Categories
कविता

स्त्री धर्म

वार्षिकांक - २०१९

आई गं तू आंदण म्हणून दिलेला तुझा धर्म मी झाकून ठेवलाय

दिवा नसलेल्या अंधाराच्या गाभार्‍यात

कारण विस्फारलेली त्याची नजर माझ्या स्वातंत्र्याच्या आडवी येते.

म्हणून मी आज धर्मालाच झाकून ठेवलंय…

आजही नजरेतले बाण काही बदललेले नाहीत त्याच्या

पायातलं वहाण आणि विषयांची भोक्ती म्हणून

आजही तो माझ्याकडे तसाच पाहतोय

आणि सोशिकतेची मूर्ती ठरवून पुन्हा एकदा पतिव्रतेवर बलात्कार होतोय

इथं बलात्कार करणार्‍या विष्णूसारख्या कामांध पुरुषाची देवार्‍यात

पूजा केली जाते; पण उद्ध्वस्त झालेल्या स्त्रीवर मात्र चारित्र्याचा

ठपका ठेवला जातोय

काय म्हणावं तुझ्या या धर्माला?

टिकली, बांगडीचं दान देतोय

पण उंबर्‍याच्या आत श्वास रोखून-रोखून मारतोय

आग, माझ्या पायातल्या पैंजणाच्या आवाजानेही

त्याच्या कपाळावरची रेष जागी होते,

म्हणून तुझा धर्म झाकून ठेवलाय

कारण त्याची नजर माझ्या स्वातंत्र्याच्या आडवी येते….

बाईनं बाईसारखं राहावं ही शिकवण धर्मातच आम्हाला दिली

म्हणून सीतेला अग्निपरीक्षा आणि भरदरबारात द्रौपदीची विटंबना झाली.

आमच्या सावलीचा देवांनाही आता विटाळ होतोय

आणि आमच्याच पोटी जन्मलेला पुरुष मात्र मंदिराचा पुजारी

म्हणून ताबा घेतोय

हाच का गं तुझा धर्म, ज्याला पावित्र्याची पारख नाही

हाच का तुझा धर्म ज्याला नितीमत्तेची जोड नाही

बोथट वाटणार्‍या संस्कृतीचं जोखड आता आयुष्याचं

ओझं झालंय

आई गं तुझ्या धर्मांना मी झाकून ठेवलाय…

बास झालं आता जुलमाचं हे रहाटगाडगं

जिथं स्त्रित्वाचा लिलाव मांडला जातोय

ग्रहण लावणारे वेगळेच असतात

शाप मात्र चंद्राला मिळतोय

पण आता काळ पुढे गेलाय

आणि हजारो वर्षे लॉक करून ठेवलेला सूर्य

झंझावातासारखा बाहेर आलाय

जोतिबाच्या सावित्रीनं भूतकाळाचा. पाश तोडलाय,

महर्षि कर्व्यांच्या घरात विधवेला देव भेटलाय

आई बघ मी ही निघाले आता त्या देवांकडे

ज्यांनी बाईला माणूस म्हणून जगायला लावणारा धर्म लिहिलाय.