दोन मुलींच्या पाठीवर त्यांना मुलगा झाला अन् त्याच्या पाठीवर आणखी एक मुलगी. पण, आपल्याला झालेला मुलगा नवसाचा असल्याचे मानून त्याच्या ‘भल्या’साठी नंतर जन्मलेल्या मुलीला चक्क एका मठात पाठविण्याची तयारी त्यांनी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी बालकल्याण समितीच्या माध्यमातून या दाम्पत्याचे समुपदेशन केले. आपल्या हातून घडत असलेली चूक उमगल्याने त्यांनी निर्णय बदलला. आणि वंशाच्या ‘दिव्या’साठी धूसर भवितव्याच्या वाटेवर जाऊ लागलेली एक ‘पणती’ केवळ अंनिसच्या सजगतेमुळे घरदार उजळविण्यासाठी परतली…!
‘आयटी’च्या जमान्यामुळे ‘स्मार्ट’ झालेले सुशिक्षित लोकही कधी कधी अंधश्रद्धेला कसे बळी पडतात, याचे हे जरासे हटके उदाहरण. नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या परिसरात घडलेली ही घटना. या भागातील शिक्षक असलेल्या एका गृहस्थाला पहिल्या दोन्हीही मुली होत्या. त्यामुळे त्याने म्हणे मुलासाठी नवस केला. योगायोगाने या दाम्पत्याला तिसरे अपत्य मुलगा झाला. त्याच्या पाठीवर एक मुलगीही झाली. पण, मुलगा मात्र नवसानेच झाल्याची त्यांनी पक्की समजूत करून घेतली. त्यातूनच कुणाच्या तरी सांगण्यावरून या मुलाच्या ‘भल्या’साठी म्हणून त्यांनी सगळ्यात लहानग्या दोन वर्षांच्या मुलीला एका मठाच्या ‘सेवे’साठी देण्याचे ठरविले.
मुलीला मठात सोडून नवसपूर्तीचा कार्यक्रम करण्याचे नियोजन त्यांनी सुरू केले. या चिमुरडीच्या वाढदिनीच एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तिला मठात पाठविण्यासाठी शोभायात्रा काढण्याचे ठरले. पण, शोभायात्रेसाठी परवानगी घेण्याच्या निमित्ताने हा प्रकार कागदावर उतरला, तेव्हा काही सजग नागरिकांचे डोळे विस्फारले. त्यातील काही महिलांनी पुढाकार घेत ‘अंनिस’चे महेंद्र दातरंगे, सुधीर धुमाळ, कृष्णा चांदगडे आदींनी बालकल्याण समितीकडे तक्रार करीत हा प्रकार रोखण्याची विनंती केली. चाईल्डलाईन संस्थेचे प्रतिनिधी पाठवूनही चौकशी करण्यात आली. त्यानंतर दांम्पत्यांची भेट घेऊन समुपदेशन करण्यात आले. आपल्याकडून होत असलेल्या चुकीची त्यांना जाणीव झाली आणि मुलीला मठात ठेवण्याचा निर्णय त्यांनी बदलला. मुलाच्या सुखासाठी केवळ अंधश्रद्धेतून या लहानग्या मुलीवर हक्काच्या घरादाराला पारखे होण्याची वेळ आली होती. ज्याच्यासाठी तिला दूर सारले जात होते, तो मुलगाही तिच्याइतकाच अजाण होता, हे खरेच. पण, सुजाण म्हणवणार्या पालकांनीच भावंडांची ताटातूट करण्याचा प्रयत्न समाजातील सजग नागरिकांमुळे यशस्वी झाला नाही. आता ही ‘पणती’ माता-पित्याच्या आश्रयाने घराचा नि मनांचा कोपरा न् कोपरा उजळवत राहील…!
नवस फेडायचा म्हणून दोन वर्षांच्या मुलीला मठात पाठविण्याचा हा प्रकार अंधश्रद्धेचा आणि अल्पवयीन बालिकेचा जगण्याचा हक्क हिरावून घेणारा होता. समुपदेशनानंतर पालकांनी आपला निर्णय बदलला, हे स्वागतार्ह आहे. पण, आर्थिक स्थिती चांगली असलेल्या व चांगल्या कृतीतून समाजाला आदर्श देण्याची जबाबदारी असणार्यांकडूनच अनेकदा असे प्रकार होतात. आता तरी हे थांबले पाहिजे.
–सुधीर धुमाळ, नाशिक