गेल्या सहा महिन्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व विवेकजागराशी जोडलेल्या अनेक मुद्यांवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी, नागरिक यांच्याशी मला संवाद साधता आला. कार्यक्रमासाठी मुलांइतक्याच मुली उपस्थित असायच्या. अशाच एका कार्यक्रमात एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की, आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करतो; या शिबिरात अनेक मुले रक्तदान करतात पण रक्तदान करण्यासाठी मुली पात्रच ठरत नाहीत. त्यांची इच्छा असते परंतु त्यांच्या रक्तात हिमोग्लोबीन नेहमी कमीच असते. खात्या-पित्या घरातील, महाविद्यालयात शिक्षण घेणार्या मुलींच्या अंगातही रक्त सर्रास कमी का असते? बाईच्या सर्वव्यापी गौणत्वाचा हा एक दृश्य परिणाम आहे.
मुलग्याला पुरूष बनविण्याची आणि मुलीला बाई बनविण्याची प्रक्रिया त्यांच्या जन्मापासून सुरू होते. गर्भलिंगनिदान करायला सुरवात झाल्यापासून खरेतर मुलगा व मुलगी म्हणून वेगळी वागणूक मिळण्याची सुरवात बाळ गर्भात असल्यापासूनच होते… गर्भात असतानाच तो मुलगा आहे हे पालकांनी माहीत करून घेतले असेल तर त्या आईची विशेष काळजी घेतली जाते. घरातील जेवण्या-खाण्याच्या पद्धतीत देखील ही असमानता प्रतिबिंबीत होते. पुरूषांनी व मुलग्यांनी आधी जेवणे, त्यानंतर मुली व बायकांनी जेवायला बसणे ही अगदी साधी मानली गेलेली दैनंदिन कृती आहे. मुलीचं हिमोग्लोबीन वाढवायचं असेल तर या कृतीचीही चिकित्सा करावी लागते.
भविष्यात स्त्री व पुरूष म्हणून विशिष्ट भूमिका बजावण्याची अपेक्षा समाज मुलाकडून वा मुलीकडून करत असतो. अगदी लहानपणापासून त्यासाठी त्यांची तयारी करून घेतली जाते. मुलींना भातुकली खेळायला देणे आणि मुलांना गाड्या खेळायला देणे अशा छोट्या छोट्या दैनंदिन रितीरिवाजांच्या माध्यमातून हे ‘घडवणे’ चालू असते. रमजानच्या काळात ‘छोटे रोजेनवाज’ म्हणून लहान मुलांचे आणि मुलींचे कौतुकपर फोटो छापले जातात. त्यांच्या कोणत्या वर्तनाचे कौतुक होणार आहे हे समाज, कुटुंब अशा कृतींमधून मुलांना सांगत असतो. आणि त्या कृती करण्यासाठी बळ देत असतो.
व्रतवैकल्ये, रूढी, परंपरा सांभाळण्यासाठी मुलीचे सामाजिकीकरण केले जाते. आठवी-नववीत असल्यापासून मुली आठवड्यातून एखादा उपवास करू लागतात. मुली शाळेत जात असतात. त्यामुळे खरेतर त्या कुटुंब, जात यापेक्षा वेगळ्या व्यक्तींच्या समूहांच्या संपर्कात येत असतात. पुस्तकांच्या माध्यमातून दूरवरच्या अनेक प्रगल्भ मनांशी संवाद करण्याची संधी त्यांना मिळू शकत असते; परंतु हे घडताना दिसत नाही कारण शिक्षणव्यवस्थेतील बहुसंख्य व्यक्ती या वैज्ञानिक दृष्टिकोनातून दैनंदिन जीवनाकडे बघत नाहीत. त्यामुळे मुलींना(व मुलांनाही) त्यांच्या सामाजिकीकरणाची चिकित्सा करायला कोणी शिकवत नाही. ज्योतिराव फुल्यांच्या शाळेत जाणार्या मुक्ताबाई साळवे या 14 वर्षांच्या मांग समाजातील मुलीने लिहिलेला निबंध आपण वाचला तर हा मुद्दा अधिक नेमकेपणाने स्पष्ट होईल. 1855 साली लिहिलेल्या निबंधात मुक्ताबाईने लिहिले आहे की, “एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दु:खे पडतात… आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाही… ज्या वेळेस आमच्यातील स्त्रिया बाळंत होतात. त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्पर सुद्धा नसते…. एखाद्या वेळेस त्यांना बाळंत रोग झाला तर औषधास व वैद्यास पैसा कोठून मिळणार. असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने लोकांस फुकट औषधे दिली?” ज्योतिरावांच्या शाळेत शिकणार्या मुलीला 1855 साली परिस्थितीचे विश्लेषण करून परिस्थितीला प्रश्न विचारण्याची ताकद आलेली आहे. आपल्या वाट्याला आलेले जगणे हे आपले भागधेय मानून न स्वीकारता त्याच्याशी जमवून घेत जमेल तसे जगत न राहता त्या परिस्थितीची चिकित्सा करायला व स्वत:चे मत मांडायला शिक्षणाने या विद्यार्थिनीला शिकवले आहे. अशा वृत्तीची जोपासना शिक्षणातून होत नाही. कोणते अन्न खाऊन रक्त वाढते हे शाळेत शिकवले जाते. पण आपल्या अंगात रक्त कमी का ते वाढविण्यासाठी स्वत:मध्ये, कुटुंबात, समाजात कोणते बदल होणे गरजेचे आहे हा प्रश्न विचारायला शिक्षण शिकवत नाही. नवीन जमान्यातल्या शिकलेल्या मुली मग नवीन व्रतवैकल्ये शोधून काढतात. मार्गशीर्षातले गुरूवार अथवा वैभवलक्ष्मीचे व्रत हे 20 वर्षांपूवी अस्तित्वात नसलेले व्रत हे अशा शिकलेल्या, तथाकथित उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, शहरी बायकांमार्फतच खेडोपाडी पोहोचले आहे. 75 वर्षांची आजी हे व्रत करत नव्हती व नाही.
वयात आले की मुलीला फोलिक अॅसिडच्या गोळ्या शासनाकडून देण्यात येतात. परंतु मासिक पाळीमध्ये होणारा कमी अधिक रक्तस्त्राव, अनियमितता, स्वच्छतेसाठी आवश्यक सोयी याविषयी आपल्या समाजात अजिबात मोकळेपणा अस्तित्वात नाही. त्यामुळे याविषयाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी योग्य वैद्यकीय मदत घेणे मुलींकडून, स्त्रियांकडून घडत नाही.
एका शाळेत किशोरवयीन मुलींसाठी एक माहिती देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (मुलांसाठी असा कार्यक्रम आयोजित करण्याची गरज बहुतेक समाजाला वाटत नाही) वर्गातून त्या मुलींना ‘एका कार्यक्रमासाठी’ असे सांगून बोलावून नेले होते. कार्यक्रम संपल्यावर मुलींची आपापसात चर्चा चालली होती की, कुठल्या कार्यक्रमाला गेला होता असे मुलांनी विचारले तर त्यांना काय सांगायचे? त्यावर एक मार्गदर्शक म्हणाल्या की, ‘आईला मदत कशी करायची हे सांगायला बोलावलं होतं असं सांगा.’ स्वत:च्या शरीराविषयी मोकळेपणा बाळगायला आपण मुलींना शिकवत नाही. रक्तदान करण्यायोग्य मुली न सापडणे हे अशा अनेक पातळ्यांवर घडणार्या सामाजिक प्रक्रियांचे फलित आहे. आपण मुलींना स्वत:च्या शरीराकडे दुर्लक्ष करायला, त्याविषयी आदर नाही तर लाज बाळगायला शिकवतो. बाईच्या शरीरावर, लैंगिकतेवर ताबा ठेवणे, तिच्या शोषणासाठी त्याचा वापर करणे याची भांडवली, पुरूषसत्ताक समाजव्यवस्थेतील प्रत्यक्ष अभिव्यक्ती ही वेगवेगळ्या सत्तासंबंधांमध्ये विशिष्ट रूप घेऊन येते. कुटुंबाच्या अंतर्गत बाईवर होणार्या हिंसाचाराचे आपण उदाहरण घेऊ. कुटुंबांतर्गत सत्तासंबंधांमुळे या हिंसाचाराला रस्त्यावर होणार्या हिंसेपेक्षा वेगळे पदर आहेत. माहेरच्यांना भेटू न देणे, त्यांच्याविषयी अपशब्द वापरणे, मुलांपासून तोडण्याचा प्रयत्न करणे, तिच्या शरीराविषयी, ‘माझी भाकरी मी हवी तेव्हा खाईन’ असे मत व वागणूक असणे. मारहाण करणार्यासोबतच सतत रहावे लागत असल्याने, सतत मारहाणीच्या भीतीखाली वावरावे लागते. असे अनेक पदर कुटुंबांतर्गत होणार्या हिंसाचाराला असतात. जेव्हा स्वत: दैवी दहशतीच्यामुळे स्त्रीचे शोषण होते तेव्हा त्याचे बहुआयामी स्वरूपही असेच वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसते. जादूटोणाविरोधी कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील बघितला तर हे स्पष्ट होईल.
जादूटोणाविरोधी कायद्याखाली 40 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी सहा गुन्हे हे पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून मुलींना, बायकांना फशी पाडणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे या संदर्भातील आहेत. दापोलीला दाखल झालेल्या केसमध्ये लांब केस असलेल्या, एकही ऑपरेशन न झालेल्या मुली शोधायच्या, त्यांना देवी सारखं सजवून, पूजाविधी केल्यानंतर पैशांचा पाऊस पडेल असं सांगायचं. अशा भूलथापा मारून मुलींना जाळ्यात ओढण्यात येत होतं. या विधीचा पुढील भाग काय असावा हे विश्रांतवाडी पुणे येथे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून लक्षात येते. येथील मुस्लीम धर्मीय बाबाने पैशाचा पाऊस पाडण्यासाठी भक्त महिलेला नग्न पूजा करायला सांगितली होती. मालेगावला एका गुन्ह्यामध्ये मांत्रिकाने संबंधित महिलेला पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मांडीवर नोट ठेवून त्यावरून हात फिरवून नोटा दुप्पट करण्याचा ‘प्रयोग’ तो करत असे. त्यानंतर जेव्हा पैसे दुप्पट झाले नाहीत तेव्हा ‘बाधा’ दूर करण्यासाठी त्या महिलेचे लैंगिक शोषण करत असे. उस्मानाबादमध्ये हॉटेलमध्ये उतरलेल्या मांत्रिकाने मूल होत नाही यावर दैवी उपचार करण्याच्या नावे तक्रारदार महिलेवर तीन महिने बलात्कार केलेला आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणात मांत्रिकाच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. सोलापूरमध्ये सासूने ‘केलेली करणी’ उतरवण्यासाठी मांत्रिकाकडे गेलेल्या महिलेला त्याने तीर्थ म्हणून गुंगीचे औषध प्यायला देऊन तिच्यावर बलात्कार केलेला आहे. कुंडली दोष दूर करणे, नाडीज्योतिष बघणे व दोष दूर करणे अशा कारणांसाठी बायकांचे लैंगिक शोषण व खून झाल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत.
वंचित वर्गातील सर्वात वंचित घटक म्हणजे महिला. त्यांच्या हातात पैसा नसतो, संसाधनांवर त्यांचा ताबा नसतो. मूल न होणे, सासूचा जाच, नवर्याला ‘कह्यात’ ठेवणे या परिस्थितीतून मार्ग काढता येईल यासाठी मदत करतील अशा सामाजिक यंत्रणा आजूबाजूला नसतात किंवा या परिस्थितीविरूद्ध बंड करून स्वत:ची वाट स्वत: काढण्याला समाजमान्यता नसते. विशिष्ट अशा सामाजिक रचनेमुळे स्वत:च्या आयुष्यावर जिचा ताबा नाही अशी बाई या सर्व समस्यांचे उत्तर दैवाच्या करणीत शोधते आणि दैवाची ही विपरीत करणी दूर होण्याचा ठेका घेतलेल्या मांत्रिक, तांत्रिक, बुवा, भगत, गुरू, बापू यांचं सहज भक्ष्य बनते. स्त्रियांच्या आयुष्यातील ‘अगतिकता आणि कुटुंब’ किंवा ‘स्त्रियांची अगतिकता आणि जातीव्यवस्था’ यातून हिंसाचाराचा एक वेगळा पट उलगडतो तशाच पद्धतीने ‘स्त्रियांच्या आयुष्यातील अगतिकता आणि ती दूर करण्यासाठी त्यांची दैवशरणता.’ यातून स्त्रियांच्या शोषणाचा एक वेगळा पट उभा राहतो आणि लैंगिक शोषण हा या शोषणाचा एक व्यवच्छेदक भाग असतो हे या कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या स्वरूपावरून आपल्या लक्षात येते.
जादूटोणाविरोधी कायदा आपण अधिकाधिक महिलापर्यंत पोहोचवला पाहिजे. या निमित्ताने त्या अधिक सजग होतील. स्वत:चे शोषण आणि दैववाद स्वीकारून समस्यांची उत्तरे शोधण्याचा मार्ग याविषयी विचार करू लागतील. जादूटोणाविरोधी कायदा हा महिलांच्या शोषणमुक्तीच्या लढ्याला एक वेगळा आयाम देऊ शकेल असे जाणवत आहे.
हे बघायला डॉक्टर हवे होते.
–अॅड. मुक्ता दाभोलकर