Categories
अभिवादन

डॉ. विठ्ठल प्रभू यांना विनम्र आदरांजली!

एप्रिल - २०१९

डॉ. विठ्ठल प्रभू आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संबंध सुरवातीपासून अगदी समितीच्या स्थापनेपासून अतिशय जवळचे होते. समितीने आयोजित केलेल्या अनेक परिषदांमध्ये, कार्यक्रमातून, शिबिरातून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. अंनिस वार्तापत्राशी तर त्यांचे खास संबंध होते. वार्तापत्राच्या नेहमीच्या अंकात ते वेळोवेळी लिहित असायचेच पण वार्षिक अंकातही त्यांचे लिखाण असायचे. आसारामबापूंनी लैंगिकतेबद्दल काही अवैज्ञानिक दावे केले होते. यावर प्रतिवाद करणारा परखड लेख वार्तापत्रात डॉ.प्रभू यांनी लिहिला होता. या लेखावर चिडून जाऊन आसाराम बापूच्या आश्रमाने डॉ.प्रभू व वार्तापत्रास कायदेशीर नोटीस पाठविली होती.

वार्तापत्राच्या वार्षिक अंकाला देणगी मिळवण्याच्या मुंबईतील मोहिमेची सुरुवात दरवर्षी त्यांच्या पासूनच होत असे. डॉ. दाभोलकरांच्या भेटीनंतर जाताना देणगीचा चेक ते डॉक्टरांच्या हातात काहीही न बोलता ठेवत. त्यावेळचे डॉ. विठ्ठल प्रभूंचे प्रसन्न, कौतुकाचे हास्य आजही नजरेसमोर तरळते. अंनिसच्या या मार्गदर्शक सहकार्‍याला विनम्र अभिवादन !

संपादक

डॉ. विठ्ठल प्रभू नुकतेच गेले. तब्बल नऊ दशकांचे निरामय आरोग्य त्यांना लाभले.

‘निरामय कामजीवन’चे लेखक हीच त्यांची ओळख. तशी तीस-पस्तीस पुस्तके त्यांच्या नावे जमा आहेत; पण हे पुस्तक खास. ‘निरामय कामजीवन’ची पहिली आवृत्ती आली, तब्बल 36 वर्षांपूर्वी, 1982 च्या पाडव्याला. माझ्या हातात आज चौतिसावी आवृत्ती आहे आणि आजही हे पुस्तक तितकेच प्रभावी आणि उपयुक्त आहे. आवृत्तीगणिक डॉक्टरांनी यात प्रयत्नपूर्वक आणि अभ्यासपूर्वक भर घातली आहे. त्यामुळेच आजही हे पुस्तक ताजे टवटवीत आहे. इतक्या वर्षांत कितीतरी बदल झाले. एड्ससारखे आजार आले, स्त्रीवादी काम-दृष्टिकोन आला, नवनवी गर्भनिरोधक साधने आली, ‘व्हायग्रा’सारखे बहुचर्चित औषध आले, पिवळ्या कव्हरातले ‘पोर्न’ हातातल्या मोबाईलमध्ये अवतरले आणि या सार्‍यांबरोबर नवे गैरसमज, नव्या अंधश्रद्धा आणि नवे शोषकही आले. नवे आले; पण जुने नामशेष नाही झाले. डॉक्टरांनी हे सारे यथायोग्य स्वरुपात आणि शब्दांत त्यांच्या पुस्तकात आणले. अतिशय अनुरूप आणि सभ्य भाषा ही त्यांच्या लिखाणाची खासियत. कितीतरी शब्दांना समर्पक आणि सहज रुळलेले मराठी शब्द नाहीत; पण डॉ. प्रभू लिहीत राहिले, शब्द आणि पिढ्या घडवीत राहिले.

या पुस्तकाला लाभलेली डॉ. भा. नी. पुरंदरेंची पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना अजूनही लागू आहे. यात कामजीवन हा विषय शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमाचा भाग असावा, अशी आजही अमान्य असलेली मागणी आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार लाभला. कामविज्ञानाला राजमान्यता मिळाली; पण ते तेवढीच. इतकी वर्षं झाली, डॉ. विठ्ठल प्रभू देवाघरी गेले, तरीही ही मागणी काही कृतीत उतरलेली नाही. या विषयावर अहवाल देणार्‍या सरकारी समितीत डॉ. प्रभू होते. सकारात्मक अहवालही दिला गेला; पण महाराष्ट्राच्या विधानसभेने तो एकमताने नाकारला!

डॉ. प्रभूंनी लैंगिकता शिक्षणाचा सतत आग्रह धरला आणि कृतीतून तो दाखवूनही दिला. त्यांची पुस्तके, त्यांचे रेडिओवरील कार्यक्रम याची साक्ष आहेत. शेवटी कामजीवन म्हणजे निव्वळ संभोग नाही. लैंगिकता म्हणजे निव्वळ मैथुन नाही. लैंगिकता तर भाषा, वाचा, व्यवहार आणि जीवनदृष्टी व्यापून असते, हे लक्षात घेऊन डॉक्टरांनी तसे लिखाण केले. लैंगिक शिक्षण म्हणजे हे डॉक्टर आता तरूण मुला-मुलींना मानवी संभोगाची सचित्र माहिती सांगणार आणि मोठाच गहजब उडणार, अशी सांभाळ-काळजी काळजात बाळगणार्‍या समाजाच्या सगळ्या शंकांना उत्तरे दिली. लोकं विचारत; ‘प्राण्यांना कोण शिकवते?’ डॉक्टर सांगत, ‘प्राण्यांची लैंगिकता ही सिझनने बद्ध असते; माणसाची लैंगिकता ही रीझनने, कायद्याने, नीतीने, रीतीने… त्यामुळे शिक्षण हवेच.’ लोकं म्हणत, ‘पाण्यात पडले की पोहायला येतेच की?’ प्रभू म्हणत, ‘बरोबर; पण गटांगळ्या खात शिकायचे का तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली? निवड तुमची.’ दबक्या आवाजात प्रश्न येई, ‘हे ऐकून मुलांना आमच्याबद्दल काय वाटेल?’ मिश्कीलपणे उत्तर येई, ‘काय वाटायचंय? निसर्गाचा एक नियम म्हणून हे शिकवायचे आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला मुले तुम्हाला जबाबदार धरतात का?’ बावरलेला कुणी विचारी ‘हे असले काही शिकवले की मुले ते सगळे प्रयोग करून बघतील…मग?’ शांत, विचारी उत्तर येई, ‘या वयात उत्सुकता असतेच आणि प्रयोग चालतातच. आपल्या महाकाव्यातही हे आहेच; उलट शिक्षणाने जबाबदार वर्तन वाढीस लागते. प्रयोगशीलतेला, फाजील कुतुहलाला वळण लागते. शिक्षणाने तरुण बिघडतील, असे म्हणणे म्हणजे भाषा शिकवली तर मुले फक्त शिव्याच शिकतील, असे म्हणण्यासारखे आहे. उलट भाषेवर छान प्रभुत्व असेल, तर एकही शिवी न देता तोच परिणाम साधता येतो!’ या आणि अशा शंकांना डॉक्टर चिकाटीने उत्तरे देत राहिले.

या विषयावर काही माहितीपर व्हिडीओ क्लिप्स बनवाव्यात, असा विचार होता. मार्गदर्शनासाठी मी त्यांच्याकडे गेलो. सहस्राहूननी अधिक पौर्णिमा पाहिलेला हा तपस्वी खुल्या दिलाने माझे स्वागत करता झाला. आपल्या ज्ञानाचे आणि संदर्भग्रंथांचे भांडार खुले केले त्यांनी. गेली काही महिने असा ‘यू-ट्यूब’ चॅनेल सुरू आहे आणि आजमितीस त्यास पाच कोटी ऐंशी लाखांच्या वर ‘हिट्स’ मिळाले आहेत, हे मी अभिमानाने सांगत नाहीये; मोठ्या खेदाने हे नमूद करतोय. अशा शास्त्रीय माहितीची किती गरज आहे आणि ती पोचवण्यात आम्ही डॉक्टर किती कमी पडतो, याची विषण्ण करणारी जाणीव होते मला.

त्या वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्त्या अशी माहिती मिरवत असतात; पण त्याआडून स्वतःचीच जाहिरात जास्त केलेली असते. शास्त्रीय महिती दुय्यम आणि आत्मगौरव जास्त अशी स्थिती असते. डॉ. प्रभूंनी असला प्रकार टाळला. अत्यंत सुसंस्कृतपणे, संयतपणे त्यांनी र. धों. कर्वेंची पताका पुढे नेली. प्रचंड वाचन, अभ्यास, काव्य-नाट्य-विनोदाची उत्तम जाण असणारा हा मर्मज्ञ रसिक एक ‘आनंदयात्री’ होता. जयवंत दळवी, कुसुमाग्रज, पुलं अशा भाषाप्रभूंशी त्यांचा स्नेह होता. त्यामुळेच की काय, कामशास्त्रासारखा स्फोटक विषय असूनही त्यांची लेखणी कधीही चळली नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांनी आपली लेखणी चालवली आणि अनेकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवले. याच भावनेतून ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनशी निगडित झाले. इथल्याच सहकार्‍यांबरोबर त्यांनी पुढे ‘कौन्सिल फॉर सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड’ ही संस्था काढली. उत्सुक डॉक्टरांसाठी अभ्यासक्रम, परिषदा, नियतकालिके असे मोठे काम उभे केले. या त्यांच्या कामानिमित्त याच संस्थेने त्यांचा गोल्डन लॅम्प पुरस्कार देऊन गौरव केला. असे इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले.

आजही कितीतरी मुले, मुली, स्त्री, पुरुष काही ना काही आणि काहीच्या काही शंका घेऊन येतात. कामसमस्यांपैकी 80 टक्के समस्यांना माहितीचा डोस पुरतो. औषध लागतच नाही; पण लिंगाचा आकार वाढवण्यासाठी, सेक्सची ‘पॉवर’ वाढवण्यासाठी, पूर्वायुष्यातील झालेली चूक सुधारण्यासाठी, हस्तमैथुनाचे दुष्परिणाम घालवण्यासाठी, ‘शर्तीली दवा’ विकणारे ठायी-ठायी ठाण मांडून बसले आहेत. मेंदूत अपुर्‍या आणि चुकीच्या माहितीची जळमटे असलेली जनता यांच्या जाळ्यात अलगद सापडते आहे आणि अक्षरशः नागवली जाते आहे. यात दोष खरा तर तज्ज्ञ डॉक्टरांचा आहे. आम्ही खुलेपणाने बोलत नाही, योग्य आणि शास्त्रीय माहिती पोेचवत नाही, म्हणून या लिंगवैदूंचे फावते. ही एक मोठीच गरज डॉ. प्रभूंनी त्यांच्या परीने भरून काढली.

कामसमस्या हा आम्हा डॉक्टरांच्या दृष्टीने दुय्यम विषय. कॉलेजमध्ये याची ओळख शून्य टक्के. बलात्कार पीडिता कशी तपासावी?, याशिवाय कोणतीही कामसमस्या अगदी स्त्रीआरोग्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातही अंतर्भूत नव्हती आणि आजही नाही. ‘एकलव्य’ होऊन अभ्यास करणे हाच उपाय. असले पेशंट येतात; पण असतात अगदी गांगरून गेलेले. मुळात कोणाकडे जावे, या दुग्ध्यात पडलेले. स्त्रीरोगतज्ज्ञ, श्री-रोगतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, गुप्तरोगतज्ज्ञ की सार्वजनिक मुतार्‍यांत जाहिराती लावणारे स्वयंघोषित लिंगवैदू? शिवाय येणारे पेशंट चाचरत बोलणार, नुसतेच घुटमळणार, भलतेच काहीतरी सांगणार; काय बोलावे, कोणत्या शब्दांत आपले गार्‍हाणे मांडावे, हीच त्यांची एक मोठी समस्या. कोणते शब्द अश्लील समजले जातील; कोणते शिष्टसंमत, हा मनात गोंधळ. संकोच जितका पेशंटला वाटतो, तितकाच डॉक्टरांनाही वाटत असतो. पुरेसा वेळ तर नसतोच; मग डॉ. प्रभूंचे ‘निरामय कामजीवन’ हे पुस्तक मी त्यांना वाचायला द्यायला लागलो. दोघांनीही संपूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय माझ्याकडे यायचं नाही असे सांगायला लागलो आणि हे पुस्तक ‘रामबाण’ ठरू लागले. 80 टक्के लोकांना पुन्हा माझ्याकडे येण्याची गरजच पडायची नाही. जे यायचे त्यांच्या मनातली भीती संपलेली असायची. समस्या मांडायला नेमके पारिभाषिक शब्द त्यांना पुस्तक वाचून मिळालेले असायचे. मलाही सारे काही ‘गमभन’पासून सुरू करावे लागायचे नाही. किमान शास्त्रीय पूर्वज्ञान बोलताना काही गृहीत धरता यायचे. हे पुस्तक केवळ पुस्तक नसून ‘औषधी पुस्तक’ आहे, हे माझ्या लक्षात आले. पुढे काही निमित्ताने डॉक्टरांचे माझ्या दवाखान्यातही येणे झाले. मी चक्क त्यांना दारातच साष्टांग नमस्कार घातला. विठ्ठलाचे पायी माथा टेकल्याचे समाधान लाभले. एखाद्या नव्या औषधाच्या शोधाइतकीच त्यांची कामगिरी वंदनीय होती.

आज या मृत्युलेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रणिपात घालतो आहे; पण आजही त्यांच्याप्रती माझी आणि समाजाची आदरभावना पूर्णतः व्यक्त झालेली नाही, असेच वाटते. आजही कामजीवन ‘निरामय’ नाही, आजही लैंगिकता शिक्षणाची हेळसांड चालूच आहे, आजही आदरांजली वाहताना ओंजळ रिकामीच आहे, याची अस्वस्थ जाणीव राहीलच राहील.

संपर्क ः 9822010349

shantanusabhyankar@hotmail.com