Categories
बुवाबाजी

बापूचे ‘काम’काज

वार्षिकांक – २०१३

आसारामसारख्या तथाकथित आध्यात्मिक बुवाचे पितळ मिडियाने उघड केले. आचार्य अत्र्यानी केडगावच्या नारायण महाराजाची बिंगे फोडण्यापासून ते आजतागाईत विवेकी माध्यमे हे काम करीत आहेत. तरीही बुवाबाजी कमी का होत नाही? कारण यौनशोषण व पैसा यासाठी अध्यात्माची झूल पांघरणे ही आपली परंपरा आहे. पण अध्यात्मिक गुरु हा माणूसच असतो व विविध वासनापासून सुटू शकत नाही, हे आपण नीट समजून घ्यायला हवे.

आपल्या संस्कृतीत एक संस्कृत वचन सांगितले गेले आहे. ते असे-

धर्मार्थ काम मोक्षणा यस्यै कोऽपि न विद्यते।

अजागल स्तनस्येव तस्य जन्म निरर्थकम्॥

याचा अर्थ काय?

आसारामबापूंच्या प्रवचनात हा श्लोक कधी ऐकला नाही. पण त्यांना तो माहिती असता तर त्यांना धन्य वाटले असते.

याचा अर्थ असा आहे की, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. ते मानवी जीवनाचे सर्वात महत्वाचे अंग आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरूषार्थापैकी एकाही पुरूषार्थाची प्राप्ती ज्यास झाली नाही अशा माणसाचा जन्म अजागळ स्तनाप्रमाणे निरर्थक होय.

म्हणजेच या श्लोकाने ठासून सांगितले आहे की, जन्माला आलेला मनुष्य मग तो स्त्री असो की पुरूष, त्याने या चारपैकी एका तरी पुरूषार्थाचा लाभ हा करून घेतलाच पाहिजे. तसे तो न करील तर त्यास मनुष्य जन्म लाभल्याचे काहीच साफल्य नाही.

आसारामबापू हे मनुष्य आहेत. त्यांनी लहानपणापासूनच ‘धर्म’ या पुरूषार्थाची सुरवात केली. कारण त्यांना कळून चुकले होते की, त्यांचा ओढा ‘धर्माकडे’ आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात रहाणार्‍या हरपलानी कुटुंबात ते जन्मले. फाळणीनंतर ते भारतात आले. गुजरात राज्याच्या माणिनगरात त्यांनी म्हणजे असूमल सिरूमल हरपलानी यांनी चहा टपरीचा व्यवसाय सुरू केला. म्हणजे ‘अर्थ’ हा पुरूषार्थही बरोबर चालू केला.

आता धर्म आणि अर्थ या पुरूषार्थांपैकी ‘अर्था’चाच अगोदर सहारा आसारामबापूंनी का घेतला? याचे उत्तर कामसूत्र ग्रंथातील एका सूत्रात दडले आहे. हे सूत्र म्हणते-

‘धर्म हा अर्थापेक्षा श्रेष्ठ होय. अर्थ हा कामापेक्षा श्रेष्ठ होय. पण अर्थ हा पुरूषार्थच सर्वांनी अगोदर स्वीकारायला हवा. कारण त्यामुळेच तर मनुष्यास आपले सर्व व्यवहार सुखाने करता येतात. म्हणून राजाने देखील प्रथम ‘अर्थास’ प्राधान्य द्यावे.’

अर्थ म्हणजे पैसा, धन, संपत्ती. आसारामबापूंनी अगदी व्यवस्थितपणे याचा पाठपुरावा केलेला आहे.

अहमदाबाद जवळील मणिनगरात असलेल्या मॅजिस्ट्रेट ऑफीसच्या समोर चहा विक्री करीत आसाराम पोट भरत होते. त्यांचा नातेवाईक सेवकराम हा त्यावेळी त्यांच्याबरोबर होता. तो आजही तोच व्यवसाय तेथे करत आहे. पण अर्थाची वाढ होत नव्हती. म्हणून मग आसारामबापूंनी सायकल मॅकेनिकचे काम काही काळ करून पाहिले. तेथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार 1959 मध्ये दारूच्या नशेत आसाराम बापूंनी एक खून केला. पण पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली आणि ते शहर सोडून विजापूर येथे व नंतर अहमदाबादच्या सरदारनगर भागात आले.

‘अर्थवृद्धी’ होण्यासाठी मग वेगळा व्यवसाय त्यांनी सुरू केला. नथुमल, कृष्णमल व तेहरानी जामरमल या चार साथीदारांसोबत दारूविक्रीचा व्यवसाय फळाला आला. आणि मग ‘अर्थ’ प्राप्तीचा पुरूषार्थ सिद्ध झाल्यावर ते महाराज बनून धर्माकडे वळले.

धर्माकडे वळल्यावर ‘काम’ म्हणजे सेक्सकडे कानाडोळा करावा लागतो. झाले तसेच. त्यांचे त्यावेळी लक्ष्मीदेवींशी जबरदस्तीने लग्न लावले गेले होते असे त्यांचेच म्हणणे होते. लग्नाअगोदर काही दिवस ते पळूनही गेले होते. पण धर्मात बुडाल्याने त्यांनी कुटुंबत्याग करून ‘आसाराम बापू’ बनून आश्रमाकडे कूच केली. कूच केली खरी, पण त्यातच त्यांना नारायण प्रेम साई नावाने अपत्यही झाले!

पण त्यांना ‘काममग्न’ व्हावयाचे नव्हते लगेच. त्यांनी ‘अर्थ’ प्राप्तीसाठी ‘धर्म’ वापरायला सुरवात केली. अगोदर त्यांनी ट्रस्ट स्थापन केला. मग या ट्रस्टमार्फत आश्रम काढण्याचा कुटीरोद्योग सुरू केला. त्याचे रूपांतर इंडस्ट्रीत झाले. म्हणजे असे की, संपूर्ण देशभरात 425 च्या वर आश्रम उभे राहिले. एक अध्यात्मिक इंडस्ट्री.

आसारामबापूच्या ट्रस्टने अधिकृत जाहीर केलेला वार्षिक उत्पन्नाचा आकडा 400 करोड रूपये आहे. वास्तवात यापेक्षाही जास्त उत्पन्न असणार. कारण त्यांच्या भक्तांचीच संख्या 20 लाखांच्या वर आहे. अहमदाबाद येथील एका आश्रमाची जागा सुमारे 67000 चौरसमीटर आहे. सुमारे 50 गुरूकुल आणि 1400 समिती असणार्‍या या बापूंच्या आश्रमांचा ‘धंदा’ काय आहे?

पूजेच्या साहित्याचे उत्पादन आणि विक्री. सत्संगाच्या डी.व्ही.डींची विक्री. मल्टिमीडिया व टी.व्ही.मधून प्रवचने व प्रसार. हे झाले भौतिक व्यापार. आध्यात्मिक व्यापाराची उलाढाल प्रचंड आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रे वापरली जातात. आसारामबापूच नव्हे तर भारतातील सर्व बुवा, महाराज, तांत्रिक, फकीर, स्वामी, पास्तर, पुजारी, गुरू, योगी, मौलवी, धर्मगुरू हेच तंत्र वापरतात.

तंत्र सोपे आहे. त्यांच्या आध्यात्मिक प्रवचनाने मोहीत झालेल्या भक्तांकरवी त्यांची एक प्रतिमा तयार होत जाते. या प्रतिमेचा पुरेपूर वापर अत्यंत हुशारीने ते करतात. यास ‘मॅनेजमेंट लिंगोस’ म्हणावयास हरकत नाही. मग बाबा ‘बिझी’ होतात. अनेक दिवस ते दर्शन देण्यास येत नाही. ते वरवर दाखवित रहातात की पैसा ही माया आहे. त्याच्यामागे लागू नये, पण मनात मात्र ही माया पूर्ण पसरलेली असते. त्यामुळे या ‘मिथ्या’ पासून त्यांना दूर जाणे मुश्कील असते. मग ते ‘फीया’ लावतात. दर्शन फी, प्रवचन फी, प्रवेश फी इत्यादी. फ्री अध्यात्माचे रूपांतर फी अध्यात्मात होते. तुकाराम-ज्ञानेश्वर-नामदेवांना याची काहीच कल्पना नव्हती ते बरे होते.

बाबा सर्वांचे ‘आराध्य’ दैवत बनलेले असल्याने हजारो भक्तांचे हात बाबांसाठी शिवशिवू लागतात. मग बाबा या भक्तांच्या हातांना काम देतात, वळण देतात.

पहिले काम नवनवीन भक्तांंना बाबांकडे खेचून आणायचे. त्यांना बाबांचे सर्व साहित्य द्यायचे. या पहिल्या कामास आधुनिक जगात म्हणतात- ‘मार्केटिंग व सेल्स’

मग हे बाबाभक्त बाबांचे सत्संग भरविण्यास सुरवात करतात. काही जण योगशिबीरे घेतात, काही जण ध्यानशिबीरे घेतात…. वगैरे वगैरे. यास म्हणतात- ‘ऑपरेशन्स’ हे दुसरे काम.

आता या बाबांचे समाजाशी काही तरी देणेघेणे असते. म्हणून मग तिसरे काम दिले जाते. ‘पीआरओ किंवा पब्लिक रिलेशन ऑफीसरचे’ हे हात बाबांची प्रसिद्धी करण्यात तय्यार असतात. टी.व्ही.वर बाबांचे दर्शन घडविणे, नेत्यांशी भेटी घडविणे, सिने-अभिनेत्यांना भेटविणे इत्यादी. म्हणजे बाबांची ‘इमेज’ तयार करण्यासाठी रात्रंदिवस हे पीआरओ भक्त झटत असतात. बाबांची पब्लिसिटी तुफान होऊ लागते ती त्यांच्यामुळेच. प्रिंट, टी.व्ही., इंटरनेट, व्यापारी संस्था व उद्योगकेंद्रे सगळीकडे बाबांचे फोटो, बाबांची वाक्ये, बाबांच्या वस्तू…. व्यवस्थित पसरविली जातात. मग बॉलिवुड स्टार नाहीतर मंत्री-खासदार यांच्या बरोबरच त्यांचे ‘रिलेशन्स’ छानपैकी तयार केले जातात.

आणि उरते मग चौथे काम. ह्युमन रिसोर्स नावाचे हे काम अगदी व्यवस्थित चालते. ह्युमन रिसोर्स म्हणजे- जे भक्तगण असतात त्यांची काळजी घेणे. त्यांच्या समस्या सोडविणे. त्यांना आधार देणे. त्यांना पडलेल्या प्रश्नांची सोडवणूक करणे. त्यांना चांगले, श्रद्धाळू भक्त बनविणे. या चौथ्या कामामुळेच आसाराम बापू सध्या तुरूंगात आहेत. कारण त्यांनी ‘काम’ मग्नता दाखविली आहे म्हणून.

याचा अर्थ आधुनिक बिझिनेस मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी वापरून आसारामसहित सर्वच महाराज-मौलवी-पास्तरांचा धंदा बरकतीचा होत चालला आहे. म्हणजे इथे ‘अर्थ’ हा पुरूषार्थ या सर्वांनी पुरेपूर दाखवून दिला आहे. ‘धर्म’ बुवा बनून.

या अर्थकारणाने भयानक संहार घडतो. आसाराम बापूंचेच उदाहरण घेऊ या. आसाराम बापूंच्या ट्रस्टने शासनाच्या मालकीची सुमारे अर्धा हेक्टर जमीन बळकाविली आहे. त्या जागेवर सी.बी.एस.ई. शाळा, औषध विक्री इत्यादी आध्यात्मिक नसलेल्या व्यवसायाची उभारणी केली आहे. वास्तवात लीजवर मिळालेल्या या जागेवर फक्त योगासने करण्यासच परवानगी मिळाली होती. पण बापूंनी त्या जागेत स्विमींग पूल, घरे, पिरॅमिड बांधली आहेत. बिलवाली आणि लिंबोडी या गावात सुमारे पावणे सात हेक्टर जमीन शासनाकडून आश्रमाने मिळविली. तीही, दरवर्षी 1 रूपया भाडेतत्त्वावर. 1 जून 1998 पासून या जागेतून आश्रमाचा कारभार चालू आहे.

आश्रमांच्या जागा या हरितपट्ट्यात येतात. त्यावर इमारत बांधायची असेल तर त्या संदर्भातील खात्यांची परवानगी घ्यावी लागते. पण बापूंच्या आश्रमांनी हे सारे नियम गुंडाळून ठेवले. आणि त्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी दाखवून बांधकामांचा धुरळा उडवून टाकला.

पैसा हातात आला की माणूस बिघडतो तो त्या पैशांचा माज आला तर. करोडो रूपयांचे मालक झाल्यावर हे बुवा-महाराज आपल्या धनाड्य वृत्तीची झलक दाखवू लागतात. ते इतक्या खालच्या थरास जातात की आपण नीतीतत्वे सांगणार्‍या धर्माचे प्रवर्तक आहोत हे विसरून खुनशी बनतात. त्याचे एक उदाहरण वाघेला बंधू असलेल्या मुलांच्या खुनात ठळकपणे उठून दिसते.

अभिषेक आणि दिपेश वाघेला या दहा वर्षांच्या दोन चुलत भावांना आसारामबापूंच्या बालकेंद्रात ठेवण्यात आले. महाविद्यालयातच त्या दोघांचाही मृत्यू झाला. 3 जुलै 2008 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. दोघेही सुरवातीस आश्रमातून गायब झाले. त्यांचे वडील चौकशीसाठी आश्रमात गेल्यावर या मोटेरा आश्रमातील दर्शन साई आणि आसारामबापूंनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी दिपेश व अभिषेकच्या पालकांवरच उलटे आरोप केले, की ते दोघेही घरातून पळून आले होते व आम्हीच त्यांना आश्रमात आश्रय दिला होता. या मुलांच्या पालकांनी यावर त्यांना आम्ही स्वत: येऊन 15000 रूपये भरून त्यांना भरती केले होते हे सांगितले. त्यावेळी पक्की पावतीही दिली नव्हती हे निदर्शनास आणले. कच्ची पावती दाखविली. शिवाय मुलांसाठी पिवळा शर्ट व पांढरी विजार दिलेलीही दाखविली. पण काहीच दाद मिळाली नाही. ‘आम्ही त्यांना शिक्षणासाठी ठेवले होते, पण आश्रमात त्यांचे टक्कल करून कपाळावर चंदनाचा टिळा लावून त्यांना विचित्र अवस्थेत पाहिल्यावर आम्ही खूपच अस्वस्थ झालो होतो’ असे एक पालक प्रफुल्ल वाघेला म्हणतात. ज्या दिवशी हे करण्यात आले त्याच रात्री आम्हास कळवण्यात आले की, ते दोघे बेपत्ता आहेत. चौकशीसाठी गेल्यावर आश्रमातील गुरूकुलाचे संचालक पंकज सक्सेनांनी ‘पिंपळाच्या झाडाला 11 फेर्‍या मारा, मुले सापडतील’ असे सांगितले. तेही या पालकांनी केले.

शेवटी त्यांनी पोलिसांकडे जायचा निर्णय घेतला. पण आश्रमाच्या लोकांकडून असे करू नका असे धमकीवजा सांगितले. रात्रभर वाट पाहून त्यांनी चांदकेडा पोलीस स्टेशनात सकाळी धाव घेतली. त्यावेळी तेथे विकास खेमचा आणि अजय शहा हे आश्रमाचे दोन कर्मचारी अगोदरच बसले होते. त्यांनी पोलीसांना सांगायला सुरवात केल्यावर पोलीस अधिकार्‍याने या पालकांनाच उलटे सुनावले. आणि तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला.

या पालकांना आसारामबापूंनी एक संदेश पाठविला. त्यात त्यांनी उपाय सुचविला होता-

‘चार रस्ते मिळतात त्या चौकात जा. 7 खडे उचला. ते एका पाण्याच्या बादलीत टाका. त्यात हरविलेल्या मुलांचे कपडे भिजवून आत बाहेर काढा. आणि ते ओले कपडे मुलांच्या रूममध्ये नेऊन वाळत घाला. 4 तासांत मुले रूममध्ये येतील!’

तीन दिवसांनंतर दोघांचेही मृतदेह आश्रमाशेजारी असणार्‍या नदीपात्रात सापडले. दिपेशचे दोन्ही हात खांद्यापासून दूर निखळून पडले होते. शरीरातील इंद्रिये गायब झाली होती. छातीच्या बरगड्या तेवढ्या दिसत होत्या. डाव्या पायाच्या घोट्यापासूनचा पुढचा पाय गायब होता. उजवा पाय जळालेल्या अवस्थेत होता. या ठिकाणी पंचनामा करण्यास पोलीस तयार नव्हते. आश्रमातून टेम्पो भरून भक्त व कर्मचारी आले होते. त्यांच्या हातात हॉकी स्टीक्स आणि हत्यारे होती. ‘आम्ही तिथून जीव वाचवून पळालो’ असे वाघेला म्हणतात.

या सार्‍या प्रकरणाने वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्यावर मात्र चांगलाच पेट घेतला. पोलीसांवरील दबाव वाढला. ‘दिव्य भास्कर’ दैनिकाचा वार्ताहार कुलदीप सिंग कलेर यास भक्तांनी व आसारामच्या माणसांनी बेदम मारहाण केल्यावर मात्र भडका उडाला. त्याला आश्रमात नेऊन मारहाण करण्यात आली व लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

याच प्रकरणानंतर लगेचच मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमातूनही 2 मुले गायब झाली. रामकृष्ण यादव हा नर्सरीतील विद्यार्थी होता तर वेदांत मोरया हा पहिलीत शिकत होता.

वाघेला पालकांचे म्हणणे होते की, आश्रमात तंत्र-मंत्र विद्या आणि चमत्कार विद्या चालते. तंत्रमंत्र विद्या ही अघोरी विद्याही असू शकते. तांत्रिकाचे वामाचारी पंथ फार पूर्वीपासून या देशात अस्तित्वात आहेत. शाक्त आणि शैव पंथ. असे दोन पंथ आध्यात्मिक क्षेत्रात मध्ययुगात अस्तित्वात होते. शाक्त पंथ हा शक्तीची उपासना करण्यास सांगतो. शिव व वेताळ अशा देवा-दिकांच्या श्रद्धेने चालणारा पंथ आहे, शैव पंथ. या दोन्ही पंथाचे सर्व आचार व विधी गुप्त चालतात. त्यात पशुबळी, नरबळी इ. विधींचाही समावेश असतो. शाक्त संप्रदायात कवटी, हाडे व अन्य मंत्र-तंत्राची अघोरी सामुग्री घेऊन जे विधी चालत ते मध्यरात्री व अमावस्येला केले जात असत. प्रेताचे मांस भक्षण करणे, मद्यपान करणे, गांजा-चरस-भांग यासारख्या मादक पदार्थांचे सेवन करणे हे शैव पंथियांमध्ये सर्रास चालत असे. यासारख्या आचार पद्धतीमुळे मंत्र-तंत्र शक्ती प्राप्त होते असा त्यांचा दावा असतो. गुजरातमधील बाबा कोनाराम नावाचे साधू या संप्रदायाचे प्रवर्तक होते.

अघोरी पंथाची उपासना शिव आणि तारा या देवांची असते. कालिमातेसारखीच तारादेवी. ही 10 महाविद्यांनी समृद्ध असते अशी अघोरी पंथीयांची भावना असते. या 10 महाविद्यांच्या 10 देवी असतात व त्यापैकी भैरवीची पूजा जोरात असते. बंगालात बागलमुखी व कालीमातेचे प्रस्थ आहे.

आसाराम बापूचे नेहमी दावे असतात की, त्यांच्याकडे खूप मोठी विद्या आहे व ते तंत्र-मंत्राने सर्वांच्या समस्या दूर करतात. त्यांच्या वेबसाईटवर मंत्र कोणकोणते व कशासाठी याची यादीच सादर आहे. कोमामध्ये गेलेल्यांसाठी, लिव्हर, मेंदू हेपाटायटीस-बी, ब्राँकायटीस या रोगांसाठी बीजमंत्र दिले आहेत. हे असे दावे जीवघेणे आणि रूग्णांच्या जीवाशी खेळणारे आहेत. स्त्रियांच्या मासिक पाळीसाठी वैदिक मंत्र पॉवर आहे. चांगला नवरा मिळावा म्हणून, ब्रम्हचर्याची रक्षा करण्यासाठी, ‘जय जय गिरीवर, राज किशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी’ असा मंत्र आहे. अपघाताशिवाय प्रवास व्हावा, धंदा चालावा-नोकरी मिळावी, कोर्ट केसेस जिंकाव्यात यासाठी ‘ओम नमो सर्वार्थ स्वाहा:’ सारखे अनेक बीजमंत्र दिले आहेत.

खरे तर असे मंत्र-तंत्र घेऊन कोणत्याही समस्या सुटत नाहीत, रोग बरे होत नाहीत. पण आसारामबापूने त्याचा व्यवस्थित वापर आपल्या आध्यात्मिक बाजारासाठी केला आहे.

वाघेला पुत्रांच्या खुनाच्या चौकशीसाठी जस्टीस डी.के.त्रिवेदी कमिशन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना नेमले. त्याचे कारण गुजरातच्या हायकोर्टाने फटकारले होते की, या खुनांची चौकशी संथ गतीने का चालली आहे म्हणून. आसाराम बापूस कमिशनने सहा वेळा समन्स काढूनही ते हजर राहिले नाहीत. आणि जेव्हा रहायचे तेव्हा वाट्टेल तेव्हा चौकशीच्या रूममधून बाहेर पडायचे. वाट्टेल तेव्हा यायचे.

आसाराम बापूचेच समर्थक व एकेकाळचे कट्टर भक्त व आश्रमाचे सेक्रेटरी राजू चांडक यांचाही खून करण्याचा प्रयत्न झाला. त्याचे कारण हे होते की आश्रमात चाललेल्या गैरव्यवहारावर त्याने बोट ठेवले होते. आसाराम बापूंचे खाजगी वैद्य अमृत प्रजापती यांनीही नंतर बापूंची साथ सोडली. त्यांनाही धमक्या देण्यात आल्या कारण त्यांनी आसाराम बापूंचे स्त्रियांशी असलेले संबंध पाहिले होते. 1988 मध्ये प्रजापतींनी आश्रमात 15000 रूपये पगारावर नोकरी सुरू केली. पण तेथे अनेक गैरप्रकार चालतात असे त्यांच्या लक्षात आले. गाईचे तूप म्हणून भेसळ केलेले तूप दिले जायचे. दिल्लीच्या जातीकारा फार्म हाऊसवर आसाराम बापू त्यांच्या आई वारल्यावर गेले होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांच्या खोलीत एक स्त्री व आसाराम बापू यांना प्रजापतींनी नको त्या अवस्थेत पाहिले होते.

‘अर्थ’शक्तीचे हे प्रताप फक्त आसाराम बापूच करतात असे नाही. महाराज-बुवा हे जेव्हा गडगंज संपत्ती गोळा करतात तेव्हा त्या अर्थाने अनेक अनर्थ घडविण्याची ताकद त्यांच्यात पैदा होते. यातून अंधश्रद्धांचा फैलाव करण्यास ते जराही कचरत नाहीत.

आसाराम बापूंनी एक मंत्र तयार केला आहे. वासनेपासून बचाव करणारा हा मंत्र आहे. ‘ओम अर्यमायै नम:।’ नावाचा हा मंत्र कामविकार असेल तर तो दूर करतो. पण खुद्द स्वत:च मंत्र तयार करून त्यांनी तो स्वत:वर का चालविला नाही असा मोठा प्रश्न पडतो. कारण ‘काम’ या पुरूषार्थावर विजय न मिळविता ते आता गजाआड झाले आहेत. गजाआड होण्यापूर्वीपासून जर आसाराम बापूंनी ‘वासना से बचने का मंत्रा’चा जप केला असता तर ते ‘सात्विक’ जीवन जगले असते.

पण अशा मंत्र तंत्रांनी काही होत नसते. ‘सेक्स स्कँडल’ केलेले असे त्यांच्यासारखेच अनेक महाराज- बुवा या देशात झाले आहेत. आसाराम बापू काही पहिले महाराज-बुवा नव्हेत. आसाराम बापूंची सेक्स विषयीची मते अतिशय चुकीची आणि अवैज्ञानिक आहेत जसे की, ‘अमावस्या व पौर्णिमेस शरीरसंबंध ठेवू नयेत. शिवरात्री व होळीलाही सेक्स करू नये. कारण जर अशावेळी संबंध ठेवले तर मूल आंधळे-पांगळे जन्मते. आणि समजा गर्भधारणा झालीच नाही तरीही यामुळे नपुसंकत्व येते! या सगळ्या थिल्लर सल्ल्यांशिवाय आसाराम बापू असे म्हणतात की, ‘जर बुद्धिमान मूल जन्माला घालायचे असेला तर दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान सेक्स करावा.’

हस्तमैथुन आणि समलिंग संबंधामुळे सर्व शरीरातील ऊर्जा नाहीशी होते व माणूस दुबळा होतो असे सल्ले देणारे आसाराम बापू सेक्स स्कँडल मुळे सध्या तुरूंगात आहेत हा विरोधाभास येथील तथाकथित धर्मनेतृत्वाची मानसिकता अधोरेखित करतो. असे तथाकथित धर्मनेतृत्व करणारे बुवा-महाराज हे धर्माचा वापर करून लैंगिक शोषण करतात हे इथल्या समाजाने समजून घ्यावयास हवे. बंगलोर जवळील बोडादो या गावातील स्वामी नित्यानंदाचे उदाहरण बरेच काही सांगून जाते. 2010 मध्ये एका तामीळ अभिनेत्रीबरोबर चाळे करतानाची त्याची चित्रफीत टी.व्ही.वरून प्रसारीत झाल्यावर एकच खळबळ उडाली. त्याच वर्षी या नित्यानंदची भक्त असलेल्या आरती राव या महिलेने आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार बंगळूरूच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे दाखल केली. आरती राव ही इंजिनियर असून ती पिलानी येथील ‘बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स’ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते. तिने नित्यानंदांच्या आश्रमात प्रवेश केला आणि ती संपूर्ण अध्यात्मिक वृत्तीची बनली. एवढेच नव्हे तर तिने मा नित्यानंद तृणेश्वरीमयी असे नावही धारण केले. त्याच वेळी नित्यानंदांच्या आश्रमाबरोबर एक करारही करून टाकला. त्याला ‘कुणालाही न सांगण्याचा करार’ असे म्हटले जाते. काय होते या करारात?

या करारात म्हटले होते की, या आश्रमातील जो कार्यक्रम आहे तो तांत्रिक साधनेवर आधारलेला आहे. या तंत्र साधनेतून स्त्री व पुरूष परमोच्च आनंदाच्या सीमेपलिकडे जाऊन एक उन्नत आनंद घेतात. यासाठी नग्नता, द़ृश्य चित्रे, रेखाचित्रे, कामसंबंध व्यवहार, लिंग दर्शन या गोष्टी अपरिहार्य असून त्या मान्य आहेत.

महाराज-बुवा हे नेहमीच अशी कृत्ये अत्यंत गोपनीय ठेवतात. खरे तर तो त्यांच्या बाये हाथ का खेल असतो. या प्रोग्रामचे नावही आकर्षक असेच ते ठेवतात, स्वामी नित्यानंदांच्या या प्रोग्रामचे नाव होते, ‘लर्निंग फ्रॉम द मास्टर प्रोग्राम’

सी.आय.डी.ने आश्रमावर जेव्हा छापा घातला तेव्हा अनेक मोबाईल्स, लॅपटॉप व कॉम्प्युटरच्या हार्डडिस्क सापडल्या. अनेकांची करारपत्रे सापडली. ही करारपत्रे कायद्याच्या कचाट्यात सापडू नयेत अशा पद्धतीने होते आणि त्या सर्व भक्तांनी आंधळेपणाने त्यावर सह्या केल्या होत्या. सी.आय.डी.च्या तपासातून असे निष्पन्न झाले की, असे करार करणार्‍यांपैकी 90% चित्रण केलेले 35 व्डिडीओ क्लीपस् सापडल्या.

याचा अर्थ उघड आहे. उच्चविद्याविभुषित आहे म्हणून अंधश्रद्ध आणि अवैज्ञानिक मानसिकता नसते असे नाही. विद्येचा दृष्टिकोनाशी संबंध नसतो. विद्या ही फक्त पोटभरूपणा करते. ही विद्या देखील तोकडीच असते. पण त्याचा दर्प फार मोठा असतो. या विद्येमुळे जगातील सर्व माहिती मुठीत असते. पण या माहितीचा वापर कसा व कुठे करायचा आणि का करायचा याचे ज्ञान शून्य असते. मग लैंगिक अत्याचार व छळ या महाराज-बुवांनी न केल्यासच नवल.

नवल याचेही नाही की आसाराम बापूच्या प्रसिद्धी प्रमुखाने जे म्हटले त्याचे. सुनील वानखेडे नावाचा हा प्रसिद्धी प्रमुख म्हणतो की, “आसाराम बापू विरोधात केला गेलेला हा सरकारी कट आहे. एक कटकारस्थान आहे. कारण आसाराम बापूंना कोणतीही लैंगिक इच्छा नव्हती. ते सामान्य पुरूष नाहीत. ते संत आहेत. आणि संतांना सेक्सची, कामसंबंध व मैथुनाची इच्छा नसते!”

असे म्हणणे हे सर्वात मोठे असत्य आहे.

निदान भारताच्या इतिहासाचे ज्ञान ज्यांना आहे त्यांना हे म्हणणे किती तकलादू आहे याची जाणीव होईल. भारतीय प्राचीन परंपरेत ‘सेक्स’विषयी खूप मोकळेपणा होता आणि कमालीचा स्वीकार होता.

कामसूत्र हा ग्रंथ वात्सायन मुनींनी लिहून प्राचीन काळीच खुल्या कामज्ञानाचा प्रचार केलेला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय परंपरेत कामवृत्तीसाठी कामदेवाची निर्मिती केली गेली. आणि याच धर्मग्रंथांनी ठामपणे सांगितले आहे की जशी श्रद्धा, बुद्धी, सुधा,भय, निद्रा, स्मृती इत्यादी अनेक वृत्ती मनुष्याच्या मनात असतात तशीच कामवृत्तीही असते. ही कामवृत्ती मनुष्याच्या वासना जागृत करते व त्याला भौतिक गोष्टी करण्यास भाग पाडते.

या पृथ्वीची-सृष्टीची उत्पत्ती ही ‘विराज’ क्रियेतून होते. विराज म्हणजे पुरूषाने स्त्रीमध्ये गर्भधारण करण्यासाठी केलेली क्रिया. सर्व प्राण्यांची व मानवांची निर्मिती आणि वाढ ही पित्याने मातेत गर्भधारणा केल्याने झाली आहे आणि शिव व पार्वती हे त्याचे प्रतिक आहे.

जर विश्वाचा आरंभ असा झाला असेल तर संत कोणत्या विश्वातून येतात? ते तर याच विश्वाचे अंग आहेत. आणि म्हणूनच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरूषार्थाचे स्वतंत्र असे शास्त्र बनविले गेले. त्यात कामशास्त्र हेही येते.

नित्यानंद, आसाराम बापू आणि अनेक बुवा महाराजांनी एकीकडे कामसुख घेतले आहे तर दुसरीकडे असे सुख घेतल्याचा इन्कार केला आहे. हा दांभिकपणा झाला. या दांभिकपणास खुद्द या महाराज-बुवांच्या लाडक्या मनुस्मृतीनेच मोठा टोला लगावला आहे. त्यात असे म्हटले आहे की,

‘काम, क्रोध, हिंसा, ईर्षा, असंतोष आणि वेडेपणा इत्यादी मानसिक रोगाचे मूळ कारण कामाचे सेवन अजिबात न करणे किंवा त्याचा अतिरेक करणे यातूनच उद्भवतो.’

या बुवा-महाराजांनी कामाचा अतिरेक केला आहे. त्यांना कामेच्छा नसते असे म्हटले तरी मनुस्मृती त्यांना मानसिक रोगी ठरवते.

याचा अर्थ कामशास्त्रावर प्राचीन काळी बराच विचार करण्यात आला होता व तो उघडपणे मांडण्यात येत होता. यात वात्सायनाने कामसूत्र ग्रंथ तर आणलाच पण त्याचबरोबर अनेक ग्रंथही मैथुन, कामशास्त्र यावर अनेक ऋषींनी देखील आणले. उदा.दत्तकाचार्याचे ‘वैशिक’, चारायणाचार्य यांचे ‘साधारण अधिकरण’, घोटकमुखाचे ‘कन्यासंप्रयुक्त’ इ.

जर एवढे सारे असेल तर बुवा-महाराजांची अशी सेक्स स्कँडल का होतात? त्याचे कारण जे तत्वज्ञान हे बुवा-महाराज बाळगतात त्यात मोठा गोंधळ आढळतो. एकीकडे स्त्रीचे आकर्षण असते तर दुसरीकडे स्त्री ही मोक्ष मार्गातील धोंड असा दुटप्पी विचार डोक्यात ठेवणे. स्त्री सहवासाने ताकद कमी होते असे अध्यात्मिक प्रवचनात सांगायचे तर अध्यात्मिक उपदेशात असे सांगायचे की स्त्रीचे समाधान केले तरच घर सुखी राहते!

थोडक्यात पाप हातून घडायला नको आणि पुण्यही वाढायला नको अशा भोंगळ संकल्पना बाळगल्या की ह्याचा परिणाम विपरितपणे कामजीवनावर होतो. म्हणजे असले अध्यात्मिक तत्वज्ञान सामान्य माणसांचाही गोंधळ उडवून टाकते आणि मानसिकता बिघडवून ठेवते.

परंपरेने स्त्रीला दुय्यम स्थान दिले आहे. मुलगा झाला की कौतुक-पेढे ही परंपरा, नवर्‍याच्या घरात त्याचेच म्हणणे अंतिम ठरवणारी रूढी आणि म्हातारपणात सर्वांचे नीट करण्यासाठी सतत तत्पर सेवेसाठी हजर ही स्त्रीची आजची अवस्था इथल्या पारंपारिक रूढी-समजुतींनी केली आहे. ही पुरूषी मनोवृत्ती आहे. लहानपणापासून पुरूषास ‘पुरूषी’पणा करण्यास उत्तेजन देणारी ही परंपरा पुरूषाची मानसिकता बिघडविते. स्त्रीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन नेहमी गोंधळलेला, संशयी नाहीतर विचित्र रहातो. त्याचा परिणाम काम जीवनावर न झाल्यासच नवल आणि या कामजीवनावर परिणाम झाल्यावर आसाराम बापूसारखे महाराज उपचार करायला निघतात.

मर्द मनुष्याची व्याख्या इथल्या समाजात ही मानली गेली आहे. की जो भरभरा पोरे काढतो तो मर्द! हाच पुरूषत्वाचा खरा मानदंड. मग हे पुरूषत्व वाढविणे-वाचविणे यासाठी अशा महाराज-बुवा-भोंदूंच्याकडून ‘उपचार’ करून घेतात. हा इलाज लपून छपून चालतो. हे एक प्रकारचे मानसिक नपुसंकत्वच आहे. एकीकडे मुलाला ‘पुरूष’ म्हणून वाढविणे आणि दुसरीकडे कर्मविपाक सिद्धांताची मोक्षाबद्दलची वेडगळ कल्पना यातून कामजीवनच सपक बनत जाते.

यातून आपल्या नीतीच्या, पुरूषार्थाच्या कल्पना विकृत बनल्या. ‘कडकडीत ब्रम्हचर्य पाळणार्‍या, वीर्याचा एक थेंबही बाहेर पडू न देणार्‍या योग्याची मानसिक-शारीरिक ताकद प्रचंड असते. त्याला अनेक सिद्धी प्राप्त असतात. तो मनोबलाने हवे ते करू शकतो, इत्यादी भोंगळ समजुती यातूनच निर्माण होतात. या समजुती बाळगल्याने योगी-महाराज-बुवा यांच्याबद्दल अवास्तव समजुती तयार होत जातात. ‘योगी मनसामर्थ्याने वीर्य मेंदूत ओढून घेतात, त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर तेज निर्माण होते, त्यांचे डोळे पाणीदार असतात’ असले काहीतरी भोंदू मत तयार होते.

वीर्यनाश झाल्याने डोळ्याभोवती काळी वर्तुळे तयार होतात. वीर्य हे पांढरे शुभ्र हवे, चक्क्यासारखे घट्ट हवे, तरच त्याला खरी ताकद असते, पातळ-पिवळसर वीर्य म्हणजे आजारपणाचे-नपुसंकत्वाचे लक्षण अशा चुकीच्या कल्पना वयात येतानाच डोक्यात भिनलेल्या असतात. या सार्‍या गोष्टींत आसाराम महाराजांसारख्यांचे ग्रंथ भरच घालतात.

चौथा पुरूषार्थ मोक्ष. हा प्रकारच एकूण भोंगळ आहे. मोक्ष म्हणजे संसारातून, जन्म मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्ती. ती कशी व का मिळवायची याचे तत्वज्ञान म्हणजे अनेक गोंधळांचा बाजार! याच मोक्षाचे गाजर दाखवून इथले महाराज-बुवा, इथल्या समाजास लुटत आले आहेत. मोक्ष मुक्तीचा मेनू प्रत्येक महाराज-बुवा वेगवेगळा तयार करतो आणि त्याची किंमतही तो ठरवितो. त्यामुळे साहजिकच तो अध्यात्मिक क्षेत्रातील ‘थोर विभुती’ बनतो. याच मोक्ष कल्पनेत पूर्ण बुडलेला महाराज-बुवा तरूणपणी आणि मध्यवय उलटेपर्यंत स्वत:च्या कामभावना दाबून ठेवतो. यांना वर येऊ न देण्याचा प्रयत्न करतो. पण नंतर ते तेवढ्याच ताकदीने उफाळून वर येते. मग ते त्यांच्या ‘थोर विभुती’पणाचा वापर करून सेक्सचा भोग सुरू करतात.

भक्तांसाठी सेक्स म्हणजे एक उपाय होय, समस्यांवरचा जालीम उपचार होय असेही मार्केटिंग या महाराज-बुवांकडून केले जाते. या उपायासाठी मंद प्रकाशाचा हॉल, धूप, धून सारे काही निर्माण केले जाते. आणि मग सेक्ससाठी तयार होण्याकरीता ‘ब्रेन वॉशिंग’ केले जाते. पूर्वी जे घडले आहे, जी नाती आहेत हे सारे ‘मिथ्या’ ठरविले जाते. ‘माझी तू दासी आहेस’ असे ठसविले जाते. किंवा त्या देवाची आज्ञा आहे असे सांगितले जाते. आणि मग देवाचा प्रसाद,मोक्षाचे द्वार खोलणारी क्रिया अशी विविध नावे देऊन सेक्स केला जातो. विनाशतर्र्, कोणताही किंतु मनात न ठेवता महाराज-बुवांवर श्रद्धा ठेवावी अशी पूर्वअट घातल्याने भक्तीण महाराज-बुवांशी रत होण्यास तयार होते. शिवाय वर असेही सांगितले जाते की, कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी हे सारे आवश्यक आहे. म्हणजे सेक्सला योगाशी जोडले जाते.

रशियाहून आलेल्या एका मुलीस ऋषिकेश येथील एका बुवाकडून लैंगिक शोषणाला वारंवार सामोरे जावे लागले. सुरवातीस जेव्हा तो बुवा तिच्या कपाळाचे चुंबन घेई तेव्हा तिला वाटे की काहीतरी ऊर्जा त्याच्यातून आपल्यात आली आहे. मग ती बुवाच्या स्पर्शास बळी पकडून त्याच्या मिठीत गेली जी मिठी ‘अध्यात्मिक क्रियेचा भाग’ आहे असे सांगण्यात येत होते. बंगळूरू येथील एका 27 वर्षीय इंजिनियर तरूणीस रूद्राभिषेकाचा उपाय सुचविला. त्यासाठी तिच्याकडून स्वत:च्या लिंगावर दूध व मधाचा अभिषेक करवून घेतला! एका फ्रेंच माणसाचा अनुभव विदारक आहे. 35 वर्षांच्या या फ्रेंचमनला बुवाने निर्वस्त्र घेऊन उताणे झोपण्यास सांगितले. मग त्याच्या पोटावर पाय ठेवून त्याचे लिंग हातात अर्धा तास घेऊन, आध्यात्मिक शक्ती त्याच्या शरीरात सोडण्याचा विधी केला! त्यावेळी त्या फ्रेंचमनला ते अत्यंत आनंददायी वाटले. पण आज त्याला त्याचा भयंकर पश्चात्ताप होतो आहे.

युरोपातून उत्तर भारतात एक ख्रिस्ती धर्मोपदेशक आला होता. त्या ठिकाणी तो लहान मुलांशी लैंगिक संबंध ठेवीत असे. पण भारतात आल्यावर इथेही त्याने तेच सुरू केले. एका मनोविश्लेषण तज्ञाने ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर त्याची रवानगी अफ्रिकेत करण्यात आली.

संसारातून मुक्ती मिळविण्यासाठी अगोदर असलेल्या समस्या दूर करणे महत्वाचे असते, रोग असेल तर रोगमुक्त होणे गरजेचे असते असे महाराज-बाबा सतत सांगत रहातात. 2006 मध्ये स्वामी विकासानंद उर्फ विकास जोशी याचा मध्यप्रदेशातील जबलपूर परिसरात खूप मोठा दबदबा होता. पोलिसांना तो शहरातील एका हॉटेलमध्ये सापडला. त्यावेळी त्याच्या बरोबर 3 स्त्रिया व एक मुलगी आणि जवळपास 60 सेक्स सी.डी. सापडल्या. त्याला ‘साहब’ या टोपण नावाने पुकारले जायचे. हा साहब भक्तीणींना सांगत असे की, हे लैंगिक संबंध कुणाला सांगितल्यास त्यांचे सांसारिक आयुष्य नष्ट होईल! रेबॅन गॉगल घालून प्रवचन करताना हा महाराज म्हणत असे की त्याच्याकडे सर्व रोग व सर्व समस्या घालवणारी तंत्र-मंत्र शक्ती आहे. 2010 पासून तो आता जेलमध्ये आहे.

लोकांची चमत्कारावर विश्वास ठेवणारी मानसिकता ही अशा महाराज-बुवांच्या लैंगिक भूलथापांना बळी पडते हे ही एका बाजूला दिसून येते. कोणी तरी येऊन आपल्या समस्या सोडवेल ही शॉर्टकट मानसिकताही लैंगिक शोषणास बळी पाडते. हे खरे असले तरी काही पीडित स्त्रिया अशा सेक्ससाठी स्वत:हून तयार होतात. त्याचे कारण त्यांची भाबडी ‘आशा’ ही असते की यातून काहीतरी चांगले घडेल. त्याचबराबेर आपल्या लैंगिक समस्यांसाठी नेमके काय करायचे असते याचेही अज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर समाजात आहे.

अनेक मोठमोठे बुवा-महाराज हे सेक्स काऊंसेलर, डॉक्टर्स व संप्रेरके तज्ञांना वरचेवर भेटत असतात हे समोर आले आहे. भारतातील प्रसिद्ध संप्रेरक तज्ञ सुधाकर कृष्णमूर्ती म्हणतात की या महराज-बुवांची सेक्स करण्याची इच्छा सामान्य लोकांसारखीच तीव्र असते. त्यांना हस्तमैथुन किंवा स्वमर्दन पाप वाटत असल्याने ते स्त्रियांचा-भक्तीणींचा वापर करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सेक्शुअल हेल्थ कमिटीवर असलेल्या कृष्णमूर्तींनी ठासून सांगितले आहे की, बहुसंख्य बुवा-महाराज यांना शिश्नात ताठरता न येण्याची समस्या असते. त्यांना असा उपाय हवा असतो की ज्यामुळे एका वेळी अनेक जणींशी मैथुन ते करतील. यासाठी ते औषधेही घेण्यास मागे-पुढे पाहत नाहीत.

अनेक महाराज-बुवांचे लहानपण मानसिकद़ृष्ट्या अत्यंत अस्थिर व बिघडलेल्या परिस्थितीत गेलेले दिसते. आसाराम बापूंचा मुलगा नारायण साईच्या लहानपणीचे किस्से खूप बोलके आहेत. माऊंट अबूच्या जवळील जंगलात वडिलांबरोबर गुहेत राहण्याचे दिवस त्याला भयंकर वाटतात. जंगलात कुठेही त्याचे वडील त्याला सोडून जायचे आणि परत गुहेत येण्याची आज्ञा करायचे. साबरमती नदीत ते त्याला अक्षरश: फेकून द्यायचे आणि असेच पोहायला शिक म्हणायचे. त्याला शिकण्याची व अभ्यासाची अजिबात आवड नव्हती. नवव्या इयत्तेत तो संपूर्ण नापास झाल्यावर बाहेर पडला. प्रश्न सोडविताना उत्तर पत्रिकेवर तो फक्त ‘हरी ओम हरी’ एवढेच लिहून काढे. वडिलांच्या प्रवचनावेळी ढोल वाजविणे आणि नाचणे-गाणे एवढेच त्याचे काम उरले होते.

महाराज-बुवांचे विचार हे अनेक दोषांनी भरलेले आढळतात. एखादी गोष्ट पटवून द्यायची झाली तर ते अनेक मानसिक क्लृप्त्यांचा वापर करतात. उदाहरणार्थ भक्तांना पूर्णपणे आपल्या विचारांच्या प्रभावाखाली सतत ठेवणे. अनेक बुवा महाराज हे विविध प्रोग्राम्स आखतात. ध्यान, योग याचे 3 आठवड्यापासून 2 महिन्यांपर्यंतचे त्यांचे ‘पॅकेज’ असते. यावेळी ते भक्तांना त्यांच्या डोक्यात दुसरे कोणतेच विचार येऊ नयेत म्हणून एक योजना आखतात. 4 तासांपेक्षा जास्त वेळ झोपायचे नाही, पहाटे उठून ध्यान धारणा, प्रात: स्मरण वगैरेने सुखात करायची. मग बुवा-महाराजांची प्रवचने, डी.व्ही.डी., सत्संग विधी दिवसभर ठेवायचे आणि सात्विक आहार, पाणी व चप्पल न घालता फिरणे वगैरे अज्ञान द्यायच्या. हे सर्व दिवस करायचे. अशा पूर्ण गुंतून राहण्याने भक्तांस स्वतंत्र विचार करण्याची फुरसतच मिळत नाही. झोप कमी राहिल्याने मेंदूवर ताण येतो. आणि पडल्या पडल्या झोप येत रहाते. या ग्लानी आणि गुंगीत अध्यात्माचा ओव्हरडोस मानसिक गुलामगिरी तयार करतो. याचे टोकाचे उदाहरण म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटमधला तज्ञ असलेला संतोष 35 वर्षांचा संतोष नित्यानंदांचा भक्त बनला. दिवस अन् रात्र तो त्यांच्या सहवासात अशा पद्धतीने राहिल्यावर तो नित्यानंदमय बनला. इतका की त्याने त्याचे नाव बदलून शांतीमयानंद ठेवले. त्याच्या आई-वडिलांनी कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली की, आमचा मुलगा गेली सहा वर्षेनित्यानंदांच्या आश्रमात आहे, त्याची तेथून सोडवणूक करून मिळावी. पण संतोष आपल्या आई-वडिलांना येणार नाही असे ठामपणे सांगून आश्रमवासी बनला.

जर असे गृहीत धरले की महाराज बुवांना सेक्सची इच्छा होत नाही तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांच्या मेंदूत व मेंदूतील रसायनांमध्ये काहीतरी गफलत आहे. नाहीतर एखादा लैंगिकतेचा विकार आहे. मेंदूतील डोपामीन व अन्य संप्रेरकांच्या सामान्य पातळीत जर फरका पडला तर लैंगिक इच्छेवर त्याचा परिणाम होतो. मग काही वेळेस अती कामेच्छा हा विकार होणे किंवा कामेच्छा पूर्णपणे नाहीशी होणे हा विकार होतो. अतीकामेच्छा ज्यास इंग्रजीत हायपरसेक्शुअ‍ॅलिटी म्हटले जाते, अशा असणार्‍या व्यक्ती अनेक जोडीदारांबरोबर मैथुन करीत राहतात. याचा अर्थ सेक्सचे व्यसनच त्यांना जडते असा होऊ शकतो. त्यातून बलात्कार, लैंगिक चाळे, एकापेक्षा अनेकांबरोबर संभोग करीत राहणे, पोर्नोग्राफी पाहण्यात सतत डुंबलेले असणे, स्वत:चे शरीरप्रदर्शन करणे, लहान मुलांशी लैंगिक संबंध बळजबरीने ठेवणे, असे प्रकार सुरू होतात.

सेक्स करीत रहावेसे वाटणे हे जेव्हा स्वत:च स्वत:वर ताबा न रहता घडू लागले तर त्यास मैथुनाची स्वसक्ती म्हटले जाते. असे घडण्यामागे काळजी, एकटेपणा, स्वत:वरचा विश्वास कमी होणे या गोष्टी असतात. आणि जर संभोग केला की मग तात्पुरते चांगले वाटते. नंतर अपराधीपणा वाटू लागतो. प्रचंड चिंता सुरू होते. आणि मग पुन्हा एकटेपणा, विश्वास कमी होणे असे चक्र सुरू होते. पुरूषांमध्ये ही मैथुन स्वसक्ती मोठ्या प्रमाणावर आढळते. अनेक छिन्नमनस्कता व मॅनिया या मानसिक विकृतीमध्येही ही स्वसक्ती आढळते. फेफरे येणे, मेंदूच्या कपाळामागील भागास इजा, मेंदूतील काही भागांचे कार्य नीट न होणे अशा रूग्णांतही ही सक्ती आढळते.

म्हणजे सामान्य कामवर्तनापेक्षा वेगळे कामवर्तन ही गोष्ट कामविकारांशी किंवा कामबिघाडांशी संबंधित असते. मग अशा महाराज साधू-बुवांच्या बाबतीत ज्यांनी सेक्स स्कँडल केलेले आहेत त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे का हे पहायला हवे.

अशी कोणतीही शक्ती, औषध वा क्रिया नाही ज्याने लैंगिकता काबूत ठेवता येईल. ती काबूत ठेवण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. असे करणे चूक आहे. लैंगिक क्रियेस योग्य मार्ग उपलब्ध करून दिला तर ती संयमीपणे आणि व्यवस्थितरित्या व्यक्त होत रहाते, व त्याचा उपद्रवही कोणास होत नाही.

योग्य मार्ग याचा अर्थ स्त्री-पुरूष संबंधांविषयीचे व्यवस्थिथ वैज्ञानिक ज्ञान घेणे आणि असे संबंध निरामयरित्या कसे ठेवायचे हे शिकणे.

लैंगिक ज्ञान शिक्षण किंवा सेक्स एज्युकेशन हा जसा एक मार्ग आहे तसाच याविषयी समाजमन अनुकूल बनेल असे शासनाचे धोरण असणे हाही एक मार्ग आहे. निव्वळ कायदे करून हा प्रश्न सुटत नाही. आसाराम बापूच्या कृत्यामागे हेही एक कारण आहे. म्हणजे समाजातील गैरसमजुती, सेक्ससंबंधी वैज्ञानिक शिक्षणाचा अभाव आणि शासनाची उदासीनता यामुळे आसाराम बापू-नित्यानंद यांच्या सारख्यांचे फावते.

मग प्रश्न उरतो आसाराम बापूंना अटक केल्याने समाजास फायदा होईल की नाही? आसाराम बापूंची अटक हा काही लैंगिक दुराचारावरील उतारा नव्हे. ती एक शिक्षा झाली. दंड झाला. शिक्षा केल्याने लैंगिक दुराचारी वर्तन थांबेल असे मानायचे काही कारण नाही. शिक्षेने जरब बसेल. पण समाजमनाचे काय? समाजमन जैसे थे राहील. ते बदलणार नाही. ते बदलायचे असेल तर अध्यात्मिक गुरूंनी सेक्सचा त्याग करायला हवा हे स्वत:चे मत समाजाने सोडून द्यावे लागेल. कारण महाराज-बुवा ही देखील माणसेच आहेत. ती देखील मताच्या ओझ्याखाली वावरत असतात. हा जो सामाजिक दबाव असतो तो त्यांना एकटे पाडतो, त्यांची निराशा वाढवितो. त्यामुळे महाराज-बुवा-पास्तर-मुल्ला-मौलवी यांची देखील एक मैथुन भूख असतेच. ती त्यांना मारून टाकण्यास सांगण्याऐवजी त्यांनी योग्य रितीने व जबाबदारी घेऊन भागवावी अशी मानसिकता समाजाने स्वत:च स्वत: तयार करावयास हवी. संसार त्याग, स्त्री म्हणजे माया वगैरे वेडगळ कल्पना सोडून द्याव्यात.

सेक्स हा सेक्स असतो. त्यांत देव, धर्म, पूजा-विधी-कर्मकांडे यांची ढवळाढवळ असता कामा नये. समाजाने सेक्सकडे पाहताना एवढेच पहावे की त्यात अवैज्ञानिक, विकृत, हानीकारक व लुबाडणारे काही नाही ना? एवढे जरी समाजास कळले तरी खूप काही घडेल.

लैंगिक गुन्हे हे गुन्हेगारी वर्तनात मोडतात. अनेक बुवा-महाराज हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असू शकतात, जर ते तसे असतील तर त्या त्या बुवा-महाराजांच्या भक्तांनी सावध होणे अत्यंत गरजेचे असते. गुन्हेगार सुधारणेसाठी त्याला कायद्याच्या चौकटीत बसवून प्रचलित कायद्यानुसार योग्य ती शिक्षा देत असतानाच, त्यांच्यात मानसिक बदल घडविणे हा प्रभावी उपाय असू शकतो. आसाराम बापूस पकडल्यावर त्याबद्दल भक्तांनी राग-राग करण्याचे कारण नाही आणि तो योग्य मार्गही नाही.

भारतीय परंपरेत हे पूर्वीही घडत होते आणि यापुढेही घडत राहील. जोवर समाज-नीती अन् विवेकाचा स्वीकार करीत नाही व वैज्ञानिक दृष्टिकोनाने धर्म-अध्यात्मिक-बुवा यांचे मूल्यमापन करत नाही तोवर असे प्रकार घडत राहणारच.

पुरूषार्थ-मोक्ष-भक्ती-कर्म अशा फसव्या शब्दांची जादू जोवर समाज लादून घेईल तोवर आसाराम-नित्यानंदांचे अवतार प्रगट होत राहणारच.

बुवा-महाराजांना काम आहार द्यायचा की काम नशा करू द्यायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.

– डॉ. प्रदीप पाटील

लेखक संपर्क : 9890844468