डॉ. नरेंद्र दाभोलकर संघटनेचे काम करणार्या कार्यकर्त्यांचा कुटुंबाला कायम वेगवेगळ्या प्रकारे मदत करीत असत. एखादा कुटुंबप्रमुख ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील प्रत्येकाकडे जातीने लक्ष देतो. त्यांची सुख-दु:खे आजारपण याकडे लक्ष देतो. त्याचप्रमाणे डॉ. दाभोलकरसुद्धा संघटनेत काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडे कायम लक्ष देत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला ते आपल्या कुटुंबातीलच एक आहेत असेच वाटायचे. याचा प्रत्यय आम्हाला सुद्धा आला आहे.
डॉ. दाभोलकर हे आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे वाटायचे. माझे पती तावरे सरांच्या आजारपणात त्यांनी खूपच आर्थिक मदत केली. 1999 साली सरांना हार्टचे ऑपरेशन करण्याचा सल्ला मिरजेतील डॉक्टरांनी दिला. आम्ही घरातील सर्वजण खूप चिंतेत होतो. कारण ऑपरेशनसाठी दीड ते दोन लाख रूपयांचा खर्च येणार होता. आम्ही पैशांची जुळवाजुळव करीत होतो. डॉ. दाभोलकरांना सरांच्या ऑपरेशनबद्दल समजल्यावर ते स्वत: आमच्या घरी आले. त्यांना पैशाची अडचण समजल्यावर ते सरांना म्हणाले की, तुम्ही पुण्याला जाऊन दवाखान्यात अॅडमिट व्हा. मी बाकीच्या पैशांची व्यवस्था करतो. ते स्वत: दवाखान्यात जाऊन सरांच्या ऑपरेशनसाठी 40 हजार रूपये भरून आले. सरांना पुण्याच्या डॉ. अविनाश इनामदार यांच्या दवाखान्यात डॉक्टरांनी अॅडमिट केले. वार्तापत्रात तावरे सरांच्या ऑपरेशनसाठी कार्यकर्त्यांना मदतीचे आवाहन केले. डॉ. दाभोलकर आम्हाला कायम धीर द्यायचे व सांगायचे की, ‘वहिनी तुम्ही घाबरू नका. आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत.’ त्यानंतर तावरे सरांची रूबी हॉलमध्ये अँजिओग्राफी केली. त्यादिवशी ते स्वत: दवाखान्यात आले होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी मला सांगितले की, वहिनी तुम्ही ऑपरेशनच्या आदल्या दिवशी तुमच्या भाच्याला साधनाच्या ऑफीसमध्ये पाठवा. मी त्याच्याकडे दवाखान्यातील इतर खर्चासाठी थोडे पैसे देतो. त्याप्रमाणे मी माझ्या भाच्याला साधनाच्या ऑफीसमध्ये पाठविले. दाभोलकरांनी त्याच्या जवळ परत 15 हजार रूपये पाठवून दिले. ऑपरेशन झाल्यावर ते स्वत: सरांना भेटायला आले. डॉ. इनामदारांना खूप समाधान वाटले. कारण डॉ. दाभोलकर हे संघटनेतील कार्यकर्त्यांना मदत करतात त्यांची काळजी घेतात याचे मोल ते जाणून असावेत.
तावरे सरांच्या ऑपरेशनसाठी सर्व नातेवाईक व काही संस्थांनी जी आर्थिक मदत केली त्यामध्ये सिंहाचा वाटा डॉ. दाभोलकरांचा होता. त्यानंतरसुद्धा अनेक वेळा डॉ. दाभोलकरांनी आम्हाला आर्थिक मदत केली. कारण त्यांना अंनिसच्या कार्याकर्त्यांच्याबद्दल खूप आपलेपणा होता. यांच्या प्रथम स्मृतीदिनी आमच्या कुटुंबीयाच्याकडून त्यांना आदरांजली.
–शोभना तावरे