Categories
पुस्तक परिचय

मानवाची कहाणी

मे - २०१४

कॉम्रेड प्रभाकर संझगिरी यांनी लिहिलेल्या ‘मानवाची कहाणी’ या पुस्तिकेची पहिली आवृत्ती 1960 साली प्रसिद्ध झाली. मराठी माणसांच्या जनवादी चळवळीची यशस्वी फलश्रुती त्याच वर्षी झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुढारपण करणार्‍या नेतृत्वाने समाजवादाचे ध्येयस्वप्न अधोरेखित केले होते. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे-अमर शेख-गव्हाणकरांच्या शाहिरी सूरनाट्याचे गारूड ओथंबले हाते. मराठी साहित्यातील प्रस्थापित विचारमूल्यांना जाब विचारणारी कामगार वर्गाची तळपती तलवार पाजळली जात होती. चळवळीतील कामगार-शेतकर्‍यांच्या उत्स्फूर्त भागीदारीने समाजवादासाठी आश्वासक वातावरण तयार केले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पोत समाजवादी विचारांना सशक्त करणारा होता. या परिपेक्ष्यांत कामगार-कष्टकर्‍यांत कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी प्रबोधनाचे एक धारदार आयुध कॉम्रेड संझगिरी यांनी दिले.

या पुस्तिकेच्या चार आवृत्त्या निघाल्या. आता ही पाचवी 21 व्या शतकातील आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. जगातील केवळ आर्थिक-राजकीय नव्हे तर वैचारिक-सांस्कृतिक क्षेत्रांतही प्रचंड उलथापालथी घडून गेल्या आहेत आणि घडत आहेत. समाजवादी शक्तींच्या अभूतपूर्व पिछेहाटीनंतर सुरू झालेली साम्राज्यवादी वैश्विकरणाची आक्रमक मुसंडी अजून ओसरलेली नाही. आपल्या देशातील कामगारवर्गीय संघटित चळवळीचे स्वरूप पार बदलून गेले आहे. महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण कष्टकर्‍यांचा कैवार घेऊन लढणार्‍या परिवर्तनशील पुढारपणामुळे नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. श्रमिकांच्या एकजुटीला फोडणार्‍या विविध उपटसुंभांचे तण फोफावले आहे. भारतीय सरंजामी परंपरेतील अंधश्रद्धांनी अत्याधुनिक तंत्रविज्ञानाच्या प्रकाशझोतात बस्तान बसविले आहे. माणसाची माणसापासून फारकत करणारी जुनी-नवी सगळी बजबजपुरी पुन:पुन्हा उफाळत आहे. अशा या घायाळ करणार्‍या संभ्रमित स्थितीत कार्यकर्त्यांचे मनोबल टिकविणारे एक अमोघ हत्यार असते- विज्ञाननिष्ठ चिकित्सेचे, विचक्षक जिज्ञासेचे. वेधक संशोधनाचे. कॉम्रेड संझगिरी यांनी सांगितलेली ‘मानवाची कहाणी’ या चिकित्सेला जिज्ञासेला आणि संशोधनाला उभारी देईल या विश्वासाने त्यांच्या या पुस्तिकेची ही आवृत्ती आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

संझगिरी आज हयात नाहीत. ते असते आणि त्यांनी त्यांच्या कामगारवर्गीय जनवादी चळवळीतील कार्यमग्न व्यग्रतेतून खास वेळ काढला असता तर, अलिकडच्या काळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत ज्या अनन्यसाधारण घडामोडी झाल्या आहेत, त्याची निश्चितच नोंद त्यांनी घेतली असती. विज्ञाननिष्ठ चिकित्सेचा कमालीचा आग्रह धरणे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याचे धाडस दाखविणे हा त्यांच्या स्वभावाचा टोकदार पैलू होता. चिकित्सेला नुसती कुतूहलपूर्ण जिज्ञासा पुरत नसते याचे भान त्यांना होते. अपार परिश्रम करण्याचा संशोधकाचा बाणा त्यांच्या अंगी होता. तथापि, त्यांच्या हयातीच्या काळात त्यांना अत्यावश्यक वाटलेले या पुस्तिकेत करावयाचे बदल आणि पुनर्लेखन ते करू शकले नाहीत. आणि याची खंत त्यांना अखेरपर्यंत कुरतडत राहिली हे त्यांच्या सान्निध्यात राहिलेल्यांना माहिती आहे. तसेच तात्विक व शास्त्रीय लिखाणातील कच्चे दुवे, दोष किंवा विसंगती कुणी नजरेस आणून दिली तर पूर्ण विचारांती आणि वादसंवादातून ती स्वीकारण्याचा प्रांजळपणा त्यांच्यात होता.

या निमित्ताने याठिकाणी एक-दोन मुद्द्यांविषयी विवेचन करणे उपयुक्त होईल.

एकोणिसाव्या शतकापासून आपल्या देशात सुरू झालेल्या अनेक वादांपैकी एक, भारतीय बहुविध सामाजिक-सांस्कृतिक जीवनातील ऐतिहासिक घडामोडीविषयी आहे. विशेषत: प्राचीन पाषाण काळापासून आताच्या भारतीय भूभागात वस्ती करून कोण राहत होते, नवपाषाण काळापासून आताच्या भारतीय भूभागात वस्ती करून कोण राहत होते, नवपाषाण काळात आजच्या भारतातील आणि आजच्या पाकिस्तानातील भूभागात असणार्‍या मानवी संस्कृती(सिव्हीलायझेशन) कोणत्या होत्या, त्यांचे काय झाले, नंतर येथे कोण कोण कसे कसे येत गेले वगैरे. संझगिरींनी उत्तर प्राचीन पाषाण युगीन, नवपाषाण युगीन आणि त्यानंतरच्या भारतातील घडामोडींबाबत सुव्यवस्थित मांडणी केली आहे. ही मांडणी करताना त्यांनी उत्खनन-संशोधनातील अवशेष सामग्रींच्या आणि सामग्रींशी निगडित समग्र जीवनपद्धतींच्या आधारावर अनेक संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षांचा उपयोग केला आहे. त्यांनी केलेल्या मांडणीत एके ठिकाणी अशी विधाने आहेत-

“भारत हा खंडप्राय देश आहे व त्याच्या निरनिराळ्या भागात सांस्कृतिक व तांत्रिक प्रगतीचा वेग वेगवेगळा होता. हराप्पाची ताम्रयुगीन संस्कृती सिंधूच्या खोर्‍यात भरभराटीस आली होती तेव्हा इतर सर्व भाग पाषाणयुगाच्या मध्य व उत्तर अवस्थेत होते. पुढे आर्य आक्रमकांनी गंगेच्या खोर्‍यांच्या कृषीवल आणि पशुपाल संस्कृतीचा प्रसार केला तेव्हा नर्मदेच्या दक्षिणेकडे पाषाणयुगच पसरले होते. पुढे क्रमश: दक्षिणेकडेच्या नद्यांच्या सुपीक खोर्‍यात कृषिवल समाज स्थाईक झाले, तेव्हा पूर्वीचे तेथले उत्तर पाषाणयुगीन रहिवाशी सर्वच त्यात विलीन झाले नाहीत. त्यांच्यापैकी अनेक जमातींनी डोंगरात व जंगलात आश्रय घेतला व तेथे त्यांची जुनी समाजव्यवस्था कायम राहिली. आजच्या आदिवासी जमातीत एकेकाळी भारतभर पसरलेल्या आर्यपूर्व, द्रविडपूर्व समाजाचेच अवशेष शिल्लक आहेत यात शंका नाही.”

संझगिरी यांनी ‘आर्य आक्रमण’ या शीर्षकाखाली एक प्रकरण लिहिले आहे, त्यात लिहिले आहे की, “(इ.स.पूर्व 1800 च्या) सुमारास या (इजिप्त-सुमेर-सिंधू या नागर) संस्कृतीच्या इतिहासाला एक नवे वळण लागले. या प्रदेशावर भटक्या पशुपाल गणांनी केलेले आक्रमण. त्यांच्या दुसर्‍या लाटा इराणवर आदळतात आणि बलुचिस्तान व अफगाणिस्तानचे डोंगर तुडवून भारतात प्रवेश करतात. त्यांचे रथारूढ धनुर्धारी, गणसमाजाच्या समताधिष्ठित शिस्तीने बांधलेली त्यांची दले, तत्कालीन नागर संस्कृतीवर भराभर विजय मिळवतात.

“वैदिक आर्यांना शेती माहीत असली तरी त्यांचा समाज मुख्यत: पितृसत्ताक पशुपाल समाज होता. घोडे व रथ यांचा उपयोग करणारा लढवय्या समाज होता. आर्य गणांच्या झुंडी इ.स.पूर्व 2000 वा त्याच्या आधीपासून भारतात येऊ लागल्या असाव्यात आणि ही घुसखोरी पुढची पाचसहाशे वर्षेचालू राहिली असावी. परंतु मुख्यत्वेकरून दोन किंवा तीन फेर्‍यांत हे आक्रमण झाले असावे. यातील शेवटची दोनतीनशे वर्षेहा सिंधू संस्कृतीचा र्‍हासकाळ आहे. सारांश मोहन-जो-डारो, हराप्पा आदी शहरे आर्यांच्या हल्ल्यांनीच नष्ट झाली नसली तरी ती नष्ट होण्याशी आर्य टोळ्यांच्या चढायांचाच संबंध होता असा निष्कर्ष काढणेच योग्य होईल.”

मोहन-जो-डारो, हराप्पाची नागरी सिंधू संस्कृती नष्ट झाली हे खरेच. उत्खननात ती शोधली गेली आहे. नष्ट होण्यामागे निश्चित कारणे काय असावीत याबाबत तर्कच करावे लागतात. भलेमोठे नैसर्गिक उत्पात अथवा क्रमाने ढासळत लयाला जाणारी त्या नगरांची अर्थव्यवस्था अशी कारणे असू शकतात. आर्यांच्या हल्ल्यांनी ती नष्ट झाली हे संझगिरी यांचे म्हणणे योग्यच आहे. पण मग, “त्यांचे रथारूढ धनुर्धारी, गणसमाजाच्या समाधिष्ठित शिस्तीने बांधलेली त्यांची दले, तत्कालीन नागर संस्कृतीवर भराभर विजय मिळवतात” असे लिहिणे अप्रस्तुत ठरते. तसेच, “ती नष्ट होण्याशी आर्य टोळ्यांच्या चढायांचाच संबंध होता असा निष्कर्ष काढणेच योग्य होईल”, या त्यांनी केलेल्या विधानाचा नीट उलगडा होऊ शकत नाही.

संझगिरींनी ‘आर्यवंश’ नव्हे तर, आर्यगण असा शब्दप्रयोग केला आहे. आर्यांचा पितृसत्ताक पशुपाल गणसमाज असा उल्लेख केला आहे. या गणसमाजाकडे घोडे, रथ आणि तीरकमठे आहेत. गायीगुरे आहेत. या सगळ्याचा सांभाळ करायचा तर श्रमविभागणी असली पाहिजे. अशा विभाजित पितृसत्ताक गणसमाजात, ‘समताधिष्ठीत शिस्तीने बांधलेली दले’ असली पाहिजेत हे त्यांचे म्हणणे पटणारे नाही. अन्नसंग्राहक गणसमाजातील समताधिष्ठीत जीवनशैली आणि निर्णयप्रक्रियेतील सामूहिक भागीदारी, या समाजाने कृषिवल पशुपाल अवस्थेत संक्रमण केल्यानंतर काही काळ रेंगाळत राहते हे खरे असावे. पण ‘नागर संस्कृतीवर भराभर विजय मिळवणार्‍या आर्यांच्या बाबतीत’ हे तत्व लागू करणे संयुक्तीक होईल काय याचा विचार करण्याची गरज आहे.

संझगिरी सांगतात की, “सिंधू संस्कृती ही कृषिवल समाजावर आधारलेली होती आणि म्हणून या समाजात मातृसत्ताक पद्धती-निदान त्या पद्धतीचे बळकट अवशेष असणे स्वाभाविक होते. भारतात इतरत्र पसरलेल्या प्राचीन-पाषाणयुगीन किंवा नवपाषाणयुगीन कृषिवल समाजात देखील ही पद्धती रूढ असणे स्वाभाविक होते.”

या परिच्छेदातील उत्तरार्ध पटण्यायोग्य आहे. मानवी समूह अन्नसंग्राहक अवस्थेतून कृषिवल अवस्थेत स्थित्यंतर करताना, कृषीप्रक्रियेतील स्त्रियांची अग्रभागी भूमिका मातृसत्ताक निर्णयव्यवस्थेला पुरेसा अवकाश नक्कीच प्राप्त करून देते. परंतु सिंधू संस्कृती जरी, कृषिवल अवस्थेच्या प्राथमिक चौथर्‍यावर उभारली गेली असली तरी, ती प्रगत होत होत अनेक वस्तूंची दूर-दूर व्यापारी देवघेव करण्याच्या नागरी अवस्थेपर्यंत पोचली होती. संझगिरींनी या नागरी सिंधू संस्कृतीतील अवशेषांचे सचित्र विवरण केले आहे. या संस्कृतीतील श्रमविभागणीचे, श्रमिकांनी निर्माण केलेल्या धनाचे, श्रमापासून फारकत घेतलेल्या वरिष्ठांनी धनसंचयावर प्रस्थापित केलेल्या वर्चस्वाचे आणि उच्चनीच भेदभावांचे उचित चित्रण संझगिरी यांच्या मांडणीत आहे. त्यामुळे अशा सिंधू संस्कृतीत मातृसत्ताक पद्धती अथवा या पद्धतीचे बळकट अवशेष शिल्लक राहिले असतील हे संभवत नाही.

“पूर्वीच्या नागर संस्कृती(तील) उत्पादनतंत्र व शास्त्र….(आर्य) आक्रमकांनी इतरत्र पसरविले… त्यांनी त्यातील तंत्र व शास्त्र आत्मसात करून आपल्याबरोबर चहुकडे नेले.” संझगिरींची ही विधाने वस्तुस्थितीशी पडताळून पाहायला हवीत. एकतर पूर्वीची नागर संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती ‘आर्य आक्रमक’ येण्यापूर्वीच नष्ट झाली होती. त्यामुळे त्या संस्कृतीतील उत्पादनतंत्र व शास्त्र आत्मसात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे ते चहूकडे नेण्याचे प्रयोजन उरत नाही. तथापि, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावयाला हवी की, सिंधू संस्कृतीचे नष्ट होणे म्हणजे त्यावेळची भारतातील अन्य ठिकाणची सगळीच व्यवस्था नष्ट होणे नव्हे. उत्तरपाषाणकालीन व नवपाषाणकालीन लहान लहान कृषिवल मानवी समूहाचे अस्तित्व असणारच. भारताबाहेरून आलेल्यांनी या मानवी समुहांच्या कृषिवल तंत्राला आत्मसात केले असणे शक्य आहे. तरीही या तंत्राचा प्रसार सर्वदूर करण्याचे कार्य या पशुपालक नवागत आक्रमकांनीच केले हे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू शकते.

त्याचबरोबर विंध्य-नर्मदेच्या दक्षिणेला आणि पूर्वेला असणार्‍या नद्यांच्या विस्तीर्ण सुपीक प्रदेशात कृषिवल जीवनपद्धतीचा अंगीकार करण्यासाठी, त्या प्रदेशात पूर्वापार राहत असलेल्या मानवी समूहांनी, ‘आर्य-आक्रमकांनी’ त्यांच्यापर्यंत पोचून हे उत्पादनतंत्र देईपर्यंत वाट पाहत बसण्याची पूर्वअट मान्य करणे कठीण आहे. सिंधू आणि तिच्या परिसरात गाळपेर कृषितंत्राचा झपाट्याने प्रसार होणे स्वाभाविक आहे. तसेच गंगेच्या खोर्‍यात लोखंडाचा शोध लागल्यानंतर त्याच्यापासून बनविलेल्या आवजारांचा उपयोग करून जंगलातील जमीन लागवडीखाली आणून कृषीउत्पादनाचा विकास केला गेला हेही बरोबरच आहे. पण मग हा लोखंडाचा शोध नक्की कोणी लावला? आर्यांनी जंगले जाळून आणि लोखंडाचा वापर करून कृषिउत्पादनाचे तंत्र विकसित केले ही समजूत पुन्हा एकदा नीट तपासून पाहिली पाहिजे. तसेच हे उत्पादनतंत्र विकसित होण्याच्या शक्यता भारताच्या पूर्व आणि दक्षिण भागात कुठेच नव्हत्या काय आणि असतील तर त्याच्या खाणाखुणांचे अवशेष संशोधायला हवेत. ज्याला समृद्ध द्रविड संस्कृती म्हटले जाते ती काय आर्यांच्या आक्रमक आगमनानंतर विकसित झाली? उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत नव्या उत्पादनतंत्राचा प्रसार होईपर्यंत तिथली सामाजिक-आर्थिक मानवी समूहांची अवस्था काय होती? असे अनेक प्रश्न उद्भवतात. अर्थात, मानवाची कहाणी या पुस्तिकेचा उद्देश या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्याचा नसल्याने संझगिरी यांनी त्यांचा उहापोह केलेला नसावा.

संझगिरी यांनी केलेल्या मांडणीशी आणि काढलेल्या निष्कर्षांशी विरोध दाखविणारे अनेक प्रवाह आहेत. यापैकी एक प्रवाह अगदी अलिकडच्या काळात फारच आक्रमकपणे पुढे आला आहे. या प्रवाहाचे प्रणेते म्हणतात की, आर्य भारताबाहेरून आले असे म्हणणे म्हणजे एक थोतांड आहे. आर्य मुळचे इथलेच आहेत. आर्य, द्रविड आणि आर्येतर द्रविडेतर सर्व आदिवासी जमाती- हे सर्वजण मूळ भारतीय असून आर्यांनी बाहेरून भारतावर आक्रमण केले असे म्हणणे साफ झूट आहे.

इतिहासाची आणि मानवी विकासाच्या प्रवासाची आपल्याला हवी तशी मांडणी करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जात असतो. जर या प्रयत्नांमागे ठोस आणि भरघोस पुरावे वैज्ञानिक आधारावर दिले गेले तर त्यांची नोंद घेणे महत्वाचे ठरते. तथापि, तसे ते न देता वेगळ्याच राजकीय हितसंबंधासाठी कांगावेखोरपणा करून सत्य दडवून ठेवण्याचा उद्योग कुणी करत असेल तर त्याचा यथायोग्य प्रतिवाद करावा लागतो. आर्य इथलेच असे प्रतिपादन उच्चरवाने करणार्‍यांचा प्रतिवाद करण्यासाठी संझगिरींच्या पुस्तिकेत भरपूर सामग्री आहे.

शुद्ध रक्ती आर्यवंशाच्या संकल्पनेला पुढे रेटत फॅसिस्ट हुकूमशाही अनन्वित जुलुमांचा धुमाकूळ कसा घालू शकते त्याचा अनुभव विसाव्या शतकाने पुरेपूर दिला. एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा ती चाल खेळण्याचे कुटिल मनसुबे रचले जात आहेत. अशावेळी जनमानसांतील खुळचट भ्रमसमज निपटून काढायची नितांत गरज आहे. संझगिरींनी आर्यविषयक बाबींच्या बाबत केलेल्या विवेचनाला समृद्ध करण्याच्या दृष्टीने विशेष अध्ययन करणे महत्वाचे आहे. आर्य हा वंश वगैरे अजिबात नव्हताच. पण मग आर्य म्हणून खरोखरच एखादी गोष्ट होती का? आर्य नावाचा गणसमाज होता का असा प्रश्न देखील विचारायला हवा. आर्य नावाचा भाषिक समूह होता असे मांडणार्‍या इतिहासकारांची मतेही विचारात घ्यावी लागतील.

एक निर्विवाद गोष्ट म्हणजे, वसुंधरेवरील भ्रमणगतीच्या चक्रात फिरत राहणे ही जीवसृष्टीतील मानवाची अपरिहार्य जीवनसरणी आहे. आज पृथ्वीतलावर विविध ठिकाणी स्थीर-स्थाईक झालेल्या वसाहतीतील माणसे देखील याला अपवाद नाहीतच. ‘पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन’ या काव्यपंक्तीतील भटकेपण राजाच्या सदनाचा पत्ताच नव्हता तेव्हापासून माणसाच्या पायावर(ललाटावर नव्हे) कोरले गेले आहे. पृथ्वीवरील विशाल जलाशयांच्या आणि भूखंडांच्या सरहद्दी ठरविण्याची ‘अक्कल’ माणसांना सुचली नव्हती तेव्हा मानव समूहांची मुक्त भ्रमंती इकडून तिकडे सुरू झाली होती. आताच्या भारतात आणि पाकिस्तानात केवळ खैबर खिंडीतूनच नव्हे तर अन्य मार्गावरूनही अनेकानेक मानवसमूह येत गेले हे कोणी नाकारू शकत नाही. शक आले, हूण आले, कुशाण आले. त्यांच्या त्यांच्या भाषांसह हे मानवी भाषासमूह आले. त्यापैकी काही भाषासमूह ‘आर्य’ या संज्ञेने संबोधित करून त्यांच्या भाषेची मुळे ‘पुरातन इराणीयन’ भाषेत रूतली आहेत अशी संशोधनात्मक मल्लिनाथी इतिहासकारांनी केली आहे. भारताचे आणि इराणचे संबंध शत्रूभावी असावेत अशी कोणी कितीही आरडाओरड केली तरी पुरातनातील ही सनातन मुळे कशी उपटून काढणार? ‘इराणीयन-इंडोइराणीयन-इंडोआर्यन’ हा तथाकथित ‘आर्यां’चा भाषिक प्रवास, त्याकाळातील नवपाषाणकालीन बहुभाषिक आदिमानवसमूहांच्याआणि द्रविडीयन संस्कृती समूहांच्या भाषेत विरघळत गेला हे ऐतिहासिक सत्य नाकारता येईल काय?

संझगिरींनी केलेल्या जीवसृष्टीच्या वैज्ञानिक मीमांसेत अतिसूक्ष्म साध्यासुध्या एकपेशी जीवाचा जैविक विकास होत होत मानवी जीवनसृष्टी अस्तित्वात आली आहे. वंशाच्या भाषेतच बोलले पाहिजे असा कोणाचा अट्टाहासच असेल तर या अतिसूक्ष्म एकपेशी भाषाहीन जीवाच्या वंशाचेच आपण सर्वजण आहोत असे म्हणावे लागेल. जी काही बहुविधता आहे ती, विशिष्ट भौतिक परिस्थितीची स्वाभाविक निर्मिती आणि परिणती आहे. मानवी समाजातील विविध प्रकारचे भेद आणि माणसांच्या मेंदूतील भेदभावाच्या संकल्पना यांची निर्मिती माणसांनीच केली आहे. ती निसर्गत: झालेली नाही. हे भेद आणि या भेदभावाच्या संकल्पनांवर आधारलेला ‘अस्वाभाविक अमानुष’ व्यवहार संपविण्याची जबाबदारी माणसांवरच आहे; निसर्गावर नाही! ही जबाबदारी पेलण्याच्या महान प्रयासातील एक चिकित्सक जबाबदारी कॉम्रेड संझगिरी यांनी ‘मानवाची कहाणी’ लिहून पार पाडली आणि त्याला अनुषंगून करावयाच्या ‘क्रांतिकारी व्यवहारा’साठी आयुष्य व्यतीत केले. यापुढील जबाबदार व्यवहार जाणीवपूर्वक चिकित्सेने करण्याची हमी आपण घ्यायला हवी. आणि हा व्यवहार ‘स्वाभाविक मानुषी’ व्यवहार बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल असा दुर्दम्य आशावाद जागता ठेवायला हवा.

कुमार शिराळकर

पुस्तकाचे नाव : मानवाची कहाणी
लेखक : प्रभाकर संझगिरी
मुद्रक/प्रकाशक : हेमकांत सामंत, मुंबई श्रमिक संघ, क्वारी रोड, भांडुप, मुंबई-4000078
किंमत : रू.200/-