Categories
संपादकीय

अभिवादन

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

केशवसुतांनी एका कवितेत विवेकनिष्ठेच्या वाटेवर निर्भयपणे प्रवास करणार्‍या शूरांचं वर्णन केलंय.

नव्या जगातील नव्या मनूचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे.’

साहित्य, वाणी आणि संघटन कौशल्य या त्रिविध आयुधांनी गेली 25 वर्षे न थकता महाराष्ट्राला विवेकाच्या वाटेवर नेण्याचा दाभोलकर प्रयत्न करीत होते. त्यांना विरोध करणार्‍या आंधळ्या दुष्ट शक्ती, अपप्रचार आणि कायद्यांचा दुरूपयोग करून दाभोलकरांची वाट अडवीत होते. पण सत्यनिष्ठा व तर्ककौशल्य यांच्या सामर्थ्यावर दाभोलकर त्यांना पुरून उरले. अखेर समोरासमोर भिडत असताना आपली डाळ शिजत नाही हे लक्षात येताच या दुष्टांनी पाठीमागून वार केला. दाभोलकरांचा घात होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे. शहीद डॉ.दाभोलकरांचे स्मरण व आठवणी यांना वाट देण्यासाठी हा स्मृती-विशेषांक आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

या विशेषांकातील लेखनाचे स्वरूप द्विविध आहे. एक विभाग त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा आहे. तर दुसरा विभाग त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारा आहे.

डॉक्टरांनी आपल्या कार्यात महाराष्ट्रातील अनेक सवंगडी जमविले होते. त्यातील अनेकजण संकटांना न घाबरता अंधविश्वासाविरोधात जंग छेडीत होते. त्यातील अनेकावर विरोधकांनी हल्ले केले. दाभोलकरांनी या सवंगड्यांना एकाकी पडू दिले नाही. ‘भिऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे’ असा केवळ शाब्दिक उपदेश न करता ते या कार्यकर्त्यांना कृतीशील आधार देत होते. या सवंगड्याची मनोगते ‘पाठबळ’ या विभागात आपण वाचू शकाल. चळवळीत काम करताना अनेकांना विपन्न काळात त्यांनी आर्थिक व भावनिक पाठबळ दिले. त्यांच्या दाटून आलेल्या आठवणीचा विभाग हृदगतमध्ये सर्वांनी आवर्जून वाचावा.

कुटुंबातील कर्ता गेला की, कुटुंबीय कोसळून पडतात पण डॉक्टरांच्या पत्नी शैलाताई, पुत्र हमीद व कन्या मुक्ता खचले नाहीत. मनोधैर्य कायम ठेवून वडिलांचा कठीण वारसा पुढं नेणं सोपं नाही. पण आम्ही कुटुंबीय तुमचा वारसा पुढे चालवू या भावना व्यक्त करणारा हमीदचा लेख शूर पित्यांचा शूर पुत्राच्या निश्चयाचा निदर्शक ठरेल.

बालपणापासून ते अंनिसचे नेतृत्व हाती घेईपर्यंतची नरेंद्रची जडणघडण तसेच चळवळीला पोषक लेखन, वक्तृत्व व संघटन हे व्यक्तीमत्वाचे पैलू या अंकात तपशिलात दिले आहेत.

दाभोलकरांच्या खुनानंतर खुन्यांचा शोध अजूनही लागलेला नाही. त्याबद्दल कार्यकर्त्यांत व जनमानसात अस्वस्थता आहे. वर्षभरात तपासाच्या संदर्भात काय घटना घडल्या त्याचा मागोवा मुक्ता दाभोलकरांच्या लेखातून आपणास समजेल.

डॉक्टरांनी महाराष्ट्रात विवेकाची पेरणी करण्यासाठी जे शेकडो साथीदार जोडले त्यांचे मनोधैर्य यत्किंचितही कमी झालेले नाही. अविनाश पाटील व दाभोलकर कुटुंबीय यांच्या प्रेरणेने गेले वर्षभर अंनिसचे कार्य त्याच गतीने पुढे चालू आहे आणि पुढेही चालू राहील हे जनमानसाला या विशेषांकातून खचितच जाणवेल.

डॉक्टर आता शरीराने आपल्या सोबत नाहीत. पण विचाराने ते दीपस्तंभाप्रमाणे आपणाला नवसमाजरचनेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रकाश देत आहेत व पुढेही देत रहातील. या वाटेवर चालण्यासाठी हा विशेषांक आपणाला प्रेरणादायी ठरेल.

जगाचा इतिहास असे सांगतो की, प्रगतीच्या दिशेने समाजाची वाटचाल व्हावी यासाठी झोकून देणार्‍या सुधारकांचे विचार जनमानसाला सुरवातीला आकलन होत नाहीत. समाज हा नवविचारांऐवजी परंपरांना कवटाळून बसतो; त्यांना मळलेल्या वाटा अधिक प्रिय असतात. नव्या वाटा शोधणे व या वाटेवरचा संकटमय प्रवास याला लोक घाबरतात. मग यातीलच कोणीतरी नव्या वाटेवर उडी मारतो. मग इतर त्यांच्या मागून येतात. पण परंपरात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात ते सनातनी जनसामान्यांना रोखतात. यातूनच काहीजण मागे वळतात. तर काहींचा प्रवास पुढे चालू राहतो. अखेर नव्या वाटाचे महत्व समाजाला कळून येते व परिवर्तनाला सुरवात होते. बदल हा प्राणीसृष्टीचा इतिहास आहे. पाण्यातील प्राणी जमिनीवर आले त्यातील काही उत्क्रांत होऊन आकाशात उडू लागले. गरजा व नवआकलन याबाबतीत इतर प्राण्यांपेक्षा माणूस त्याच्या बुद्धीसामर्थ्याने नवी झेप घेण्यात अधिक यशस्वी होतो. म्हणून समाजबदलाचा प्रवास घडतो.

या सगळ्या प्रवासात समाजसुधारक दीपस्तंभाप्रमाणे वाट दाखवित राहतात. त्यांनाच संपविण्याचा सनातन्यांचा प्रयत्न असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाबतीत हेच घडले. त्यांचा विचार सामान्य लोक स्वीकारीत आहेत. हे लक्षात येऊन धर्मांधांनी त्यांचा घात केला. पण नवा विचार समाजमन आता सोडणार नाही. मार्टीन ल्युथर किंग, गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर अनेक थोर समाजसुधारकांनी ऐतिहासिक बदल घडविला. अंधविश्वासात रूतलेला समाज दाभोलकरांच्या हौतात्म्याने निश्चित बाहेर पडेल यात शंका नाही.