कुस्ती चार्वाकाची
भारतीय प्राचीन इतिहासाचा मागोवा घेत असताना असे लक्षात येते खी, वैदिक धर्माच्या अगोदर मोहोनजोदरो, हराप्पा अशा संस्कृत्या नांदत होत्या. त्या विकसित होत्या अशा खुणा सापडतात. ह्या संस्कृतीच्या व त्याच्या पूर्वीच्या मानवी सभ्यतेच्या संचीत ज्ञानाचा उपयोग करून वैदिकांनी आपला डळमळीत असा डोलारा उभा केला आहे. त्यासाठी त्यांनी पूर्वजांचा ठसा पुसून आपणच सर्व ज्ञानाचे कर्ते आहोत अशी बढाई मारली आहे. पूर्वीचे ज्ञान नष्ट व दफन करण्यात मागेपुढे पाहिले नाही. शेती व्यवसायात अन्न उत्पादन करणार्या श्रमिकांचा उल्लेख सुद्धा न करता आपल्या भिक्षुकी ऐतखाऊ प्रवृत्तीचे गुणगाण करण्यात धन्य मानिले आहे.
तर्क, सत्य, समता, न्याय या पूर्वीच्या विचारांचा पाठपुरावा करायचा सोडून आत्मा, ईश्वर, परलोक ह्यासारख्या मेंदूला निष्क्रिय करून सोडणारे भ्रम लोकप्रिय करण्याचे पोकळ अवडंबर रचले आहे. समतेकडे न जाता विषमतेचा मार्ग अट्टाहासाने स्वार्थासाठी पुढे रेटला आहे. हाच आस्तिकतेचा एकमेव इष्ट जन्महेतू आहे.
यज्ञाचा फोलपणा रोखठोक उघडा करून कर्मकांडाचा कर्दनकाळ म्हणून चार्वाक तत्त्वज्ञान पुढे येते. त्याचा लोकायत म्हणूनही उल्लेख करतात. बुद्धिप्रामाण्य, प्रत्यक्ष प्रमाण, इंद्रियजन्य ज्ञान अशा शास्त्रीय विचारसरणीला पोषक असे विचार त्या काळी मांडले गेले. त्या पायावरच आजचे विज्ञान विकसित झाले आहे. कल्पनावाद्याच्या विचारांवर तर नाहीच नाही. भस्म झालेल्या देहाचे पुन्हा येणे कसे शक्य आहे? महाभूतापासून निर्माण झालेल्या शरीराचा विशिष्ट रचनेचा परिणाम म्हणून जाणीव हा गुण शरीरात निर्माण होतो. शरीर संपताच तो नष्ट होतो. त्यामुळे आत्म्याच्या नावावर मारलेल्या उड्यांचा खेळ संपतो. प्रत्यक्ष प्रमाण स्वीकारणीय ठरल्यामुळे सर्व पारलौकिक व लोकोत्तर भारूडांना स्थान उरले नाही. त्यामुळे कर्मकांडामागील मतलबी हेतू स्पष्ट झाला. चार्वाकाची बांधिलकी लोकांशी व प्रत्यक्ष वास्तवाशी भिडलेली आहे.
सत्यज्ञान हे प्रत्यक्ष पुरावायुक्त, सार्वत्रिक पडताळणी करणारे असले पाहिजे असा आग्रह चार्वाकाचा आहे. त्यामुळे चार्वाक हे कृतीशील दर्शन आहे. सदाचरण हेच समृद्धीचे साधन आहे. ते पूर्ण इहवादी आहे. त्यात ईश्वराचे लुडबुडण्याचे कारण नाही. मृत झालेल्या माणसासाठी श्राद्ध वगैरे प्रेतक्रिया म्हणजे पुरोहितांनी आपल्या उपजीविकेसाठी केलेल्या क्लृप्त्या आहेत. त्यासाठी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. पण चार्वाकांनी ते ग्रंथप्रामाण्य नाकारले.
काल्पनिक दु:खमुक्ती किंवा सुखप्राप्ती ह्या आशेतून सुटका झाल्यावर वास्तवातील सुखदु:खाच्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची क्षमता निर्माण होते. हाच चार्वाकाच्या इहवादाचा मूळ गाभा आहे.
मानवी जीवनात सुख दु:ख दोन्ही असतात. दु:खाचा निषेध केल्याने, त्यागी बनल्याने सुख मिळणार नाही. सुख मिळविण्यासाठी वेगळे मार्ग प्रयत्नाने निवडावे लागतील. सुख वाढवण्याचे इहवादी प्रयत्न ह्याच जन्मात करावे लागतील. देहदंड न करता योग्य श्रम करून सुख उपभोगू शकू. दु:खाची भीती घालून भ्रामक असिद्ध मार्ग सांगणार्या मतलबी लोकांपासून दूर रहा हा नास्तिक विचार चार्वाकांनी मांडला. चार्वाकाचे विचार दडपण्याचा खटाटोप करण्यापेक्षा तो स्वीकारला असता तर जगाला वेगळे वळण मिळाले असते. मृगजळी अवताराच्या आशेवर दोन हजार वर्षेवाया घालवली असे वाटत राहते.
–रमेश माणगावे, जयसिंगपूर, जि.कोल्हापूर.
देव कधी नव्हताच…
देव कधीही माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाच्या प्रामाणिक कार्यात मदत करणार नाही. कारण तो कुठेही, कधीही अस्तित्वात नव्हता हे पक्के माहीत असल्यामुळेच मी प्रत्येक संकटात परिस्थितीशी लढताना, कृतघ्न माणसांचे आघात सोसताना खर्याखुर्या, हाडामांसाच्या माणसांकडून धीर व मदत मिळवली. कोणत्याही भूतभविष्य वगैरे काल्पनिक गोष्टींचा आधार घेतला नाही.
देव नाही हे कळल्यावर व्यसनी किंवा निराश होण्याचे कारणच नाही. उलट स्वत:ला, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्त जपले पाहिजे. साधे पण सुंदर, वाचनाने समृद्ध झालेले आयुष्य जगले पाहिजे. गरीब, वृद्ध, अपंग, गरजू यांचा अधिक प्रेमाने विचार केला पाहिजे. ही माणुसकी नास्तिकाकडे अधिक असते. माझ्या निरीश्वरवादी मित्रांकडे तर ती माझ्यापेक्षाही जास्त आहे, पण कमी नाही.
नास्तिक महिलाही फार निर्भय, हुशार व रसिक असतात. पु.लं.ची पत्नी सुनीताबाई देशपांडे या अशा एक उत्तम कलाकार व खर्या बुद्विवादी लेखिका होऊन गेल्या. कोकणातील महिलांनी अशा स्त्रियांचा आदर्श कधी समोर ठेवल्याचे मला दिसले नाही. विषमता, दास्य, छळ, शोषण, परावलंबी जीवनशैली, टवाळवर्या यांना बळी पडणारा, भारतीय स्त्रीवर्ग हासुद्धा जेव्हा सुधारणावादी, धीट आणि बुद्धिवादी होईल. तेव्हाच या वर्गाला स्वत:ची दुर्दशा आणि पुरूषप्रधान व्यवस्थेने केलेली कोंडी आणि अन्याय कळेल. थोडक्यात, नास्तिकता ही समृद्ध, समंजस, समतोल जीवनाची धीट व नीट सुरवात आहे. ती करायची की नाही हा लोकशाहीत ज्याचा त्याचा खासगी प्रश्न आहे!
–माधव गवाणकर, दापोली, जि.रत्नागिरी.
बुद्धिवाद हा शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा पाया
‘बुद्धिवाद’ हा शिक्षकांच्या संस्कारशील व्यक्तिमत्वाचा पाया असावयास हवा. शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळख करणे किंवा पदवीधर तयार करणे नव्हे, तर शिक्षण म्हणजे परिपूर्ण ‘माणूस’ साकार करणे होय. यासाठी आपला एकूण अभ्यासक्रम ‘विज्ञाननिष्ठ व बुद्विवादी’ असावयास हवा. अभ्यासक्रमाची आणि पाठ्यपुस्तकांची रचना प्रयत्नवादाला आणि विज्ञानवादाला पोषक आणि दैववाद, बुवाबाजी, चमत्कार यांच्या विरोधात असावयास हवी.
* स्वत: अंधश्रद्धा असणारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यावर अंधश्रद्धा निर्मूलनाचे संस्कार काय करणार?
संत कबीर म्हणतात-
“जो का गुरू अंधा होय। वो का चेला अंधा होय॥
अंधे को अंधा मिला। साबूत बया न कोय॥
म्हणून शिक्षकाजवळ ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हवा.
सत्यापेक्षा सत्य शोधण्याची प्रक्रिया अधिक महत्वाची आहे, असे ड्यूई याने म्हटले आहे. त्यामुळे व्यक्ती वा समाजाची निरंतर प्रगती होत असते. सत्याचा लोकविलक्षण आग्रह धरणारा दुसरा महत्वाचा तत्वज्ञ म्हणजे बर्ट्रांड रसेल होय. ही सारी दुनिया बुडाली तरी हरकत नाही; परंतु मी किंवा कुठल्याही मानवाने असत्यावर विश्वास ठेवू नये. बर्ट्रांड रसेलने म्हटले आहे, “प्रत्येक गोष्टीचा आपण पुरावा मागू तरच विश्वास ठेवू, अशी शिक्षणपद्धती विकसित झाल्याशिवाय जातीवाद, धर्मवाद, वंशवाद, आंधळ्या सामाजिक परंपरा नष्ट होणार नाहीत. त्याच्या सामाजिक तत्वज्ञानात प्रज्ञेला, करूणेला, समतेला महत्तम स्थान आहे. म्हणून रसेलने म्हटले आहे, की मी कुठलाही धर्म मानत नाही. पण धर्म स्वीकारण्याची वेळ आली तर मी बौद्ध धर्म स्वीकारीन.”
यासाठी काय करता येईल?
1) शाळेमध्ये कोणत्याही देव देवतांचे पूजन करू नये. वर्गात, कार्यालय, स्टाफरूममध्ये अथवा भिंतीवर देवदेवतांच्या किंवा बुवा बाबांच्या प्रतिमा, चित्रे ठेवू नयेत. त्याऐवजी महापुरूषांचेच फोटो असावेत.
2) शाळेमध्ये देवावर, दैवी शक्तीवर प्रार्थना/गीते न म्हणता महाराष्ट्राच्या/देशाच्या जयजयकार, गौरव करणारी, प्रेरणा देणारी, संग्रामाची गीते, विज्ञानगीते, अंधश्रद्धा निर्मूलन गीते गायली जावीत. उदाहरणार्थ- खरा तो एकचि धर्म-साने गुरूजी, हिंद देश के निवासी, आता उठवू सारे रान- साने गुरूजी, सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा-इक्बाल, बल सागर भारत होवो- साने गुरूजी, हम होंगे कामयाब, प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा, नव्या जगाचे नायक आम्ही। धरा उद्याची उंच गुढी-वसंत बापट इत्यादी.
3) शाळेमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. दैववादाला, नशीब कल्पनेला नकार देऊन प्रयत्नवादाचा स्वीकार करावा. समाजसुधारकांनी लिहिलेली पुस्तके वाचावीत. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनात श्रद्धा नव्हे तर चिकित्सक दृष्टी निर्माण केली पाहिजे. श्रद्धा ही माणसाला अंध बनविते तर विश्वास किंवा चिकित्सा अधिक डोळस बनविते. श्रद्धेमध्ये शंकेला वाव नसतो. प्रश्न विचारता येत नाही.
4) विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारावेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याकरिता संधी द्यावी, व्होल्टेअर म्हणतो, “कोणत्याही माणसाची परीक्षा त्याने विचारलेल्या प्रश्नावरून करा; त्याने दिलेल्या उत्तरावरून नको.” वर्गामध्ये ‘गप्प बैस’, ‘मी सांगेन ते ऐक’ असं दटावणारी शिस्त नको. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे, विचार करण्याचे स्वातंत्र्य द्यावे.
प्रा. श्याम निकोसे, नागपूर.
श्रद्धेपेक्षा विश्वास श्रेष्ठ!
भीती व आशा या द्विधावस्थेत श्रद्धा व तिचा भाव उत्पन्न होतो. मात्र भौतिक तत्वांना प्रमाणाची जोड आवश्यक असते. प्रमाण आणि प्रामाण्य याशिवाय एखाद्या बाबींवर विश्वास ठेवणे शक्य नसल्याकारणास्तव अशा प्रसंगी श्रद्धेचा आधार घ्यावा लागतो.
उद्याच्या उजेडासाठी तुमची श्रद्धा थोडी बाजूला सारून, तुमच्यातला ‘विश्वास’ जागू द्या. पहा, हिंमत आणि धैर्य, जे श्रद्धेवाल्यांजवळ मुळीच नसते ते धैर्य तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. नव्हे आलेल्या कोणत्याही संकटाला तुम्ही विश्वासाने, हिंमतीने सामोरे जाऊन यशस्वी व्हाल.
श्रद्धेपेक्षा विश्वास महत्वाचा किंवा श्रेष्ठ ठरत असेल, तर अंधश्रद्धेच्या खाईत लोटू पाहणारी श्रद्धा, आपण आपल्याजवळ बाळगण्यापेक्षा, स्व:विश्वास बाळगला तर, जगताही येईल आणि इतरांना जगूही देता येईल.
डॉ.नरेंद्र दाभोलकर हे गो.ग.आगरकरांचा वारसा चालवित होते. ते आगरकरांसारखे धर्मसुधारक होते. त्यांचे मनोबल आगरकरांप्रमाणेच, ध्येयवादी, निष्ठावंत व नीतीचे होते. त्यांच्या परिवर्तनशील, कष्टाळू, विश्वासपूर्ण विचारांना, श्रद्धेच्या जादूने संपविणे फार कठीण होऊन बसल्याकारणास्तव, दुष्ट विचारांने त्यांनी हत्या करण्यात आली. (ऐतिहासिक एक घटना) ती निंदनीय आहे. वेदनादायक आहे. या वेदनेवरील उपाय म्हणजे, आपण सर्व डॉ.दाभोलकरांसारखे, प्रामाणिक, विश्वासू, प्रयत्नवादी, विज्ञानवादी, नीतीमान असावे.
प्रा. मुकुंद दखणे, यवतमाळ
पाणी म्हणजे जीवन
यावर्षी महाराष्ट्रात बर्यापैकी पाऊस होऊन सुद्धा मागील काही दिवसांत एक बातमी वाचण्यात आली की, पाण्याअभावी ‘परळी’ येथील औष्णिक विद्युत केंद्र बंद पडणार! खरोखर ही वेळ का येते? भारतीय माणूस वातावरण, पाणी, हवा, लोकसंख्या इ.बद्दल बेफिकीर आहे. तो फक्त स्वत:पुरता व आजपुरता विचार करतो. त्यामुळेच दुष्काळी स्थिती निर्माण होण्यास मदत होते. पाणी असतांना गैरवापर केला जातो. हे आपल्याला दररोजच्या गोष्टींकडे बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल. आजही आमच्या खेड्यातील माता भगिनी हंडाभर पाण्यासाठी 2 ते 3 कि.मी.वणवण भटकतात. तर शहरी भागात पाण्याची चंगळ असते. टुमदार घरे व बंगलेवाले यांना रोज अंगण ओले केल्याशिवाय करमत नाही. रस्त्यावर पाणी वाया घालवून प्रत्येक शहरामध्ये हजारो लिटर पाणी वाया घालवले जाते. पाणी कधीही शिळे होत नाही. परंतु आमच्या भगिनी वर्गात मोठा गैरसमज असतो की, काल भरलेले पाणी शिळे झाले म्हणून ओतून दिले जाते. वास्तविक संशोधनानंतर असे सिद्ध झाले आहे की, नळाचे पाणी भरल्यावर 24 तासांनी वापरावे ज्यामुळे पाण्यातील अतिरिक्त क्लोरीन उडून जाते. बरं ते शिळे पाणी आपण कपडे, भांडी धुण्यासाठी वापरू शकतो परंतु आपल्या हे लक्षात येत नाही. ब्रश करतांना, हात धुतांना नळ सुरू ठेवला जातो. ज्याद्वारे दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. शॉवरखाली आंघोळ केल्याने जास्तीचा वेळ वापरला जातो. व मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. भांडी धुताना सुद्धा बादलीमध्ये किंवा टबमध्ये पाणी घेऊन भांडी धुतल्यास बर्याच पाण्याची बचत होईल तसेच भांडी धुतलेले पाणी परसबागेला दिल्यास पाण्याची बचत होईल. काही कुटुंबांना बाईक, कार यांना रोज आंघोळ घालण्याची सवय असते, त्याऐवजी ओल्या फडक्याने काम भागते. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना प्रत्येकी पाण्याचा ग्लास देण्याऐवजी तांब्याभर पाणी व फुलपात्र दिल्यास पाहिजे तेवढे पाणी वापरले जाईल.
संजय बारी, पुणे.
शंकराचार्य मठाची लूट पेशवे इंग्रज युती व टिपू सुलतान
नोव्हेंबर 2013 च्या (भाग-1) अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा सर्वांगीण दृष्ट्या उत्कृष्ट अंक प्रसिद्ध केलात सर्व लेखक, संपादक व सहाय्यकांचे मन:पूर्वक अभिनंदन.
या वार्तापत्रात अनिल चव्हाण व राहूल थोरात यांनी प्रत्यक्ष निरीक्षण व समीक्षण केलेला “सनातनी संस्कृतीचे माहेरघर : शृंगेरीपीठ” या शीर्षकाचा अभ्यासपूर्ण व डोळ्यात अंजन घालणारा लेख लिहून धर्माच्या नावाखाली पडद्यामागील कुटनीतीच्या बाबी प्रकाशात आणल्या हे मोठे परिवर्तनाला विचार करावयास लावणारे काम केले आहे.
उक्त लेखात शंकराचार्यांचा ढोंगीपणा, बेहिशोबी महामूर स्थावर व जंगम मिळकतीच्या उचलेगिरीचा लेखाजोखा मांडलेला आहे. तथापि त्यात विद्यमान माहिती नमूद केलेली आहे. वाचकांचा असा समज होऊ शकतो की आजचेच शंकराचार्य अफाट मिळकतीचे उपभोक्ते आहेत पण हे अर्धसत्य आहे. पूर्वीचे शंकराचार्य देखील अफाट धन बाळगून होते हे तत्कालीन सत्ताधार्यांना चांगलेच ज्ञात असावे त्याशिवाय त्यांचा मठ पेशव्यांच्या सरदारांनी लुटला नसता. लुटीनंतर आर्थिक तुटीचा अनुशेष कसेही करून भरून काढणे त्यांच्या विशेष धार्मिक कौशल्याची पोचपावती आहे.
उत्तर पेशवाईत सरदार स्वत:च्याच प्रजेला लुटत असल्याची कितीतरी उदाहरणे कागदपत्रातून सापडतात. परशुरामभाऊ पटवर्धनाने तर शृंगेरीच्या शंकराचार्यांचा मठ लुटण्यासही कमी केले नाही.
परशुरामभाऊने रघुनाथराव कुरूंदवाडकरास आघाडीवर पाठविले त्याने संत्तीबिननूर, मायकोंडी, हुपेगिरी व चैन्नागिरी ही ठिकाणे घेतली तेथे रघुनाथराव यांच्या सैन्यांनी शृंगेरीकर स्वामींचा मठ लुटून हत्ती वगैरे लाखो रूपयांचा माल आणला.
पुढे शृंगेरीकर स्वामीने आपले लुटलेले साहित्य परत मिळावे म्हणून पुष्कळ प्रयत्न केले. पुण्याहूनही रघुनाथरावास त्याबाबत बरीच पत्रे आली पण रघुनाथराव पटवर्धनाने तो लुटलेला माल परत केला नाही.
1791 मध्ये मोती तलावाच्या भेटीनंतर टिपूविरूद्ध संयुक्त फौजांच्या (इंग्रज, निझाम व पेशवे) लढाईचा रंग एकदम पालटला. पटवर्धनांनी टिपूच्या प्रदेशात कमालीची लुटालूट मांडली. रघुनाथराव पटवर्धनाच्या फौजेने तर शृंगेरीच्या शंकराचार्याचा मठ लुटण्यास कमी केले नाही. 1792 च्या फेबु्रवारीत संयुक्त आघाडीच्या फौजांनी श्रीरंगपट्टण वेढले एकदम लढाई करून श्रीरंगपट्टण जिंकावे व टिपूस बुडवावे हा ब्रिटीश सेनापती कॉर्न वालीसचा विचार होता आघाडीस राहून तो जोरदार हल्ले चढवित होता पण टिपूनेही कडवा प्रतिकार केला हे खुद्द हरिपंतासही मान्य करावे लागले. टिपू त्यांच्या सैनिकांनी पाच-सातशे गोर्यांना कंठस्नान घालून दीड हजार एतद्देशीय शिपाईही मारले. पराक्रमाची शर्थ करूनही इंग्रजांनी पेशव्यांची मदत घेऊनही श्रीरंगपट्टण मिळाले नाही.
श्रीरंगपट्टणची दुसरी मोहीम 1793 मध्ये निजाम, इंग्रज आणि पेशवे यांनी उघडली यात इंग्रजांनी अतिशय महत्वाची कामगिरी बजावली त्यांच्या लष्करी हालचाली त्वरेने आणि विशिष्ट हेतूने झाल्या. पटवर्धनांचे सैन्य शृंगेरीचा मठ लुटण्यात आणि बिदनूर जिंकून घेण्यास बराच काल गुंतलेचे दिसून येते. पेशवे, इंग्रज व निजाम यांनी पुन:श्च हातमिळवणी करून मे 1799 मध्ये श्रीरंगपट्टला वेढा दिला त्यात टिपू सुलतान मारला गेला.
ब्राह्मणी राज्यात हिंदू धर्मोद्धारार्थ अवतारलेल्या कारभाराच्या आमदानीत, आचार्याचे मठ, एक दोनदा नव्हे तर चार वेळा पेशव्यांनी लुटावे या प्रकारांची उपपत्ती नीटशी लागत नाही. त्रिंबकराव मामा पेठे यांनी 1977-71 मध्ये मेलकोटा येतील रामानूजाचार्यांचा, सन 1775 मध्ये हरिपंत फडके यांच्या फौजेने द्वारकापीठाच्या शंकराचार्यांचा त्याचे पुढचे साली पटवर्धनांनी करवीर संकेश्वरचा व सन 1791 मध्ये पुन्हा पटवर्धनांनी शृंगेरी शंकराचार्यांचा असा चारदा आचार्य मठ लुटल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो त्यामुळे हिंदूच्या शंकराचार्यांनी मुसलमान असलेल्या टिपू सुलतानची राजवट व त्यांचे संरक्षण पसंत केले.
–मधुकर जावळे, बीड