Categories
उपक्रम शाखा वार्ता

जळगाव येथे सर्पाबद्दल प्रबोधन व व्याख्यान

सप्टेंबर - २०१२

म.अं.नि.स.जळगाव यांनी सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांच्या मदतीने जळगाव शहरात 18 विद्यालयांमध्ये ‘साप वाचवा, माणूस वाचवा’ हा संदेश विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविला. सुमारे 10,000 विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन झाले. दि.22 जुलै 2012 रोजी बसस्थानक येथे सुमारे 2 हजार नागरिकांमध्ये प्रबोधन झाले. यात पोस्टर, चित्रफित तसेच सर्पमित्र विवेक देसाई यांच्या व्याख्यानाद्वारे प्रबोधन करण्यात आले. या कामात अंनिसचे कार्यकर्ते प्रा.डी.एस.कट्यारे, भारत गुजर, मंजू मुंदडा, विश्वजित चौधरी, पी.एन.चौधरी, विजय लुल्हे, शिरीष चौधरी, रविशंकर, संदीप कुमावर यांनी मदत केली.

संगमनेरमध्ये स्त्री-भु्रणहत्ये विरोधात प्रबोधनपर रॅली

            आज सामाजिक अस्थिरता निर्माण करणारी प्रमुख समस्या म्हणजे वाढत्या स्त्रीभु्रणहत्या, मुलींचे घटते प्रमाण वेळीच थांबविले नाही तर समाजाचे संतुलन बिघडून सर्वत्र अराजकता माजेल. स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच समाजमन बदलासाठी प्रबोधनाची नितांत गरज आहे. अंनिस शाखा संगमनेरच्या वतीने ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या विषयाचे एक हजार पोस्टर्स प्रकाशित करून वितरीत करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागात फिरून प्रबोधनपर व्याख्यानेही शाखेचे कार्यकर्ते देतात. या उपक्रमाचा पुढील भाग म्हणून संगमनेर शाखेने ‘स्त्री भ्रूण हत्या थांबवा, स्त्री जन्माचे स्वागत करा’ हा संदेश देणारी रॅली संगमनेर शहरातून काढली. या रॅलीमध्ये शहरातील रू.दा.मालपाणी विद्यालय, सिद्धार्थ विद्यालय, सह्याद्री विद्यालयातील मुले-मुली सहभागी झाले होते. तसेच शहरातील माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, हल्लीच्या उपनगराध्यक्षा पूनम मुंदडा, ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुचिता गवळी, डॉ.भावना दिघे, उत्कर्षा रूपवते, लक्ष्मण ढोले, डॉ.गवळी, दत्तात्रय आरोटे व सर्व स्तरातील अनेक स्त्री पुरूष सहभागी झाले होते. ‘थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, स्त्रीभ्रूण हत्या थांबलीच पाहिजे!!, लेक वाचवा देश वाचवा, मुलीचा करू नका दुस्वास, देऊन शिक्षण करा तिला सक्षम’ अशा घोेषणांनी संपूर्ण शहर दुमदुमले होते. रॅलीचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होऊन त्याचे सभेत रूपांतर झाले. समारोप प्रसंगी अंनिसच्या वतीने प्रास्ताविक झाल्यानंतर दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रूपवते, अ‍ॅड.संगिता शाळीग्राम, डॉ.भावना दिघे व रॅलीत सहभागी असलेल्या अनेक कन्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अंनिसच्या वतीने एक किंवा दोन मुलींवर थांबलेल्या जोडप्यांचे प्रातिनिधीक स्वरूपात गुलाबपुष्प व स्मृतीचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंनिसचे कार्यकर्ते काशीनाथ गुंजाळ, सोमनाथ जोर्वेकर, हरीभाऊ उगले, प्राचार्य अशोक गवांदे, असिफ शेख, अनिल भोसले, निलेश खरात, श्रीकांत माघाडे, डॉ.जे.पी.शेख या सर्वांनी परिश्रम घेतले.

अ‍ॅड.रंजना पगार-गवांदे, संगमनेर, जि.नगर