प्रख्यात दिग्दर्शक सत्यजीत राय हे बंगालीतील लोकप्रिय लेखकही होते. कथा, कादंबर्या, लेखसंग्रह अशी त्यांनी पन्नासपेक्षाही अधिक पुस्तके बंगालीत लिहिली आहेत. शास्त्रज्ञ, प्रोफेसर शंकू हे त्यांनी निर्माण केलेले बंगाली साहित्यातील एक प्रसिद्ध पात्र आहे. प्रोफेसर शंकू यांच्या दैनंदिनीच्या स्वरूपात श्री.राय यांनी एकूण 38 दीर्घकथा लिहिल्या आहेत. या कथांना फक्त विज्ञानकथा म्हणणे पुरेसे होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये विज्ञानाव्यतिरिक्त पर्यटन, रहस्य आणि साहस हे रससुद्धा आहेत. या कथांपैकीच एका कथेचा विलास गिते यांनी केलेला हा अनुवाद...
7 एप्रिल
मानववंशशास्त्रज्ञ डॉ.क्लाईन यांच्या आश्चर्यकारक कर्तृत्वासंबंधी वृत्तपत्रात पूर्वीच छापून आलं होतं. त्यांना दक्षिण अमेरिकेच्या अमेझॉनच्या जंगलात प्रवास करताना अशा एका आदिवासी जमातीचा शोध लागला, की जी तीस लक्ष वर्षांपूर्वी माणूस ज्या अवस्थेत राहत होता, त्याच अवस्थेत आजही राहते आहे. हा एक खूपच महत्वाचा शोध होता. फक्त एवढंच नव्हे, तर सर्कससाठी किंवा आणि संग्रहालयासाठी ज्याप्रमाणे प्राणी धरून आणतात, त्याच पद्धतीने क्लाईन यांनी या जमातीच्या एका आदिवासीला धरून, पिंजर्यात घालून पश्चिम जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरात आपल्या घरी आणलं होतं. वृत्तपत्रात त्या आदिमानवाचा फोटो मी पाहिला होता. तो दोन पायांवर चालत असला, तरी वानरापेक्षा वेगळा दिसत नव्हता. त्यानंतर मात्र क्लाईन यांची जगभर किर्ती पसरली. हा आदिमानव अद्यापही क्लाईन यांच्या घरी पिंजर्यातच रहातो आहे. कच्चं मांस खातो, तोंडाने एखाद्या जनावरासारखा आवाज करतो, स्वाभाविकपणेच कुठलीही भाषा वापरीत नाही, आणि अधिकांश वेळ झोपूनच असतो. त्या आदिमतम मानवाला एकदा पहाण्याची मला तीव्र इच्छा होती, पण ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे असं वाटलं नव्हतं, पण ती शक्यता दृष्टिपथात आली. काल मला क्लाईनकडूनच एक पत्र आलं. त्याने लिहिलं होतं-
इन्व्हेंटर म्हणून तुम्ही आता विश्वविख्यात आहात. सगळ्याच देशांमधले शास्त्रज्ञ तुम्हाला मानतात. मी आदिमतम मानवाचा- त्याला होमो अॅभारेन्सिस म्हणतात- एक नमुना माझ्या संग्रहासाठी आणला आहे. ही बातमी बहुधा तुम्ही वृत्तपत्रात वाचली असेल. तुम्ही येऊन या आश्चर्यकारक मानवाला पाहून जावे असे मला वाटते. तुम्ही वर्षातून एकदा युरोपमध्ये येण्याची शक्यता आहे का? असेल, तर मला कळवा, तुम्ही युरोपमध्ये कुठेही असलात, तरी तिथून तुम्हाला मी हॅम्बुर्गमध्ये येण्याचं आमंत्रण देत आहे. सगळा खर्च मी करीन. जेव्हा तुम्ही याल, तेव्हा आणखीही काही शास्त्रज्ञांना बोलावण्याची माझी इच्छा आहे. असा आश्चर्यकारक प्राणी पहाण्याची संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. मी जेव्हा गेलो होतो, तेव्हा या आदिवासी जमातीचे फक्त बारा लोक शिल्लक होते. तेही आता अधिक दिवस जिवंत रहाणार नाहीत. आणि इतर कुठला गटही पुन्हा तिथे जाऊन त्यांना पाहील, अशी शक्यताही कमी आहे, कारण तिथे जाण्याचा मार्ग अत्यंत दुर्गम आहे आणि मार्गावर नाना प्रकारचे हिंस्त्र प्राणीही आहेत. माझा तरूण शास्त्रज्ञ मित्र हरमन बुश हा तर नावेतून नदीत पडला आणि त्याला सुसरींनी खाल्लं, मी जिवंत परत आलो हे माझं नशीबच म्हणायला हवं.
असो, तुमचा निर्णय मला लवकरात लवकर कळवा.
तुमचा,
हाईरिख क्लाईन
येत्या सप्टेंबरमध्ये मला जिनीव्हात एका कॉन्फरन्ससाठी निमंत्रण आहे. जाण्याबद्दल जरा साशंकच होतो. आता वय झालंय. जेट विमानाच्या श्वासाची दगदग आता सहन होत नाही. पण क्लाईनच्या या निमंत्रणामुळे जिनिव्हाला जायचं, असं मी ठरवलं. ही संधी सोडून चालणार नाही. आजवर ज्या आदिमानवाचे फक्त जीवाश्म(कॉसिल्सच) सापडले होते, तोच माणूस जिवंत पहायला मिळेल हे केवढं मोठं भाग्य!
इथं सांगायला हवं की, क्लाईनचा तरूण सहकारी हरमन बुश याच्याशी माझी पाचेक वर्षांपूर्वी ब्रेमेन शहरात ओळख झाली होती. हरमन खूप मेधावी जीवशास्त्रज्ञ होता. त्यामुळे त्याच्या अशा मृत्यूच्या बातमीने मला खूप वाईट वाटलं. क्लाईनशी ओळख होण्याची संधी मिळाली नव्हती. तो खूप सज्जन माणूस आहे असं ऐकलं होतं. मानववंशशास्त्रात त्याचं खूप महत्वाचं संशोधन होतं.
मुश्किल म्हणजे सप्टेंबरमध्ये मला परदेशी जावं लागलं, तर माझं एक काम बहुधा मी पूर्ण करून जाऊ शकणार नाही. अर्थात एलिक्सिरमच्या अभावामुळे एरवीही मी या कामात मी खूप प्रगती करू शकलो नसतो. हे औषध तयार झालं असतं, तर सगळीकडे बोलबाला झाला असता. या औषधामुळे माणसाच्या उत्क्रांतीचा वेग लाखपटींनी वाढवता येतो. म्हणजेच, उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला या औषधाचं इंजेक्शन दिल्यास पाच मिनिटांत त्याच्यामध्ये दहा हजार वर्षांच्या उत्क्रांतीचं स्वरूप पहाता आलं असतं. पहिल्यांदा मी या औषधाचा प्रयोग माझा नोकर प्रल्हाद याच्यावर करून पाहिला, पण काहीच फळ मिळालं नाही. त्यानंतर एलिक्सिरमचं प्रमाण थोडं वाढवून पुन्हा इंजेक्शन दिल्यावर दिसलं की, प्रल्हादने अत्यंत जटील अशा गणिती विषयावर व्याख्यान द्यायला सुरवात केली आहे.
पण त्याची ही अवस्था फार वेळ टिकली नाही, दहा मिनिटांतच प्रल्हाद झोपी गेला. झोपेतून जागा झाल्यावर दिसलं की, तो पुन्हा इंजेक्शन देण्यापूर्वीच्या अवस्थेत परत आला आहे, तो म्हणाला, ‘तुम्ही सुई दिल्यावर डोकं भणभण करीत होतं. मी बहुतेक काहीतरी चुकीचं बडबडलो, नाही का?’
माझ्याकडे आणखी एलिक्सिरम नाही. गेल्या वर्षी जपानहून एक बाटली आणली होती. या औषधाच्या तीन वर्षांपूर्वीच शोध लागला आहे. अत्यंत प्रभावी असं ड्रग, आणि किंमतही खूप. पण प्रल्हादवर त्या औषधाचा प्रयोग करून पाहिल्यावर जो परिणाम दिसला, त्यानेच मला खूप उत्साह वाटला होता. भविष्यात माणसाच्या मेंदूचा आकार वाढणार याची मला पूर्ण खात्री आहे. त्यानंतरच्या अवस्थेत दीर्घकाळ यंत्रांवर अवलंबून राहिल्यामुळे बहुधा माणसाचे इतर अवयव दुर्बल होतील; पण नवनवीन यंत्रं शोधून काढण्यासाठीच्या प्रयोगांमुळे मेंदूचा आकार वाढतच जाईल. अर्थात हे सारं घडायला खूप काळ लागेल. उत्क्रांतीमुळे माणसाचं रंग-रूप बदलण्यासाठी वीस-पंचवीस हजार वर्षेलागतात.
माझं हे औषध तयार झाल्यावर भविष्यातल्या माणसाचं रंग-रूप-आकार कसा असेल याचा अंदाज करीत बसावं लागणार नाही; डोळ्यांसमोरच माणूस कसा बदलत जाईल हे पहाता येईल.
मी क्लाईनच्या पत्राला उत्तर पाठवलं. त्यात हे सुद्धा लिहिलं की, क्रोल आणि साँडर्स या दोघांना जर त्याने आमंत्रण दिलं तर खूप चांगलं होईल, कारण हे दोघेही आपापल्या क्षेत्रातले दिग्गज आहेत. क्रोल मानववंशशास्त्रज्ञ (अँथ्रापॉलॉजिस्ट) आहे आणि साँडर्स बायोलॉजिस्ट आहे. मी सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात जाणार आहे. आधी जिनीव्हा, त्यानंतर हॅम्बुर्ग.
10 सप्टेंबर
आज मी जिनीव्हाला जात आहे. काही दिवसांपूर्वी मला क्रोल आणि साँडर्स यांची पत्रं मिळाली. दोघांनाही क्लाईनने आमंत्रण दिलं आहे. क्रोलला माझ्या औषधाबद्दल लिहिलं होतं. त्याच्या उत्तरादाखल त्याने लिहिलं,
‘तुमचं औषध मला सध्या ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत सोबत घेऊन या. युरोपमधल्या कुठल्याही मोठ्या शहरात एलिक्सिरम मिळतं. बहुधा क्लाईनजवळही असू शकतं. एकाच वेळी भूतकाळातल्या आणि भविष्यकाळातल्या मानवाला पाहू शकलो, तर खूपच छान होईल. क्लाईन हा माणूस मला खूप चांगला वाटतो. तुम्हाला तो आपली प्रयोगशाळा वापरून देईल असं मला खात्रीने वाटतंय.’
त्यामुळेच मी ‘इव्होल्यूटिन’ या माझ्या औषधाची बाटली बरोबर नेत आहे. संधी मिळाल्यास क्लाईनपुढे प्रस्ताव ठेवीन.
16 सप्टेंबर, हॅम्बुर्ग
जिनीव्हातलं काम पूर्ण करून काल हॅम्बुर्गला पोचलो. इतर पाहुणेसुद्धा कालच येऊन पोचले आहेत. क्रोल आणि साँडर्स बरोबरच फ्रेंच जिऑलॉजिस्ट मिशेल रोमा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ मार्कोबार्तेल्ली आणि रशियन न्यूरॉलॉजिस्ट डॉ.इलिया पेट्रॉफ आहेत.
मी रात्री पोचलो. मला अभिवादन करून क्लाईन म्हणाला, “माझा तो आदिमानव संध्याकाळपासूनच झोपलाय. तीस लक्ष वर्षांपूर्वी अदिमानवही तसंच करीत असे अशी माझी खात्री आहे. म्हणून मी उद्या सकाळी तुम्हा सगळ्यांना त्याच्याजवळ घेऊन जाईन.”
मी लॅबोरेटरीचा विषय काही काढला नाही. दोनेक दिवस इथं राहीन, त्यानंतर बोलेन. पण त्याच्या सहकार्याच्या मृत्यूबद्दल सहानुभूती व्यक्त करायला मी विसरलो नाही. त्याला मी व्यक्तिगतपणे ओळखीत होतो, हे सुद्धा मी क्लाईनला सांगितले. क्लाईन म्हणाला की, अठराव्या शतकात एका स्पॅनिश प्रवाशाने लिहिलेल्या एका अत्यंत दुर्मिळ अशा प्रवासवर्णनात म्हणे ब्राझिलच्या या आदिवासी जमातीचा उल्लेख आहे. लेखकाने लिहिलंय की, या जमातीचे लोक बरोब्बर वानर आणि मनुष्य यांच्या मधल्या अवस्थेत आहेत. इतक्या जुन्या पुस्तकातलं हे आश्चर्यकारक अनुमान वाचूनच क्लाईन अमेझॉनच्या गहन अरण्यात या जमातीचा शोध घेण्यासाठी गेला. यात आपण यशस्वी होऊ असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

डिनर अगदी छान होतं. जुन्या मित्रांशी भेट हिच्या व्यतिरिक्त तीन अपरिचित शास्त्रज्ञांनी ओळख झाल्यानेही खूप चांगलं वाटलं. बार्तेल्ली, रोमा आणि पेट्रॉफ हे तिघेही अदिमतम माणूस पहाण्यासाठी खूप उत्सुक आहेत. हा खरोखर आश्चर्यकारक शोध आहे आणि अमेझॉनचं जंगल ही खूप नवलाईची जागा आहे असं सगळ्यांनीच मान्य केलं.
पेट्रॉफने क्लाईनला विचारलं, ‘हा आदिमानवाला सुसंस्कृत करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात का?’
क्लाईन म्हणाला, ‘जो माणूस सुमारे तीस लक्ष वर्षांपूर्वीच्या अवस्थेत आहे, त्याला काही शिकवता येईल असं मला वाटत नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजवर या जमातीच्या माणसांचे फॉसिल्स सापडले होते ते दक्षिण आफ्रिकेत, आणि खरा माणूस सापडला दक्षिण अमेरिकेत.’
‘त्याला कशा प्रकारे ठेवलंय तुम्ही?’ बार्तोल्लीने विचारलं.
‘माझ्याच कंपाऊंडमध्ये शंभर मीटर व्यासांच्या अशा, गजांनी वेढलेल्या जागेमध्ये त्याला ठेवलंय. घरात पिंजर्यामध्ये त्याला ठेवण्याची मला मुळीच इच्छा नव्हती. नैसर्गिक वातावरणात तो आनंदात आहे. आपल्या जमातीच्या लोकांचा अभाव त्याला जाणवतो आहे असं काही लिहून मला दिसलं नाही. त्याच्या रक्षणासाठी एक सशस्त्र माणूस नेमावा लागला आहे. एरवीही तो हिंस्त्रपणा दाखवित नाही. पण त्याची शारीरिक शक्ती प्रचंड आहे हे मला ठाऊक आहे. एका झाडाची मोठी फांदी त्याने हाताने काडकन् तोडली होती.’
‘त्याच्यामध्ये सुख-दु:खाच्या अभिव्यक्तीची काही लक्षणं दिसली का?’ मी विचारलं.
‘नाही.’ क्लाईन म्हणाला. ‘तो फक्त अधूनमधून तोंडाने एक प्रकारचा आवाज काढतो- त्या आवाजाचं गोरिलाच्या हुंकाराशी थोडं साम्य आहे.’
‘तो चार पायांवर कधी चालतच नाही का?’
‘नाही. तो माणूस आहे यात काही संशयच नाही. नेहमी दोन पायांवरच चालतो. फळं, मुळं खातो. पण मांस मात्र कच्चंच खातो, भाजून नव्हे. हा माणूस अद्यापही अग्नीचा वापर करायला शिकलेला नाही.
एके दिवशी मी अग्नी पेटवून त्याच्यासमोर ठेवला, तर तो ओरडून दूर पळून गेला.’
साडे दहाच्या सुमारास आम्ही आपापल्या खोल्यांत निघून गेलो. क्लाईनने आमच्या पाहुणचारात काहीच त्रुटी ठेवली नव्हती हे मान्यच करायला हवं.
17 सप्टेंबर, रात्री 11 वाजता
आज नवलाईचा अनुभव आला. आम्ही सहा शास्त्रज्ञांनी आज एक जिवंत ‘होमो अॅफोरेल्सिस’ पाहिला. ‘होमो अॅफोरेल्सिस’ म्हणजे आदिमानव. तो दोन पायावर चालत नसता तर तो वानरच वाटला असता. सर्वांग स्वैराच्या, रंगाच्या केसांनी झाकलेलं. क्लाईनने त्याला हाफ पँट नेसवून त्याच्यात थोडा सुसंस्कृतपणा आणण्याचा प्रयत्न केला होता, आणि जवळच अस्वलाचं कातडं ठेवलं होतं- थंडी वाजल्यास अंगावर पांघरण्यासाठी त्याचा वापर करण्याची वेळ अद्याप तरी त्या प्राण्यावर आलेली नाही. जमिनीत एका छोट्या सिमेंटच्या हौदात पाणी ठेवलं होतं. त्याला तहान लागल्यास पिण्यासाठी, आमच्यासमोरच त्या प्राण्याने एखाद्या जनावराप्रमाणे त्या हौदातून पाणी प्यायलं. त्यानंतर आम्हा सर्वांना एकाच वेळी पाहिल्यानंतर बहुधा तो एका चेस्टनटच्या झाडामागे जाऊन लपला; आणि थोड्या वेळाने अगदी सावधपणे पुन्हा बाहेर आला.
क्लाईनने बहुधा मुद्दामच त्या आदिमानवाभोवती लहानमोठे दगड विखरून ठेवले होते. आदिमानव त्या छोट्या छोट्या दगडांच्या तुकड्यांपैकीच काही तुकडे हातात घेऊन इकडे-तिकडे फेकीत जणू खेळू लागला.
खरोखर, असं दृश्य आपल्याला कधीतरी पहायला मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पेट्रॉफने आपल्या कॅमेर्याने काही फोटो काढले. तो आदिमानव मात्र वीस मीटर्सपेक्षा जवळ काही येत नव्हता.
आम्ही तिथे असतानाच एका सशस्त्र वॉचमनने एका प्लॅस्टिकच्या बादलीत कच्चं कुठल्याशा जनावराचं मांस आणून त्या आदिमानवाला खायला दिलं. आदिमावनाच्या जबड्याचा जोर प्रचंड होता, हे मी डोळ्यांसमोरच पाहिलं.
दुपारच्या जेवणाच्या वेळी क्रोल क्लाईनला म्हणाला, ‘तुमचा हा आदिमानव डावखोरा-म्हणजे लेफ्ट हँडेड आहे, हे बहुधा तुमच्या लक्षात आलं असेल.’
ते माझ्याही लक्षात आलं होतं. तो दगडाचे तुकडे डाव्या हाताने उचलीत होता. क्लाईन म्हणाला, ‘ठाऊक आहे. ही गोष्ट अगदी पहिल्याच दिवशी माझ्या लक्षात आली होती.’
रामो म्हणाला, ‘पण तुमच्या या आदिमानवाच्या नजरेत बुद्धीची चमक दिसतेय. ज्याप्रकारे ता आमच्याकडे निरखून-निरखून पहात होता-
क्लाईन रामोचं वाक्य पूर्ण होऊ न देताच म्हणाला, ‘याचा अर्थ होतो अॅफोरेन्सिसला आपण जितकं मूख समजत होतो, तितका तो मूर्ख नाही. चार पायांवर चालणं सोडून त्याने दोन पायांवर चालणं सुरू केल्याबरोबर त्याच्या मेंदूचा आकारही नक्कीच वाढला.’
मी आता क्लाईनला त्याची प्रयोगशाळा दाखवण्याची विनंती केली. तो आनंदाने यासाठी तयार झाला. म्हणाला, ठीक आहे, जेवणानंतर दाखवतो तुम्हाला माझी प्रयोगशाळा.
लंचनंतर अतिशय उत्तम अशी ब्राझिलियन कॉफी पाजून क्लाईन आम्हाला त्याची प्रयोगशाळा दाखवायला घेऊन केला. उपकरणं, यंत्रसामग्री, रसायनं, औषधे यांनी परिपूर्ण अशी प्रयोगशाळा पाहिल्यावर वाटलं की, तिथे कुठल्याही स्वरूपाचा प्रयोग करता येईल. लॅबोरेटरीत एका बाजूला एका शेल्फवर अनेक बाटल्यांमध्ये तीन एलिक्सिरमच्या बाटल्या पाहून खूप बरं वाटलं. अर्थात ती माझ्या औषधाची गोष्ट अद्याप क्लाईनला सांगितलेली नाही.
रात्रीच्या डिनरनंतर काही वेळ गप्पा करून, एकमेकांना गुड नाईट म्हणून आम्ही आपापल्या खोल्यांत गेलो. मला मनात सकाळपासून काहीतरी खटकत होतं, पण खूप विचार करूनही त्याचं कारण सापडत नव्हतं. एवढ्यात दरवाजावर टक्टक् झाली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे पावणे अकरा वाजले होते. इतक्या रात्री कोण बरं आलं असावं?
दरवाजा उघडून पाहिलं, तर क्रोल आणि साँडर्स, मामला काय आहे?
क्रोल म्हणाला, ‘मी इथे ज्या खोलीत रहातोय, त्या खोलीत नक्कीच कधीकाळी हरमान बुश रहात असावा, कारण त्याची एक वही मला त्या खोलीतल्या एका ड्रॉवरमध्ये सापडली.
‘काय आहे त्या वहीत?’
‘जे लिहिलेलं आहे ते वाचून फार वाईट वाटतंय. अमेझॉनच्या जंगलात नदीमार्गाने साडेतीनशे मैल प्रवास केल्यानंतरही जेव्हा आदिमानवाचं दर्शन झालं नाही, तेव्हा क्लाईनने म्हणे नाद सोडून दिला होता. बुशनेच त्याला उभारी देऊन पुढे नेलं. तो म्हणाला, ‘स्पॅनिश प्रवाशाचं विवरण कधीही चुकीचं असू शकत नाही. पण -’
‘पण काय ?’
‘बुशच्या मनात एक संशय जागा झाला. त्याचं मन म्हणू लागलं की, तो या मोहिमेचा शेवट पाहू शकणार नाही. त्याने त्या वहीत लिहिलंय की, त्याच्यामध्ये भविष्यकाळातील घटनांची आधीच कल्पना येण्याची जी क्षमता आहे, तिचा त्याला अनेक वेळा प्रत्यय आला आहे. क्लाईनला त्यामध्ये कुठलाही संशय नव्हता; प्राणाची भीतीही त्याला कधी वाटली नाही. तो अत्यंत साहसी होता. जहाजातून जातानाही तो एकाग्रमनाने एक प्रयोग करीत होता.
‘कुठला प्रयोग?’
‘ते काही बुशने लिहिलं नाही. बुशला स्वत:लाही तो कुठला प्रयोग आहे याची माहिती असावी असं वाटत नाही.’
‘बिचारा बुश!’
बुशच्या मृत्यूमुळे आधीच मला धक्का बसला होता; या बातमीमुळे आणखीच वाईट वाटलं.
‘फक्त एवढंच नाही’, क्रोल म्हणाला, ‘क्लाईन एक युगान्तकारक शोध लावून विश्वविख्यात होणार आहे हे सुद्धा बुशच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे क्लाईनने आता मागे हटू नये असं त्याला आणखी तीव्रपणे वाटत होतं.
साँडर्स काही वेळापासून विमनस्क वाटत होता. मी त्याला विचारलं, ‘कसला विचार करताहात?’ यावर तो म्हणाला, ‘काही नाही, पण एक गोष्ट खटकतेय. माझा समज होता की, आदिमानव हा बुटका असतो, पण हा आदिमानव तर चांगला पाच फूट नऊ इंचाच्या जवळपास आहे!’
मी म्हणालो, ‘याचं कारण दुसरं काहीही नाही, हा माणूस आदिमानव असला, तरी तो विसाव्या शतकातला प्राणी आहे. याची सगळीचं लक्षण होमो अफोरेन्सिसशी जुळतील असं समजणं चुकीचं आहे.’
‘हो, बरोबर आहे.’
रात्र झाली होती. त्यामळे आमच्या गप्पा आणखी पुढे गेल्या नाहीत. क्रोल निरोप घेताना म्हणाला, आता तुमच्या औषधाबद्दल क्लाईनला सांगा. त्याच्याकडचं एलिक्सिरम तर तुम्हाला लागणारच आहे. ते देण्याच्या बाबतीत तो काही हरकत घेणार नाही असं वाटतं.’
पुढे काय होणार कोण जाणे, पण उद्या सकाळीच क्लाईनला माझ्या औषधासंबंधी सांगावं लागणार.
18 सप्टेंबर
आज सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलवर सगळ्यांसमोर मी माझ्या इव्होल्युटिनबद्दल सांगितलं. माझ्या नोकराला ते औषध दिल्याने त्याच्यावर काय परिणाम झाला तेही सांगितलं, आणि सर्वात शेवटी क्लाईनला विनंती केली, ‘तुमच्याकडचं एलिक्सिरम एक चमचा मिळालं तरी माझं काम यशस्वी होईल. त्यासाठी जी किंमत लागेल, ती द्यायला मी तयार आहे.
माझ्या इव्होल्यूटीन या औषधाबद्दल ऐकून क्लाईनला खरोखर आश्चर्य वाटलेलं दिसलं. तो म्हणाला, ‘एक चमचा एलिक्सिरमचे कसले पैसे हो? काय बोलता तुम्ही पण! पण हे औषध तयार झाल्यावर त्याची चाचणी तुम्ही कुणावर घेणार? तो माणूस कुठंय?’
मी हसून म्हणालो, ‘का बरं?’ तुमचा तो आदिमानव-होमो अफोरेन्सिस- आहे की!’ या औषधाची त्याच्यावर चाचणी घेतली, तर तो अर्ध्या तासात आधुनिक माणसात- होमो सॅपियन्समध्ये बदलून जाईल.’
मला जाणवलं, की माझं बोलणं ऐकल्यावर क्लाईनच्या डोळ्यांत एका सेकंदासाठी एक चमक दिसून गेली. तो म्हणाला, ‘या औषधाच्या अँटिडोट-म्हणजे विरूद्ध परिणाम करणारं औषध- तुम्ही तयार केलं आहे का? म्हणजे ते देऊन त्या माणसाला परत पूर्वावस्थेत आणता येईल?’
मी मान हलवून म्हणालो, ‘हो, ती व्यवस्थाही आहे’
‘तुम्ही अगदी थरो आहात असं दिसतंय!’ क्लाईन म्हणाला, ‘पण माझं म्हणजे असं आहे- ते मी अद्याप सांगितलं नाही तुम्हाला- पण…. माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. आजचा दिवस अशा प्रकारची चाचणी घेण्यासाठी शुभ नाही. मी एलिक्सिरम तुम्हाला उद्या देईन. उद्या सकाळी.’
ब्रेकफास्टनंतर आम्ही पुन्हा आदिमानवाला पहायला गेलो. आज आमच्याबद्दलची त्याची भीती बरीच कमी झालेली दिसली. तो आमच्यापासून दहा फूट अंतरावर येऊन आमच्याकडे पाहू लागला. माझ्याकडे तर तो चांगला दोन मिनिटं पहात होता. त्यानंतर त्याने तोंडाने एक आवाज काढला, पण त्यास रागाची भावना नव्हती.
माझ्या मनातून मात्र ते खटकणं काही जात नाहीय. आदिमानवाचा हा नमुना पाहिल्याबरोबर का कोण जाणे, मी विचारात पडलो. का, कशासाठी- हे काही सांगू शकणार नाही. बहुधा वय झाल्यामुळे माझ्या विचार करण्याच्या शक्तीवरही थोडा विपरीत परिणाम झाला असावा.
18 सप्टेंबर, रात्री दहा वाजता
आज रात्रीचं जेवण जेवल्यानंतर प्रकृती बिघडल्यासारखी वाटत होती. फक्त एवढंच नव्हे, त्याचबरोबर डोळ्यातले विचारही सगळे उलटे पालटे होत होते. माझ्याबरोबर मीच तयार केलेलं प्रभावी असं ‘मिरॅक्युरल’ हे औेषध होतं. त्याचा एक डोस घेऊन काही क्षणातच मी पूर्ववत झालो. मला एरवी असं कधीही होत नाही. आज का बरं असं झालं?
दहा मिनिटातंच दरवाजावर टक्-टक् झाली. दार उघडलं, तर साँडर्स आणि क्रोल, क्रोल म्हणाला, ‘आज डिनरच्या वेळी आपल्या ड्रिंकमध्ये बहुधा काहीतरी मिसळलं होतं. डोकं गरगरतंय, विचार उलटेपालटे होताहेत.’
साँडर्स म्हणाला, ‘माझीही तीच अवस्था आहे.’
मी त्या दोनही जणांना मिरॅक्युरल घ्यायला लावून बरं केलं.’
पण बाकी तीनजण? त्यांचं काय होणार?
आम्ही तिघेजण त्यांच्यासाठी औषध घेऊन निघालो. त्यांच्या खोल्या ठाऊक होत्या. त्यांच्या खोल्यांवर धक्के मारून, ते उघडून सर्वांना मिरॅक्युरल दिलं. सगळ्यांची सारखीच अवस्था झाली होती. पेट्रॉफला इंग्रजी चांगलं येतं, आमच्याशी तो इंग्रजीतच बोले, पण आता मात्र तो रशियनशिवाय कुठलीच भाषा बोलू शकत नव्हता.
त्यातही व्याकरणाच्या चुका! बार्तेल्ली आपल्या भाषेत फक्त ‘मम्मा मिया, मम्मा मिया’ म्हणजे ‘आई गं! आई गं!’ असं म्हणतोय, आणि आमचा फ्रेंच मित्र काहीच बोलत नाहीय. फक्त डोळे मोठे करून समोरच्या दिशेने पहातोय. पण अखेर सगळ्यांनाच माझ्या औषधाचा गुण आला आणि ते ठणठणीत बरे झाले.
प्रश्न होता- आता काय बरं करायला हवं? क्लाईन कुठल्यातरी कारणामुळे आमच्यामागे लागला होता की काय? पण कशासाठी? मला अडवण्यामागे कारण काय असावं, आणि त्याचबरोबर इतरांच्यावरही त्याचा राग का असावा?
पण यावर आता विचार करण्यात काही अर्थ नाही. आम्ही एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या खोल्यांत परत गेलो.
आणि त्यानंतर लगेच मला काय खटकत होतं, ते माझ्या मनात स्पष्ट झालं, आणि त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात आलं की, माझं एव्होल्यूटिन हे औषध लवकरात लवकर तयार करायला हवं.
पण या बाबतीत मला क्लाईनशी असलेल्या संपर्काची काही मदत होईल का?
हे उद्या सकाळच्या आधी समजणार नाही.

19 सप्टेंबर
आज सकाळी ब्रेकफास्टसाठी खाली आल्याबरोबर क्लाईनना प्रश्न केला, ‘काल रात्री तुमची प्रकृती ठीक होती ना? मला मात्र खूप आजारी असल्यासारखे वाटत होतं. खाण्यात काहीतरी गडबड झाली असावी असं वाटतं.’
आम्ही सर्वांनी अर्थातच कबूल केलं की आम्हालाही बरं वाटत नव्हतं आणि औषध घेतल्यावर आता बरं वाटतंय.
‘कुठलं औषध घेतलंत?’
‘प्रोफेसर शंकूंनी तयार केलेलं एक औषध, साँडर्स म्हणाला.
‘मला ठाऊक असतं तर मीही ते औषध घेतलं असतं,’ क्लाईन म्हणाला, ‘मी सुद्धा सारी रात्र तळमळत होतो. आज सकाळी सहानंतर बरं वाटायला लागलं.’
मी म्हणालो, ‘चला, बरं झालं! आज तर मला एलिक्सिरम मिळालं तर खूप बरं होईल.’
‘ठीक आहे, ब्रेकफास्टनंतर लगेत देतो.’
ब्रेकफास्टनंतर क्रोल, साँडर्स आणि पेट्रॉफ थोडे फिरण्यासाठी बाहेर गेले. बार्तेल्ली आणि रोमा म्हणाले, ‘आज आम्ही त्या आदिमानवाचे काही फोटो काढू.’ त्या आदिमानवाला वाटत असलेली आमची भीती आता गेली आहे आणि तो जवळ येऊ लागला आहे, त्यामुळे चांगले फोटो येतील.’
मी क्लाईनबरोबर त्याच्या प्रयोगशाळेत गेलो. त्याने शेल्फवरून एलिक्सिरमची बाटली खाली काढल्याबरोबर मी ओळखलं की, त्यातलं औषध बदलण्यात आलं आहे, त्या बाटलीतल्या औषधाचा रंग एलिक्सिरमसारखा नव्हता. एलिक्सिरम व इथे अत्यंत फिकट अशा निळ्या रंगाची छटा दिसते; क्लाईनने देऊ केलेलं एलिक्सिरम अगदी पाण्यासारखं दिसत होतं. माझ्या डोळ्यांत धूळ फेकणं इतकं सोपं नाही!
पण बाहेर मी तसं काही दाखवलं नाही. एका झाकण असलेल्या पात्रात चमचाभर तो द्रवपदार्थ घेऊन पात्राला झाकण लावलं.
माझी इच्छा पूर्ण न झाल्याने मला वाईट वाटलं, त्यामुळे मी स्वत:च्या खोलीत परत आलो. आज त्या आदिमानवाला पहावं असं वाटत नव्हतं, माझं संशोधन पूर्ण होता-होता मध्येच थांबलं, अपूर्ण राहिलं; यापेक्षा दु:खाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? अर्थात शहरात शोध घेतला तर ड्रगिस्टच्या दुकानात एलिक्सिरम नक्कीच मिळेल, पण तिथेही क्लाईन आडवा येणार नाही कशावरून?
साडे दहा वाजता दरवाजावर टक् टक् झाली. उघडून पाहिलं, तर साँडर्स आणि क्रोल.
‘एलिक्सिरम घेतलंत क्लाईनकडून?’ क्रोलने विचारलं. म्हणालो, ‘घेतलं खरं, पण ते काही खरं ड्रग नाही. भेसळीचं वाटतंय.’
‘आम्हाला वाटलंच होतं असं काहीतरी होणार. हे घ्या अस्सल एलिक्सिरम!’
क्रोलने खिशातून एक बाटली बाहेर काढून मला दिली.
माझ्या जिवात जीव आला. मी लगेच माझ्या औषधात एक चमचा एलिक्सिरम मिसळलं.
‘पण याचा कुणावर प्रयोग करायचा विचार आहे तुमचा?’ साँडर्सने विचारलं.
मी म्हणालो, ‘ज्याच्यावर प्रयोग केल्यावर एक मोठं रहस्य उलगडेल, अशावर पण आता नाही. रात्री.’
क्रोल आणि साँडर्सने खूप चौकशी केली, तरीही मी काय करणार आहे हे त्यांना सांगितलं नाही.
दुपारच्या जेवणाच्या वेळेला क्लाईनने निरोप पाठवला की, त्याची प्रकृती पुन्हा बिघडली आहे, तेव्हा आम्ही त्याची वाट न पाहता जेवण करून घ्यावे.
दुपारनंतर आम्ही सगळे हॅम्बुर्ग शहर पहाण्यासाठी बाहेर पडलो. संध्याकाळी सातला परत आल्यावर समजलं की, क्लाईनची प्रकृती उत्तम आहे, थोड्या वेळासाठी तो बाहेर गेला आहे. आणि डिनरपूर्वीच परत येईल.
का कोण जाणे, माझ्या छातीत धस्स झालं. क्लाईन बाहेर गेलाय? तो एकटाच गेलाय, की त्याच्याबरोबर आणखी कुणी गेलंय?
मी बाकीच्या पाचजणांकडे पाहून म्हणालो, ‘मला काहीतरी गडबडीची शंका येतेय. तो आदीमानव त्याच्या पिंजर्यात आहे की नाही हे आपण एकदा पहाण्याची गरज आहे. तुम्ही एक मिनिट वाट पहा, मी माझं अस्त्र घेऊन येतो; कारण काय घडेल हे काही सांगता येणार नाही.’
माझं अॅनिहिलीन पिस्तुल मी प्रत्येक सफरीच्या वेळी बरोबर नेतोच असं नाही; पण यावेळी का कोण जाते, मी ते बरोबर आणलं होतं. बॅगेतून ते बाहेर काढून घेऊन, इतर पाचजणांना बरोबर घेऊन मी घराच्या उत्तरेकडे असलेल्या, लोखंडी गजांनी घेरलेल्या आदिमानवाच्या पिंजर्याच्या दिशेने पळालो.
त्या पिंजर्याला एका ठिकाणी एक लोखंडी दरवाजा आहे, त्यातून आत जाता येतं. गेटसमोर सशस्त्र पहारेकरी उभा होता- क्लाईनच्या विश्वासातला रूडॉल्फ. आम्हाला पाहून त्याने रिव्हॉल्व्हर काढलं, मी आता दुसरं काय करणार?-माझ्या ऑनिनहिलीनच्या सहाय्याने त्याला त्याच्या रिव्हॉल्व्हरसहित निश्चिहून करावं लागलं.
आता मार्ग खुला होता. आम्ही सहाजण त्या पिंजर्यात प्रवेश केला, पण मिनिटभर इकडे-तिकडे शोधल्यावर लक्षात आलं की, आदिमानव तिथे नाही. म्हणजे क्लाईन त्याला घेऊनच बाहेर गेला होता.
आता क्रोलने आपली तत्परता दाखवली. घराच्या आत जाऊन त्याने थेट पोलिसांना फोन केला. क्लाईनच्या डेमलर गाडीचा नंबर मला ठाऊक होता. तो पोलिसांना देऊन क्रोल म्हणाला, ‘या गाडीचा ताबडतोब शोध घ्या.’
पोलिसांकडून उत्तर यायला वीस मिनिटं लागली. ‘कोनिगस्ट्रास आणि ग्रूनबर्गट्रासच्या मध्ये गाडी अडवण्यात आली, क्लाईनने रिव्हॉल्व्हरने एका पोलिसाला जखमीसुद्धा केलं. क्लाईनबरोबर एक जंगली माणूस आहे, दोघांनाही पोलीस स्टेशनवर आणलं आहे, तुम्हीही पोलीस स्टेशनवर या’ असं आम्हाला सांगण्यात आलं.
फोन झाल्यावर दोन टॅक्सी मागवून आम्ही सारे पोलीस स्टेशनवर जाऊन धडकलो. पोलीस क्लाईनची चौकशी करीत होते. आम्ही पोलिसांना सांगितले की, आम्हाला त्या जंगली माणसाला-आदिमानवाला भेटायचं आहे. एक कॉन्स्टेबल आम्हाला आतल्या एका खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत सामान म्हणाल तर एक टेबल आणि एकच खुर्ची होती. जमिनीवर एका कोपर्यात अंगाचं मुटकुळं करून आमच्या ओळखीचा आदिमानव झोपलेला होता.
मी माझ्या खिशातून एक बॉक्स बाहेर काढून त्या झोपलेल्या आदिमानवाजवळ गेलो. बॉक्समध्ये इंजेक्शनचा सगळा सरंजाम आणि माझं इव्होल्यूटिन हे ड्रग होतं. ते ड्रग सिरिंजमध्ये भरून निद्रीस्त आदिमानवाच्या केसाळ दंडावर एक इंजेक्शन दिलं.
त्यानंतर अत्यंत उत्कंठेने आम्ही सहाजण शास्त्रज्ञ, त्या इंजेक्शनचा काय परिणाम होतो याची वाट पाहू लागलो.
पाच मिनिटांतच आदिमानवामध्ये रूपांतर सुरू झालं. त्याच्या अंगावरचे केस नष्ट झाले, कपाळ मोठं झालं, जबडा मागे गेला, डोळे खोल खोबणीतून बाहेर, आले, शरीरावरचे स्नायू कमी होऊन तो सडपातळ दिसू लागला.
पंधरा मिनिटं झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की, आता आम्ही ज्याला पहातो आहोत तो ब्राझिलमधल्या कुठल्याशा जमातीतला आदिमानव नाही; तर युरोपचा रहिवाशी आहे, त्याच्या त्वचेचा वर्ण माझ्या मित्रांच्या त्वचेच्या वर्णसारखाच गोरा आहे. त्याच्या डोक्यावरचे केस सोनेरी आहेत, त्याचं शरीर पहाता तो वयाने तीसपेक्षा अधिक नसावा असं वाटतं, त्याच्या चेहरेपट्टीवरून तो देखणा वाटतोय.
‘माईन गॉट!’ क्रोल म्हणाला, ‘ हा तर हरमान बुश आहे!’
मी आता आणखी एक, अन्टिडोटचं इंजेक्शन देऊन त्याची उत्क्रांती थांबवली, त्यानंतर हाताने हलवल्याबरोबर बुश धडपडून उठून बसला आणि त्याने जर्मन भाषेत प्रश्न विचारला, ‘तुम्ही कोण आहात? मी कुठे आहे?’
मी म्हणालो, ‘आम्ही तुमचे मित्र आहोत. तुमचा शत्रू आता पोलिसांच्या तावडीत सापडलेला आहे. आता सांगा बरं, क्लाईनने काय प्रयोग केला होता?’
‘ओ:!’ बुशने कपाळावर हात मारून घेतला. ‘ही वॉज प्रिपेअरिंग द ड्रग ऑफ सटान’ म्हणजेच त्याने सैतानाचं औषध तयार केलं होतं. त्याच्या इंजेक्शनमुळे माणूस उत्क्रांतीच्या मार्गावर मागे जाई. क्लाईनने पूर्णपणे खोटं बोलून मला ब्राझिलला नेलं; त्यानंतर एके दिवशी संधी साधून अमेझॉन नदीमध्ये आमच्या जहाजाच्या एका केबिनमध्ये मला रिव्हॉल्व्हर दाखवून बळजबरीने त्याने इंजेक्शन दिलं- तेच, उत्क्रांतीच्या मार्गावर मागे नेणारं इंजेक्शन. त्यानंतर काय झालं मला ठाऊक नाही.- पण तुम्ही…. तुमच्यापैकी तर काहीजण मला ओळखीचे वाटताहात. यू आर प्रोफेसर शंकू, बरोबर ना?’
‘अगदी बरोबर. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे.’
‘विचारा!’
‘तुम्ही लेफ्ट हँडेड आहात. डावखोरे आहात. बरोबर ना?
माझ्या डायरीत तुम्ही स्वत: आपलं नाव आणि पत्ता लिहून दिला होता. तेव्हापासून माझ्या लक्षात आहे.’
‘येस, आय अॅम लेफ्ट हँडेड.’
मला खटकण्याचं कारण हेच होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, क्लाईन आणि मी असे आम्ही दोघे शास्त्रज्ञ जवळजवळ एकाच प्रकारचं संशोधन करीत होतो. तो चालला होता मागच्या दिशेने, भूतकाळाकडे, तर मी चाललो होतो भविष्यकाळाच्या दिशेने. आता कळालं की, उत्क्रांतीच्या बाबतीत अधिक कुतूहल न दाखवलेलंच चांगलं. जे काही व्हायचं आहे ते आपल्या आपण होऊ द्यावा. माझ्या इव्हॉल्युटिनची बाटली आता माझ्या गिरीडीतल्या घरातल्या शेल्फची शोभा वाढवील- ते पुन्हा वापरण्याचा आता काही प्रश्नच येत नाही. पण या प्रसंगी मात्र या औेषधाने खूप चांगलं काम केलं आहे हे मान्यच करायला हवं.
क्लाईनला आता सुटका नाही, कारण त्याच्या रिव्हॉल्व्हरच्या गोळीने जो पोलीस जखमी झाला होता, तो नुकताच मृत झाला आहे.
सत्यजीत राय
(रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित होणार्या आगामी कथासंग्रहातून)