Categories
अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

जुलै - २०१९

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ 1 ऑगस्टला होत आहे. त्यानिमित्ताने कॉ. अण्णा भाऊ साठेंवरचा लेख प्रसिद्ध करीत आहोत.

(1 ऑगस्ट 1919 ते 18 जुलै 1969)

“ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित-श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,” असे वरिष्ठ वर्णाला आणि वरिष्ठ वर्गाला ठणकावून सांगणार्‍या अण्णा भाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.

अण्णा भाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 चा! गाव वाटेगाव! शेती नाही, उत्पन्नाचे कसलेही साधन नाही, शिक्षणाची सोय नाही; उपासमार दारिद्य्र, लाचारी, टोकाचा जातीभेद अशी दु:खे इथल्या धर्मव्यवस्थेने बहाल केलेली. या दु:ख आणि दैन्याचे गाठोडे सोबत घेऊन अण्णा भाऊ आपल्या वडिलांबरोबर मुंबईला पायी आले आणि पोटासाठी माटुंगा येथील लेबर कॅम्पातील झोपडपट्टीत स्थायिक झाले.

लेबर कॅम्पात विविध जिल्ह्यांतून आलेली दलित मंडळी राहत; गिरण्यांत, गोदीत, म्युनिसिपालटीत नोकरी करत. इथे दोनच राजकीय पक्ष होते. एक डॉ. बाबासाहेबांचा ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ आणि दुसरा ‘कम्युनिस्ट पक्ष.’ बाबासाहेबांचा समाजावर प्रचंड प्रभाव असूनही अनेक दलित कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते.

अण्णा भाऊंची परंपरा ज्ञानाची, शिक्षणाची नव्हती. त्यांची परंपरा होती कष्टाची, दारिद्य्राची आणि ढोलकी, तुणतुणे आणि तमाशाची. लेबर कॅम्पातल्या मच्छरावर त्यांनी एक पोवाडा लिहिला आणि ते कॉम्रेड शंकर नारायण पगारेंच्या नजरेत आले. त्यांना लिहिते करण्यासाठी लालबावट्याच्या ऑफीसमध्ये सोय करण्यात आली. पोस्टर आणि पत्रकांच्या गठ्ठ्यावर बसून त्यांनी ‘प्रथम मायभूच्या चरणा’ हा गण लिहिला.

त्यांचा गण आणि वगनाट्य कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात सादर करण्यात आले. या पहिल्या प्रयोगाला प्रमुख कम्युनिस्ट नेते – कॉ. गंगाधर अधिकारी, कॉ. बी. टी. रणदिवे, कॉ. पी. सी. जोशी इत्यादी उपस्थित होते.

अशी दणदणीत सुरुवात केलेल्या अण्णा भाऊंनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या शंभरच्या आसपास आहे. त्यामध्ये चौदा लोकनाट्ये, दहा पोवाडे, एक नाटक, एक प्रवासवर्णन, बावीस कथासंग्रह, तीन कादंबर्‍या, बारा चित्रपटकथा, तेरा गीतपुस्तिका यांचा समावेश आहे. भारतातील आणि जगातील सत्तावीस भाषांमध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतरे झाली आणि प्रसिद्ध पण झाली. ‘फकिरा’ कादंबरीला त्या काळी नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सरकारने कादंबरी लेखनातले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले.

1957 साली पहिले दलित साहित्य संमेलन भरले. त्याचे स्वागताध्यक्ष अण्णा भाऊ होते. त्यांनी आपल्या जहाल तात्त्विक मांडणीने साहित्यविश्व हलवले. त्यांचा केंद्रबिंदू शहरी मध्यमवर्गीयांकडून दलित आदिवासी कष्टकर्‍यांच्या जीवन प्रवाहाकडे प्रवास करू लागला.

“ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,” या विधानाने तर पारंपरिक भाकडकथांना छेद देऊन श्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

त्यांनी जलसे आणि तमाशाचे स्वरूप बदलले. अश्लीलता आणि दैवी कथा काढून त्यात पुरोगामी, सामाजिक आणि राजकीय विचार भरले. त्यांच्या जलशावर मोरारजी सरकारने बंदी आणली, तेव्हा त्यांनी नवे नामकरण केले – ‘लोकनाट्य’! त्यांनी गणाचे स्वरूप स्वीकारले; पण अधिष्ठान बदलले. देवदेवतांच्या वंदनाऐवजी मातृभूमी, देशभक्त, हुतात्मे यांना वंदन केले. उदा.

“प्रथम मायभूच्या चरणा

छत्रपती शिवबा चरणा,

स्मरोनि गातो कवना ॥धृ.॥

क्रांतिकारी वीरांना आणि त्यागी भूषणापणा,

लावूनिया प्राणा,

अर्पियले ज्यांनी जीवना…

स्फूर्ती द्यावी हीच प्रार्थना.”

परमेश्वराच्या अवतारावर आधारलेली ‘गवळण’ वगळली आणि लोकनाट्यात ‘म्हणणी’ आली. त्यातून कथानकाचा परिचय करून दिला जातो.

लावणीरचनेत त्यांनी घाट स्वीकारला; पण आशय बदलला. त्यांची लावणी कुलीन, संस्कारी आणि प्रबोधनकारी असते. ‘मुंबईच्या लावणी’त त्यांनी मुंबईचे वास्तव आणि सत्यदर्शन घडवले आहे. एका बाजूला सुखासीनता आणि चंगळवाद, तर दुसर्‍या बाजूला उपासमारीची खोल दरी.

उदा.

मुंबईत उंचावरी, मलबार हिल, इंद्रपुरी,

कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती॥

परळात राहणारं, रात्रंदिवस राबणारं,

मिळेल ते खाऊन घाम गाळती॥

ही टोकाची विषमता, कपडे, वाहतुकीची साधने, नोकरी-धंदे, आजारपण, इस्पितळे, एवढेच काय अंत्यविधीसाठी आहे. ऐपतदारांची प्रेते, मसणवटी, चंदनवाडी, सोनापूर येथे जाळतात, तर “बेवारशी सरणार्‍यांची सागराच्या काठी बघा सोय लागती.”

‘माझी मैना गावावर राहिली’ या लावणीत त्यांनी ग्रामीण युवकाचे रूपक वापरून सीमाप्रश्नावर सोप्या भाषेत प्रभावी भाष्य केले आहे. नवविवाहित ग्रामीण युवक नोकरीच्या शोधात मुंबईला येतो. तिथले अनुभव तो मांडतो.

त्याची ‘मैना’ गावात त्याला भरल्या मनाने निरोप देते. ते वर्णन श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी आणते. हा तरुण तिला हसवण्याचा प्रयत्न करतो, दागिन्यांनी मढवण्याचे आमिष दाखवतो; पण

“मैना खचली मनात, रुसली डोळ्यात,

नाही हसली गालात, हात उंचावून उभी राहिली”

ही ताटातूट गरिबीने केली.

गरिबाला कशाकशाला तोंड द्यावे लागते. आपल्याला कल्पनाही करवत नाही. “पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची”

पुढे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होते – “झालं फौंटनला जंग, तिथं, बांधून चंग, धार रक्ताची वाहिली”

गरीब जोडप्याची ताटातूट, तशी सीमाभाग आणि उर्वरित महाराष्ट्राची ताटातूट आहे. शेवटी ते संदेश देतात –

तुम्ही चुकू नका। कुणी वळू नका।

मागं पळू नका।

बिनी मारायची अजून राहिली।

माझ्या जीवाची होतीया काहिली॥

सरकार कामगार मालक तंट्यात लवाद नेमते- त्याचे वर्णन अण्णा भाऊ करतात –

उदार होऊन नेमी सरकार। लवादाचा ऐका परकार॥

मालकाच्या मतानं आणि सरकारच्या सुतानं, निवड होते लवादाची।

लवाद म्हणजे माणूस! पण जात निराळी असते त्याची॥

मोठा पगार। मोठा दर्जा। मोठ्या इभ्रतीची॥

सात पिढीला त्याच्या। ओळख नसते गिरणीच्या कामाची॥

बाबासाहेबांचा संदेश अण्णा भाऊंनी नेमक्या शब्दांत एका गीतात मांडला आहे –

जग बदल घालूनी घाव। गेले सांगून मला भीमराव।

अण्णा भाऊंनी दलित, शोषित, भटके, वंचित, स्त्रिया यांना नायकत्व बहाल केले- त्यांच्या कथा व कादंबर्‍यांत डवरी, डोंबारी, दरवेशी, माकडवाले, सापगारुडी, तुरेवाले, भानामतीवाले, गोसावी, फासेपारधी, नंदीवाले, शिकलगार अशा कितीतरी जमाती दिसतात.

‘वैजयंता’ कादंबरीच्या प्रस्तावनेत ते म्हणतात – “जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच कदर जनता करते. हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर नि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, इथे समता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे, अशी मला दररोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पाहत पाहत मी लिहीत असतो.”

‘बरबाद्या कंजारी’ कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, “माझी जीवनावर फार निष्ठा असून मला माणसं फार आवडतात. त्यांची श्रमशक्ती महान आहे; ती जगतात, जगाला जगवतात, त्यांच्या बळावरच हे जग चालतं; त्यांची झुंज आणि त्यांचे यश यावर माझा विश्वास आहे. त्यांना विद्रुप करणे मला आवडत नाही.”

यापेक्षा मोठी देशभक्ती कोणती?

त्यांच्या कथा-कादंबरीतले नायक नीतीने जगतात, हक्कासाठी संघर्ष करतात; मोडतात; पण वाकत नाहीत. ‘घाव घालूनच जग बदलू शकते’ हाच संदेश ते देतात.

अण्णा भाऊ मार्क्सवादी होते. मार्क्सने विज्ञानाचे नियम समाजविकासाला लावले. म्हणून त्याला शास्त्रीय समाजवादही म्हणतात. मार्क्सवादी हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा असतो. अण्णा भाऊंच्या लेखनात वैज्ञानिक दृष्टिकोन जागोजागी आढळतो. नेमके शब्द, कमीत कमी शब्दांत आशय, विचाराच्या समर्थनार्थ इतिहास आणि पुराणातले दाखले, ग्रामीण जीवनातले संबोध, म्हणी, ओघवते-प्रवाही निवेदन अशा वैशिष्ट्यामुळेच त्यांचे साहित्य मनाची पकड घेते.

मार्क्सवादाने या जन्मजात कलावंताला जिण्याचे व कलेचे प्रयोजन दिले, या टॉर्चच्या प्रकाशात अण्णा भाऊंनी गावकुसा बाहेरच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यामुळेच त्यांची जयंती अनेक ठिकाणी साजरी होते. ‘राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन,’ अशी त्यांच्या नावाने दहा साहित्य संमेलने भरली. आता तर जन्मशताब्दीही मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे.

फार थोड्या लेखकांना हा बहुमान मिळतो. आपणही हा महोत्सवात सामील होऊया! अण्णा भाऊंचे समाजवादी विचार समजून घेऊया! आणि चांगल्या जीवनासाठी संघर्ष करूया! अण्णा भाऊंच्या भाषेत-

अण्णा भाऊ साठे म्हणे।

बदलूनिया दुबळे जिणे,

होणार जे विजयी रण करती॥