Categories
कार्याध्यक्षांची डायरी

महा. अंनिस ‘त्रिदशकपूर्ती’चा हेतू आणि महत्त्व

जुलै - २०१९
9,10 11 ऑगस्टला मुलुंड (मुंबई) येथे भव्य अधिवेशन

प्रिय साथी,

आपणांशी संवाद साधताना अतिशय आनंद होत आहे. या वर्षी महाराष्ट्र अं.नि.स.च्या शाखा, जिल्हा व राज्य या तीनही स्तरांवरील कार्यकारिणीची निवडप्रक्रिया पार पडली. महत्त्वाचे म्हणजे संपर्ण निवड सर्वसहमतीने होण्याची आपली परंपरा कायम ठेवली. लोकशाही पद्धतीने असली, तरीही कोणीही निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला नाही, ही विशेष नोंद घेण्याची बाब आहे.

समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक दि. 7 ते 9 जून रोजी भोर, जि. पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. महत्त्वाचे म्हणजे समितीच्या स्थापनेपासूनचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर वयाच्या आणि प्रकृतीच्या मोठ्या अडचणी असून देखील निवड सहमती समितीचे अध्यक्ष म्हणून बैठकीच्या पहिल्या दिवशी जातीने हजर राहिले व त्यांनी त्यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवड सन 2019 ते 2022 निश्चित केली. एवढेच नव्हे, तर समितीचे विस्तारणारे कार्य आणि राजकीय-सामाजिक वास्तव लक्षात घेता सर्वांनी एकदिलाने व परस्परविश्वासाने हे काम पुढे नेण्याबाबत वडिलकीच्या नात्याने आणि आत्मियतेने मार्गदर्शन केले, प्रेरणा दिली. त्याचा परिणाम म्हणून दुसर्‍या दिवशी त्रिदशकपूर्ती अधिवेशनावरील चर्चेदरम्यान विविध जिल्ह्यांतील उपस्थित पदाधिकार्‍यांनी मोठ्या उत्साहाने त्रिदशकपूर्ती अधिवेशन साजरे करण्याबाबत व त्यासाठी जाहिरात व देणगी स्वरुपात निधी संकलनाबाबत इष्टांक उत्स्फूर्तपणे जाहीर केले.

मित्रांनो, आपण उपाध्यक्ष म्हणून या वर्षी नव्याने निवड केलेले तीनही राज्य उपाध्यक्ष अनुक्रमे ज्येष्ठ लेखक, संपादक, विचारवंत उत्तम कांबळे (नाशिक), डॉ. सुरेश खुरसाळे (नांदेड) आणि प्रा. शामराव पाटील (इस्लामपूर) हे बैठकीला भेट देण्यासाठी मुद्दामहून भोर येथे उपस्थित राहिले. त्यांना आपल्यासोबत या पदावर काम करण्याचा विशेष आनंद व अभिमान वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच अंनिस कार्यकर्त्यांचे समर्पण व बांधिलकी बाबत कौतुक केले.

साथी, महाराष्ट्र अंनिसच्या संघटित कामाला यावर्षी तीस वर्षेपूर्ण होत आहेत. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या अतिशय कुशल आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या पुढाकाराने 9 ऑगस्ट 1989 रोजी या कामाची पायाभरणी झाली. प्रारंभीच्या काळात दहा-बारा शाखांमधील विस्तार आणि तथाकथित दैवी चमत्कारांमागील तथ्य सांगणारे सप्रयोग व्याख्यानाचे कार्यक्रम आणि बुवा-बाबांचा भांडाफोड करणारे असे सीमित असलेले हे काम संघटित प्रयत्न, संपर्कातील सातत्य आणि उपक्रमातील वैविध्य या त्रिसूत्रीने क्रमाक्रमाने विविधांगाने बहरत आणि विस्तारत गेले. अंधश्रद्धांच्या विविध प्रश्नांच्या अंगाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार यापासून ते विवेकवाद-मानवतावादापर्यंत हे काम विस्तारले. ते थेट संविधान मूल्यांची रुजवण ते लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांचे भरणपोषण येथपर्यंत स्पर्श करू लागले आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून 350 च्या वर शाखांमधून विस्तारले आहे. महाराष्ट्राबाहेर 10-12 राज्यांत चांगला संपर्क आहे.

मित्रांनो, संघटनेच्या रौप्यपूर्ती अधिवेशनातच पुढील पाच वर्षांनी म्हणजे त्रिदशकपूर्तीच्या निमित्त अतिशय भव्य आणि दिमाखदार असे अधिवेशन घेण्याचा संकल्प आपण केला होता. त्या संकल्पपूर्तीची वेळ आता अगदी नजीक येऊन ठेपली आहे.

समाजपरिवर्तनाच्या क्षेत्रात एखाद्या संघटनेचा तीस वर्षांचा कालावधी म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. डॉ. दाभोलकर नेहमी म्हणायचे की, ही लढाई दशकांची नव्हे, शतकांची आहे, तरीदेखील अशा टप्प्यावर पोचल्यानंतर मागे वळून पाहत भविष्याचा वेध घेणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच अशा कार्यक्रमाची आवश्यकता असते. कारण त्यातून कार्यकर्त्यांना नवीन प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आपले कार्य ठसठशीतपणे समाजापुढे नेण्याची, नेमकेपणाने पोचविण्याची संधी असते. आपल्या त्रिदशकपूर्तीला तर आणखी वेगळा संदर्भ आहे. हे वर्ष महाराष्ट्र राज्य निर्मितीचे साठावे वर्ष आहे. पुरोगामी म्हणविल्या जाणार्‍या महाराष्ट्रात तीस वर्षेम्हणजे निम्मा काळ अंनिस कार्यरत आहे, तेव्हा महाराष्ट्राच्या सामाजिक प्रगतीत आपल्या कामाचा एक खारीचा वाटा नक्कीच आहे, हा वाटा काय? हे समाजापुढे आणण्याची अधिवेशन ही संधी आहे. सुरुवातीच्या काळात विरोधकांकडूनच नव्हे, तर अगदी पुरोगामी परिवर्तनवादी संस्था-संघटनेच्या मित्रांकडून देखील ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हे काय व्यवस्था बदलाचे काम आहे का, अशी उपेक्षा होत होती; मात्र आज या कामाचे महत्त्व केवळ अधोरेखितच झालेले नाही, तर डॉक्टरांच्या बलिदानानंतर ते महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील घडामोडींमध्ये केंद्रस्थानी आले आहे. या कामाला देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही मागणी आणि मान्यता वाढते आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्र/देशाबाहेरील अनेक व्यक्ती-संघटना महाराष्ट्र अंनिसचे काम ‘पायोनियर’ आणि ‘युनिक’ असल्याचे गौरवोद्गार काढत आहेत.

मित्रांनो, तीस वर्षांतील आपल्या कामाचे आपण व्यवस्थित दस्तऐवज संकलन करू शकलो नाही, ही आपल्या कामातील मोठीच उणीव राहिली आहे; अन्यथा ‘नोबेल पुरस्कारा’च्या दर्जाचे किंवा त्याहूनही अधिक काम आपण उभे केले आहे, असे जराही अतिशयोक्ती आणि अभिनिवेश न ठेवता म्हणू शकतो, अशी माझी खात्री आहे. तेव्हा त्रिदशकपूर्ती अधिवेशन हे चांगल्या अर्थाने आपल्या कामाचे मार्केटिंग करण्याची संधी आहे.

मित्रांनो, पुरोगामी महाराष्ट्राच्या साठ वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्र अंनिसचे योगदान काय? हे नेमकेपणाने समाजाला सांगण्यासाठी हे अधिवेशन आहे. पुढील काही मुद्दे आपल्याला सर्वांना सांगता आले पाहिजेत. नंबर एक – Identification of Issue. अंधश्रद्धेचा प्रश्न आहे, हे देखील पूर्वी मान्य नव्हते. आज आपल्या प्रयत्नातून ते सर्वमान्य झाले आहे. अगदी बुवा, बाबा, मांत्रिक, मौलवी देखील अंधश्रद्धा वाईट असतात, त्याचे निर्मूलन झाले पाहिजे, हे मान्य करतात. नंबर दोन – How to address issue. हा अंधश्रद्धेचा प्रश्न कसा सोडवायचा, याबद्दल आपण आपल्या कामातून एक मापदंडच जगापुढे उभा करू शकतो. अंधश्रद्धेच्या कोणत्याही प्रकारचा प्रश्न असो, तो आम्ही सोडवू शकतो, असा विश्वास आपल्या कामातून आणि अनुभवातून आपण देऊ शकलो आहोत. नंबर तीन – आपल्या कामामुळे महाराष्ट्रात तरी उघडपणे चमत्काराचा दावा करणारे बुवा-बाबा थांबले आहेत. हे मोठे यश आहे. म्हणजे चमत्कार करणारे छोटे-मोठे बाबा आहेत की नाही? तर आहेत; पण ते उघडपणे दावा करीत नाहीत, ही आपली उपलब्धी आहे. नंबर चार – सतत 18 वर्षांचे अथक प्रयत्न, पाठपुरावा आणि संसदीय मार्गाने आंदोलने करून आणि आपल्या अध्वर्यु नेत्याच्या बलिदानातून आपण जादूटोणाविरोधी कायदा करण्यास शासनाला भाग पाडले. अशा स्वरुपाच्या सामाजिक प्रश्नाबाबतचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. जगाला हा कायदा पथदर्शी आहे. कारण अशा स्वरुपाचा कायदा भारतातील इतर काही राज्यांत आपला पाठपुरावा व मार्गदर्शनाने करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत; तर युगांडासारख्या देशात नरबळीच्या घटना थांबविण्यासाठी तेथील संसदेत अशा कायद्याचा ड्राफ्ट तयार करण्यासंदर्भात आपणाशी वारंवार संवाद व मार्गदर्शन घेतले गेले. एवढेच नव्हे, तर तेथील संसदेसमोर बोलण्यासाठी आपल्याला आमंत्रित केले गेले, यावरून या कायद्याचे महत्त्व अधोरेखित होते. नंबर पाच – म्हणजे जातीच्या प्रश्नाबाबत जातपंचायतींच्या समांतर न्यायप्रक्रियेला चाप देणारा देशातील पहिला ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा’ आपल्या पाठपुराव्यातून आपण प्राप्त केला. हा देखील भारतातील एकमेवाद्वितीय कायदा आहे.

यासोबत शेकडो महत्त्वाच्या गोष्टी आणि कार्य आपण सांगू शकतो. ते ठळकपणे जगासमोर आणण्यासाठी अधिवेशन हे निमित्त आहे. आपले त्रिदशकपूर्ती अधिवेशन हे आपण ठरवून प्रथमच मुंबई येथे घेत आहोत. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. आपले अधिवेशन जगभर पोचवण्यासाठी मुंबई महत्त्वाची आहे. गेली वर्षभर त्याची तयारी आपण करत आहोत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई येथील सर्व सहकार्‍यांच्या प्रयत्नातून तयारी सुरू आहे. त्यासाठी आतापर्यंत आठ बैठका होऊन कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरू आहे.

मित्रांनो, दि. 9, 10 व 11 ऑगस्ट 2019 या तारखांना मुंबई येथील ‘कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड’ या ठिकाणी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दि. 9 ऑगस्ट रोजी ‘मानवतावादासाठी विवेकवाद’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आहे. या परिषदेसाठी जवळपास 15 ते 20 देशांतील प्रमुख विवेकवादी व्यक्ती-संघटनांना मिळून जवळपास सव्वाशे मान्यवरांना निमंत्रणे पाठविली असून, संपर्क, पाठपुरावा सुरू आहे. यातील काही जणांची उपस्थिती निश्चित झाली आहे. तसेच देशभरातील 20 ते 25 राज्यांतील समविचारी प्रमुख संस्था, संघटनांना देखील निमंत्रणे दिली आहेत. त्यातून प्रमुख लोकांचे येणे निश्चित झाले आहे. त्यामुळे देश-विदेशातील सुमारे 150 ते 200 मान्यवर व प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती निश्चित झाली आहे. त्यासाठी देशभरातील मान्यवरांची स्वागत समिती गठित केली आहे. त्यासाठी विनंती केलेल्या डॉ. अनिल काकोडकरांपासून ते आतिष दाभोलकरांपर्यंत अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी संमती कळविली आहे. हे सांगताना विशेष आनंद आणि अभिमान वाटतो.

दि. 10 व 11 ऑगस्ट रोजी आपले त्रिदशकपूर्ती अधिवेशन आहे. हा आपल्या संघटनेचा आनंद सोहळा आहे. त्यामुळे आपण सर्व क्रियाशील कार्यकर्ते, हितचिंतक सभासद या कुटुंबसोहळ्याला सहपरिवार सादर निमंत्रित आहात. आपण तीनही दिवस अगत्यपूर्वक यावे, ही आग्रहाची विनंती.

अर्थातच, मुंबईसारख्या शहरातील आयोजन, पावसाळ्याचे दिवस आणि सुरक्षेचा मुद्दा या सर्व बाबी लक्षात घेता पूर्वनोंदणीशिवाय कोणालाही उपस्थित राहता येणार नाही. व्यक्तिगत पूर्वनोंदणीचा ऑनलाईन फॉर्म आपणाला मेलद्वारे उपलब्ध करून दिला जाईल. तो भरून नोंदणी करणे अनिवार्य आहे. या फॉर्मवरून जिल्हापातळीवर पडताळणी केली जाईल, त्यानंतरच नोंदणी अंतिम होईल. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही समितीचा सदस्य असल्याशिवाय परस्पर नोंदणीसाठी सांगू नये; तसेच ऐनवेळी परस्पर येऊ नये. अशा व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. कृपया हे समजून घ्यावे, सहकार्य करावे. त्यासाठी वेळोवेळी मेलद्वारे येणार्‍या सूचना पाहता राहा. त्यानुसार कार्यवाही करा, ही विनंती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एवढे भव्य-दिव्य अधिवेशन आयोजित करणे, हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी फार मोठा खर्च आहे. वेळ, श्रम, पैसा, कौशल्य, तंत्रज्ञान सर्वच साधनांची मोठी गरज आहे.

त्यासाठी आता वेळ अतिशय कमी आहे. त्यामुळे आपापल्या ठिकाणी सर्वशक्तीनिशी प्रथम प्राधान्याने आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करीत जाहिराती व देणग्या संकलन करणे आवश्यक आहे. त्यासाठीचे आवाहनपत्रं, सूचनापत्रं आपणास पोचली असतीलच. आता वेळ न दवडता व संकोच न ठेवता अत्यंत नियोजनपूर्वक निधी उभारणीचे काम करणे आवश्यक आहे. अनुभव असा आहे की, मदत देणारे खूप आहेत. आपणच त्यांच्यापर्यंत पोचण्यास कमी पडतो किंवा आपल्या क्षमता नीट वापरत नाहीत; पण या आव्हानात्मक स्थितीत संघटनेचे सर्वोच्च प्राधान्य लक्षात घेऊन कामाला कोठेही कसर न ठेवता आपण सर्व हे काम कराल, अशी खात्री आहे. तूर्त संघटनेचा हाच सर्वांत महत्त्वाचा व प्राधान्याचा कार्यक्रम असल्याने आपापल्या शाखा, जिल्हा पातळीवरील इतर कार्यक्रमाला प्रमुख लोकांनी वेळ, श्रम खर्च करू नये. कारण आपणा सर्वांच्या बहुमोल सहभागाची त्रिदशकपूर्ती यशस्वितेसाठी नितांत आवश्यकता आहे. यासाठीचा उत्साह सर्वच दिसतो आहे. अनेक जिल्ह्यांच्या बैठका होत आहेत व कार्यकर्ते निधी उभारणीच्या कामाला लागले आहेत. त्यांचे फोन येत आहेत, हे सर्व चित्र उत्साहवर्धक आहे. प्राधान्याने विशेषांकाच्या मजकुराची जबाबदारी असलेल्या पदाधिकार्‍यांनी आपले लेख वेळेत द्यावयाचे आहेत; तसेच वेळ व श्रम देणार्‍या कार्यकर्त्यांनी आपली नावे कळवावयाची आहेत. सर्वांच्या सर्वसमावेशक प्रयत्नांतून ‘त्रिदशकपूर्ती’ संस्मरणीय करूया! कटिबद्ध होऊया!