अंधश्रद्धेच्या विरोधात वारकरी संतांनी मोठ्या प्रमाणात जनजागरण केल्याचे दिसून येते आहे. त्यातून समाज मोठ्या प्रमाणात जागृत होत होता; किंबहुना अधिक धाडसाने विधान करायचे झाले तर महाराष्ट्रात ज्या चळवळी उभ्या राहिल्या, त्यांच्या मुळाशीसुद्धा संतविचार होता, असे म्हणायला मोठा वाव आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अनेक व्याख्यानांत संतांची वचने पाहायला मिळत होती. संतांनी विवेकाचा अखंड जागर केला. त्यांनी केलेल्या लोकजागरमधून समाज विवेकी बनत आहे, हे लक्षात आल्यानेच काही दुष्ट प्रवृत्ती वारकरी चळवळीत घुसल्या आणि एका सुधारणावादी विचाराला पुन्हा मुरड घालण्याचे काम सुरू केले. अशाच प्रवृत्तींनी जादूटोणाविरोधी कायद्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु ज्यांनी वारकरी संतांचा विचार समजून घेतला आहे, अशी कोणतीही व्यक्ती ही कायद्याला विरोध करू शकत नाही. कारण जो विवेकी विचार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रुजविण्याचा प्रयत्न केला, तोच वारकरी संतांचा विचार आहे.
समाज विवेकी होणे हे काही लोकांना अडचणीचे ठरणारे असते. म्हणूनच समाज जितका अज्ञानी राहील, तितकी या लोकांना संधी असते. ज्या-ज्या वेळी समाजाला शहाणे करण्याचे प्रयत्न झाले, त्या प्रत्येक वेळी त्यांना विरोध करणार्या प्रवृत्ती समोर आल्याचे दिसून येते. संत आणि समाजसुधारक सर्वांनाच आपापल्या जीवनात या विरोधाला सामोरे जावे लागले आहे; किंबहुना आपल्या प्राणाचे बलिदानही द्यावे लागले आहे. वारकरी संतांनी अंधश्रद्धेच्या विरोधात केलेला जागर हा तसाच एका ध्येयनिष्ठेतून केल्याचे दिसून येते. सर्वच संतांच्या अभंगांमध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात स्पष्ट शब्दांत भूमिका मांडल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
कोणता तरी येताळ, म्हसोबा याची तुमच्या घरावर वक्रदृष्टी झालेली आहे, असे सांगून त्यांना पशुबळी देण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्या तथाकथित देवांची ग्रामीण समाजमनावर मोठी दहशत होती. इतक्या लोकजागरनंतरही ती आजही पाहायला मिळते. या विरोधात जागरण करताना तुकाराम महाराज म्हणतात-
शेंदरी हेंदरी दैवते।
केण ती पूजी भूते–खेते।
आपल्या पोटा जी रडते।
मागते शिते अवधान॥
आपुल्या इच्छे आणिका पिडी।
काय ती देईल बराडी॥
कळो ही आली तयाची जोडी।
आपली रोकडी बुद्धी अधिरा।
ही शेंदराने माखलेली हेंदरी दैवते, तुम्ही पूजत बसण्याचे काय कारण आहे? कशाकरिता त्यांची पूजा करता? त्यांची भीतीही बाळगण्याचे कारण नाही आणि ते आपले हित करतील, अशी आशाही धरण्याचे कारण नाही. जी दैवते त्यांच्या पोटासाठी तुमच्याकडे काहीतरी मागतात. ती किती दुबळी आहेत, हे समजून घेतले पाहिजे. ती आपले पोट भरण्यासाठी सक्षम नसल्यामुळे तुमच्याकडे ‘शिते’ मागत असतील, तर असल्या दुबळ्या देवांना घाबरण्याचे कारण नाही. ते स्वत:च पोटाला मिळविण्याएवढे सक्षम नसल्याने त्यांच्याकडून तुमच्या हिताची कोणतीही गोष्ट होण्याची शक्यता नाही. ते त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पिडा देत असतील, तर ते तुमचे कोणते हित करणार आहेत? म्हणून अशा दैवतांच्या नादी लागू नका, असा संदेश तुकाराम महाराज देतात.
गोंधळ-जागरणाच्यामध्ये पशूला बळी देण्याची परंपरा आहे. याविरोधात एकनाथ महाराज जागरण करतात. ते म्हणतात ‘बाबांनो, मल्हारी देवाची वारी खुशाल मागा; पण त्यात पशूचा बळी देण्याची गरज नाही. बळीच द्यायचे असतील, बकरेच मारायचे असतील, तर ते काम आणि क्रोध ही माजलेली बकरे मारा. महाराज लिहितात-
काम क्रोध बकरा मारा।
पूजा रखमाईच्या वरा॥
आपल्यातील विकार जागविणारे काम आणि क्रोध यांचा बकरा मारा. अशा प्रकारे जागृती केल्याचे दिसून येते. देवाकडे नवस करणार्यांना जागृत करताना तुकाराम महाराज म्हणतात,
अरे नवस करून मुले झाली असती,
तर लग्नच करायची गरज पडली?
नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती?
वारकरी संतांनी महाराष्टामध्ये असा विवेकी विचारांचा जागर केला. म्हणूनच इथे विवेक चळवळी निर्माण झाल्या आणि काम करीत आहेत, हे आपण अधिक नेटाने पुढे नेऊ या.
संपर्क ः 95949 99409