फुलते त्या प्रत्येकीचे
पवित्र निर्माल्यच होईल
अशी खात्री देता येत नाही.
उमलू न दिलेल्या
कित्येक कळ्यांना
निर्माल्य हे तर वरदान ठरते बहुधा.
बाकी ज्याने ज्याकडे जसे पाहावे
तसे ते त्याला दिसते,
हा एक जबरदस्त दिलासाच म्हणायचा,
शोषक – शोषित दोघांनाही !
त्याग, कृतार्थता, जीवनार्थ
तर बरेचदा असते
संस्कृतीची निव्वळ सारवासारव.
कळ्यांनी कसे कुठे किती फुलावे,
स्वतःला कुणावर कधी वाहावे,
वेलीवरच कोमेजावे, की
समाजपुरुषाच्या पायाशी
पाचोळा म्हणून पसरावे,
हे ठरवायची मुभा
संस्कृतिरक्षकांपलिकडे
कुणालाच नसते.
स्वयंनिर्णय, व्यक्तिस्वातंत्र्य,
असल्या ज्वालाग्रही हक्कांचा तर कळ्यांना पत्ताच नसतो.
नाहीतरी संस्कृतिवृक्षाच्या दिमाखदार उभारासाठी
खत म्हणून पायाशी असा पालापाचोळा
आवश्यक असतोच !!