“आमचा धर्म शांतताप्रिय आहे. आमचा धर्म अहिंसक आहे. आमचा धर्म सत्याचा आहे. आमच्या धर्माचे लोक परधर्मसहिष्णू आहेत. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. आम्ही कोणतेही अधार्मिक, अनैतिक कृत्य करीत नाही. आम्ही केवळ ईश्वरची इच्छा पाळतो. आम्ही धर्माची आज्ञा मानतो.”
असे प्रत्येक धार्मिक व्यक्तीला ठामपणे वाटते.
असे असले तरी खालील गोष्टी ऐतिहासिक सत्ये आहेत.
धर्माच्या नावाखाली माणसाने माणसाचे अनन्वित छळ, हाल केले आहेत. आपण करतो आहो ते धार्मिक कृत्य आहे, देवाची आज्ञा आहे, ती पाळणे आपले परमकर्तव्य आहे असे श्रद्धापूर्वक मानून ते हिंसक कर्तव्य आनंदाने आणि उत्साहाने पार पाडले आहे.
अनेक लढाया कत्तली, दंगली धर्माच्या नावे झाल्या आहेत. सर्वाधिक रक्तपात, मनुष्यहत्या अन्य कोणत्याही कारणापेक्षा धर्मभेदांमुळे झाल्या आहेत.
इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत चाललेली ख्रिश्चनांची धर्मयुद्धे(कु्रसेडस्) इतिहासप्रसिद्ध आहेत. त्यातील पहिल्या धर्मयुद्धात (इ.स.1095) र्हाईन प्रांतातील असंख्य निरपराधी ज्यूंची भयानक कत्तल हे ख्रिश्चन धर्मियांचे पहिले महान धर्मकृत्य मानले जाते.
‘इस्लाम खतरेमें’ असा नारा दिला की हातात नंग्या तलवारी घेऊन, जिवावर उदार होऊन कडवे मुस्लीम धर्मरक्षणासाठी काफिरांना मारायला रस्त्यावर येतात. मुस्लिमांनी धर्मप्रसारासाठी केलेल्या अनेक क्रूर कत्तली इतिहासप्रसिद्ध आहेत. देवा-धर्माचे काम करताना मागे पुढे पाहायचे नसते. देवाला आवडेल तेच करायचे असते.
“हिंदूनो, खर्या मायेचे पूत असाल तर उठा. आपल्या महान, पवित्र धर्माला चारशे वर्षांपूर्वी लागलेला तो कलंक पुसून टाका.” असे आवाहन केले की जय भवानी, हरहर महादेव-अशा गर्जना करीत धार्मिक निघालेच राडा करायला.
दहशतवादाचे मूळ धर्मात आहे. धार्मिक श्रद्धेत आहे. धर्माच्या नावे भावनिक आवाहन केले की, धार्मिकांची सारासार विचारशक्ती लुप्त होते. धर्मोन्माद चढलेल्या अशा श्रद्धाळूंची झुंड धोकादायक असते; अविचारी कृत्ये करते, असे वारंवार दिसून आले आहे.
धर्मांमुळे माणसामाणसांत भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. आम्ही आणि ते असे तट पडले आहेत. प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटणे स्वाभाविक आहे. जगातल्या आजच्या समस्या अन्य धर्मियांमुळे निर्माण झाल्या आहेत. जगातील सर्व लोकांनी आमचे सर्वश्रेष्ठ, महान पवित्र धर्म स्वीकारला की विश्वशांती निर्माण होईल. सर्वत्र आबादी आबाद होईल. असे प्रत्येक धार्मिकाला वाटते.
परंपरा, धर्मग्रंथ, श्रद्धा, भावना यावर धर्माचा डोलारा उभा असतो. त्यामुळे आपल्या धर्माचे तेवढे उत्कृष्ट, इतर धर्मांचे निकृष्ट अशी दृढ भावना प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या मनात असते. सर्व धर्म चांगले असा समभाव वरवर दिसत असला तरी वास्तव परिस्थिती काय ते सर्वजण जाणतात.
खोटे बोलू नये, कुणाची फसवणूक करू नये, कुणाला दुखवू नये, चोरी-लुटमारी करू नये, कुणावर अन्याय जबरदस्ती करू नये असे सर्वच धर्म सांगतात.
पण जेव्हा दोन धार्मिक गटांमध्ये(समजा हिंदू-मुस्लिम) दंगल पेटते तेव्हा काय होते ते आठवा.
वरील सर्व धार्मिक उपदेश दोन्ही गट विसरतात. अन्य धर्मियांच्या दुकानांतील माल लुटणे, त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करणे हेच धार्मिक कृत्य आहे, हीच धर्माची आज्ञा आहे, हेच देवाला आवडणारे असे दोन्ही धर्मियांना वाटते. अशा गोष्टी अनैतिक आहेत, असे करण्यात काही चूक आहे, असे त्यांच्या मनातसुद्धा येत नाही. असे वाटते ते केवळ धार्मिक उन्माद चढलेल्या दंगलखोरांनाच नव्हे तर दंगलीत प्रत्यक्ष सक्रिय सहभागी नसलेल्या सर्वच धार्मिक श्रद्धाळूंना असेच वाटते. दोन्ही धर्मातील लोक आपापल्या गटातील सर्वच दंगलखोरांच्या हिंसक कृत्यांचे, अनैतिक अत्याचारांचे समर्थन करतात. परधर्मीयांची घरे जाळणार्यांना आणि त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करणार्यांना ते शूरवीर म्हणून गौरवतात. त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळतात असा अनुभव दिसतो.
म्हणून सर्वधर्मसमभाव ही संकल्पना फोल आहे. असा समभाव सर्वथैव अशक्य आहे. एखाद्या हिंदूने एका मुसलमानाला वाचवले किंवा एखाद्या मुसलमानाने दंगलीच्या वेळी एका हिंदू स्त्रीला संरक्षण दिले अशा एक दोन घटना घडत असतील. पण त्या अपवादात्मक.
म्हणून सर्वधर्म अभाव हवा. सर्व धर्म नष्ट होतील, सगळ्यांचा, ‘मानवता’ हा एकच धर्म असेल तरच जगात शांतता, सुरक्षितता नांदू शकेल. नाहीतर धर्मांधांच्या हल्ल्याची तलवार कायमची टांगती राहील.
प्रा. य. ना. वालावलकर
लेखक संपर्क : ynwala@gmail.com