सर्प हा मानव जातीचा मित्र असून घार, घुबड, ससाणा, मोर, मुंगुस यापेक्षा मानवच सापाचा मोठा शत्रू असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड शाखेचे अध्यक्ष नितीनकुमार राऊत यांनी सर्पविज्ञान प्रबोधनपर व्याख्यानात सांगितले. द.ग.तटकरे माध्यमिक विद्यालय, सुतारवाडी येथे नितीनकुमार राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सापाविषयी ज्या गैरसमजुती आणि भीती आहेत, याबाबत बोलताना नितीनकुमार राऊत यांनी सांगितले की, 1972 साली वन्यजीव संरक्षण हा कायदा केला. या कायद्यानुसार सापाला संरक्षण दिले गेले आहे. नाग, मण्यार, घोणस, फुरसे याच सापाच्या विषारी जाती असून, बाकी बिनविषारी आणि निमविषारी सापांची संख्या जास्त आहे. सापाचे आयुष्य 25 वर्षे इतके असते.
सर्पाचे विष उपयुक्त असते
ज्ञानदीप विद्यामंदिर, बोरघर हवेली येथे नितीनकुमार राऊत यांचे सर्पाच्या उपयुक्ततेसंबंधी व्याख्यान झाले. त्यात त्यांनी सर्पाच्या वेगवेगळ्या जाती, त्यांचे प्रकार, त्यांचा आहार, त्यांचे प्रजनन, त्यांचे रहाण्याचे ठिकाण याबाबत माहिती सांगितली. विषारी साप व बिनविषारी साप कसे ओळखावेत यासाठी पोस्टर दाखवून मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे 25 ते 30 टक्के धान्याची नासाडी उंदीर करतात व एका उंदराची जोडी वर्षाला सुमारे 800 ते 900 पिल्ले घालते. उंदरावरच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम सर्प करत असतात तसेच धान्यावरील उपद्रवी किटकांना ते खातात. सापाच्या विषावर रासायनिक क्रिया करून माणसांच्या अनेक व्याधींवर त्याचा इंजेक्शनसाठी उपयोग होतो व प्रतिसर्प विष हे इंजेक्शनही सापाच्या विषापासून तयार होते. अशाप्रकारे सर्प हे मानवजातीस उपकारक असून, त्याचे निसर्गातील अस्तित्व गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.