11 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2013 अखेर पहाटेच्यावेळी आकाशामध्ये पूर्वेला एक अनोखा नजराणा निसर्ग उलगडून दाखवणार आहे. आयसॉन नावाचा धूमकेतू आकाशाच्या पटलावर आपले अस्तित्व अधोरेखीत करणार आहे. त्याला पाहण्यासाठी दुर्बीणीची आवश्यकता नाही. हवेत फक्त दोन डोळे, सताड उघडे आणि निसर्गाची साथ. निसर्गाचा अविष्कार उघड्या डोळ्यांनी पाहण्याची संधी दवडण्यात काय अर्थ आहे? इंटरनॅशनल सायंटीफिक ऑप्टीकल नेटवर्क (International Scientific Optical Network) (ISON) या रशियास्थित संस्थेमध्ये कार्यरत असलेले बेलारूसचे नेव्हस्की व रशियाचे नोव्हीचोनोक या वैज्ञानिकांनी सप्टेंबर 2012 मध्ये आयसॉन या धूमकेतूचा शोध लावला. त्यामुळे त्याला नेव्हस्की नोव्हीचोनोक किंवा आयसॉन (ISON) धूमकेतू असे संबोधले गेले आहे.
खगोलवैज्ञानिक परिभाषेत आयसॉनला C/2012 S1 धूमकेतू असे म्हणतात.
C : धूमकेतूंचा कालावधी नियमीत नाही
2012 : धूमकेतूचा शोध लागलेले वर्ष
S : सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात शोधला
1 : सदर पंधरवड्यात सापडलेला पहिला धूमकेतू
आयसॉन हा सर्वसाधारण धूमकेतू असणार नाही असा वैज्ञानिकांचा कयास आहे. तो अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि दिवसासुद्धा दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्थात धूमकेतू हे बेभरवशी सुद्धा आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे. 5 किमी गाभा असलेल्या आयसॉनची कक्षा लंबवर्तुळाकार असून तो सूर्याभोवती फेरी मारण्यासाठी पहिल्यांदाच येत आहे. त्याच्यातील द्रव्य सूर्यमालेच्या उत्पत्ती संदर्भात काही माहिती देण्याची शक्यता वैज्ञानिक वर्तवत आहेत. आयसॉन सूर्याला घासून जाणार आहे. दि. 28 नोव्हेंबर 2013 रोजी तो सूर्याला सर्वात जवळ म्हणजे अंदाजे 12 लाख किलोमिटर अंतरावर असणार आहे. सूर्याला घासून जाणारे बहुसंख्य धूमकेतू सूर्याच्या प्रंचड गुरूत्वाकर्षणाने व प्रखर किरणांनी नष्ट होतात. परंतु आयसॉन हा मोठा असून तो अशा प्रकारचा धक्का सहन करूनही शिल्लक राहणार आहे. त्यामुळे आतापर्यंतचा सर्वात तेजस्वी धूमकेतू पाहण्याची संधी या निमीत्ताने मिळणार आहे. 11 नोव्हेबंर 2013 रोजी आयसॉनची तेजस्विता 5.9 असणार आहे व तो उघड्या डोळ्यांनी सुद्धा दिसणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटी तो ध्रुवतार्यासारखा तेजस्वी असणार आहे. क्षितीजाच्या जवळ असला तरी शेपटीमुळे तो ओळखला जाऊ शकतो. 28 नोव्हेंबर 2013 रोजी तो शुक्राच्या चांदणीसारखा तेजस्वी दिसणार आहे. यानंतर मात्र त्याची तेजस्वीता कमी कमी होत जाणार असून 31 डिसेंबर 2013 पर्यंत पहाटेच्या आकाशात 4 वाजल्यानंतर पूर्वेच्या बाजूला तो 5.5 तेजस्वीतेचा दिसेल.
इतिहास :
शतकानूशतके धूमकेतू हे अचानक येणारे पाहूणे आहेत असे अनुमान होते. चिनी, बॅबेलोनीयन यांनी 2000 वर्षापूर्वीच्या हॅले धुमकेतूच्या नोंदी ठेवल्याचा उल्लेख वराहमिहीर आणि मुघल कालावधीतील साहित्यात होता. दुर्बीणीच्या शोधानंतर मात्र धूमकेतूंच्या शोधांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. यापैकी काही शोध अपघाताने लागलेले आहेत तर बहुसंख्य शोध वैज्ञानिकांची जिद्द, चिकाटी आणि सहनशिलता याचा अविष्कार आहे. पहिली महिला खगोलवैज्ञानिक म्हणून उल्लेख होत असलेल्या ब्रिटनच्या कॅरोलीन हर्शेल (1750-1848) यांनी जवळपास 8 तर चार्लस मेसीअर (1730-1817) यांनी 13 धूमकेतूंचा शोध लावला. परंतु जीन लुईस पॉन्सच्या (1761-1831) नावांवर उच्चांकी 37 धूमकेतूंचा शोध जमा झालेला आहे. वैज्ञानिक कशा प्रकारे आपला वेळ कारणी लावत असतात याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या शतकात वैज्ञानिकांच्या बरोबरीने बर्याच हौशी खगोलनिरिक्षकांनीही आपला वेळ धूमकेतूंच्या शोधासाठी व्यतीत केलेला आहे.
धूमकेतूंचे शोधकशोधलेल्या धूमकेतूंची संख्या
जॉर्ज अलकॉक (1912-2000) 5
विल्यम ब्रॅडफिल्ड (1928) 18
कॅरोलीन शुमेकर (1929) 32
डेव्हीड लेव्ही (1948) 22
धूमकेतू :
Dirty Ice Ball म्हणून संबोधला गेलेला धूमकेतू आकाशामध्ये आपल्या लांबसडक शेपटीने सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेला आहे. बर्फ, अमोनिया, कार्बन मोनॉक्साईड, धूळ व छोट्या मोठ्या कणापासून अर्थात कचर्या पासून बनलेला हा गोळा सूर्यापासून दूर असताना बिंदूसारखा दिसतो. धूमकेतू तीन प्रमुख भागांनी बनलेला आहे. 10 ते 20 कि.मी. व्यास असलेला केंद्रभाग प्रामुख्याने घन स्वरूपामध्ये असतो. केंद्राभोवती असणारे एक लाख कि.मी. व्यासाचे वायूचे आवरण म्हणजे कोमा किंवा गाभा. आणि याच कोम्यातून फुटलेली कित्येक कोटी कि.मी. लांबीची शेपूट. या शेपटीमुळेच धूमकेतूचं अस्तित्व मानवाला मोहवित आलेलं आहे. धूमकेतू हे उर्ट मेघ (Oort Cloud) अथवा कुईपर पट्ट्यातून (Kuiper Belt) येतात. सदर भागामध्ये 100 अब्ज धूमकेतू असावेत असा वैज्ञानिकांचा कयास आहे. सूर्याजवळ आल्यानंतर सूर्याच्या उष्णतेमुळे आणि वार्याच्या झोतामुळे धूमकेतूमधील बर्फाची वाफ होते व याच वाफेचे रूपांतर त्याच्या शेपटीत होते. सदर शेपटीत कचरा व प्रभारीत कण असतात. त्यामुळे शेपटीसुद्धा दोन प्रकारची दिसते, एक कचर्याची शेपटी आणि दुसरी प्रभारीत कणांची शेपटी. प्रभारीत कणांची शेपटी निळसर रंगाची दिसते. सूर्याला फेरी मारून धूमकेतू परत आपल्या ठिकाणी जातात परंतु शेपटी मात्र मागे ठेवून जातात. शेपटीमधील कचराही त्याच कक्षेमध्ये तसाच राहातो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना जर या कचर्यातून गेली तर हा कचरा पृथ्वीकडे खेचला जातो आणि पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणात हा कचरा पेट घेतो आणि पृथ्वीवासीयांना उल्का पडल्याचे द़ृश्य दिसते. अर्थात बहुसंख्य जण याला तारा निखळला असे म्हणतात. खरं तर तारा कधीच निखळत नाही आणि या कचर्याकडे पाहुन ‘कुछ कुछ होता है’ असे म्हणून आपली इच्छा पूर्ण करून घेण्यात काय अर्थ आहे. कचर्याचे प्रमाण जास्त असेल तर असंख्य उल्का पडताना दिसतात यालाच उल्कावर्षाव म्हणतात.
धूमकेतूंचे प्रकार :
सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणार्या कालावधीवरून धूमकेतूंचे तीन प्रकार पडतात.
1. कमी कालावधीचे धूमकेतू – सूर्याला फेरी मारण्याचा कालावधी 200 वर्षापेक्षा कमी असणारे धूमकेतू या प्रकारात येतात. यांची कक्षा फार लंबवर्तुळाकार नसते. हे धूमकेतू लघुग्रहांच्या सारखेच असतात की, जे ग्रह होण्यापासून बचावलेले असतात. या प्रकारचे धूमकेतू कुईपरच्या पट्ट्यातून येतात. हा पट्टा नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्यापासून अंदाजे 30 ते 50 खगोलीय एकक अंतरावर आहे. या पट्ट्यात गोठलेल्या अवस्थेतील खुजे ग्रह आहेत. दर 76 वर्षानंतर दिसणारा हॅलेचा धूमकेतू या प्रकारात येतो.
(1 खगोलीय एकक म्हणजे सूर्य ते पृथ्वी अंतर की जे 15 कोटी किलोमिटर आहे त्यामुळे कुईपर पट्टा हा सूर्यापासून अंदाजे 450 ते 750 कोटी किलोमिटर अंतरावर येतो)
2. जास्त कालावधीचे धूमकेतू – सूर्याला फेरी मारण्याचा कालावधी 200 वर्षापेक्षा जास्त असणारे धूमकेतू या प्रकारात येतात. यांची कक्षा लंबवर्तूळाकार असते. अर्थात काही जणांची पॅराबोलीक अथवा हायपरबॉलीक असते. काहीवेळा तर हे धूमकेतू परतच येत नाहीत. सदरचे धूमकेतू उर्ट मेघातून येतात. हा मेघ सूर्यापासून एक प्रकाशवर्ष किंवा 50000 खगोलीय एकक अंतरावर आहे. काही तार्यांच्या गुरूत्वीय बलामुळे ते सूर्यमालेकडे ढकलले जातात. त्यामुळे ते सूर्याला फेरी मारून पुन्हा उर्ट मेघाकडे जातात.
(1 प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. अंदाजे 1013 किलोमिटर) .
3. सूर्याला घासून जाणारे धूमकेतू – या प्रकारातील धूमकेतूंची लंबवर्तूळाकार कक्षा सूर्याला घासून जाते. काही वेळा सूर्यापासून फक्त 1000 किमी अंतरावरून सुद्धा हे धूमकेतू जातात त्यामुळे अशा जवळून जाणार्या धूमकेतूंची काहीवेळा अक्षरश: वाफ होते, काहीजणांचे तुकडे होतात तर काहींना सूर्यच गिंळंकृत करतो. आता येणारा आयसॉन याच प्रकारचा आहे. मात्र तो नष्ट होण्यापैकी नाही कारण त्यामध्ये असणार्या द्रव्याचं प्रमाण प्रचंड आहे असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.
हॅलेचा धूमकेतू :
सर्वमान्य झालेला आणि खगोलशास्त्राच्या प्रगतीमध्ये ऐतिहासीक भूमिका निभावलेला म्हणून हॅलेच्या धूमकेतूचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. एडमंड हॅले यांनी 1682 साली स्वत: धूमकेतू पाहिला होता. इतिहासातील धूमकेतूच्या नोंदीचा त्यांनी अभ्यास केला. सन 1456, 1531 आणि 1607 मध्ये चिनी, बॅबेलोनीयन व युरोपीयन दस्तऐवजामध्ये नोंद असलेल्या धूमकेतूच्या कालावधीतून त्यांनी तर्क केला की 75-76 वर्षांनंतर धूमकेतू दिसेल. हॅलेंनी 1758 मध्ये धूमकेतू दिसेल असे अनुमान केले आणि त्यांच्या तर्काप्रमाणे सन 1758 मध्ये धूमकेतू दिसला देखील परंतु तो पाहायला हॅले नव्हते. निरिक्षण आणि तर्क लढवण्याच्या कल्पनेत वैज्ञानिक किती प्रगल्भ असतात याचं हे मुर्तीमंत उदाहरण आहे. हॅलेच्या या योगदानाबद्दल सदर धूमकेतूला हॅलेचा धूमकेतू म्हणतात. हॅलेचा धूमकेतू सन 1986 मध्ये दिसला होता आणि आता 2061 साली तो पुन्हा दिसणार आहे. तुम्ही पाहू शकता अथवा नाही ते तुमच्या वयोमानावर आणि जिज्ञासेवर अवलंबून आहे.

शुमेकर लेव्ही धूमकेतू :
1994 साली जीन आणि कॅरालिन शूमेकर हे दांपत्य आणि डेव्हिड लेव्ही यांनी एक धूमकेतू पाहिला. त्याला नंतर शूमेकर लेव्ही असं नाव दिलं गेलं. या धूमकेतूच्या अभ्यासातून वैज्ञानिकांच्या लक्षात आलं की, हा धूमकेतू गुरू ग्रहावर आदळण्याची शक्यता आहे. त्यांच्या तर्कानुसार तो 21 जुलै 1994 रोजी गुरू ग्रहावर आदळलासुद्धा. आदळल्यानंतर सदर धूमकेतूचे तुकडे झाले. गुरू ग्रह धूमकेतूपेक्षा प्रचंड मोठा होता त्यामुळे गुरूला काहीही झाले नाही पण तोच धूमकेतू पृथ्वीवर आदळला असता तर हे लिहायला आणि वाचायला तुम्ही अथवा मी असण्याची शक्यता अत्यंत धूसर होती. शुमेकर लेव्ही धूमकेतू गुरू ग्रहावर आदळत असतानाचे थेट प्रक्षेपण नासाने केले होते. अमेरिकेत टीव्हीवर लाखो लोक हे अनोखे खगोलीय नाटय पहात होते. आणि नेमके त्याचवेळी भारतामध्ये पुरीच्या जगन्नाथाची रथयात्रा सुरू होती व भारतातील टिव्हीवरून त्याचदिवशी त्याचवेळी जगन्नाथाचा रथ ओढत असल्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. हा फरक आहे आपला आणि त्यांचा. संस्कृतीच्या नावाखाली कायम पाश्चात्यांना नाव ठेवत बसण्याचा ठेका घेतलेल्यांनी मुंबई अथवा दिल्लीतील महिलांच्या संदर्भात घडलेल्या घटनांकडे गांभिर्याने पहावे आणि किमान त्यांच्या वैज्ञानिक द़ृष्टीकोनाचे आणि प्रगतीचे तरी अनुकरण करावे एवढीच माफक अपेक्षा.
धूमकेतूचा प्रताप :
आकाशातून तेजस्वी वलय असलेली रेषा आपलं लक्ष वेधून घेते. या झेप घेणार्या तेजस्वी वस्तूला आपण तारा निखळला असे अनावधानाने म्हणतो. तारा कधीही निखळत नाही किंवा तूटून पडत नाही. आकाशात फिरत असलेले छोटे मोठे धुळीचे कण, दगड, कचरा इ. अवशेष पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीत आले की पृथ्वी त्यांना खेचून घेते. सेकंदाला 10 ते 70 कि.मी. वेगाने या वस्तू पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात व वातावरणाबरोबर झालेल्या घर्षणाने ते पेट घेतात. त्यांना आपण उल्का पडली असे म्हणतो. सदरचा कचरा हा धूमकेतूच्या शिल्लक राहिलेली शेपटीतून आलेला असतो. कचर्याचे प्रमाण जास्त असेल तर उल्कांची संख्या स्वाभाविकपणे जास्तच असणार. अशा घटनेला उल्का वर्षाव म्हणतात. दरवर्शी 17 नोव्हेंबरला सिंह राशीतून होणारा उल्का वर्षाव हा टेंपल टटल धूमकेतूच्या कचर्यामुळे तर 13 डिसेंबरच्या आसपास मिथुन राशीतून होणारा उल्कावर्षाव हा फायेथॉन धूमकेतूमुळे निर्माण होतो. उल्कावर्षाव ही खगोलीय घटना आहे त्याचा आंनद लुटायलाच पाहिजे. उल्का जर मोठी असेल तर तिला अशनी म्हणतात. अशनी घर्षाणाने पूर्ण नष्ट होत नाहीत त्यामुळे शिल्लक राहिलेले अवशेष पृथ्वीवर पडतात. बुलढाणा जिल्हयातील लोणारचे सरोवर हे 50 हजार वर्षापूर्वीची उल्का पडून तयार झालेले आहे. अर्थात हे आपणाला जपानच्या संशोधकांनी सांगितले. 6.5 कोटी वर्षापूर्वी डायनॉसोरसारखे महाकाय प्राणी पृथ्वीवर एखादा धूमकेतू आदळल्यामुळे नष्ट झाले असावेत असा अंदाज आहे.
धूमकेतूच्या निरीक्षणार्थ पाठवलेल्या मोहिमा :
वैज्ञानिक कोणत्याही घटनेचा अभ्यास मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठीच करतात. धूमकेतूचाही अभ्यास करणे हा त्याचाच एक भाग आहे. पृथ्वीवर निर्माण झालेले पाणी अथवा जीवसृष्टीची निर्मीती धूमकेतूमुळे झाली असण्याची शक्यता वैज्ञानिक पडताळून पाहात आहेत. भविष्यात एखादा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ आला आणि तो पृथ्वीपेक्षा मोठा असेल तर तो विध्वंस करण्याची दाट शक्यता त्यामुळे अशा धूमकेतूंची कक्षा बदलणे अथवा त्याचे वस्तुमान कमी करणे अशा प्रकारचे प्रयोग वैज्ञानिक करत असतात. अनेक मोहिमा याची साक्ष देतात. त्यापैकी काही..
* 1985 मध्ये इंटरनॅशनल कॉमेंटरी एक्सप्लोरर अंतराळयान ’जीयाकोबीनी झीनर’ या धूमकेतूच्या जवळून गेले. आणि त्याने धूमकेतू म्हणजे घाणेरडया बर्फाचा गोळा असतो यावर शिक्कामोर्तब केले.
* सुलसेल, सकीगाके, व्हेगा1, व्हेगा2 व जिओटो या अंतराळयानांनी हॅलेच्या धूमकेतूला 1986 मध्ये जवळून भेट दिली. हॅलेची घनता, आकारमान आणि त्यातील घटकांची माहिती घेण्यात ते यशस्वी ठरले.
* डीप स्पेस 1 या यानाने ’बोरेली’ धूमकेतूचे अत्यंत चांगल्या प्रतीचे फोटो 2001 मध्ये घेतले.
* स्टारडस्ट हे अंतराळयान ’वाईल्ड 2’ या धूमकेतूच्या शेपटीजवळून 2004 साली गेले आणि त्याने सदर शेपटीतील कचरा पृथ्वीवर आणला. त्याच्या संशोधनातून पाण्याचे अस्तीत्व आणि इतर घटकांच्या अस्तीत्वाला पुष्टी मिळाली.
* 2005 साली डीप इंम्पॅक्ट अंतराळयानाने ’टेंम्पल’ या धूमकेतूला भेट देत त्यावर 100 मिटर खेालीचा एक खड्डा निर्माण केला. धूमकेतूच्या गाभ्यामध्ये एक यंत्र ठेवून त्यातील वायूंचा व कचर्याचा अभ्यास करण्यासाठी मदतगार ठरला.

धूमकेतू आणि अंधश्रद्धा :
धूमकेतू हे पुढील घटनांची माहिती देणारे दूत होते असा बहुसंख्य संस्कृतीमध्ये उल्लेख आहेत विशेष बाब म्हणजे वाईट भविष्याबद्दलचे कथनच जास्त प्रमाणात आहे.
* अग्नीपुराणानुसार धूमकेतू ज्या बाजूने येणार आहे त्या बाजूकडून भूकंप होण्याची आणि शत्र्ाूचे आक्रमण होण्याची शक्यता असते.
* देवयानी आकाशगंगेत धूमकेतू आला तर प्रचंड महापूर येतो आणि त्यामुळे समाजाचे स्थलांतर होते. वांशिक दंगली होतात. मीन राशीत धूमकेतू आला तर पहिल्यांदा कोरडा दुष्काळ आणि नंतर ओला दुष्काळ पडतो. अन्नधान्य महाग होते. पर्यायाने प्राणी आणि मानवाचा मृत्यू ओढवतो.
* वृषभ राशीत धूमकेतू आला तर रक्ताचे पाट वाहतात आणि नंतरच्या तीन वर्षात राजाचा मृत्यू होतो.
* मृग नक्षत्रात धूमकेतू आला तर राणी आणि मंत्रिमंडळ राजाविरोधात कटकारस्थान करतात आणि राजवट उलथवून टाकतात. असं भविष्य वर्तवलं तर राजा, राणी आणि मंत्रिमंडळाला जिवंत ठेवेल काय! आणि एक मात्र निश्चित की ज्यान असं भविष्य वर्तवलं असेल त्याच्या आयुष्याची चैनी झाली असणार.
* उत्तर आफ्रीकेतील मसाई समुदाय धूमकेतूचे आगमन उपासमारीशी तर दक्षिण आफ्रिकेतील झुलू समाज युध्दाशी जोडत होते. नायजेरीयन संस्कृतीनुसार धूमकेतू साथीच्या रोगाला निमंत्रण देतात असा समज होता.
* धूमकेतू उत्तरेकडे जाणारा असेल तर देशात फार मोठ्या दुर्घटना घडतात आणि पश्चिमेकडील देश स्वारी करतात असा पौराणिक समज होता.
* सर्व समुदायामध्ये धूमकेतू हे अघटीत, अशुभ, आणि राक्षसी घटना घडवतात असा समज होता त्याला अपवाद फक्त नामीबीयातील शिकार करणारा कूंग समुदाय. तेच फक्त धूमकेतूबद्दल आशावादी होते. धूमकेतूचे आगमन चांगली घटना घडण्याची पूर्वसुचना असते असं ते मानत होते. अर्थात धूमकेतू आला म्हणून काही चांगली घटना घडेल अशातला भाग नाही परंतू अशुभ घटनेचं भय निर्माण करून घाबरवून सोडण्यापेक्षा ते बरच म्हणाव लागेल. वैज्ञानिक द़ृष्टीकोनावर या सर्व गोष्टी टिकत नाहीत हे मात्र निश्चित.
* धूमकेतूशी संबंधीत पूर्वीचा समाज अंधश्रद्ध असणं स्वाभाविक आहे. कारण त्याकाळात वैज्ञानिक माहिती व तंत्रज्ञानाचा आवाका आजच्याएवढा नव्हता. त्यामुळे त्यांनी जो धूमकेतूच्या आगमनाचा अन्वयार्थ लावला त्यामुळे त्यांना अडाणी अथवा मूर्ख म्हणण्याचा अजिबात उद्देश नाही. परंतू आज जर धूमकेतूचा संबध शुभ अशुभ घटनेशी लावला जात असेल तर अशा मंडळीना काय म्हणायचं हे आपणच ठरवलेलं बरं!
* धूमकेतू म्हणजे काय? ते कोठून येतात? ते का येतात यांचा अभ्यास त्याकाळी तंत्रज्ञानाच्या अनुपलब्धतेमुळे झालेला नव्हता. त्यामुळे त्यांनी काही अनुमान काढली असतील तर ती आजच्या पातळीवर चुकीची असतील.
* परंतू आज धूमकेतूबद्दल विज्ञानाने एवढी प्रचंड माहिती दिली असतानाही जर शुभ अशुभ गोष्टीबद्दल भाष्य करणारी मंडळी असतील तर मात्र चिंतेची बाब आहे.
वर्षानुवर्षे दुर्बिण आकाशाच्या एखाद्या भागामध्ये लावून वैज्ञानिक धूमकेतूंचा शोध घेत असतात. ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. निरीक्षणाअंती धूमकेतूंचा शोध लागतही नाही आणि जर लागलाच तर अपार आनंद देउन जातो. याउलट कोणतेही निरीक्षण अथवा कष्ट न करता, वैज्ञानिकांच्या माहितीच्या आधारे आकाशात आलेल्या धूमकेतूचा उपयोग ज्योतिषवाले दुसर्याच्या आयुष्यातील चढउतारावर भाष्य करण्यात घालवतात. घाबरवून सोडणार्या योगांची पोतडी सोडतात आणि आपली तुंबडी भरून घेतात. आयत्या पिठावर अनावश्यक रेघोटया ओढणार्यांचा हा लांछनास्पद प्रकार समाजाला अत्यंत घातक आहे. यापासून दूर राहण्याची आणि खगोलीय घटनेचा आनंद लुटण्याची गरज आहे.
धूमकेतू पाहून मला काय फायदा असा प्रश्न करणार्याला तुझा समाजाला काय फायदा असा प्रतिप्रश्न करणंच योग्य ठरेल. त्यामुळे आयसॉन पाहण्याची संधी दवडू नका. आणि त्याच्याशी संबधीत अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका. ती एक खगोलीय घटना आहे आपल्या भविष्याशी खेळण्यात तिला रस नाही. ज्यांचा आर्थिक फायदा दडलेला आहे आणि समाजाला फसवण्याचा ज्यांनी ठेका घेतलेला आहे ते यात निशितच रस घेणार. आपण मात्र स्वत:च्या बुध्दीने विचार करण्याची गरज आहे. वैज्ञानिक द़ृष्टीकोनाचा अंगीकार करणे आणि त्याचा प्रसार करणे हे घटनादत्त कर्तव्य आहे. ते पार पाडलं तर ती एक प्रकारे डॉ. नरेंद्र दाभोलकरांना खरी आदरांजली ठरेल.
– डॉ. नितीन शिंदे
लेखक संपर्क : 9860438208