मी अंधारात घुसणार
तेवढ्यात उजेड
पाय आपटून – आपटून रडू लागला
म्हणाला, नको ना जाऊ.
मी म्हटलं का?
तो म्हणाला, अंधारात भुतं असतात.
मी त्याचं बोट धरलं
आणि चल म्हटलं
आम्ही पुढे जाऊ तसं
अंधार नाहीसा होत गेला
आणि माणसं दिसू लागली….
‘देवाने माणूस तयार केला की,
माणसाने देव निर्माण केला?’
असं काहीसं मी परवा
कशाचीही पर्वा न करता बोललो.
तर काही माणसं माझ्या अंगावर
धावून आली मला मारायला
तेवढ्यात मी
बाजूच्या दगडासमोर
हात जोडून उभा राहिलो
आणि काय गंमत राव
अंगावर आलेली माणसं
त्या दगडासमोर नतमस्तक झाली.
आणि
तेव्हापासून तो दगडसुद्धा
देव झाला.”