Categories
चळवळ प्रेरणा

विधी-ब्राह्मणाविना डॉक्टरांचा विवाह संपन्न

मार्च - २०११

धुळ्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.भास्कर दरवडे यांचा मुलगा डॉ.अभिनय याचा विवाह अंमळनेर(जि.जळगाव) येथील प्रकाश महाजन यांची मुलगी डॉ.मीनल हिच्याशी दि.20 नोव्हेंबर 2010 रोजी सत्यशोधक-नोंदणी पद्धतीने संपन्न झाला. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. प्रत्येक मान्यवराने साधेपणाने विवाह झाले पाहिजेत, पुरोहितशाहीची अर्थहीन कर्मकांडे, हुंडा, बँड, मिरवणुका, कुंडली, पत्रिका, डी.जे. अशा बाजारू प्रकारापासून विवाहासारख्या समारंभाना वाचविले पाहिजे, यावर भर देण्यात आला. विवाह नोंदणी अधिकार्‍यासमोर वधु वरांनी कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या केल्या. शासकीय कागदपत्रांवरील शपथ वाचन झाले. व सत्यशोधकी शपथ वधुवरांना देण्यात आली.

            शपथ पूर्ण होताच वधुवरांनी परस्परांना पुष्पहार घातला व उपस्थितांनी अक्षतांएवजी फुलांंच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. साध्या पण कलात्मक मंडपात उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला. आहेर नव्हते, गोंधळ नव्हता, पुरेहितांची न समजणारी बडबड नव्हती, पूजा विधी नव्हते, सर्व कसे आखीव रेखीव. संयोजन आटोपशीर व निवेदन दर्जेदार होते. सनईवादनाने वातावरणात प्रसन्नता होती. प्रत्येकाच्या तोंडी ‘अशी लग्ने झाली पाहिजेत’ ही प्रतिक्रिया होती.

प्रदीप सोनवणे, धुळे