Categories
विशेष

आपुलकीचं नातं

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

2003 साली जानेवारी महिन्यात मी हर्षदा बरोबर रजिस्टर पद्धतीने विवाहबद्ध झालो. त्यातून वाचलेले 21 हजार रूपये मी बँकेत एफ.डी.करून ठेवले. लग्नानंतर माझे वडील, मी, बायको व आई एकत्र राहू लागलो. हे सर्व लिहिण्याचे कारण डॉक्टर व डॉक्टरांचे कुटुंबीय यांचं मोलाचं सहकार्य व साथ आम्हाला सतत लाभली. कुटुंब म्हटलं की, भांडणे, रागलोभ, अडीअडचणी आल्याच. पण माझ्या बाबतीत अडचणींचा अक्षरश: डोंगर उभा होता. दोन्ही बहिणींचे नवरे अत्यंत व्यसनी. सतत त्यांची भांडणे. आर्थिक तणाव. ते निस्तरण्यासाठी माझ्यावर नकळत सततचा ताण. या सर्व परिस्थितीत मानसिक आधारापासून ते आर्थिक, उपचाराच्या पातळीपर्यंत डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांनी मला सतत मदत केली. त्यांच्या या कणखर पाठींब्यामुळेच मी आजपर्यंत अनेक संकटांना सामोरे जावू शकलो. डॉक्टरांचा प्रत्येक सल्ला हा अत्यंत विचारपूर्वक व दीर्घकालीन विचार करणारा असे. माझे वडील व आई यांचे व माझ्या बायकोचे भांडण अगदी विकोपाला गेले तेव्हा सर्व समाजाचा विचार न करता आम्हाला विभक्त राहण्यासाठी दिलेला सल्ला व तुम्हाला एक मूल झाल्यानंतर परत तुम्ही एकत्र आपोआप याल व तुझे आईवडील नातवामध्ये रमतील हे त्यांचे व शैलाताईंचे शब्द मी सध्या अनुभवतोय आणि एकत्र कुटुंबात आता राहतोय.

मी 1992 पासून 2011 पर्यंत म्हणजे तब्बल 19 वर्षे भाड्याच्या खोलीत राहिलो. 24 वेळा रूम बदलली. माझे एकच स्वप्न होते, स्वत:च्या घरात रहाण्याचे. मी बचत केलेल्या पैशातून सातार्‍यात 2007 साली जमीन घेऊन ठेवली होती. पण घर बांधणे आर्थिक अडचणीमुळे केवळ अशक्य होते. ते शक्य झाले फक्त माझा जिवलग मित्र सचिन पोळ, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शैलाताई दाभोलकर यांच्यामुळेच. स्वत:चे घर मी बांधले. बांधताना ते पहाण्यासाठी डॉक्टर स्वत: 3 ते 4 वेळा प्रत्यक्ष जागेवर येऊन गेले. 26 जानेवारी 2012 ला अत्यंत आगळ्या व वेगळ्या पद्धतीने(कोणतेही धार्मिक कर्मकांड न करता) मी नवीन घरात रहायला गेलो त्यालाही डॉक्टर व सर्व कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. आज ज्या वास्तुत मी रहातो त्या वास्तुत मी डॉक्टरांमुळेच आहे याची जाणीव आणि डॉक्टर हे पहायला आज नाहीत याची वेदना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. डॉक्टर माझ्यासाठी आणि कुुटुंबीयांसाठी वडील होते. रक्ताने ते माझे वडिल नसतील पण माझ्या सख्ख्या वडिलांपेक्षा ते मला खूप खूप जवळचे होते व आजही आहेत. “डॉक्टर, तुम्ही आज शरीराने आमच्याबरोबर नाही. पण चिंता करू नका तुमचा विचार मी (आणि माझे कुटुंबीय) अखेरच्या श्वासापर्यंत समाजात रूजवत रहाणार यात कुठलीही कमतरता माझ्याकडून मी होऊ देणार नाही.”

कुटुंब कसं असावं? ते फक्त रक्तातील नात्याचंच नसावं तर माणसाला माणूसपण देणारं आणि एक नैतिक विवेकी माणूस घडवणारं असावं. हे सर्व अनुभवायला आणि प्रत्यक्ष कृतीत आणायला शिकवलं ते दाभोलकर कुटुंबीयांनी. अशा दाभोलकर कुटुंबीयांशी माझा व माझ्या कुटुंबाचा ऋणानुबंध जुळला आणि माझं कुटुंबच विचारांनी बदलून गेलं यापेक्षा वेगळं जीवनात काय मिळवायचंय? शेवटी एवढेच सांगेन दाभोलकर कुटुंबीय हे मी माझ्या कुटुंबाचाच भाग मानतो आणि डॉक्टरांचं अचानक जाणं म्हणजे माझ्या वडिलांचं जाणं मी मानतो.

प्रशांत पोतदार