स्मृती विशेषांक आवडला
अं.नि.वा.चा शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक विशेष आवडला. पाच-दहा वर्षे कार्य करणार्या तरूण कार्यकर्त्यांपासून गेली वीस-पंचवीस वर्षे डॉक्टरांसोबत कार्य करणार्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंतच्या भावनांना जागा दिल्याबद्दल अंनिवाचे आभार! डॉ. दाभोलकरांविषयी आठवणी जागविणार्या त्यांच्या कुटुंबियांसमवेत अंनिस परिवारातील कार्यकर्त्यांची मगोगते ही आजी व भावी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरतील अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील तळागाळातील हजारो कार्यकर्त्यांपैकी काही मोजक्याच कार्यकर्त्यांची ही प्रतिनिधीक मनोगते असली तरी समितीच्या कार्याची सर्वसाधारण कल्पना त्यावरून यावी.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा ठाव घेणारा, त्यांच्या स्मृतीांना उजाळा देणारा, त्यांना अभिवादन करणारा असा स्मृती विशेषांक काढल्याबद्दल अंनिवाचे संपादक, व्यवस्थापक व सर्व संपादकीय सदस्यांचे मनापासून अभिनंदन!
–व्ही. टी. जाधव, नाशिक.
प्लँचेटचा उपयोग वेदनादायी
पुरोगामी विचारवंत आणि लेखक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करताना शासनातील एका ज्येष्ठ अधिकार्याने ‘प्लँचेट’चा विधी करून डॉ. दाभोलकर यांचा मारेकरी शोधण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तात तथ्य असेल तर मनाला अत्यंत वेदना देणारा हा प्रकार आहे. प्लँचेट म्हणजे काही लपून राहिलेल्या गुन्हेगारांचा शोध घेणारं यंत्र नव्हे. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास प्लँचेट हा सुखवस्तू माणसांचा वेळ घालविण्याचा एक बालिश पोरखेळ आहे. या खेळाचा मुख्य भाग असा की, तिपाईवरच्या पेल्यात म्हणे मृत व्यक्तीचा आत्मा प्रवेश करतो आणि तो अक्षरांवर सरकून प्लँचेट लावणार्या व्यक्तीला योग्य उत्तरे देतो! परंतु वस्तुस्थिती ही आहे की, पेला आपोआप सरकत नाही. प्लँचेट लावणार्या व्यक्तीच्या बोटांतील बलाने तो सरकवला जातो.
वैद्यक शास्त्रातील अत्याधुनिक संशोधनानुसार ‘आत्मा’ या संकल्पनेचा आधारच संपुष्टात आला आहे. म्हणूनच प्लँचेट हे एक चक्क थोतांड आहे. त्यातून भोळ्या आणि श्रद्धाळू माणसांची दिशाभूल होते. विज्ञानाचा तथाकथित प्लँचेटशी दूरान्वयानेदेखील संबंध पोहोचत नाही. 1987 साली भारत सरकारच्या नवीन धोरणानुसार, वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती करणे हे नागरिकांचे प्रमुख कर्तव्य ठरविण्यात आले आहे. मात्र आज(सन 2014 मध्ये) पूर्णपणे अवैज्ञानिक आणि थोतांड असलेल्या ‘प्लँचेट’ या बालिश पोरखेळाचा गुन्हेगारांच्या तपासाकरता आधार घेतला जात आहे. ही शरमेची गोष्ट नव्हे काय?
–यज्ञेश्वर निगळे, पर्वरी, गोवा