Categories
विशेष

कुटुंबप्रमुखरूपी छत्र हरवले

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 8.30 ची वेळ मी कॉलेजला जाण्यासाठी आवरले होते, तर खाली पार्किंगमध्ये गाडी स्वच्छ करायला गेले होते. उदय वर आल्यावर माझ्या रूममध्ये आले आणि कसेबसे खाली बसले. मी विचारले ‘काय झाले? चक्कर येत आहे का?’ उदय काहीच बोलत नव्हते मी पुन्हा विचारले ‘काय झाले?’ तेव्हा सर हळूच म्हणाले, डॉक्टर गेले. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. कानावर विश्वास बसेना, आपल्यालाच असे वाईट ऐकू आले असेल असे वाटले म्हणून मी पुन्हा विचारले. अहो काय झाले ते नीट सांगा. तेव्हा सर म्हणाले, ‘डॉक्टर गेले त्यांच्यावर कुणीतरी गोळ्या झाडल्या.’ हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी कॉलेजला त्या दिवशी गेलेच नाही. आजपर्यंतच्या आयुष्यातला तो सर्वात वाईट दिवस होता.

मी कॉलेजमध्ये असताना डॉक्टरांबद्दल ऐकून होते, पेपरमधील बातम्या वाचून डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणजे अंनिस एवढेच. कॉलेजमध्ये असताना वर्षा देशपांडेंची भेट व्हायची. त्यांच्या पथनाट्यात, रॅलीत मी असायचे. माझ्या लग्नाचे प्रयत्न घरचे करतायत हे सांगितल्यावर मॅडमनी उदय चव्हाण यांचे नाव सुचविले. शैला मॅडम आणि दोघींनी हे लग्न ठरविले. पुढे डॉ.नरेंद्र दाभोलकर व सरांचे मित्र मंडळ सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्यासाठी सर्व नियोजन केले. आम्ही दोघे ठाम राहिल्याने घरच्यांना विरोध करता आला नाही.

आमच्या लग्नाच्या पत्रिका व जेवण खर्च डॉक्टरांनीच केला. पत्रिकेत सुरवातीलाच आमची भावंडं असा उल्लेख करून मग उदय व संगीता सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध होतायत अशा आशयाचा मजकूर छापला होता. लग्नातसुद्धा डॉक्टरांनी घरातल्या एका जबाबदार व्यक्तीची भूमिका पार पाडली. सर्व पाहुण्यांना अल्पोपहार म्हणून श्रीखंड पुरी, भाजी, पुलावचे नियोजन केले होते. पाहुणे वाढल्याने श्रीखंड कमी पडले तर डॉक्टर स्वत: जाऊन ते घेऊन आले. शैला मॅडम व वर्षा मॅडमनी तर घरातल्यासारखी सर्व कामे केली. काय नाते होते आमचे आणि दाभोलकर कुटुंबाचे? कशासाठी डॉक्टरांनी स्वत:चा वेळ व पैसा खर्च केला? कारण डॉक्टर कार्यकर्त्यांना आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती समजत होते. लग्नानंतर संक्रांतीला शैला मॅडम व डॉक्टर घरी आले व संक्रांतीची म्हणून एक साडी भेट दिली. दोन्ही मुलींच्या जन्मावेळी व त्याआधीही शैला मॅडमनी माझी खूप काळजी घेतली. दवाखान्यात माझी कधीही फी घेतली नाही. अजूनही मुलींना चित्रा मॅडमकडे घेऊन जातो तेव्हा फी घेतली जात नाही. मुलींच्या जन्मावेळी उदयच्या जवळ स्वत: डॉक्टर थांबले होते त्यांना धीर देण्यासाठी.

उदयला सामाजिक कृतज्ञतानिधीचे मानधन डॉक्टरांनी प्रयत्न करून चालू केले होते. लग्नानंतर मला नोकरीत पगार नव्हता. तेव्हा त्याचा हातभार लागत होता. निधीचे मानधन बंद झाल्यावर परिवर्तनमध्ये उदयाला नोकरी देऊन त्यांनी नकळतपणे मोठी मदतच केली.

डॉक्टर त्यांचे काही काम असले तर अचानक घरी यायचे तेव्हा मी गडबडून जायचे. आता डॉक्टरांना मी काय नाष्टा करू? की जेवायचा आग्रह धरू? चहा की कॉफी? काही सुचायचे नाही. पण डॉक्टर एका मिनिटात मला शांत करायचे ‘मी काहीही घेणार नाही’ असे सांगून माझीच विचारपूस करायचे. कॉलेज कसे चालले आहे? पगार मिळतो का? वगैरे विचारून शेवटी म्हणायचे, ‘आपण सर्वांच्या पुढे विचाराने चार पाऊले पुढे आहोत ही सर्वात जमेची बाजू आहे.’ लहान मुलगी खेळत असेल तर ते तिच्याशी खेळायचे, गप्पा मारायचे, कधी कधी मुलीला स्कूटरवर फिरवून आणायचे तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती.

आमच्या कॉलेजमध्ये मी विवेकवाहिनी सुरू केली तेव्हा डॉक्टरांनी फार कौतुक केले. त्यासाठी त्यांचे सतत मार्गदर्शन मिळायचे. नोकरीतील ताण कमी होण्यासाठीही त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरायचे.

एकदा विवेकवाहिनीच्या शिबीरासाठी ‘हमाल भवन, पुणे’ येथे उदय सर व मी दोघेही गेलो होतो. शिबीर संपल्यावर सरांना चक्कर येऊ लागली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तपासून विश्रांती घ्यायला लावली व स्वत: बाहेर जाऊन मेडिकलमधून औषधे घेऊन आले. संध्याकाळी सातारला येताना आम्हाला एस.टी.त बसवून दिले व मगच ते त्यांच्या कामासाठी गेले. हे कसले ऋणानुबंध होते कळत नाही.

अलिकडे डॉक्टर फारच कामात व्यस्त असल्याने माझी भेट जरा कमी वेळा व्हायची. विवेकवाहिनीच्या शिबीरात त्यांचे व्याख्यान ऐकायला मिळायचे. तरीही डॉक्टर उदयजवळ माझी व मुलीची चौकशी करायचे. अलिकडे मे 2013 मध्ये सातारला कार्यकर्त्यांचे चिंतन शिबीर होते तेव्हा महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांना चहाला बोलावले तेव्हा डॉक्टरही आले होते. मोठ्या मुलीला विचारले आता कितवीत गेलीस? ती म्हटली 10 वीत तेव्हा डॉक्टर म्हणाले, अरे बापरे ही एवढी मोठी झाली व मला म्हणाले तुझ्यापेक्षा उंच दिसायला लागली, मला तर वाटते की, मी आत्ताच परवा तुमचं लग्न लावून दिलं आहे. मोठी मुलगी मृण्मयी म्हणायची की, “डॉक्टर आजोबा घरी आल्यावर मला एखादा हिरो घरी आल्यानंतर जितका आनंद होईल तितका आजोबा आल्यावर होतो.”

हे डॉक्टरांचे आमच्या कुटुंबाशी झालेलं शेवटचं संभाषण होतं. आता मुलीला 10 वीला चांगले गुण मिळाले. डॉक्टर असते तर ते नक्कीच घरी आले असते. मुलीचे कौतुक केलं असतं.

डॉक्टरांचं नाव कुणी काढलं, बातमी ऐकली की, लगेच डोळ्यात पाणी येतं. छोटी मुलगी ती बातमी पाहिली किंवा ऐकली तरी आम्हा दोघांनाही म्हणते, ‘डॉक्टर आजोबांची बातमी पाहिली की तुम्ही रडता म्हणून ती बातमी ऐकू नका, पाहू नका असे म्हणते.’

संगीता उदय चव्हाण