Categories
व्यक्तिविशेष

चळवळीचा साहित्यिक

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

‘भ्रम आणि निरास’ हे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील पहिले पुस्तक. सन 1985 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाला प्रख्यात समाजवादी विचारवंत ना.ग.गोरे यांनी ‘मुळावर घाव’ या शिर्षकाची सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेच्या अखेरीस ना.ग.गोरे लिहितात, “अंधश्रद्धेचे भारताला लागलेले खग्रास ग्रहण दाभोलकरांच्या प्रयत्नाने जरी अंशत:च सुटले तरी ते इष्टच ठरणार आहे. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आला असताना अंधश्रद्धेची झापडे बांधून ठेचकाळत राहण्यात शहाणपणा तो काय?”

गेली तीस-पस्तीस वर्षे डॉ.दाभोलकर अंधश्रद्धेचे ग्रहण सुटावे म्हणून धडपडत होते. पण या ज्ञानसूर्यालाच धर्मांधांनी कायमचा गिळून टाकला. पण सूर्य निमाला तरी त्याची प्रभा निमाली नाही. ती इथल्या मनामनातील अंधाराला दूर करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. ज्या आयुधांनी दाभोलकर भारतीय समाजाला ‘तिमिरातून तेजाकडे’ नेण्यासाठी लढत होते त्यात त्यांनी लिहिलेल्या डझनभर ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे. लेखक या नात्याने दाभोलकरांनी केलेल्या गौरवास्पद कार्याचा मागोवा घेणे त्यांच्या प्रथमस्मृती दिनी उचित होईल.

बहुआयामी व्यक्तिमत्व

दाभोलकरांनी काय लिहिलं व कशासाठी लिहिलं या विषयाअगोदर दाभोलकरांनी केवळ लेखन केलं नाही हे नीट समजून घ्यावे लागेल. सामाजिक क्षेत्रात वावरणार्‍या व्यक्तींची स्थूल मानाने तीन गटात विभागणी करता येईल. विचारांची पेरणी करणारे, नवा विचार इतरांकडून स्वीकारून कृती करणारे व अशा कृतींची उर्मी असणार्‍यांचे संघटन करणारे. पहिल्या गटात मार्क्स, लक्ष्मणशास्त्री जोशी, मानवेंद्रनाथ रॉय अशा व्यक्तींची नावे घेता येतील. दुसरा गट सामाजिक कार्यकर्त्यांचा. ही मंडळी विचारवंतांनी मांडलेले विचारधन कृतीत उतरविण्यासाठी धडपडत असतात. सुंदरलाल बहुगुणांचे झाडाला धरून ठेवणारे, झाड तोडणार असाल तर आम्हालाही तोडा म्हणणारे कार्यकर्तेयाच गटातील. आणि तिसरा गट हा नेतृत्व करणार्‍या कुशल संघटकांचा. विचाराने प्रेरीत हेऊन कृतीप्रवण बनू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांना संघटीत करून परिवर्तन साकार करण्याची धडपड करणारी ही मंडळी विविध क्षेत्रात अग्रभागी असतात.

पण मानवी कर्तृत्वाला नैसर्गिक मर्यादा असतात. जे विचार मांडतात ते कृतीशील असतीलच असं नाही. आणि कृतीशील असणार्‍या सर्वांना नेतृत्व जमेल असंही घडत नाही. या मर्यादा भेदून परिवर्तनाच्या सर्व क्षेत्रात लिलया संचार करणारी मंडळी संख्येने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच दिसतात. डॉ.नरेंद्र दाभोलकर हे असंच विचार, कृती व संघटन या तिन्ही आघाड्यांवर लीलया संचार करणारं बहुआयामी व्यक्तीमत्व होतं. आचार्य अत्रे हे उत्तम प्रासादिक व विनोदी लेखन करीत. जग काय म्हणेल? हे स्त्रियांच्या प्रश्नावर अस्वस्थ करणारे नाटक त्यांनी लिहिलं पण स्त्रीदास्याच्या विमोचनासाठी ते कृतीशील नव्हते. राम गणेश गडकरींनी व्यसनाच्या दुष्परिणामावर ‘एकच प्याला’ हे अजरामर नायक लिहिलं. पण गडकरींनी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम उभा केला नाही.

तत्वविचार, कृतीशीलता व संघटना चातुर्य या तिन्ही पातळीवर विहार करणार्‍या व्यक्तीमत्वात गांधीजींचे नाव घ्यावे लागेल. गांधीजी नवा विचार मांडणारे लेखक व विचारवंत होते, ते कृतीशील होते व उत्तम संघटकही होते. समाजाला लागलेले अंधश्रद्धेचे ग्रहण सुटण्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर विचार, कृती व संघटन या तिनही पातळ्यांवर लढणारे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. दाभोलकरांच्या लेखनांची प्रेरणा काय होती हे कळण्यासाठी हे सर्व विस्ताराने मांडलं.

लेखनाची प्रेरणा

नरहर कुरूंदकर यांचा ‘भजन’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे. भजन हा शब्द एकाच विषयाचा ध्यास व चिंतन अशा अर्थानं कुरूंदकरांनी वापरलाय. अंधश्रद्धेचे ग्रहण सुटावं हा दाभोलकरांचा ध्यास होता. या ध्यासातून त्यांचे लेखन घडलंय. दाभोलकरांना अंधश्रद्धेपायी माणसांना काय काय भोगावं लागतं याची तीव्र संवेदना होती. पण ही संवेदना त्यांचे भावविश्व हादरवून सोडणारी असली तरी त्यातून त्यांनी अस्वस्थ करणार्‍या भाव कविता लिहिल्या नाहीत. करूणेला ज्ञानसामर्थ्याची जोड देण्याचा त्यांचा स्वभाव होता. खपीळिीशव लू र्श्रेींश र्लीीं र्सीळवशव लू ज्ञपेुश्रशवसश ज्ञानाधारीत करूणा हा बदल घडवू शकतो. अणुबाँबच्या महाभयानकतेचे स्वरूप आकलन झाल्यावर रसेल या प्रख्यात तत्वज्ञाचे मन करूणेने भरून आले व अणुयुद्धाच्या विरोधात ते कृतीशील झाले. त्यासाठी वयाच्या नव्वदीच्या आसपास त्यांनी तुरूंगवास भोगला. नरेंद्र दाभोलकर हा असाच तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘झरा-मूळचाच खरा’ असं व्यक्तीमत्व होतं. समाजबदलाच्या तीव्र आंतरिक जाणिवेतून दाभोलकरांचं अंधश्रद्धांना चाप बसविणारं लेखन निर्माण झालंय. मात्र त्यांची लेखन प्रेरणा व कृतीशीलता ही अंधारातील उडी नव्हती. भान ठेवून निर्णय व बेभान होऊन कृती हे त्यांच्या चळवळीचे सूत्र होते. बेभान होऊन कृती करण्यासाठी आपण कशासाठी लढत आहोत याचा नीट विचार करायला हवा. हा विचार मांडण्यासाठी व चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि समाजाला कृतीची प्रेरणा देण्यासाठी दाभोलकरांनी विपुल लिखाण केलं. या अर्थानं त्यांच्या लेखनाला एक विशिष्ट मर्यादा जरूर आहे. पण त्यात अचाट सामर्थ्यही आहे. कारण दाभोलकरांनी केवळ लिहिण्यासाठी म्हणून लिहिलं नाही तर दीपस्तंभाप्रमाणे अंधश्रद्धेचा अंधार हटविण्याच्या हेतुनं लिहिलं.

पु.ल.देशपांडे यांनी कलाकारांना जीवन अधिक सुंदर करण्याचा सल्ला दिला. अंधश्रद्धेचे कुरूप जग अधिक सुंदर करणारे साहित्य हे दाभोलकरांच्या साहित्याचे स्वरूप आहे.

समांतर प्रवास

दाभोलकरांचा लेखन प्रवास अंनिसच्या प्रवासाशी जोडून चाललेला दिसतो. 1980 च्या सुमारास दाभोलकरांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य व्यक्तीगत पातळीवर सुरू झाले. त्याला संघटीत रूप येण्यास 1985 नंतर सुरवात झाली. सुरवातीला भुतासारख्या अघोरी अंधश्रद्धांवर हल्ले सुरू झाले. पुढे या चळवळीला वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराची गरज वाटू लागली. अलिकडच्या 10 वर्षांत तिने धर्मचिकित्सेचा आग्रह धरला. या विकासाला समांतर चळवळीसाठी साहित्याची गरज निर्माण झाली तेव्हा तेव्हा दाभोलकरांची पुस्तके प्रसिद्ध होत गेली. 1985 साली ‘भ्रम आणि निरास’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. जून 2013 ला ‘मती-भानामती’ हे माधव बावगे यांच्या सहकार्याने लिहिलेले त्यांचे अखेरचे पुस्तक 1985 ते 2013 या सतरा वर्षांच्या काळात त्यांनी एकूण बारा पुस्तके प्रसिद्ध केली. या प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. विषयांचे आकलन, त्यांची तर्कशुद्ध मांडणी, राजहंसचे दर्जेदार प्रकाशन व मिलिंद जोशी, चंद्रमोहन कुलकर्णी यांची कलात्मक मुखपृष्ठे यांनी प्रत्येक पुस्तक दर्जेदार आणि वाचनीय झाले आहे.

भ्रम आणि निरास

‘भ्रम आणि निरास’ या पहिल्या पुस्तकात अंधश्रद्धेशी संबंधित विविध विषयांची मांडणी आहे. या पुस्तकाला ना.ग.गोरे यांची सुंदर प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत त्यांनी या देशाचा पंतप्रधान अंधश्रद्धेची शिकार झाला याचा आपणाला हादरवून टाकणारा दाखला दिलाय. अंधश्रद्ध मनुष्य कोणत्या थराला जाऊ शकतो त्याचे अलिकडले उदाहरण म्हणजे इंदिरा गांधींचा खून. त्यांचा पहारेकरी बियांतसिंग याने इंदिराजींच्या बंगल्यावर बहिरा ससाणा बसलेला पाहिला. सुवर्ण मंदिरावर सैन्य पाठविल्याने नाराज झालेल्या शीखामध्ये बियांतसिंगही होता. त्याला भ्रम झाला की, हा ससाणा गुरू गोविंदसिंगाची आज्ञा घेऊन आलाय. इथे शिकार आहे. मार गोळी. आणि एके दिवशी बियांतसिंगाने इंदिराजींची शिकार केली. गुरूच्या आज्ञेशी निष्ठावान शिखाचा विवेक अंधश्रद्धेत जळून गेला. ‘भ्रम आणि निरास’ वाचण्यापूर्वी ही प्रस्तावना जरूर वाचली पाहिजे. मूळ पुस्तकात प्रत्येक पानावर अशा जीवघेण्या भ्रमांचे दाखले देत दाभोलकरांनी अंधश्रद्धेच्या आणिबाणीचे भयप्रद स्वरूप उघड केले आहे.

अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम

‘भ्रम अणि निरास’ नंतर ‘अंधश्रद्धा आणि प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात लोकांच्या मनात सतत डोकावणार्‍या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. शिबीरे व भाषणांच्या वेळी श्रोते विविध प्रश्न विचारीत. त्यात काही प्रश्न कुतुहल जनक तर काहींना विज्ञान समजून घ्यायचे असे तर वक्त्याची जिरवण्यासाठी काही प्रश्न केवळ वादावादीसाठी उपस्थित केलेले असत. या प्रश्नाचे विषयवार गट करून काही गटांची उत्तरे डॉक्टर दाभोलकर यांनी व काहींची प्रा.प.रा.आर्डेयांनी दिली. यात उत्तर दिलेला एक मासलेवाईक प्रश्न असा- हेच माझे वडील या श्रद्धेची मी चिकित्सा करावी का? जिज्ञासूंनी याचे उत्तर या पुस्तकातून जरूर वाचावे. ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ हे पुस्तक खूपच लोकप्रिय झालं. 1989 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या साहित्य व संस्कृती खात्यातर्फे या पुस्तकाला ‘उत्तम वाङ्मय’ पुरस्कारही मिळाला. या पुस्तकाची 16 वी आवृत्ती संपण्याच्या मार्गावर आहे. अंधश्रद्धेवरील पुस्तकांच्या खपाच्या बाबतीत हा बहुधा उच्चांक असेल. नुकतंच या पुस्तकाचं कन्नड भाषेत भाषांतर झालं.

अंधश्रद्धा विनाशाय’ व ‘लढे अंधश्रद्धेचे’

अंनिसची चळवळ जशी वाढू लागली तसतसे अंधश्रद्धेविरूद्धचा संघर्ष वाढू लागला. विविध केंद्राद्वारे अंधश्रद्धेच्या प्रकरणाचा पर्दाफाश वेग घेऊ लागला. या कृती कार्यक्रमात डॉ.दाभोलकर अग्रभागी असत. अंधश्रद्धांच्या विरोधातील रोमहर्षक लढतींचे स्वानुभावावर आधारीत जिवंत चित्रण ‘अंधश्रद्धा विनाशाय’ व ‘लढे अंधश्रद्धेचे’ या दोन पुस्तकात चित्रीत झालंय. त्यात 20 पैशाचा खडा 20 रूपयाला विकणारे भोंदू, कुंडलिनी जागृत करणारी तथाकथित माता, देवळाच्या गाभार्‍याला धडका घेणारे दलित, पुनर्जन्माचा दावा करणार्‍या बाईचा पर्दाफाश अशा विविध विषयांवरील स्वानुभाव दिले आहेत. या दोन्ही पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.

विचार तर कराल?

हे डॉक्टरांचे चौथे पुस्तक. 1990 मध्ये याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. 2010 पर्यंत याच्या आठ आवृत्त्या निघाल्या. या पुस्तकात पान नं.56 वर प्लँचेटचा पांचटपणा या शिर्षकाचा लेख आहे. इंजिनियरिंग कॉलेजमधील भाषणात काही युवतींनी दाभोलकरांना प्लँचेट खरे असते की, नाही असा प्रश्न विचारला. ही बुवाबाजी कशी चालते याचे प्रभावी स्पष्टीकरण या लेखात आहे. नागरी वस्तीवर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांना शोधण्यासाठी प्लँचेट वाल्यांना बोलवा. ते येणार नाहीत कारण प्लँचेट ही बुवाबाजी आहे. या लेखाचा शेवट करतांना दाभोलकर लिहितात, ‘या पुढे येणार्‍या प्लँचेटवाल्यांना भेटायला आम्ही उत्सुक आहोत.’ अशा बुद्धिप्रामाण्यवादी सायनिष्ठ दाभोलकरांचा खुनी शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी प्लँचेटवाल्याला बोलाविले. या पोलिसांचा करावा तेवढा निषेध थोडाच होईल. धन्य ते पोलीस आणि धन्य ते महाराष्ट्राचे राज्यकर्ते.

‘विचार तर कराल’ या पुस्तकात सुरवातीला वैज्ञानिक दृष्टिकोन व त्यानंतर धर्मचिकित्सा व विवेकवाद या विषयाची सखोल मांडणी करून नंतर प्रत्यक्ष विचार करा, शोधा म्हणजे सापडेल असा संदेश दिलाय. फ्रिजमधला गणपती ते राज्यपालांचा अंधविश्वास अशा विविध विषयांची वैज्ञानिक चिकित्सा या पुस्तकात आपल्या डोळ्यात अंजन घालणारी ठरते.

श्रद्धाअंधश्रद्धा

अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील दाभोलकरांचे हे पाचवे पुस्तक. व्याख्यानावेळी लोकांकडून हमखास येणारा प्रश्न म्हणजे ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’ यात फरक काय? बर्‍याचदा आमची ती श्रद्धा पण इतरांची ती अंधश्रद्धा असा युक्तीवाद लोक करतात. खरं तर त्यांची श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते हे त्यांनाही कळत नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको असे म्हणणारे त्यांच्या श्रद्धांना प्रश्न विचारला की चिडतात. डोळस श्रद्धा असावी असेही काही जण म्हणतात. या विविध अनुभवातून श्रद्धा-अंधश्रद्धेची सखोल चिकित्सा करण्याची गरज चळवळीत निर्माण झाल्याचे दाभोलकरांनी हेरले व हे पुस्तक आकारले आहे. 1996 ला याची पहिली आवृत्ती निघाली. आतापर्यंत या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या निघाल्या. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या सर्वांगीण चिकित्सेबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाची व्यापक वैचारिक भूमिका या पुस्तकात मांडली आहे. देव कल्पना व नीती-विचार हे विषय प्रथमच पुस्तकरूपाने सविस्तरपणे या पुस्तकात मांडण्यात आलेत. भाषणाच्या शैलीतले हे लिखाण वाचकांना भिडते व अंतर्मुख करते.

विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी

2003 ते 2008 या कालखंडात घडलेल्या विविध घटनांवर अनेक वृत्तपत्रांत प्रसंगानुरूप लिहिलेल्या टीकात्मक लेखातील निवडक लेखांचा हा संग्रह आहे. 2009 मध्ये तो प्रकाशित झाला. धर्मनिरपेक्षतेचा आग्रह, विधायक धर्मचिकित्सा, विवेकवादाची गरज अशा विविध विषयांची समग्रता या लेखनातून समोर येते. सुस्पष्ट प्रतिपादन, तर्कशुद्ध विचार, आर्जवी युक्तीवाद व तळमळ ही दाभोलकरांची वैशिष्ट्ये याही पुस्तकात पुरेपूर उतरली आहेत.

जादूटोणाविरोधी कायदा रद्द व्हावा म्हणून सनातन्यांनी वारकर्‍यांना फितविण्याचा उद्योग सुरू केला व पंढरपूरच्या वारीवर या कायद्याने बंदी येईल असा अपप्रचार सुरू केला. सहा सात वर्षांपूर्वी दाभोलकरांनी ‘सामाजिक समतेचे अन्वंतर घडविणारी वारी’ या शिर्षकाचा लेख प्रसिद्ध केला होता जो या पुस्तकात पुन:प्रकाशित केला आहे. या लेखात दाभोलकर यांची ‘वारी’ची मनापासून स्तुती केली आहे. ते लिहितात, ‘लक्षावधी लोकांनी तीन आठवडे चालण्याने काय साधते?’ हा प्रश्न विचारणार्‍यांना परंपरा आणि आधुनिकता या दोन्हीचे सामर्थ्य कळलेले नाही. कोणतीही अपेक्षा न धरता, सश्रद्धतेने लक्षावधीचा जनसमूह एक विशिष्ट प्रकारची वर्तणूक करतो हे समजून घ्यायला हवे. उत्कटपणा व कृतीशीलता या दोन्ही गोष्टी वारकर्‍यांमध्ये दिसून येतात. ‘जिकडे जाती तिकडे माझी भावंडे आहेत.’ ही वारकर्‍यांची मनोभूमिका आहे. म्हणून सामाजिक समतेचे मन्वंतर घडविण्याचे वाकर्‍यांनी मनावर घेतले तर ती महाराष्ट्राला मोठीच भेट ठरेल. असं लिहिणार्‍या दाभोलकरांविरोधात धर्मांधांनी वारकर्‍यांना फितविले आणि अधर्म माजविला. पण प्रा.सदानंद मोरे व विवेकी वाकर्‍यांनी धर्मांधाचा डाव उधळून लावण्यास मोलाची मदत केली व जादूटोणाविरोधी कायदा पास झाला. दाभोलकरांचे साहित्य सनातन्यांनी वाचले तर दाभोलकरांना विरोध केल्याचा पश्चात्ताप त्यांना नक्कीच होईल. पण ते वाचणार नाहीत व इतरांना पण वाचू देणार नाहीत. पण महाराष्ट्रातील विवेकी जनता दाभोलकरांचे साहित्य वाचतच राहील. व ज्यांच्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघतच रहातील कारण सत्य मरत नाही.

युवकांसाठी ठरलं…. डोळस व्हायचंय!

सकाळमध्ये युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना दाभोलकरांनी पत्ररूपाने दिलेल्या उत्तरांचे सदर ‘सकाळ’मध्ये क्रमवार प्रसिद्ध झाले. अनेकदा आयुष्यात निराशा येते, दमछाक होते. पण त्याचे कारण, तुम्ही विचार करत नाही. परिस्थितीला प्रश्न विचारत नाही. हे कसे समजून घ्यावं याविषयी हसत-खेळत सांगणारं हे पुस्तक आहे. या लेखमालेतील शेवटच्या लेखात(विवेकाने विद्वेषास पराभूत करू या) ते युवकांना आवाहन करतात. सुडाकडे वळविलेली धार्मिकता हा धर्म नव्हे, ती आहे धर्मांधता. त्यातून फक्त विनाश संभावतो. गांधीजी म्हणाले होते, ‘दातासाठी दात आणि डोळ्यासाठी डोळा’ या न्यायाने सर्व मानव समाज दंतविहीन आणि आंधळा होईल. डोळस व्हायचे म्हणजे जातीधर्माच्या पलिकडे जाऊन माणूस म्हणून गायचे. प्रिय मित्रांनो, कराल हा विचार?

ऐसे कैसे झाले भोंदू

दाभोलकरांच्या एकूण साहित्यात वाचकांना खिळवून ठेवणारा आणि अंधश्रद्धांचा भयानकतेचे रूप उघड करणारा सवोत्कृष्ट ग्रंथ असे ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या पुस्तकात वर्णन करावे लागेल. काही वर्षांपूर्वी इचलकरंजी (जि.कोल्हापूर) येथे महाराष्ट्र अंनिसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात प्रख्यात वैज्ञानिक वसंत गोवारीकर यांना निमंत्रित केले होते. परिसंवादात बोलताना त्यांनी या ग्रंथाचा उल्लेख केला. ते म्हणाले, मी रात्री 9 ला रेल्वेत बसलो. ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ उघडले व वाचायला सुरवात केली. शेवटची ओळ वाचूनच पुस्तक खाली ठेवले. तेव्हा पहाट झाली होती. काय जादू भरली आहे या ग्रंथात?

मनोविकासने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाच्या 10 व्या आवृत्तीच्या मलपृष्ठावर या प्रश्नाचे उत्तर सापडेल. तुकाराम महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे…. सार्‍या भारताने विस्मयाने आणि असूयेने पाहावे अशी प्रबोधनाची एक ज्वलंत परंपरा असल्या महाराष्ट्राला लाभली. त्याच आपल्या महाराष्ट्राला आज कर्करोगाप्रमाणे ग्रासून बुवांची प्रचंड भुतावळ आणि बुवाबाजीची दलदल सर्वत्र पसरली आहे. समाजाचा नाश करायला निघालेल्या असंख्य बुवांचे काळे कारनामे-कथित दैवी चमत्कारांचे सत्य स्वरूप- त्याच्या जाळ्यात सापडणार्‍या जनमानसाचे वैज्ञानिक विश्लेषण आणि महाराष्ट्र अंनिसने जिवाच्या कराराने बुवाबाजीशी केलेला मुकाबला. सारांश बुवाबाजीचा समग्र पंचनामा करणारा हा ग्रंथ जो वाचेल त्याला दाभोलकरांनी समाजाला जागे करण्याचे केवढे महान कर्तव्य निभावले आहे याचे दर्शन होईल व त्यांच्याप्रती असणारा आदर द्विगुणीत होईल. बुवा-बाबा मात्र दाभोलकरांना शिव्याशाप देत चडफडत रहातील.

तिमिरातुनी तेजाकडे

1985 पासून ते 2010 पर्यंत दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार वाढत्या ताकदीने तेवत ठेवला. चळवळीतील त्यांचे अनुभव विश्व विस्तारत गेले. अनेक विषयावरील चिंतन प्रगल्भ झाले. अघोरी अंधश्रद्धा देवाच्या व धर्माच्या बुरख्याखाली जोपासल्या जाणार्‍या अंधश्रद्धा, त्यांच्या चिकित्सेचे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे हत्यार, विवेकवादाची जाण चळवळीत वाढत होती. भूत, भानामती, करणी, मन, मनाचे आजार, ज्योतिष, संमोहन, श्रद्धा-अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि चमत्कार अशा विविध विषयांवर विस्कळीत स्वरूपात विविध पुस्तके दाभोलकरांनी प्रसिद्ध केली. पण या सर्व विषयांची एकसंध सम्यक मांडणी कुणी केली नव्हती हे दाभोलकरांच्या लक्षात आले. त्याबाबत केलेला प्रयत्न असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. या ग्रंथातील पहिला भाग थेट अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत तर दुसरा भाग या विरोधात अंनिसने दिलेल्या कृतीशील झुंजीबाबत आहे. तिसरा भाग सैद्धांतिक आहे. जवळपास 500 पानाचा हा ग्रंथ वाचकांनी वाचला तरी अंनिसच्या गेल्या 25 वर्षांतील कर्तृत्वाचे दर्शन त्याला घडेल. अंनिसचा ज्ञानकोश असं या ग्रंथाला म्हणता येईल.

स्वप्न अधुरे राहिले

बुवाबाजीविरूद्धचे रिपोर्टिंग सोडले तर, भूत, मन व मनाचे आजार, भानामती, ज्योतिष, संमोहन आदी अंधश्रद्धेशी निगडित विषयावर प्रसंगानुरूप मर्यादित स्वरूपाची माहिती आतापर्यंतच्या विविध पुस्तकातून दाभोलकरांनी प्रसृत केली. यातील एकेक विषयावर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याचे त्यांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीची सुरवातही झाली होती. ‘प्रश्न मनाचे’ हे हमीदच्या साथीने लिहिलेल्या पुस्तकात मनाच्या आजाराचे तपशीलवार विवेचन आले आहे. मनाचे आजार अंधश्रद्धेकडे कसे घेऊन जातात याची माहिती या पुस्तकात आहे. दुसरे पुस्तक म्हणजे माधव बावगे यांच्याबरोबर लिहिलेले ‘मती-भानामती’ हे पुस्तक. या पुस्तकात भानामती म्हणजे काय? ती घडते कशी? तिच्याबाबतचे गैरसमज व प्रत्यक्ष हाताळलेल्या भानामतीच्या घटना याचं तपशीलवार वर्णन दिलं आहे. एकाच विषयाचा संपूर्ण तपशील पुरविणारी पुस्तकांची निर्मिती करण्याची दाभोलकरांची इच्छा होती. पण ती अखेर अपुरीच राहिली. असं असलं तरी त्यांनी जे विचारधन आपणासाठी मागं ठेवलं आहे ते सुद्धा आपणासाठी पुरेसं आहे.

जीवनाचा यात्रेकरू

‘मी कसा झालो?’ या आत्मवृत्तात आचार्य अत्र्यांनी लिहिलंय ‘मी जीवनाचा यात्रेकरू आहे. माझ्या खांद्यावरची पताका अजून खाली होत नाही. माझ्या पायाचे चक्र अद्याप सुटत नाही. पण जगाला माझ्यासारखी माणसं आवडत नाहीत.’

दाभोलकरांनी विवेकाची पताका खांद्यावर घेतली. शत्रुंनी थांबविले नसते तर त्यांच्या पायाचं चक्र सुरूच राहिलं असतं. दाभोलकरांसारखी माणसं हितसंबंधी लोकांना आवडत नाहीत. म्हणून त्यांना संपविले गेले.

आचार्य अत्रे पुढे म्हणतात, साहित्य म्हणजे मधाचे पोळे, कोळ्याचे जाळं नव्हे. कोळ्याचं जाळं दिसतं सुंदर नाजुक आणि कलात्मक पण कीटकांना मारण्याचा तो फास असतो. पण मध म्हणजे जीवन. जो तो पितो तो तृप्त होतो. साहित्यात कला महत्वाची पण त्यात मधुरस असणं अधिक महत्वाचं.

सोनियाचा कळस। माजी भरला सुरारस

मृत्तिकेचा घट। माजी अमृताचा साट.

दारू सोन्याच्या भांड्यातील दारू असली तर ती विवेक मारते. पण मातीच्या घटातील अमृत जीवनाला उभारी देते. दाभोलकरांच्या शत्रूंनी धर्म नावाच्या सोनेरी घटात असत्याची झिंग आणणारी दारू भरून समाजाला झिंगत ठेवले पण डॉक्टरांनी सत्याचे अमृत देऊन जनमानसाचा विवेक तेवत ठेवला. हजारो रूपये खर्चून तीर्थक्षेत्रांना जाणार्‍या यात्रेकरूंना कबीराने सांगितले,

तीरथमें तो सब पानी है

प्रतिमा सकल तो जड है भाई

पुरान-कोरान सबै बाते है

अनुभवकी वात कबीर कहै यह

सम है झुठी पोल देखा।

“अरे, तीर्थात आहे काय? पाणी. नुसते पाणी. त्याने काही होत नाही. मी त्यात आंघोळ करून पाहिली आहे. अन् मूर्तीमध्ये तर जीवच नाही. त्या बोलत नाहीत. मी त्यांच्याशी बोलून पाहिलं आहे. पुराण अन् कुराण सगळ्या गप्पा आहेत. मी सांगतो, अनुभवावाचून बाकीचे सारे झूठ आहे.” दाभोलकर तरी यापेक्षा वेगळं काय सांगत होते?

संत गाडगे महाराज नेहमी सांगत, “घरोघर तीर्थक्षेत्र आहे. त्यासाठी भटकण्याची जरूरी नाही. गंगेत स्नान केल्याने पाप जात नाही. त्याने पापें नाहीशी होतात असे जे सांगतात, ते शास्त्राचा काळा बाजार करतात.”

अशा काळा बाजार करणार्‍या ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ म्हणून तुकोबांनी तीव्र उपहास केला आहे. दाभोलकरांच्या साहित्यात दांभिकतेचा सुरखा फाडणार्‍या अशा संत कवींच्या व कुसुमाग्रज आणि मंगेश पाडगावकर तसेच विंदा करंदीकर आणि सुरेश भट यासारख्या कवींच्या वचनाची व कवितांची दाभोलकरांच्या साहित्यात पखरण झालेली आढळते.

संतांनी समतेचा मार्ग दाखविला. दांभिकतेचा बुरखा फाडला. गाडगेबाबा, कधीही विठ्ठलाच्या मंदिरात गेले नाहीत. त्यांनी वाळवंट झाडले. संताच्या व समाजसुधारकांच्या खांद्यावर बसून दाभोलकर समाजाला नव्या वाटा दाखवत राहिले. पण पूर्वसूरीच्या पावलावर पाऊल टाकत असतानाच दाभोलकरांनी विज्ञानाच्या प्रकाशात नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचे समाजाला अपूर्व अशी देण ठरावी.

पण नव्या वाटा चोखाळताना दाभोलकरांनी कधीही हिंसक मार्ग अवलंबिला नाही. समतेचा मार्ग ममतेतून जावा ही त्यांची धारणा होती. उपहासापेक्षा करूणा आणि क्रोधापेक्षा आपुलकी महत्वाची असं त्यांना वाटायचं. मूल्यांवर आधारीत नव समाजरचना करण्याचा प्रयत्न करीत राहणं, व याच मार्गांनी समता स्थापित करणं यासाठीच दाभोलकरांनी साहित्य निर्मिती केली. त्याचसाठी वाणी वापरली आणि त्याचसाठी कृतीशीलता दाखविली. त्यांचे हे विचारधन भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. पण त्यासाठी हवी दाभोलकरांसारखीच निर्भयता व सत्यनिष्ठा.

सातार्‍यात असतांना दाभोलकर एक निळ्या रंगाची स्कूटर वापरत. तिला मागे लावलेल्या स्टेपनीवरील कव्हरवर लिहिलेले वाक्य मला अजूनही स्मरते. ‘निर्भय बनो- म.गांधी’

दाभोलकरांच्या प्रथम स्मृती दिनी याच निर्भयतेने समतेच्या वाटेवरचा आपला प्रवास चालू ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

प्रा. . रा. आर्डे