Categories
बुवाबाजी

दावूनी वैराग्याच्या कळा। भोगी विषयाचा सोहळा ॥

वार्षिकांक – २०१३

आचार्य अत्रे लिहितात, “बुवा म्हणजे धनलोभाचे, व्यभिचाराचे आणि व्यसनांचे मूर्तीमंत नरककुंड. बुवाबाजी हे समाजावरचे महाभयंकर संकट आहे. दारू किंवा जुगारापेक्षाही विनाशकारक व्यसन म्हणजे बुवाबाजी. बुवाबाजीपुढे अक्कल मुळी कामच करत नाही. बुवादिसला की आमच्या मेंदूला पक्षाघात होतो. आमचे संस्कार, आमचे शिक्षण, आमची अक्कल आणि आमचा शहाणपणा बुवाच्यापुढे सपशेल लोटांगण घालतो. म्हणून बुवाबाजी हा इंडियन पीनल कोडद्वारे फौजदारी गुन्हा ठरवण्यात यावा.

स्त्री लंपट बुवाबाजीचा पंचनामा

‘बुवाबाजी हा इंडियन पीनल कोडान्वये एक फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला पाहिजे.’ अशी मागणी महाराष्ट्रातील थोर पत्रकार आचार्य अत्रे यांनी 1941 साली केली होती. या घटनेला यंदा 72 वर्षेपूर्ण झाली. 21 सप्टेंबर 1941 साली साप्ताहिक ‘नवयुग’मध्ये ‘नारायण महाराज पळाले’ अशा शीर्षकाचा अग्रलेख अत्रेंनी लिहिला. योगायोगाने 21 सप्टेंबर या दिवशीच(1995 साली) महाराष्ट्रात एक ‘राजकीय बुवाबाजी’ झाली. ‘गणपती दूध पिऊ लागला’ ही अफवा कर्णोपकर्णी झाली. लोकांच्या झुंडी उडल्या, मुख्यमंत्री असणार्‍या मनोहर जोशी यांनीसुद्धा हा ‘प्रयोग’ करून पाहिला. अखेर अंनिसने या चमत्काराचा पर्दाफाश केला. त्यापासून 21 सप्टेंबर हा दिवस ‘चमत्कार विरोधी दिन’ म्हणून सर्वत्र साजरा होतो.

बुवाबाजीच्या प्रकरणांचा आढावा घ्यायचा म्हटले तर अगदी प्राचीन काळापासूनही करता येईल. पण एवढ्या खोलात जाण्यापेक्षा या लेखाची मर्यादा लक्षात घेऊन आचार्य अत्रे लिखीत नारायण महाराज प्रकरणापासूनच सुरवात करू या.

महाराष्ट्राचा भयानक बुवा

नारायण महाराज नावाचा हा इसम मूळचा कर्नाटकातील बागलकोटचा. सही करण्यापलिकडे महाराजाचे शिक्षण नाही. कसलीही विद्या जवळ नाही. याला प्रवचन करता येत नव्हते. कीर्तन करता येत नव्हते. व्याख्यान देता येत नव्हते. जपजाप्य, पोथी पूजन ह्याचेही महाराजाला सोयरसुतक नव्हते. हा कोणाला अंगारे देत नसे. कोणाला गंडा ताईत देत नसे. उपासतपास, व्रतवैकल्ये ह्या भानगडी महाराजांच्या गावी नसत. हे सारे उपद्व्याप त्यांच्या भक्तांनी करावेत. सर्व भानगडीवर महाराजाचा एकच तोडगा; तो म्हणजे ‘सेवा.’

ज्याला काही पाहिजे असेल मग ते मूल असो, रोगनिवारण असो, नोकरी असो, बढती असो किंवा इतर काहीही असो यावर उपाय एकच ‘सेवा.’ सहकुटुंब महाराजाच्या सेवसाठी आपल्या सर्वस्वावर पाणी सोडून राहिले पाहिजे. ‘सेवा’ केली पाहिजे. महाराजाच्या तोंडात चोवीस तास विडा असे. कोणा भक्ताने प्रसाद मागितला की, महाराज आपल्या तोंडातला चोथा(पिंकासह) भक्ताच्या हातावर टाकीत. महाराजांचा हा ‘अमूल्य प्रसाद’ भक्त निमूटपणे तोंडात टाकी. महाराजाचे स्नान बादशाही थाटाचे असे. दहा-वीस स्त्रिया त्याच्या अंगाला नाना तर्‍हेची उटणी, सुवासिक तेले लावून सुगंधित स्नान घालत. महाराजांचे अंग पुसणे, त्यांना रेशमी आणि जरीचे कपडे घालणे ह्या सर्व गोष्टी स्त्रियाच करत. हे काहीच नाही. महाराजांचे पाय चोळावयाचे असतील तर सेवेला असणार्‍या तरूणी आपल्या स्तनांना साजूक लोणी लावून त्या स्तनांनी महाराजांच्या पायाचे तळवे चोळत असत.

महाराज मुंबईला आले की, अंजनी नावाच्या एका प्रख्यात नायकिणीच्या घरी मुक्काम करत. कल्याणचे ‘साठे’ नावाचे श्रीमंत गृहस्थ महाराजाची ‘किर्ती’ ऐकून केडगावला आले. पत्नी सुंदर होती पण पोटी मूल नव्हते. महाराजांच्या सेवेसाठी केडगावला बंगला बांधून राहिले. महाराजांनी साठ्यांना कडक ब्रम्हचर्य पाळून उपासना करण्यास सांगितले. महाराज रोज दुपारी साठ्यांच्या बंगल्यात जात. आणि साठ्याच्या पत्नीबरोबर एकांत करीत. थोड्याच कालावधीत महाराजांच्या ‘कृपेने’ साठीणबाईला मुलगा झाला. पुढे महाराजांना साठ्यांची अडचण वाटू लागली. तेव्हा आपल्या तैनातीतल्या कानडी गुंडांकरवी त्यांनी साठ्यांना नदीत बुडवून ठार मारले. साठीणबाईशी संबंध ठेवण्यात महाराजाला कोणतीच आडकाठी नव्हती. पुढे महाराज बद्रीकेदारला यात्रेला निघाले. सोबत साठीणबाई होत्याच. महाराजांनी पुन्हा ‘पराक्रम’ केला. साठीणबाईला मूल झाले. महाराजांची ‘अखंड कृपा’ चालूच राहिली.

या केडगावच्या स्त्रीलंपट महाराजाचे शिष्यही तोलामोलाचे. नटवर्य केशवराव दाते. पहिल्या महायुद्धात कॅप्टन म्हणून नावाजलेले डॉ.बेलसरे. ‘केसरी’चे संपादक साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर. मुंबईचे गुजराती व्यापारी, पुण्यातील वाणसौद्याचा दुकानदार. इंदूरचे मल्हारराव नावाचे श्रीमंत गृहस्थ, इंदूरचेच सेवानिवृत्त सरन्यायाधीश अशी मातब्बर मंडळी केडगावच्या महाभयंकर नारायण महाराजाच्या नादी लागलेली. सतत पन्नास वर्षेमहाराजाची बुवाबाजी चालू होती. भक्तिणींची ‘सेवा’ घेता घेता या लंपट महाराजाला गर्मी अथवा परम्यासारखा लैंगिक रोगही जडला होता. त्याच्या या राक्षसीकृत्याची वाच्यता कुठेच झाली नाही.

पुढे आचार्य अत्रे यांनी या केडगावच्या महाराजाचा दाखल घेऊनच ‘बुवा तेथे बाया’ हे नाटक लिहिले. नवयुग साप्ताहिकातून 21 सप्टेंबर 1941 रोजी ‘नारायण बुवा पळाले’ असा आणि 28 सप्टेंबर 1941 रोजी ‘नारायण महाराज- बुवा का सावकार’ असे दोन अग्रलेख लिहिले. असा हा ‘महाराष्ट्राचा भयानक बुवा’(अत्रेंच्या शब्दात) बेंगलोरला यज्ञ करण्यासाठी गेला व यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या दिवशीच मेला.

जुन्नरचा वाघमारे बुवा

बुवाबाजीच्या इतिहासात केडगावच्या नारायण महाराजासारखा किंबहुना त्यापेक्षाही अधिक, मेंदूला बधीर करणारं प्रकरण म्हणून ‘जुन्नरचा वाघमारे बुवाचं’ देता येईल. मूळ नाव भाऊसाहेब श्रावण वाघमारे. शिक्षण मॅट्रीकपर्यंत. बायको आंबेगावला तलाठी; नंतर सर्कल अधिकारी होत्या. आधी कळंबला राहणारा वाघमारे बुवा नंतर बेकरी व्यवसायाच्या निमित्ताने नारायणगावला आला. पूर्वीचा वैद्यकीय व्यवसाय होताच. याच माध्यमातून बुवाची ओळख शकुंतलाबाई कासार या महिलेशी झाली. उपचार करता करता बुवाच्या स्वयंपाकघरातच या दोघांचा पहिला संबंध आला. या बाईने त्यांना जुन्नरला बोलावलं. कासारबाईंनी एक गुप्त पूजा करायची असून तुझी मदत लागेल असं सांगितले. पंधरा सोळा वर्षांची एक कोड असणारी मुलगी होती. तिला ‘योगिनी पूजा’ करण्यास सांगून त्या अल्पवयीन मुलीशी वाघमारे बुवाला संभोग करायला लावला. ही पूजा मग नेहमीच व्हायला लागली. कासारबाई एकेका वेळेस 15-20 महिला जमवायची. जिची पूजा असेल तिच्याशी वाघमारे संभोग करायचा. ‘लग्न जमत नाही, मूल होत नाही, नोकरी मिळत नाही’ अशी नेहमीची कारणे यामागे होतीच परंतु काही बाबतीत लैंगिक अतृप्तता हे देखील कारण होतेच.

खालच्या जातीच्या स्त्रियांपासून ब्राम्हण, गुजराथी, मारवाडी समाजाच्या जवळजवळ 50 हून अधिक स्त्रियांना वाघमारे बुवाने भोगले. त्यात कुमारिका, संसारी स्त्रिया तसेच विधवा यांचा समावेश होता. या महिलांमध्ये कुणी डॉक्टरीणबाई, कुणी मुख्याध्यापिका, कुणी बँकेत काम करणारी अशांचा सहभाग होता. बुवाकडं येणारी काही कुटुंबच्या कुटुंबे होती. आई अन् तिच्या चार मुली यायच्या. आईच्या देखत मुलींबरोबर संबंध, मुलींच्या देखत 60 वर्षांच्या आईबरोबर संबंध. कसलाच धरबंद नाही. नवरा बाहेर बसला असता बंद खोलीत त्याच्या बायकोबरोबर बुवाच्या ‘लीला’ सुरू असत. पुण्याच्या आसपासच्या परिसरातील प्रतिष्ठित घरातील स्त्रिया ज्यात काही राजकारणी लोकाच्याही घराण्याचा समावेश आहे. सर्वजण वाघमारे बुवाच्या जाळ्यात साफ अडकले होते. पुजेच्या नावाखाली या बुवाने एकेका स्त्रीशी वीस वीस वेळा संभोग केला. काही महिलांनी स्वत:च्या मुली या बुवाला अक्षरश: पुरवल्या. 12 वर्षांच्या मुलीपासून 60 वर्षांच्या बाईपर्यंत वाघमारेने पूजा केल्या.

या पूजेचा विधी काय होता? या पूजेला योनीपूजा किंवा भैरवीपूजा असे म्हटले जायचे. गणपतीची मूर्ती समोर ठेऊन ज्या 15-20 स्त्रिया जमल्या असतील त्यांनी संपूर्ण नग्न व्हायचं. मध्ये चौकात रांगोळी घातली असायची. त्यात जिची पूजा असेल तिला नग्न करून बसवायचं. तिच्या शरीराच्या प्रत्येक पॉईंटवर हळदकुंकू लावायचं. योनीपासून थेट कपाळापर्यंत गंधाची रेष काढायची. मग वाघमारे बुवा पायापासून डोक्यापर्यंत त्या स्त्रीचे चुंबन घ्यायचा आणि त्यापुढे संभोग सुरू व्हायचा. ज्या बाईच्या पूजा संपल्या असतील तिची शेवटच्या पूजेनंतर समाप्तीची योनी पूजा व्हायची. त्या बाईला गरम पाण्याने आंघोळ घालून नंतर पुन्हा दुधाने आंघोळ घालायची व परत पाण्याने आंघोळ करायची.

वाघमारे बुवाला पोलिसांनी अटक केल्यावर त्याच्या घरच्या जप्तीत हिडीस प्रकारचे पुस्तकांचा गठ्ठा मिळाला. वाघमारे जेलमधून बाहेर आल्यावर या स्त्रियांना ब्लॅकमेल करील अशी पोलिसांना भीती होती. कारण हे प्रकरण वर्तमानपत्रातून चव्हाट्यावर येताच या प्रकरणाशी संबंधित स्त्रियांनी आपल्या घरामध्ये विषारी डायझिनॉन आणून ठेवले होते. पुढे जामीनावर सुटताच हा वाघमारे बुवा वडगाव शेरी येथे सपत्नीक एका बंगल्यात राहायचा. त्याने बंगल्याचे नाव ठेवले ‘विठाई.’ वाघमार्‍यांनी नारायणगाव सोडल्यावर काही स्त्रिया सरदेशपांडे नावाचे इसमाकडे पूजा करायला जायच्या. थोडक्यात उत्तर पेशवाईतील ‘घटकंचुकी’ या प्रकाराची आठवण करून देणारे हे ‘बुवा वाघमारे’ प्रकरण.

स्त्रीलंपट तोडकर महाराज

केडगावचा नारायण महाराज. जुन्नरचा वाघमारे बुवा यांच्या ‘परंपरेतील’ आणखी एक गाजलेले प्रकरण म्हणजे कोल्हापूरच्या तोडकर महाराजाचे. याचे नाव शिवलिंग तोडकर. शिक्षण 10 वी, वय 60 च्या पुढे. म.रा.वि.मंडळात कारकून म्हणून निवृत्त. फक्त पगार घेणं एवढंच काम. कधीही बदली झाली नाही. अंगावर सोनेच सोने. 2/3 कोटींची इमारत. हनुमानभक्त. ‘द्रोणागिरी’ नावाचा मठ स्थापून भोंदूगिरी सुरू. सायकल, एम-80 या गाडीवरून फिरणार्‍या तोडकराला एका मुंबईच्या भक्ताने ‘असेंट’ भेट दिली. या वाहनात हनुमानभक्त म्हणवणार्‍या महारजाच्या शेजारी महिलांचा घोळकाच असायचा. सुंदर स्त्रियांवर महाराजांची विशेष नजर. अशा ‘भाविक’ स्त्रीला पेढा देणे, आपल्या गळ्यातील हार काढून तिच्या गळ्यात घालणे. कधी कधी पेढा भरवणे. अशा विविध लीला तोडकर करायचा. हनुमान मंदिराच्या गाभार्‍यात महिलांनी प्रवेश करू नये असा हिंदू संस्कृतीचा नियम. पण द्रोणागिरीत महिलांना गाभार्‍यात थेट प्रवेश. (किरकोळ कारणावरून ‘भावना’ दुखावणार्‍या हिंदुत्ववाद्यांच्या भावना नेमक्या इथेच का बोथट होतात?)33 फुटांची हनुमानाची भव्य मूर्ती आश्रमात आहे. भविष्यकथनाचा महाराजांचा धंदा बराच जोरात चालू होता. आश्रमात महाराज भक्तांना जेथे भेटायचे त्या खोलीच्या शेजारीच एक गुहेसारख्या आकाराची खोली होती. या गुहेत मानसरोवर व अध्यात्मिक चर्चा स्थान असे दोन काल्पनिक देखावे चितारले होते. या गुहेतच महाराज स्त्रियांशी ‘चाळे’ करायचा. ठाणे जिल्ह्यातील पालघर येथील दोन तरूणी महाराजांकडे भेटावयास आल्या. यापैकी एक पदवीधर तर दुसरी बारावीत होती. महाराजाने त्यांना गौतम ऋषी, अहिल्या व इंद्रदेव यांच्या कथेतील ओळी ऐकवल्या. ‘चाळे’ सुरू केले. त्याबरोबर एकटी असणारी 19 वर्षांची ही तरूणी घाबरून बाहेर आली. तिच्याबरोबर असणारी दुसरी मुलगी महाराजाच्या खोलीत गेली. तिलाही तोच ‘अनुभव’ आला. दोघी अत्यंत घाबरल्या अवस्थेत मठातून निघाल्या. तरूणींनी घरी पोचल्यावर घडला ,प्रकार सांगितला. त्यांच्या घरच्यांनी अंनिसशी संपर्क साधला. अंनिसला बरोबर घेऊन पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनीही कार्यतत्परता दाखवून तोडकरला अटक केली. हनुमानभक्त तोडकरला शनिवारीच अटक झाली हे विशेष. तसेच दुसर्‍याचे भविष्य सांगणार्‍या महाराजाला स्वत:चे भविष्य दिसले नाही हे सुद्धा नमूद करायला हवे. या महाराजाला वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात नेताना कोल्हापूरच्या नागरिकांनी चपलाने बडवले.

तोडकर महाराज हे कोल्हापूरातील एक बडे प्रस्थ होते. कोल्हापुरातील मोठ्या कार्यक्रमात महाराजाची हजेरी ठरलेली. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात यु.जी.सी.चे चेअरमन अरूण निगवेकर यांनी महाराजांची आवर्जून दखल घेतली होती. एक शिक्षणसम्राट हे महाराजांचे भक्त होते. पोलीस महानिरीक्षक ओमप्रकाश वाली हे सुद्धा भक्त होते. तोडकराविरूद्ध कोर्टाच्या सुनावणीस मुंबईतील एक आमदार पूर्णवेळ कोर्टात हजर होते. द्रोणागिरी मठास भेट देणार्‍यात मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनोहर जोशी, अनेक मंत्री आमदार, खासदार, लता मंगेशकर, अण्णा हजारे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, विधानपरिषदेचे अध्यक्ष ना.स.फरांदे, पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, व.पु.काळे, अरूण दाते, छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष असे अनेक ‘मान्यवर’ आहेत. तोडकराच्या अनिर्बंध बुवाबाजीला मुंबईच्या दोन धाडसी मुलींमुळे आवर बसला. कोल्हापुरात तोडकराविषयी चालणारी सुरवातीची ‘कुजबुज’ या प्रकरणानंतर तोडकरला चपला मारण्यापर्यंत पसरली. कोल्हापुरच्या या तोडकर महाराजाच्या ‘खोडकर’ लिला थांबवण्यात अंनिसचा वाटा मोठा आहे.

ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करूनी म्हणती साधू
अंगा लावुनिया राख। डोळे झाकुनि करती पाप
दावून वैराग्याचा कळा। भोगी विषयाचा सोहळा
तुका म्हणे सांगू किती। जळो तयाची संगती
-संतश्रेष्ठ तुकाराम महाराज

नित्यानंद : योगी नव्हे भोगी

1 जानेवारी 1978 रोजी थिरूमनलाई या तामीळनाडू राज्यात अरूणाचलम व लोकनायकी या मातापित्याच्या पोटी नित्यानंदाचा जन्म झाला. लहानपणी हे बाळ कधी रडले नाही. असा मातापित्यांचा दावा. देवाच्या लाकडी मूर्ती घडवण्याचा छंद. रघुपती योगा या गुरूच्या मार्गदर्शनाखाली पतंजली अष्टांग योगाचे अध्यात्मिक धडे घेतले. बेंगलोरजवळ आश्रमातून भक्ती, योग, अद्वैतवाद यावर भक्तांना मार्गदर्शन करत असे. पुढे अध्यात्मिकतेच्या नावाखाली स्मगलिंगही सुरू केले. 24 कॅरेट सोने स्मगलिंगचे आरोप नित्यानंदावर आहेत. मॉ नित्यानंद गोपिका ही पर्सनल सेक्रेटरी स्मगलिंग व सेक्ससाठी महाराजाला मदत करत असे. अमेरिका, कॅनडा, युरोप, सिंगापूर असे परदेशातही नित्यानंदाचे भक्तगण आहेत. हिंदू युनिव्हर्सिटी अमेरिकेच्या चेअरमनपदी नियुक्ती तसेच ‘वॅटकिन्स’ ने अध्यात्मिक क्षेत्रातील 100 प्रभावशाली व्यक्तीत याचा समावेश केला होता.

पण हा नित्यानंद सिनेनटी रंजिता हिच्याबरोबर योगाचे नव्हे तर भोगाचे धडे देताना सार्‍या जगाने पाहिले. अन् खरे स्वरूप बाहेर आल्यावर नित्यानंदाचा ‘आनंद’ ओसरला. 15 पेक्षा जास्त स्त्रियांशी लैंगिक शोषण केले असे ‘मिड-डे’ मध्ये म्हटले आहे. रंजीताबरोबरचा रोमान्स सुरवातीला नित्यानंदाने नाकारला. पण व्ही.डी.ओ. दाखवल्यावर कबुली दिली. सी.आय.डी.चौकशीत रंजिता हिने ही कबुली दिली. पण नंतर दोघांनी नकार देताना नित्यानंदाने असा प्रतिवाद केला की, मी ना स्त्री ना पुरूष त्यामुळे हा गुन्हा मी करू शकणार नाही. परंतु सी.आय.डी.ने पुरेसे पुरावे सामोरे करताच नित्यानंद पोपटासारखा बोलू लागला. आपण सुंदर स्त्रियांना सेक्ससाठी विचारणा करीत होतो अशी कबुली दिली. नित्यानंदाचे हे खरे रूप जगाला दाखवण्यात लेनिन नावाच्या त्याच्या ड्रायव्हरचा मोठा वाटा आहे. नित्यानंद स्वत:ला योगी म्हणवत असला तरी एकूणच पाहता तो ‘भोगी’ म्हणण्याच्या लायकीचा आहे असेच म्हणावे लागेल.

तोडकराच्या बुवाबाजीला आणि लंपटपणाला तोडकर जबाबदार आहेच. परंतु त्याची प्रतिष्ठा आणि दबदबा स्वत:च्या सहभागाने ज्यांनी वाढवला ते सर्वजण या अत्याचाराचे व लंपटपणाचे गुन्हेगार आहेत. अत्याचार होऊनदेखील तक्रार करायला लागणारे धैर्य समाजात उरत नाही अशी अवस्था निर्माण करायला बुवाच्या दरबारात ज्यांनी ज्यांनी हजेरी लावली तो प्रत्येकजण जबाबदार आहे.
-ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे

कृपालू नव्हे लुटारू महाराज

ऑक्टोबर 1922 साली अलाहाबादमध्ये जन्मलेल्या रामकृपालू त्रिपाटी हा इसम पुढे कृपालू महाराज म्हणून बुवाबाजीत ‘गाजला.’ वयाच्या 16 व्या वर्षी ‘वनवास’ पत्करलेल्या या महाराजाने इंदूर व वाराणसी येथे आयुर्वेद व संस्कृतवर मोठी प्रवचने दिलीत. जगद्गुरू ही पदवी वयाच्या 34 व्या वर्षी काशीतील विद्वत परिषदेमार्फत मिळाली. भारतामध्ये चार व अमेरिकेत एक अशी पाच अध्यात्मिक केंद्रे हा कृपालू महाराज चालवतो. याच्या थोरवीची गाणी प्रख्यात गायक अनुप जलोटा, मन्नाडे व अनुराधा पौडवाल यांनी गायलीत. याचा दबदबा एवढा की, सुरवातीला याच्या विरोधात तक्रार दाखल करून घ्यायला पोलीस तयार नव्हते. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप या महाराजावर आहेत. 1991 मध्ये 2 मुलींचे किडनॅप केले प्रकरणी केस दाखल आहे. एका 22 वर्षीय महिलेवर त्रिनिदाद येथे ‘रेप’ केल्याचा आरोप कृपालूवर आहे. एका 12 वर्षी मुलीच्या लैंगिक शोषणाची तक्रार तिच्या वडिलांनी कृपालूविरूद्ध केली आहे. याचे एकूण चारित्र्य पाहता महाराजाला कृपालू म्हणण्यापेक्षा लुटारू का म्हणू नये अस प्रश्न पडतो.

मयुरी जैनचे काय झाले?

मध्यप्रदेशातील करेली गावातील राजकुमार व शांताबाई जैन यांची मयुरी ही मुलगी. महाविद्यालयात शिकताना इकबाल नावाच्या तरूणाशी मयुरीचे प्रेमसंबंध तयार झाले. हे प्रेमसंबंध जैन कुटुंबियांना मान्य नव्हते. इकबालपासून दूर ठेवण्यासाठी मयुरीला सांगली जिल्ह्यातील जुनी धामणी येथील जैन बस्तीत वास्तव्यास आणले. मयुरी साध्वी म्हणून मंदिराच्या अतिथीगृहात राहू लागली. प्रवचन व धार्मिक कार्यात भाग घेऊ लागली. या दरम्यान इकबालशी पत्रव्यवहार चालूच होता. इकबाल तिला भेटायला आल्यावर काही तरूणांनी त्याला मारहाणही केली. पत्र व दूरध्वनी या माध्यमातून इकबाल मयुरीच्या संपर्कात येत होता. हे प्रकरण वाढत आहे हे लक्षात येताच एका तरूणास पन्नास हजार रूपये देऊन मयुरीची हत्या करण्याची सुपारी दिली. 15 मे रोजी मयुरीचा ठरलेल्या योजनेनुसार खून करण्यात आला. साध्वी मयूरीच्या खुनाची संशयाची सुई जैन मुनींच्याकडे पोहोचली होती, असे बोलले जात होते. खुनाअगोदर मयूरीने आपल्या प्रियकराला जैन मुनी कसे आपल्याशी लगट करतात हे पत्राद्वारे कळविले होते. समाजाचा दबाव आल्यानंतर मुनींनी सल्लेखना व्रत घेऊन आपले जीवन संपविले.

हे प्रकरण येथे सांगण्याचे कारण असे की, बुवाबाजीच्या काही प्रकरणात काही महत्वाची माहिती गुप्त राहते. खरे तर ठेवली जाते असे म्हटले तरी चालेल. मयुरी जैन प्रकरणातील अनेक महत्वाची ‘पाने’ गहाळ झाली आहेत. सांगलीमध्ये या प्रकरणाची चर्चा जोर धरत असताना अनेक तोंडी गोष्टी बाहेर आल्या. परंतु या प्रकरणात अनेक मातब्बर मंडळी मिटवामिटवीसाठी पुढे असल्याने बर्‍याच गोष्टी ‘अंधारात’ राहिल्या. ऐकीव माहितीवर कोण कितपत विश्वास ठेवणार? मुद्दा असा की, बुवाबाजीच्या अनेक प्रकारात कार्यकर्त्यांना हा अनुभव येतो की, प्रत्येक बुवाला एक ‘समाज’ असतो. तो समाज आपली नाचक्की न होण्याची पुरेपूर काळजी घेतो. त्यामुळे समाजातील व्यक्ती समाजाच्या अब्रूरक्षणासाठी कळत नकळत जबाबदारी उचलते. प्रसंगी याचा गैरफायदा त्या त्या बुवाला मिळतो. बुवा सुरक्षित राहतो. स्वधर्म, स्वजात याबद्दलची व्यक्तीची ओढ बुवाबाजीस पोषप ठरतेच. एवढेच नव्हे या ‘संरक्षणानेच’ बुवाबाजी फैलावते. मग बुवाची दहशत तयार होते. ‘सामना’ या चित्रपटात ‘मारूती कांबळेचे काय झाले?’ असा सवाल विचारला होता. मयुरी जैन प्रकरणातही मयुरी जैनचे काय झाले? असा सवाल अधूनमधून उठतोय.

बुवा भीती वाढवत असताना. अज्ञान वाढवत असतात. खोट्या कल्पनातून दैववादाचा प्रचार करतात. बुवा लोकांना अगतिक, निर्बुद्ध ठेवण्याची प्रक्रिया वाढवत असतात. बुवा दोन गोष्टींनी अनैतिक काम करतात. पैसा व स्त्रियांचे शोषण व दैववादाचा प्रचार. बुवाचे खरे सामर्थ्य लोकांच्या अगतिकतेत आहे. अगतिकता बुद्धी पांगळी करते. बुवाबाजी संपवायची असेल तर लोकांना चांगले जगण्याची हमी, स्त्रियांना समान वागणूक, सर्वांना आरोग्य सेवा असे सर्व अंगांनी परिवर्तन व्हायला हवे. धैर्य, आत्मविश्वास, विज्ञानदृष्टी बाळगून प्रश्नाच्या मुळाशी भिडण्याची वृत्ती विकसित झाली तर बुवाबाजी संपेल.
-डॉ.नरेंद्र दाभोलकर

बुवाबाजी व त्यामधून होणारे महिलांचे लैंगिक शोषण हे सर्व धर्मात, सर्व जातीत, सर्व राज्यात, सर्व देशात होत असते. वरील सर्व प्रकरणे ही प्रातिनिधीक स्वरूपाची आहेत. ही यादी वाढवायची म्हटली तर या विषयावर खंडच्या खंड लिहून होतील. वाघमारे बुवाच्या ‘कर्तृत्वासारखा’ दुसरे बुवा पासंगालाही पुरणारे नसले तरी ही बुवांची ‘भावकी’ कमी जास्त प्रमाणात महिलांच्या लैंगिक शोषणात समान भूमिका बजावताना दिसेल. प्रकरणे छोटी असली तरी अमरावतीचा शेख चाचा, जालन्याचा सिकंदर बाबा, इस्कॉन गुरूंचे पाशवी चाळे, ‘पोप’ म्हणवणार्‍या धर्मगुरूंचे लहान मुलांमुलींवरील व नन्सवरील अत्याचार अशी सर्वधर्मीय म्हणवणार्‍या बुवाबाजीच्या हनुमानाची शेपुट वाढवता येईल. प्रश्न आहे तो बुवाबाजीच्या माध्यमातून होणार्‍या महिलांच्या लैंगिक शोषणाला थोपवण्याचा. समाजातील सुशिक्षित म्हणवणार्‍या घटकाचे हे आद्यकर्तव्य आहे की, हा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याने करायला हवा. किमानपक्षी अंनिससारखी संघटना व तिच्या कार्यकर्त्यांच्या लढाऊपणाला पाठींबा द्यायला हवा. बुवाबाजीच्या प्रकरणात ‘समाज’ जेव्हा तोंड उघडायला लागेल, बुवाविरोधात साक्ष द्यायला आपल्या जाती-धर्माचा विचार न करता कर्तव्यबुद्धीने ज्यावेळी पुढे येईल, ‘सावित्रीच्या लेकी’ म्हणवणार्‍या महिला वर्गाला सावित्रीच्या कणखरपणाचा व सत्यशोधकी विचारांचा वारसा योग्य पद्धतीने जेव्हा समजेल, स्वत:ला ‘युवा’ म्हणवणारा वर्ग मन, मेंदू व मनगट बळकट करून व्यापक परिवर्तनाच्या लढ्यात उतरेल, ‘जशी अर्थव्यवस्था तशी मूल्यव्यवस्था’ हे सूत्र ज्यावेळी समजून घेऊन समाजवादी समाजाच्या उभारणीसाठी समाजातीलच जबाबदार घटक महत्वपूर्ण योगदान करेल तेव्हाच समाजाला पोखरणारी ‘बुवाबाजी’ नष्ट होईल.

उमेश सूर्यवंशी

लेखक संपर्क : 9922784065