Categories
कव्हर स्टोरी

विवेक जागर सायकल रॅली इस्लामपूर ते पुणे

ऑक्टोबर - २०१४

जीवनात आशानिराशेचे अनेक क्षण येतात, पण अशा प्रसंगातही विवेकाचा स्वीकार करणारी माणसं जीवनात प्रेरणास्थान बनतात.

महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरूण इस्लामपूर, जि.सांगली मधील राष्ट्रीय सेवा योजना, मानसशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा-इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इस्लामपूर ते पुणे ‘विवेक जागर सायकल रॅली’ आयोजित करण्यात आली होती. दि.18 ते 20 ऑगस्ट 2014 या तीन दिवसांमध्ये इस्लामपूर-कराड-सातारा-शिरवळ-पुणे या ठिकाणाहून जाताना विवेक जागर सायकल रॅलीने पोस्टर व घोषणांच्या माध्यमातून सर्व समाजाला ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’ असे आवाहन केले.

20 ऑगस्टचे औचित्य साधून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर, हत्या झालेल्या ठिकाणी डॉ.दाभोलकरांना आदरांजली वाहणे, महाराष्ट्र शासनाच्या नव्याने झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रसार व कायद्याविषयी प्रबोधन करणे, परिवर्तनाची चळवळ अधिक गतीमान करणे आणि विवेकाचा जागर करणे असे हेतु मनात ठेवून कॉलेजचे 60 विद्यार्थी आणि कॉलेजचे प्राध्यापक ‘विवेक जागर सायकल रॅली’मध्ये सहभागी झाले.

इस्लामपूर येथून दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सदस्य एन.आर.पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ.जे.के.पाटील, माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, उपप्राचार्य एस.टी.गायकवाड, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य एल.डी.पाटील व इस्लामपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ.नितीन शिंदे, संजय बनसोडे, शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.पी.एच.पाटील, प्रा.होनमोरे यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचे उद्घाटन केले आणि तीन दिवस चालणार्‍या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. इस्लामपूरवासियांची सकाळ विवेकाचा जागर आणि परिवर्तनाच्या गीतांनी व घोषणांनी झाली.

-‘विवेकाचा आवाज बुलंद करूया!’

– ‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर!’

-‘लढेंगे, जितेंगे!’

-‘मुर्दाड शासनाचा, धिक्कार असो!’

-‘माणूस मारता येतो, विचार मारता येत नाहीत!’

-‘लक्ष्य तो हर पल पाना है, विवेकी समाज बनाना है!’

– ‘संघर्ष करूया मनापासून, अंधश्रद्धा घालवूया मूळापासून!’

अशा घोषणांनी झोपलेल्या व झोपेचे सोंग घेतलेल्या समाजाला जागे होऊन विचार करण्यास भाग न पाडल्यास नवल!

सकाळी 9.30 वाजता सायकल रॅलीचे कराड येथे आगमन झाले. कराड येथे डॉ.अमोल मोटे, नितीन थोरवडे, विश्वास चाळके या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी रॅलीचे स्वागत केले. महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. ऊन-पावसाची आणि कपाळावरून ओघळणार्‍या घामाची पर्वा न करता मुले सायकल चालवित होती. काहींनी आपल्या सायकलवर तर काहींनी आपल्या गळ्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, संत तुकाराम, गाडगे महाराज, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले इत्यादी समाजसुधारकांचे फोटो घातले होते.

दुपारी 1 वाजता सातारा गाठले. सामाजिक विचारवंत किशोर बेडकिहाळ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेप्रशांत पोतदार, प्रा.कुमार मंडपे आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.अभिनव देशमुख यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचे स्वागत केले. येथे विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या कामाची संहिता देण्यात आली.

सायंकाळी 7.30 वाजता शिरवळमध्ये रॅलीचे आगमन झाले. शिरवळ येथे दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी आणि अंनिसचे कार्यकर्तेमुराद पटेल तसेच शिरवळ सरपंच, उपसरपंच यांनी रॅलीचे स्वागत केले. रात्रीचे जेवण, राहण्याची व्यवस्था तसेच दुसर्‍या दिवशी सकाळी चहा-नाष्टा याचे सर्व नियोजन आणि जबाबदारी मुराद पटेल यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केली.

दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता सायकल रॅली पुण्याकडे रवाना झाली. पुणे येथील एस.एम.जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन या ठिकाणी आमचे स्वागत डॉ.हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख आणि ननवाणी यांनी केले. डॉ.हमीद दाभोलकर तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी इस्लामपूर ते पुणे सायकलवरून येण्याचा अनुभव या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचा सुमारे 200 किलोमीटर सायकल चालवल्यानंतरचा अनुभव, संघटनेवरील विश्वास आणि परिवर्तनाचा ध्यास थक्क करायला लावणारा होता. विद्यार्थ्यांनी या चर्चेदरम्यान आपले अनुभव कथन केले तसेच अंनिसबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

सायंकाळी 7 वाजता एस.एम.जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल या मार्गावर विद्यार्थ्यांनी कँडल मार्च केले. परिवर्तनाच्या घोषणा, विवेकावरील निष्ठा आणि डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानाचे सार्थक होण्यासाठी अंनिसला साथ देण्यासाठी आवाहन करण्यात आले. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने पूलावर कँडल मार्चचे स्वागत केले. ज्या ठिकाणी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्या ठिकाणी समाजपरिवर्तनाची गाणी सादर केली. डॉक्टरांची हत्या झाल्याचं दु:ख आणि परिवर्तनाची विवेकी चळवळ पुढे घेऊन जाण्याचा उत्साह अशा संमिश्र भावस्थितीत आम्ही श्रमिक भवन या ठिकाणी मुक्कामी पोहोचलो.

20 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर पोहोचलो. अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक जाणिवा असणारे अभिनेते आणि अभिनेत्री तसेच अंनिसचे कार्यकर्तेयांच्या उपस्थितीमुळे पूल खचाखच भरला होता. पण विवेकाचा वसा घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी शिस्त लावण्याची गरज नव्हती. स्वयंस्फूर्ती आणि स्वयंशिस्त अंगात भिनलेले कार्यकर्ते निषेधही विवेकी मार्गाने करत होते.

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहून, परिवर्तनाच्या गीतांनी पुलावरील कार्यक्रमाची सांगता झाली. पुलावरून डॉ.दाभोलकर यांच्या हत्येखोरांना पकडण्यात अपयशी ठरलेल्या शासनाचा निषेध करीत आमचा मोर्चा पुणे महानगरपालिकेवर गेला. मोर्चामध्ये सिनेमा व सामाजिक पातळीवर कार्य करणार्‍या व्यक्तींचा सहभाग होता. याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. “डॉ.दाभोलकर जैसे लोगोंकी हत्या होती है और हत्यारोंका पता नही चलता, इस बात के लिए मै शरमिंदा हूँ!” अशा शब्दात अभिनेते नसरूद्दिन शहा यांनी आपला निषेध नोंदविला. पुढे मोर्चा मनोहर मंगल कार्यालयापर्यंत गेला. या ठिकाणी 10.30 ते 12.30 या वेळेत औपचारिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमास डॉ.बाबा आढाव, अतुल पेठे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या रॅलीतून आमचे विद्यार्थी, तरूण विवेकाची इतकी ऊर्जा घेऊन बाहेर पडतील की, सर्वदूर समाजामध्ये प्रकाशवाटा उजळलेल्या दिसतील आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर हे पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवून विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी नेहमीच प्रेरणादीप राहतील.

विवेक जागर सायकल रॅलीचे संयोजन एन.एस.एस.विभाग प्रमुख डॉ. प्रमोद गंगणमाले तसेच प्रा.निवृत्ती शिंदे, प्रा.अमित माने, प्रा.तेजपाल जगताप, प्रा.संभाजी नावडकर, डॉ.नितीन शिंदे, संजय बनसोडे यांनी केले.

प्रा. तेजपाल जगताप, प्रा. निवृत्ती शिंदे

संपर्क : 8600424393