चंद्रपूरच्या पुढे पन्नास किलोमीटरवर मंगी हे गाव आहे. शंभराच्या आसपास आदिवासी गोंड समाजाची कुटुंबं येथे राहतात. आदर्श ग्राम पुरस्कार व तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळालेलं हे गाव. मात्र या गावास आदर्श गाव का म्हणायचे हा प्रश्न खुद्द गावकर्यांसमोर उभा ठाकला आहे. महाराष्ट्र अंनिस व प्रसारमाध्यमांमुळे अंधारात दडलेलं वास्तव जगासमोर आलं. साधारण पंधरा वर्षांपूर्वी लिला कोडपे या आदिवासी तरूणीचा प्रेमविवाह त्याच गावातील तिच्याच जातीतील तरूणाशी झाला. लग्नात गावातला नवरा मुलगा नसावा, ही त्यांची रूढी-परंपरा असल्यामुळे पंच मंडळींची बैठक बसली. आदिवासी गोंड समाज एका व्यक्तीची गावाचा प्रमुख पंच म्हणून नेमणूक करतात. त्याच्या जोडीला इतर चार पंच असतात. आदिवासी जनतेचं जीवनमान तेच नियंत्रीत करतात. लग्नाची परंपरा मोडल्यामुळे पंचांनी दोन्ही परिवारास बहिष्कृत केले. त्यांना साथ देणारी इतर नऊ कुटुंबे आजही बहिष्काराच्या आगीत होरपळत आहेत. सण-उत्सव व इतर सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यास त्यांना बंदी घालण्यात आली. सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना तुच्छतेची वागणूक देण्यात येऊ लागली. दोन गटात विभागणी झाल्यामुळे सख्ख्या भावात बहिष्काराची भिंत उभी राहिली. बहिष्काराच्या वणव्यामुळे रक्ताचे बंध खाक होत असताना छोटी मुलेही त्यातून वाचू शकली नाहीत. त्यांच्या एकत्र खेळण्यावरसुद्धा बंदी आली. हा अपमान सहन न झाल्यामुळे, दोन वर्षांपूर्वी लिलाच्या भावाने(लाखेराव कोडापे) आत्महत्या केली. राजकारणी व पोलिसांनी मोठ्या गटाला साथ दिली. गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या शेर्याने फाईल बंद झाली. शासनाच्या नव्या धोरणानुसार, जिल्हाधिकारी या गावात मुक्कामासाठी आले होते मात्र गंभीर घटना त्यांच्यापर्यंत पोहचू दिली नाही. मागील महिन्यात दै.सकाळमध्ये ही बातमी मी वाचली. अंनिसच्या लढ्यामुळे अशी अनेक प्रकरणे समोर येत असतात.
शोधाशोध करून बहिष्कृतांशी संपर्क केला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना, मी अविनाश पाटील यांना सांगितली. त्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र अंनिसच्या चंद्रपूर शाखेचे जिल्हाकार्याध्यक्ष पी.एम.जाधव, अध्यक्ष प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बहिष्कृत व्यक्तींना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. मंगी गावासही ते जाऊन आले. परंतु एक महिना उलटला तरी काहीच कार्यवाही झाली नाही. अविनाश पाटील यांनी मग मला चंद्रपूरला जाण्यास सांगितले.
दि.9 सप्टेंबर रोजी मी, जाधव सर व खनके सर मंगी गावात पोहोचलो. नक्षलवाद्यांचा प्रभाव या भागावर असल्यामुळे माझ्या मनात थोडी धाकधुक होती. अंनिसच्या प्रबोधनाच्या मोहिमेला पोलीस प्रशासनाच्या कायद्याची साथ पाहिजे. यासाठी आम्ही राजुरा पोलिसांना सोबत घेतले होते. पत्रकारही बरोबर होते. दिसताक्षणी आदर्शगाव वाटावे, अशी मंगी गावाची रचना आहे. प्रत्येक घरापर्यंत सिमेंटचे रस्ते व टापटीप स्वच्छता! परंतु मन अजिबात स्वच्छ नसल्याचा प्रत्यय आम्हास आला. दोन्ही गटांना एकत्र आणण्यात आमच्या नाकीनऊ आले. सार्वजनिक ठिकाणी बैठक घेतल्यामुळे दोन्ही गट बर्याच वर्षांनी एकत्र आले. आम्ही महाराष्ट्र अंनिसची भूमिका मांडली. परंतु बहिष्कृत व्यक्तीपैकी माधव गेडाम बोलण्यास उभे राहिले असतांना पंच मंडळींच्या गटातील लोकांनी विरोध केला. वाद-प्रतिवाद झाला. मग आरडा-ओरडा झाला काही लोक आक्रमक झाल्यावर पोलिसांनी दंडक्याची भाषा ऐकविली. मग मी प्रथम महाराष्ट्र अंनिसच्या जातपंचायतीला मुठमाती अभियानाची माहिती दिली. आत्तापर्यंत बरखास्त करण्यात आलेल्या जातपंचायतीच्या बातम्या दाखविल्या. प्रबोधनाच्या मार्गाने जातपंचायत बरखास्त करणे गरजेचे असल्याचे सांगितले. परंतु वाद संपत नव्हता. शेवटी जातपंचायतविरोधीचे गृहखात्याचे परिपत्रक मी पंच परशुराम तोडासे यांना वाचण्यास सांगितले. ते वाचून ते वरमले. गावाचा कारभार कुणीतरी करावा यासाठी एक पाटील तरी असावा असे त्यांचे म्हणणे झाले. मग आम्ही एक समिती स्थापन करून त्यात दोन्ही गटांचे निम्मे सदस्य असावे. सदस्यांची संख्या समआकडी असावी व निम्म्या महिला असाव्या व या समितीने न्यायनिवाडे न करता सार्वजनिक कामे व कार्यक्रम करावे. चर्चेअंती हा मुद्दा त्यांना पटला. बहिष्कृत गटाचे लोक दहा टक्के असूनही त्यांना समितीत निम्मे स्थान असणार आहे. पुढची बैठकी प्रशासकीय अधिकार्यांच्या समक्ष होण्याअगोदर सामोपचाराने नावे काढण्याचे आम्ही सुचविले. पुढील बैठकीसाठी आम्हा पाहुण्यांना जेवण देण्याचा शब्द सर्वांनी दिला. विशेष म्हणजे हा स्वयंपाक दोन्ही गटाच्या महिला एकत्र येऊन करणार आहेत. परत गावात येण्याचे आश्वासन देत आम्ही परत निघालो. याप्रसंगी भाऊराव सिडाम, प्रकाश व्यडमे, माधव गेडाम, परशराम तोडसे, पोलीस पाटील व्यंकट मुंडे आदि गावकरी उपस्थित होते. राजुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मेघना गावंडे यांनी चांगली मदत केली. राज्यभरातील मुख्य वृत्तपत्रे, आय.बी.एन.लोकमत व आज तक(हिंदी) यांनी या घटनेची ठळकपणे नोंद घेतली. आम्ही मंगीवरून परत आल्यानंतर बहिष्कृत परिवार सन्मानाने जगत असल्याची माहिती माधव गेडाम यांनी फोनवरून दिली.
महाराष्ट्र अंनिसने जातपंचायत मुठमाती अभियान सुरू करून एक वर्ष झालं आहे. या अभियानास अनेक जातपंचायतीच्या पंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अहमदनगरच्या पद्मशाली समाजाच्या जातपंचांनी तर पत्रक काढून अंनिसच्या मोहिमेचा उल्लेख करत जातपंजायत (पद्मशाली न्याय कमेटी) बरखास्त केली आहे.
पद्मशाली समाज हा आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात आलेला समाज आहे. राज्यात दहा लाखाच्यावर हा समाज आहे. विडीकामगार व विणकाम करणारे अधिक लोक या समाजात आहेत. अहमदनगरमध्येही पन्नास हजारांवर त्यांची संख्या आहे. समाजाच्या कारभार्यांनी एकत्र येऊन ‘पद्मशाली न्याय कमिटी’ स्थापन केली. त्याद्वारे समाजातील भांडण-तंटे सोडविण्याचे काम केले जात असे. दंड व खुशालीच्या नावावर पैसे वसूल करणे, स्टॅम्प पेपरवर घटस्फोट घडवून आणणे, स्त्रियांकडूनही पोटगीसारखी भरपाई घेणे, लज्जा उत्पन्न होईल असे स्त्रियांना प्रश्न विचारणे, लोकांवर मनमानी बंधनं लादणं इत्यादी गैरप्रकार वाढीस लागले होते. याविरूद्ध आवाज उठविला तो राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्तेव नागराज मंजुळेंच्या पिस्तुल्या मधील कलाकार असलेल्या प्रा.विठ्ठल बुलबुले यांनी! त्यांच्या एका नातेवाईक महिलेस घटस्फोट देण्याचा व नवर्यास पैसे देण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता. प्रा.बुलबुले यांनी महाराष्ट्र अंनिसने त्यांना पाठबळ दिले. अंनिवामधील जातपंचायतीच्या लेखांचे झेरॉक्स करून त्यांनी ते समाजातील घरा-घरांत वाटले. गृहखात्याचे परिपत्रक मिळाल्याने त्यांची लढण्याची हिंमत आणखी वाढली. त्यांनी अनेकवेळा पंचांशी चर्चा केली. नोटीसही पाठवून जातपंचायतीच्या विरोधातील सरकारच्या आदेशाची माहितीही दिली. समाजातील तरूणांनी त्यांना साथ दिली. शेवटी 27/7/14 रोजी एकत्रित बैठक घेऊन पद्मशाली न्याय कमेटी बरखास्त करण्याची घोषणा अध्यक्ष प्रकाश येनगंदुल व प.महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अंबादास चिट्यालसर यांनी केली आणि तसे पत्रक काढून पत्रकारांना माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमुळे राज्यभर ही बातमी पोहचली. अशा प्रकारे 175 वर्षांची जुनी परंपरा असलेली पद्मशाली जातपंचायत बरखास्त झाली.
म.अं.नि.स.कडे बहिष्कृत व्यक्ती न्यायाच्या अपेक्षेने बघत आहेत. अशीच एक वेगळी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी या गावात घडली. या गावात आषाढ महिन्यात लक्ष्मीआई व मरीआईची यात्रा भरते. लक्ष्मीआईस पुरणपोळीचा तर मरीआईस रेड्याचा नैवेद्य दाखविला जातो. काही भाविक नवसापोटी छोटे रेडकू मरीआईच्या नावाने गावात सोडतात व मोठे झाल्यावर यात्रेच्या दिवशी ते तलवारीने देवीसमोर कापले जाते.(आठवा-चिवळीची यात्रा) गावात मातंग समाज बर्यापैकी असल्याने त्यांचे पंचमंडळीचे या रेडकू मारण्याच्या प्रथेवर नियंत्रण असते. रेडकू पंचाच्या हाताने मारल्यानंतर अनेक भाविक शिजलेल्या रेड्याचे मांस प्रसाद समजून खातात. मातंग समाजातील तरूण रमेश पाटोळे मात्र हा प्रकार पाहून अस्वस्थ होत होता. त्याने दलित स्वयंसेवक संघाचे विजय पोटफाडे व प्राणी क्लेश व संरक्षण समितीचे कार्यकर्ते बाबुराव जगताप यांच्या मदतीने ही प्रथा थांबविली. मात्र पंचकमेटीला याचा राग आल्यामुळे त्यांनी रमेशवर बहिष्कृत करण्याचे शस्त्र उगारले. रमेशबरोबर समाजबांधवांनी संवाद बंद करून वाळीत टाकले. इतर अनेक त्रास सुरू झाले. अंनिसच्या मोहिमेची माहिती असल्यामुळे जगतापांनी अविनाश पाटील यांच्याशी संपर्क केला. जातपंचायतविरोधी परिपत्रकाची प्रत त्यांना पाठवून सर्वांशी फोनवर चर्चा केली. केवळ कायद्याच्या धाकामुळे पंचांनी रमेशवरचा बहिष्कार उठवला. अंनिसमुळे या लढवय्या कार्यकर्त्याला आणखी बळ मिळाले.
महाराष्ट्र अंनिसकडे तक्रारींचा ओघ कायम आहे. आता राजस्थानमधून एक तक्रार आली आहे. राजसंमंध जिल्ह्यातील कलाल मेवाड जातपंचायतीने एका महिलेला घटस्फोटासाठी भाग पाडून एक लाख दहा हजारांची मागणी केली आहे. सदर मुलीचे आईवडील गरीब असल्यामुळे तेवढी रक्कम देऊ शकले नाही. परिणामी त्यांना बहिष्कृत करण्यात आले आहे. डॉ.दाभोलकर यांच्या कबड्डीच्या खेळातील सहकारी खेळाडू व राजा शिवछत्रपती पुरस्कार विजेचे शरद चव्हाण हे त्यांच्या घिसाडी जातपंचायतच्या निर्णयामुळे बहिष्कृत झाले आहेत. अंनिसची पुणे शाखा त्यांच्या मदतीला धावून गेली आहे. मराठवाड्यातील गोंधळी जातपंचायतीने लोकांवर खूप अन्याय केला आहे. अन्यायकारक सावकारीमुळे अनेक परिवार उध्वस्त झाले आहेत. बहिष्कृत परिवारास साथ दिल्यामुळे सुभाष उगलेसह इतर सात परिवारासही बहिष्कृत करण्यात आले आहे. कंजारभाट समाजातील औरंगाबादचे दर्शनसिंग मलके हे पुण्याच्या कंजारभाट जातपंचायतीकडून बहिष्कृत झाले आहेत. लवकरच ते तक्रार दाखल करणार आहेत.
अंनिसने अनेक प्रकरणात आणखी काही बहिष्कृत कुटुंबांना कसा न्याय मिळवून दिला तो वाचा पुढच्या अंकात.
-कृष्णा चांदगुडे
संपर्क : 9822630378