला आणि एक पाऊल पुढे म्हणजे विवाह हा अमावास्येला होणार आणि कोणत्याही प्रकारचे पाहुणचार नसेल असा तो दिवस 22 मार्च 1993(सोमवती अमावास्या)

शब्द दिल्याप्रमाणे दाभोलकरांनी वरील सर्व मान्यवरांना उपस्थितीत हा विवाह पार पाडण्यास सक्रीय मदत केली.

डॉ. दाभोलकर माझ्या कुटुंबाशी एवढे एकरूप झाले की, दर महिन्याला माझ्या कुटुंबाची खुशाली ते विचारायचे. माझी पत्नी(द्रोपदाबाई) ही सतत मनोविकाराने आजारी असायची. त्यांना ते माहिती झाले. आणि मला डॉक्टर कृतज्ञता निधीतून दरमहा 500 रूपये मानधन देत असत. तसेच अंनिसचे 3000 रूपये महिना देत असत. अशा प्रकारे दाभोलकर आणि माझे कुटुंब एकरूप झालो आणि त्यांनी अंनिसचा पूर्णवेळ काम करण्याची मला संधी दिली आणि मानसिक व आर्थिक सामाजिक आधारतर दिलाच परंतु माझ्या मुलाचा सत्यशोधकीय पद्धतीने विवाह पार पाडला. याचा उल्लेख त्यांनी आपल्या लेखणीतून सतत करून शाबासकीची थाप देत असत.

पत्नीचे आजारात अचानक गर्भाशय काढून टाकल्यानंतर 1 महिन्याचे पत्नीचे मानसिक संतुलन इतके बिघडले की, लघवी, संडास व अंगावर कपडे सोडून विवस्त्र अवस्थेत नेवासा तालुक्याच्या ठिकाणी फिरू लागली व दोन चार माणसांना आवरत नसे. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांनी प्रत्यक्ष पाहून निर्णय घेतला व मला आधार दिला ‘हा एक आजार असून यावर भरपूर वैज्ञानिक शोध लागले आहे.’ परंतु मी त्यांना सांगत होतो की, हे मला सहन होत नाही. राग अनावर होतो. त्यावर ते म्हणाले ‘येथून पुढे राग येता कामा नये तुम्हाला मन शांत ठेवून औषधोपचार करू या.’ डॉक्टरांनी स्वत: माझ्या पत्नीला अहमदनगर येथे मनोविकार तज्ञाकडे डॉ. कैलास झालानेकडे नेले व औषधोपचार घेण्यासाठी ठेवले तसेच फोनवर सतत माझ्याशी संपर्क साधत होते.

त्यानंतर पत्नी जिन्यावरून उतरताना खाली पडली. डोक्यावर मार लागून बेशुद्ध अवस्थेत गेली. लगेच डॉक्टरांना फोन केल्यावर त्यांनी डॉ. प्रकाश गरूड यांच्याकडे औषधोपचार घेण्यास सक्रीय सहकार्य केले व तिची प्रकृती सुधारणा झाली. नंतर 16 वर्षे तिची मी स्वच्छता, ड्रेसिंग, केस विंचरणे, पातळ नेसवणे हे सर्व काम करण्याचे धैर्य व मार्गदर्शन डॉ. दाभोलकरांनी प्राभाविक वैचारिक शिक्षण प्रशिक्षण देऊन माझ्या कुटुंबात योग्य ती गोष्ट आमच्या प्रयत्नाद्वारे कृतीत उतरवली. म्हणून माझे कुटुंबीय जीवन व अडीअडचणीला व संकटाला धैर्य व धाडस, कौशल्य दिल्यामुळे माझे आजपर्यंत जीवनात प्रगती झाली.

डॉ. दाभोलकरांनी अशा प्रकारे माझ्या जीवनात अमोल मदत व सहकार्य केलेले आहे. मा.फुले यांच्यानंतर डॉ. दाभोलकर सारख्या सत्यशोधक विचारसरणी कृतीतून दाखविणारा माणूस माझ्या तरी पाहण्यात नाही. त्यांच्या या स्मृतीस माझ्याकडून विनम्र अभिवादन करतो.

डॉ. मच्छिंद्र वाघ