फिराची 9 वी राष्ट्रीय परिषद दि.24 व 25 डिसेंबर 2014 रोजी संकल्प हायस्कूल, मु.राळबा, ता.ब्रम्हपुर, जि.गंजाम(ओडिसा) येथे संपन्न झाली. याचे संयोजन ओडिसा रॅशनॅलिस्ट ऑर्गनायझेशन, ब्रम्हपूर यांनी केले होते.
म.अं.नि.स.तर्फे प्रा.डॉ.सुदेश घोडेराव, सचिव राष्ट्रीय अनुसंधान विभाग, मनोज बनसोड, गोंदिया शाखा, के.एम.रघुनाथन, लातूर शाखा हे सहभागी झाले होते.
या परिषदेत 250 हून अधिक मानवतावादी व विवेकवादी चळवळींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परिषदेची सुरवात दि.24 डिसेंबर 2014 रोजी सकाळी 10 वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागतपर गीत व नृत्याने झाली.
उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्कल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.पी.अधिकारी तसेच फिराचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.नरेंद्र नायक, सचिव, यु.कलानाथन, डॉ.जी.विजयम, धनेश्वर साहू, के.एन.सेनापती, इ.टी.राव विचारमंचावर उपस्थित होते. मा.कुलगुरू डॉ.एस.पी.अधिकारी यांनी ओडिशामधील आणि प्रामुख्याने ब्रम्हपूर परिसरातील सामाजिक समस्यांचा ऊहापोह केला. तसेच महाभारत, रामायण या धार्मिक ग्रंथातील तसेच अनेक देव देवतांच्या बाबतीतील अंधश्रद्धा याबाबत विचार मांडले. मानवी समाजाची झालेली प्रगती ही विज्ञानाच्या आधारेच झाली आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. परिषदेला उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत मा.धनेश्वर साहू यांनी केले. प्रास्ताविक नरेंद्र नायक यांनी केले. डॉ.विजयम यांनी अध्यक्षीय भाषण केले. इ.टी.राव यांनी आभार मानले.
या परिषदेत एकूण 4 वैचारिक अभ्यासपूर्ण सत्रे आयोजित केली गेली. त्यांचे प्रमुख विषय पुढीलप्रमाणे (1) विवेकवादासमोरील आव्हाने, (2) शिक्षण आणि माध्यमे- सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बिंदू (3) धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक प्रगती (4) वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा.
प्रा.डॉ.सुदेश घोडेराव यांनी विवेकवादासमोरील आव्हाने या सत्रात सहभाग घेऊन शोध निबंध सादर केला. मनोज बनसोड यांनी शिक्षण आणि माध्यमे या सत्रांतील चर्चेत सहभाग घेतला.
जर्मनीमधील पी.एच.डी.साठी संशोधन करणारा विद्यार्थी स्टीफन बाईंडर याची विशेष उपस्थिती होती. त्याच्या संशोधनाचा विषय-‘तेलंगणा व आंध्र प्रदेशमधील विवेकवादी चळवळी’ असा आहे. संशोधनाच्या माध्यमातून आलेले निष्कर्ष त्याने परिसंवादात मांडले.
फिराचे सचिव यु.कलानाथन यांनी अहवाल सादर केला. तसेच विविध संस्था/संघटनांनी देखील त्यांच्या कार्याचे अहवाल सादर केले. म.अं.नि.स.तर्फे प्रा.डॉ.सुदेश घोडेराव यांनी चळवळीच्या कार्याची तसेच जादूटोणा विरोधी कायद्याची व दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती दिली.
2015-16 या आगामी दोन वर्षांसाठी फिराची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड मतदानाने झाली. डॉ.नरेंद्र नायक यांची अध्यक्षपदी, तर म.अं.नि.स.चे प्रा.डॉ.सुदेश घोडेराव यांची विभागीय सचिवपदी निवड करण्यात आली, कार्यकारिणीत एकूण 17 सदस्यांची निवड झाली असून पुढील धोरण ठरविण्यासाठी नागपूर येथे 15 मार्च 2015 रोजी पहिली सभा नियोजित केली आहे.
फिराचे 10 वे राष्ट्रीय अधिवेशन, 2017 मध्ये केरळ किंवा पंजाब येथे आयोजित करण्यात येणार आहे.
–प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, नाशिक