उच्चवर्णियात व्होल्टेअर का निर्माण झाला नाही?
आज तरी सगळी विद्वत्ता उच्चवर्णीयाकडे राहिली आहे. तथापि व्होल्टेअरची भूमिका घेण्यासाठी एक देखील उच्चवर्णीय पुढे सरसावला नाही. व्होल्टेअरपाशी बुद्धीचा प्रामाणिकपणा होता. तो स्वत: ज्या कॅथॉलिक चर्चमध्ये वाढला, त्या चर्चच्या तत्वप्रणालीविरूद्ध त्याने आपला संघर्ष उभा केला. असा व्होल्टेअर इथल्या तथाकथित ज्ञानाच्या ठेकेदारांत भविष्यकाळातही उमटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
तुर्कस्तानच्या सुलतानने मुस्लिम जगताचा धर्म का नष्ट केला नाही? पोपने कॅथॉलिक पंथाचा निषेध का केला नाही? ब्रिटीश पार्लमेंटने निळ्या डोळ्यांच्या बेबींची कत्तल फर्मविणारी कायदा का पास केला नाही? तुर्की सुलतान, पोप अगर ब्रिटीश पार्लमेंट यांनी ज्या कारणांसाठी वरील गोष्टी केलेल्या नाहीत त्याच कारणासाठी उच्चवर्णीय एखादा व्होल्टेअर —– करू शकले नाहीत. स्वार्थामुळे मग तो व्यक्तीचा असो अगर वर्गाचा असो. बौद्धिक….. मार्गदर्शनावर अंतर्गत मर्यादा येऊन बसतात हे कबूल केले पाहिजे.
ज्ञानाचे तथाकथित वारसदार मग ते सनातनी असोत वा सुधारक असोत ते पुरोहित असोत वा गृहस्थाश्रमी असोत, विद्वान असो वा नसो आपले श्रेष्ठत्व टिकवून धरण्यात गुंतलेले आहेत. मग त्यांनी व्होल्टेअर कसे बनावे? बुद्धीच्या प्रामाणिकपणास व चिकाटीस जो वाव द्यावा लागतो तो हे विद्वान देऊ शकत नाहीत कारण त्याला अशी भीती वाटते की, प्रामाणिकपणामुळे त्याच्या वर्गाच्या व म्हणून त्याच्याही हितसंबंधांस बाधा येईल.”
– डॉ.बाबासाहेब आंबेडकर
(1948 साली The untouchable या पुस्तकात)
डॉ.आंबेडकरांचे 1948 सालचे भाष्य आजही बरे ठरत आहे, हे अलिकडच्या काही घटनांवरून स्पष्ट होते. जातीचा अभिमान वा श्रेष्ठत्व व स्व-जाती हित ह्या गोष्टी भले-भले पुरोगामी व धर्मनिरपेक्षवादी म्हणविणारे कसे नकळत का होईना जपत असतात हे दिसून आले. आउटलुक या नियतकालिकात एस.आनंद यांनी त्याबद्दल एक खास लेख लिहिला आहे. राजदीप सरदेसाई हे टी.व्ही. वृत्त माध्यमातील एक मोठं व्यक्तीमत्व-पत्रकार-तर्कशुद्ध मांडणी करणारे. जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद म्हणून गोव्याचे मनोहर पर्रिकर व सुरेश प्रभू यांना घेण्यात आलं, तेव्हा राजदीप सरदेसाईंनी ट्वीट केलं- “गोव्यासाठी हा फार मोठा दिवस. दोघेही गौड सारस्वत ब्राम्हण, दोघेही बुद्धिमान राजकारणी पूर्ण कॅबिनेट मंत्री झाले. सारस्वत अभिमान.”
जेव्हा राजदीप सरदेसाईंना या जातीवाचक शब्दाबद्दल छेडण्यात आलं तेव्हा सरदेसाईंनी काय उत्तर द्यावं? “Proud GSB, proud Goan, Proud Indian, No contradiction.” सरदेसाईंना यामध्ये काही विसंगती दिसली नाही. GSB म्हणजे गौड सारस्वत ब्राम्हण-ब्राम्हणांमधील एक उपजात जी मानते की त्यांचे पूर्वज नदीच्या किनारी ऋग्वेदांची वचने पाठ करून वाढले, ते असेही मानतात की, परशुराम जो विष्णूचा सहावा अवतार आहे. त्याने 21 वेळा क्षत्रियांची खांडोळी करून त्यांचा वंश संपवला. ते असेही मानतात की GSB स्थलांतर करून सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी ‘पवित्रभूमी’वर स्थिर झाले. सरदेसाईंचे GSB जातभाई सुरेश प्रभू आणि मनोहर पर्रिकर मोदीच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले, तेव्हा त्यांना आपला अत्यानंद लपवता आला नाही. परंतु सरदेसाईंना GSB असलेल्या दिपीका पदूकोनला पडद्यावर बघताना जितका अभिमान वाटेल तितकाच अभिमान काहींना कैफला बघताना वाटेल काय? एखाद्या गौड सारस्वत ब्राह्मण नसलेल्या क्रिकेटरने सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडले तर सरदेसाईंना आनंद वाटेल काय? विजय मल्ल्या बद्दलच्या सरदेसाईंच्या मतावर जातीयतेच्या दृढतेची काळी छाया पसरली असेल काय? 2006 मध्ये केलेल्या पाहणीनुसार प्रसारमाध्यमातील निर्णय घेणारे 49 टक्के लोक उच्चवर्णीय होते. एकही दलित किंवा आदिवासी नव्हता. याबद्दल राजकीय सरदेसाईंना कधी चिंता किंवा खंत वाटली काय?
गोवाकर असण्याचा किंवा भारतीय असण्याचा अभिमान बाळगणे आणि गौड सारस्वत असण्याचा अभिमान बाळगणे या एकाच मापाने तोलण्याच्या गोष्टी आहेत काय?
दुसरे उदाहरण आहे प्रसिद्ध इतिहासकार, लेखक, वृत्तपत्र स्तंभलेखक तामिळ ब्राम्हण रामचंद्र गुहा यांचे. राजदीप सरदेसाई तर रामचंद्र गुहांना गुरू मानतात. 2004 साली सी.राजगोपालाचारी यांच्यावर निबंध लिहिताना गुहा लिहितात, “पहिल्यांदा आणि शेवटी मी कुठे रडलो असेल तर सी.राजगोपालाचारी ह्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू अलगदपणे ओघळले. कारण नेता, जो नुकताच मृत्यू पावलेला आहे माझ्या जातीमधून (Community) आलेला आहे. तामिळ ब्राम्हणांमधून आलेला आहे. जातीय भावना व जातीय अभिमान तुमच्या विवेकवादावर, तर्कशुद्ध विचारपद्धतीवर कशा मात करतात त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे.
तिसरे उदाहरण आहे ते इंद्रानुयी-पेप्सीको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे. त्यांच्या ब्राम्हण जातीविषयीच्या गौरवाची कथा सांगितली जाते ती अशी, नंदन निलेकनी आधारकार्डाचे चेअरमन कोकणी कर्नाटकी ब्राह्मण-इंद्रानुयींशी मुलाखत घेताना विचारले- तुमच्या आईचा तुमच्यावर फारच प्रभाव दिसतो. तुम्ही लहान असल्यापासून त्या तुम्हाला सारखे गणितात 100 टक्के मार्क पाहिजेत असे म्हणत होत्या…. वगैरे….
इंद्रानुयी म्हणतात, हे सर्वसाधारणपणे सर्वच दक्षिणी ब्राम्हणी कुटुंबात होत असते. त्यात विशेष काही नाही, मला वाटले माझी आई त्यासाठी जेनेटिकली प्रोग्रामड् होती. सर्व कुटुंब मुलांच्या ग्रेडवर लक्ष केंद्रीत करत होतं. जेव्हा नातेवाईक एकत्र येत, तेव्हा ते मुलांच्या रिपोर्ट कार्डबद्दलच बोलत असत.
दक्षिणी ब्राम्हण गणितात चांगले असतात कारण ते genetically programmed असतात. आणि म्हणून ग्रेडवर लक्ष केंद्रीत करतात ही चुकीची कल्पना आहे.
दलित आणि इतर अल्पसंख्यांकांचं प्रमाण कार्पोरेट सेक्टर, बॉलिवुड, टी.व्ही., प्रसारमाध्यमे, सांस्कृतिक क्षेत्र, खेळ यामध्ये अत्यंत नगण्य आहे. हा योगायोग आहे काय? सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी(CSDS) या संस्थेने दिल्लीमधील 37 टी.व्ही. व वृत्तपत्र प्रसारमाध्यमातील 315 महत्वाच्या निर्णय घेणार्या(Decision Makers) व्यक्तींची पाहणी केली. यामध्ये एकही दलित किंवा आदिवासी आढळला नाही. केवळ 4 टक्के ओबीसी आढळले. हा योगायोग मानायचा का?
चेतन भगत ही अशीच एक प्रसिद्ध लेखक व्यक्ती. त्यांनी तरूणांना विचारले, “तुम्ही जेव्हा मोबाईल नेटवर्क सिलेक्ट करता तेव्हा व्होडाफोन, आयडिया किंवा एअरटेल हे कुठल्या जातीचं आहे हे पाहून सिलेक्ट करता की त्यांची सेवा योग्य मोबदला पाहून सिलेक्ट करता. मग महत्वाचे निर्णय घेणार्या अधिकार्याची जात का पहावी लागते?”
चेतन भगत यांना जात ही अनिवार्य वाटते, निरर्थक वाटते तर ती लग्न जमवताना निरर्थक व अनिवार्य का वाटत नाही? भारतातील 65 कुटुंबियांची संपत्ती अब्जावधी रूपयांहून अधिक आहे आणि ते सर्व सवर्ण जातीतील आणि त्यातही एक जात बहुसंख्य प्रमाणात आहे हा योगायोग आहे काय? चेतन भगतांना भांडवलदार जातीहीन वाटतात परंतु पुढारलेल्या जाती आणि भांडवलदार याचा संबंध आहेच ना?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 साली स्वातंत्र्यापूर्वी गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला एक पत्रक पाठवले होते. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते की, एकूण 1056 आय.सी.एस.(आताचे आय.ए.एस.अधिकारी) अधिकार्यांपैकी 568 भारतीय आहेत, परंतु त्यापैकी केवळ ——- दलित जातीतला आहे. आज 68 वर्षांनंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. 2011 साली संसदेत सांगितलेल्या माहितीनुसार 149 सचिव पातळीवरच्या अधिकार्यांमध्ये एकही एस.सी.अधिकारी सचिव नाही. केवळ 4 अधिकारी एस.टी.चे आहेत. अधिकारी पदांमध्ये प्रमोशनमध्ये आरक्षण नाही, परंतु आरक्षणाच्या प्रमाणात 15% एस.सी.साठी, 7.5% एस.टी.साठी व 27% ओ.बी.सी.साठी- वरच्या पदापर्यंत ही टक्केवारी जायला हवी होती.
जातीचा अभिमान बाळगणे म्हणजे जाती व्यवस्थेच्या वरच्या थरात असण्याचा अभिमान बाळगला जातो. खालच्या तिरस्कारयुक्त जातीत जन्म झाला नाही याचा दुराभिमान असतो. पर्रिकर व प्रभू या उच्च जातीतल्यांनी उच्च पदस्थान भुषविणे आणि दलित असलेल्या मायावतींनी मुख्यमंत्रीपद भूषविणे किंवा सफाई कर्मचारी आंदोलनाचा एक कर्मचारी बेझवाज विल्लन याने अशोका फौंडेशनची फेलोशिप मिळविणे यामध्ये सरदेसाईसारखे दिग्गज भेद करणार की नाही?
राजदीप सरदेसाई, रामचंद्र गुहा, गिरीश कर्नाड, इंद्रा नुयी, रवी शास्त्री, चेतन भगत हे सर्वजण खाप पंचायत जसे आंतरजातीय विवाह केलेल्यांचे हात-पाय तोडण्याचे किंवा त्यांना जीवे मारण्याचे, वाळीत टाकण्याचे हुकुम सोडले हे जसे तिरस्करणीय व नीचपणाचे लक्षण आहे तसेच जातीचा अभिमान बाळगणे आणि खास करून पुढारलेल्या जातीत जन्माला आलेल्यांनी अभिमान बाळगणे तिरस्करणीय आहे हा विवेकी विचार स्वीकारणार की नाही? ज्या जाती जातीव्यवस्थेच्या सर्वात वरच्या थरावर होत्या त्यांनी खेड्यातील इतर जातींवर कब्जा केला, सुपिक जमिनींवर आपले नियंत्रण ठेवले, देवळातील पैसे जमविण्याच्या गल्ल्यावर डल्ला मारला, दलितांना गुलाम म्हणून ठेवले व त्यांच्या पिढ्यान्पिढ्यांचा वापर गुलाम मजूर म्हणून केला. निस्सीम मनान युकारेन या लेखिकेने हिंदू या वृत्तपत्रात लिहिले आहे की, केरळमध्ये दलितांना गुलाम म्हणून ठेवले जात होत, त्यांची जनावरांसारखी विक्री एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत केली जात होती. लेखिकेच्या पूर्वजांकडे असलेल्या गुलामांची आताची पिढी सरकारी नोकरी चतुर्थ पदावर काम करीत आहे तर लेखिकेची पिढी अमेरिका-कॅनडात व्यवसाय करत आहेत.
काही दिवसांपूर्वी पूरीचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी दलितांना मंदिरात प्रवेशास बंदी असल्याचं समर्थन केलं. आपणा सर्वांना अशा गोष्टी आश्चर्यकारक, धक्कादायक व तिरस्कारणीय वाटतात परंतु सरदेसाईंच्या ज्यात्याभिमानाकडे आपण दुर्लक्ष करतो. जातींचा अभिमान बाळगल्याने जातीद्वेष वाढतो हे कटुसत्य आहे.
व्यक्ती जशा जात्याभिमान बाळगतात, तसेच राजकीय प्रश्न देखील बाळगतात. बी.जे.पी.हा उच्चवर्णीयांचा पक्ष समजला जातो. मोदींनी संसदेत या मताचे खंडन करताना मत मांडले की, बी.जे.पी.उच्च वर्णियांचा पक्ष आता राहिलेला नाही. त्याबद्दल त्यांनी स्वत:चेच उदाहरण दिले. मी ओ.बी.सी.असून पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलो. बी.जे.पी.हा उच्च जातीचा पक्ष असता तर असे घडले असते का? परंतु मोदी हे विसरतात किंवा तिकडे दुर्लक्ष करतात की, उच्चवर्णीय असलेल्या आर.एस.एस.ने त्यांचे पंतप्रधानासाठी सिलेक्शन केले आहे. तेही का तर बिहार व उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यातून जास्तीत जास्त प्रमाणात ओ.बी.सी.चे खासदार यावेत जेणेकरून केंद्रात बीजेपीची सभा येणे सुकर होईल.
आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे स्वार्थ-जातीहित-वर्गहित साधले जाते. म्हणून आंबेडकरांचा प्रश्न शिल्लक राहतो व्होल्टेअर का निर्माण होऊ शकत नाही? जातीरहित समाज रचनेसाठी, जातीचा अभिमान आणि जातीद्वेष यांच्या बाहेर पडणे हीच आंबेडकरांना खरी मानवंदना ठरेल.
संदर्भ : 1) The persistance of the Brahmin – S.Anand-Outlook 01 Dec.2014
2) The echoing silence of caste-Nissim Mannathukkaren – The Hindu 15 April 2014
-टी. बी. खिलारे