डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची बातमी कळाल्यानंतर अतिव दु:ख झालं. दोन दिवसांपूर्वी शनिवारी 17 तारखेला त्यांच्याबरोबर पुण्यात माझी मिटींग झाली. मोहन धारियांच्या बंगल्यात साधना ट्रस्टची मिटींग होती. आम्ही तिघं एकत्र होतो. साधना संदर्भात सविस्तर चर्चा झाली. दुर्दैवानं नरेंद्र अन् माझी 17 तारखेची भेट शेवटची ठरली. त्यांची हत्या होणं ही वाईट घटना आहे. त्यांच्या जाण्याने राज्यात भरून न येणारी मोठी पोकळी निर्माण झाली. चळवळीची हानी झाली. असं दु:खानं म्हणावं लागतं. गेल्या 25 वर्षांपासून मी आणि नरेंद्र साधनाच्या माध्यमातून एकत्र काम करत होतो. साधनाचे ते संपादक होण्याअगोदरपासून आमचे संबंध आले. साधना ट्रस्टचा मी कार्यकारी विश्वस्त आहे. मोहन धारीया विश्वस्त आहेत. वसंत बापट आणि ग.प्र.प्रधान यांच्या निवृत्तीनंतर दाभोलकरांना आम्हीच साधनेचे संपादक केले. एक बुद्धिमान, हुशार, विद्वान, अभ्यासू आणि चांगला माणूस म्हणून त्यांनी साधनेचं संपादन यशस्वीरित्या केलं. साधनेची आर्थिक प्रगती झाली. साप्ताहिक अंकातून वैचारिक लेख प्रकाशित केले. साप्ताहिकाला साठ वर्षे पूर्ण झाली. या सगळ्या वाटचालीत आमच्या दोघांची चांगली मैत्री आणि निश्चितपणे चांगला आदर राहीला. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्रनी केलेलं काम मोठं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं यासाठी त्यांचं अफाट योगदान आहे. ते त्यासंबंधी एक मासिक चालवतात. त्यांचं घराणं म्हणजे विचारवंतांचं, ध्येयवादी माणसांचं घराणं. चांगलं घराणं म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांचे एक भाऊ पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. महाराष्ट्रभर फिरून नरेंद्रने पुरोगामी चळवळ व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रसारासाठी नेटाने काम केले. काही वर्षापूर्वी चळवळीतील कार्यासाठी मदत म्हणून मी त्यांना एक चार चाकी वाहन दिले. गाडी दिली हा विषय गौण. पण त्यांच्या कामाची धडाडी मोठी होती.सच्चा विचारवंत म्हणून त्यांनी अनेक आंदोलने केली. उपोषण केले. जादूटोणा विरोधी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे आग्रही होते. वारकर्यांनी विरोध केला म्हणून तो विषय राहून गेला. स्वत: साने गुरूजींनी स्थापन केलेल्या साधना ट्रस्ट व साप्ताहिक साधनाच्या अंकासाठी नरेंद्रनी दिलेलं योगदान कदापी विसरणं शक्य नाही. सुरवातीला स्वत: साने गुरूजी अंकाच्या घड्या करून पोस्टात टाकत होते. साधनेतून मिळणारे विचार आणि दिशा समाजाला आवश्यक आहेत. असा इतिहास असणार्या साधना ट्रस्टमध्ये नरेंद्रनी केलेलं काम प्रामाणिक आणि चांगलं घडलं. त्याचा निश्चित आदर आहे.
धर्मांध शक्तीनेच नरेंद्र दाभोलकरांना ठार केलं. महात्मा गांधींजींसारखंच झालं. दुसरं काय? नरेंद्रनी त्यागस्थपणे, समर्पीत भावनेने तत्वनिष्ठेने आणि ध्येयाने प्रेरीत होऊन चळवळीचे काम केलं. त्यांच्या जाण्याने अतिव दु:खच यापेक्षा वेगळं काय?
नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहताना चळवळीचे काम याहीपेक्षा अधिक नेटाने आणि झोकून देऊन करावे लागणार आहे आणि काय सांगू? शब्दाच्या पलिकडील तो माणूस होता.
–आप्पासाहेब तथा सा.रे.पाटील