महिलांनी महिलांचा घेतलेला शोध!
महिलांप्रमाणे पुरुषही बुवा, बाबा, महाराज, ताई यांच्याकडे जातात; पण आपला अभ्यास महिलांपुरता मर्यादित ठेवायचा आणि हा शोध महिलांनीच घ्यायचा, असे ठरवून या ‘पायलट स्टडी’ला म्हणजे प्राथमिक अभ्यासास सुरुवात केली.
महिला कार्यकर्त्यांनी आपल्या संपर्कातील, दहा महिलांशी चर्चा करावी, त्यांच्याकडून उत्तरे मिळवावीत आणि नंतर त्याचे एकत्रीकरण करायचे, असे ठरले. ‘महिला बुवांकडे का जातात?’ अशी समस्या असली, तरी त्यांचे प्रमाण समजण्यासाठी, गांभीर्य समजण्यासाठी आणि निष्कर्ष काढण्यासाठी इतरही महिलांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
“तुम्ही बुवांच्या कच्छपि का लागला?” असा प्रश्न विचारणे म्हणजे भांडणाची खात्रीच! म्हणून प्रश्नांचे स्वरूप बदलले. “तुम्ही अध्यात्माकडे का वळलात?” असा प्रश्न तयार केला.
वारकरी संप्रदायातील संतांनी, अध्यात्माला एका उंचीवर नेऊन ठेवले. ‘भेदाभेद अमंगळ’, ‘ईश्वर सर्वत्र आहे, ‘दुर्बल मानवांची सेवा, हीच ईश्वराची भक्ती’, असे समता, बंधुता, माणसुकीचे विचार त्यांनी मांडले आहेत. त्यामुळे अध्यात्म शब्दाची प्रतिष्ठा वाढली.
या प्रतिष्ठेचा गैरफायदा सर्व भोंदू घेतात. काहीजण आपल्या फसवणुकीच्या उद्योगाला ‘आध्यात्मिक केंद्र’ म्हणून संबोधतात. काहीजण ‘ईश्वरी राज्य’ आणण्याच्या नावाखाली, लष्करी केंद्र चालवतात, विचारवंतांचे खून पाडतात. अध्यात्मात या सर्वांचा समावेश होतो. देववाद, दैववाद, नशीब, वेद, यज्ञ, मंत्र, तंत्र, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, मोक्ष, चमत्कार असा व्यवहारातील अर्थ इथे घेतला आहे.
महिलांशी चर्चा करताना, अध्यात्माकडे वळण्याचे कारण, कुटुंबाकडून मिळालेला प्रतिसाद, त्यांना व इतरांना आलेल्या अनुभूती, झालेला लाभ, खर्च केलेला वेळ व पैसा, भक्तीच्या पद्धती इत्यादी मुद्दे ठरवले; पण चर्चा अनौपचारिक ठेवली. नावाचा आणि प्रत्येक मुद्द्याच्या उत्तराचा आग्रह धरला नाही. या उपक्रमात निशा भोसले, अस्मिता चव्हाण, सीमा पाटील, मनस्वी पाटेकर, सुप्रिया जेधे, सुनीला बुद्धिसागर, सुरेखा भापकर इत्यादी कार्यकर्त्यांनी योगदान दिले. मुलाखत देणार्यांची, भाविकांची नावे मात्र काही वेळा बदलली आहेत.
अध्यात्माच्या मुद्द्यावर महिलांचे ढोबळमानाने चार विभाग पाडले.
पहिला विभाग – वैज्ञानिक दृष्टिकोनाशी जवळीक असलेल्या किंवा उच्च आध्यात्मिक मूल्ये मानणार्या.
विभाग दुसरा – केवळ पारंपरिक कर्मकांड व धार्मिक कार्य सांभाळणार्या.
विभाग तिसरा – चमत्कारी बुवा-बाबांकडे वळलेल्या.
विभाग चौथा – वर्णवर्चस्ववादी बुवाबाजीकडे वळलेल्या.
पहिला विभाग – परिवर्तनवादी चळवळीत अनेक महिला काम करतात; काही राजकीय पक्षात, तर काही सामाजिक संघटनांमध्ये काम करतात. काही स्वतंत्र असतात. अनुभवाने, अभ्यासाने त्या बुवा-बाबा आणि वर्णभेदी संस्कृतीपासून दूर राहतात. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जवळ येतात.
काहीजणी आध्यात्मिक म्हणवतात. कबीर, गाडगेबाबा किंवा वारकरी संप्रदाय इत्यादीस मानतात आणि समता, बंधुता, माणुसकीवर विश्वास ठेवून आचरण करतात. अं.नि.वा. वार्षिक 2017 च्या अंकामध्ये गेल्या शतकातील सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याची ओळख प्रा. डॉ. छाया पोवार यांनी करून दिली आहे. बहिणाबाईंनी औपचारिक शिक्षण घेतले नाही, तरी त्यांचे व्यावहारिक शहाणपण मोठे आहे. जीवनानुभवाने त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जवळ आल्या.
या विभागातल्या महिलांचा अभ्यास त्या कर्मकांड आणि बुवांपासून दूर का राहिल्या? या प्रश्नाच्या निराकरणासाठी करावा लागेल.
कोल्हापुरातल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्या कॉ. उमा पानसरे, कॉ. सुमन पाटील, कॉ. रुपाली कदम यांनी आपण पक्षसभासद झाल्यामुळे अध्यात्मापासून दूर राहिल्याचे म्हटले आहे; तर स्नेहल कांबळे, अस्मिता चव्हाण, उज्ज्वला दळवी, प्रतिभा साटम, प्रज्ञा कोळगे, प्राची जाधव, रश्मी पेंदूरकर, प्रमोदिनी मंडपे यांनी याचे कारण घरचे वातावरण म्हटले आहे.
सुवर्णा मिठारी आणि त्यांचा गु्रप ‘जिजाऊ ब्रिगेड’मध्ये सामील झाल्याने रामदासी पंथापासून दूर झाला.
दुसरा विभाग – परंपरेने चालत आलेल्या पूजाअर्चा, उपास आणि इतरही धार्मिक कर्मकांड महिलांच्या वाट्याला येते. त्यांची इच्छा असो वा नसो; कौटुंबिक आणि सामाजिक दबाव यातून त्यांना परंपरा चालवावीच लागते. नवं धार्मिक काम न स्वीकारणे किंवा संधी मिळताच जुन्यामध्ये बदल करणे, त्यांच्या हाती असते.
पाथरवट असलेल्या उमाताईंचे मिस्टर दगडी खलबत्ता, पाटा-वरवंटा घडवतात. त्यांच्या घरी तांब्यावर पुजली जाणारी लक्ष्मी, महादेवाची पिंड, हनुमान, जोतिबा या देवता आहेत. त्यांनी लग्नात सत्यनारायण घातला होता. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली, तर सासूबाई लिंबू उतरून टाकतात आणि औषधही घेतात.
संगीताताई पाटील घरी गणपतीची पूजा करतात. गावी रेणुका, साती आसरा, बाळकृष्ण यांची पूजा होते. पूजा केल्याने कामे व्यवस्थित होतात, यश मिळते, असे त्यांना वाटते.
शीतलताई माळवींच्या घरी यल्लमा, साती आसरा, बहिरोबा यांची पूजा सासूबाई करतात. तीन वर्षांतून एकदा लिंब नेसतात.
मीनाताई चिलेंच्या घरी सासर्यांच्या काळापासून दत्ताचे स्थान आहे. वर्षातून एकदा त्या महाप्रसाद करतात. तीन वर्षांतून एकदा यल्लमादेवीचा लिंब नेसतात. बुवांकडे जाण्यापेक्षा आपल्या कामात लक्ष घालणे महत्त्वाचे असल्याचे त्या सांगतात.
पूजाताई बाबर जोतिबा, अंबाबाईची पूजा करतात. शुक्रवारचे उपवास केल्याने मनासारखा पती मिळाल्याचे त्या सांगतात.
संजनाताई तिप्पे बी.ए. आहेत. सात वर्षेत्यांना गर्भधारणेस अडचणी आल्या. संकष्टी-विनायकी उपवास केल्यावर डॉक्टरी उपचारांना यश आले. यशामध्ये साती आसरांचाही आशीर्वाद असल्याचे गौरी अंगात घेतलेल्या देवींनी सांगितले; पण घरच्यांना पटत नाही.
आसमाँभाभी एकदाच ‘दोनरका’त नमाज पढतात. ‘दोनरका’त म्हणजे नमस्कार दोन वेळा करायचा. एक वेळची नमाज आणि ‘तसबी’ एवढ्याने देव प्रसन्न होतो, असे त्यांना वाटते. ‘तसबी’ म्हणजे जप करणे. “सुभान अल्ला, लाही ला हा इल्लिला ला रहिमत दुल्ला रसुल्ला” इत्यादी जप केले जातात.
अनेकांनी दुवा केल्याने त्यांचा मुलगा आजारातून बरा झाल्याचा विश्वास त्यांना आहे. उद्योग व्यवस्थित चालावा म्हणून त्या ‘तसबी’ पढतात आणि ‘सदका’ देतात. ‘सदका’ म्हणजे दानधर्म. मनात इच्छा धरून ‘सदका ’डब्यात पैसे टाकले जातात. त्यांनी घरीच असा डबा ठेवला आहे. त्यात वर्षाकाठी जमा होणारे पाच-सहाशे रुपये त्या मशिदीत मदरसा चालवायला देतात.
या दुसर्या विभागातील महिला थोड्याशा प्रयत्नाने पहिल्या विभागाकडे- वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळू शकतात किंवा मार्ग सापडला, तर तिसर्या किंवा चौथ्या विभागाकडे- बुवांकडे-जाऊ शकतात.
तिसरा विभाग – प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी येतातच; किंबहुना अडचणीतून मार्ग काढणे म्हणजेच जीवन! काही वेळा अडचणी खूप मोठ्या असतात. काही वेळा मोठ्या असतात. अशा वेळी आधाराची गरज असते. बाबा-बुवा आधार देतील, असे वाटते.
बुवा अशा सावजांच्या शोधात असतात. सावज पकडण्यासाठी विविध जाळी तयार करतात. समस्या निराकरणाचे किंवा पारलौकिक जीवनाचे आमिष दाखवतात.
कोमलताई पिठाची चक्की चालवतात. घरी देव्हार्यावर गणपती, कुबेर, महालक्ष्मी, बाळकृष्ण यांची पूजा करतात. गवळी समाजात गोकुळाष्टमी मोठी केली जाते. या पारंपरिक, धार्मिक कार्याशिवाय त्यांचा संपर्क ‘श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रा’शी आला. केंद्र पाच मिनिटांच्या अंतरावर होते, तेव्हा त्यांना जाणे शक्य होते. आता केंद्र दूर पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर गेले आहे. उद्योग सोडून त्या जाऊ शकत नाहीत, मुलाला पाठवतात.
शेजारी एका स्नेह्यांच्या घरी दर शुक्रवारी नवदुर्गासप्तशिती, अथर्वशीर्ष, श्रीसूक्त इत्यादीचे पठण केले जाते. ते सकाळी असे, तेव्हा त्या जात. आता वेळ बदलल्याने जमत नाही.
वाचन सुरू असताना घरी शांतता असते, संघर्षातून मार्ग निघतो, मन शांत राहते. समस्यांना व्यवस्थित तोंड देता येते, नवे शिकायला मिळते, माहिती मिळते, असा त्यांचा अनुभव आहे.
कुमार वयापासून मुले देवा-धर्माकडे वळली, तर चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत, असे त्यांना वाटते.
परिसरात ‘स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र’ सुरू झाले, तेव्हा पोर्लेकर वहिनी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने गेल्या. मिस्टरांचा चिडचिडा स्वभाव बदलावा, अशी त्यांनी महाराजांना विनंती केली. काही दिवसांतच त्यांना प्रचिती आली. आता मिस्टरही केंद्रात येतात.
केंद्रात महाराज विनामूल्य सेवा देतात, म्हणजे मार्गदर्शन करतात. इथे केलेल्या प्रत्येक कृतीला ‘सेवा देणे’ असा वाक्प्रयोग केला जातो. ते बोलतात, तेव्हा दहापैकी एक-दोन गोष्टी, तरी आपल्याला लागू पडत असतात. त्या गोष्टीतून मार्ग सापडतो.
महाराज वैज्ञानिक माहितीही देतात. उदाहरणार्थ – ठराविक महिन्यात ‘नवर्याचे तोंड पाहू नये,’ असा भारतीय संस्कृतीत नियम आहे. या काळात बायकोला माहेरी राहता यावे व विश्रांती मिळावी, हा वैज्ञानिक विचार त्यामागे आहे. वहिनीला शंभर कौरवांच्या जन्माबद्दल कुतूहल होते; पण महाराजांनी त्याकाळी ‘टेस्ट ट्यूब बेबी’चे तंत्र अवगत होते,’ हे सांगितल्यावर समाधान झाले.
महाराज अंतर्ज्ञानाने अनेक गोष्टी ओळखतात. सासूबाईंनी ‘सेवा घेतली’ म्हणजे ‘भेट घेतली’ तेव्हा महाराजांनी सांगितले, ‘घरातले देव खराब झाले आहेत,’ तर खरोखरच शनियंत्राच्या टाकाला चिरा पडल्या होत्या.
एकदा मिस्टरांच्या शरीराला सूज आली. महाराजांनी फोनवरून तीर्थाची सेवा दिली- म्हणजे चमचाभर तीर्थ प्राशन करायला सांगितले. चार दिवसांत पायांवरील सूज कमी झाली. पुढे हा थॉयरॉईडचा आजार असल्याचे कळले. गेली सहा वर्षेत्यांना गोळी सुरू आहे.
सारामृत अध्याय वाचणे किंवा जप करणे, अशा सेवेतून घरी शांतता राहते, मानसिक समाधान मिळते, असे त्यांना वाटते. त्यांच्यासमोर इतर भाविकांनाही अनुभूती आल्याची उदाहरणे आहेत. एका भाविकाच्या पोटात अकरा किलोची गाठ होती. डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती; पण ऑपरेशन यशस्वी झाले. दुसर्या भाविकाच्या पोटात दुखते आहे, हे महाराजांनी अचूक ओळखले.
सावंत वहिनींचे कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होते. घरी अनेक नातेवाईकांची सतत वर्दळ असे. या खात्या-पित्या घराला एके दिवशी दृष्ट लागली. मिस्टर दुसर्या बाईच्या नादी लागल्याचे समजले. वहिनींना धरणी दुभंगली. रोज खटके उडू लागले. शेवटी मिस्टर घरी यायचे बंद झाले. आर्थिक कुचंबणा सुरू झाली. मुलांचा सांभाळ करण्यासाठी वहिनींनी भाजी विकली, दहा टक्क्याने कर्ज काढले. आता मुलांची लग्ने झालीत, त्यांचा संसार व्यवस्थित सुरू आहे.
या अडचणीच्या वेळी अनेकजणांनी – करणी केली आहे, देव घातले आहेत अशी कारणे व्यक्त केली. वहिनींनी मांत्रिक आणि महाराजांचे उंबरठे झिजवले. अंगारे-धुपारे केले; पण मिस्टरांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही, असा त्यांना अनुभव आला.
रत्नमालाताईंना लहानपणापासून देवाधर्माचे ध्यान आहे. त्यांनी परिसरातल्या बहुतेक देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. दारात येणारे बैरागी, गोसावी, भगत, देवऋषी यांना कधीही विन्मुख पाठवत नाहीत.
मुलं होऊ देत, नातवंडे होऊ देत, आजार बरा होऊ दे, अशा अनेक कारणांनी त्यांनी नवस केले आणि फेडलेही. वर्षाला मठाची यात्रा त्या चुकवत नाहीत.
एक सुप्रसिद्ध डॉक्टरीणबाई आपल्या पतीसमवेत एका महाराजांच्या नावाने समिती चालवत आहेत. त्यांना भजनाने समाधान वाटते; मुलगा निर्व्यसनी राहिला याचे श्रेय त्या भजनाला देतात. महाराजांच्या चमत्कारांचा भांडाफोड झाला, हे ठाऊक असूनही त्या म्हणतात – “आम्ही बाबांच्या बाबतीत निगेटिव्ह विचार करू शकत नाही. आमच्यात भक्ती मुरली आहे; एकदा श्रद्धा ठेवली की, चिकित्सा करायची नाही.”
विशेष म्हणजे या डॉक्टरांचे आजोबा राजर्षी शाहूंच्या काळात सत्यशोधकांचे नेते होते. कधीकधी गंगा उलटी वाहते, ती अशी! पाटीलवहिनी एकदा खूप आजारी होत्या. जगतात की मरतात, अशी शंका होती. एका भगताने ‘बाहेरची बाधा’ सांगितली आणि कोकणातून प्रसिद्ध पावलेल्या एका मोठ्या बाबांच्याकडे पाठवले. पाटीलवहिनी पतीसमवेत दर रविवारच्या बैठकींना जातात. मुलगा कधी आला नाही, त्यामुळे त्याचे पाण्यात बुडून निधन झाले, असे त्यांना वाटते.
गावातले डॉक्टर मोठ्या हॉस्पिटलकडे रुग्ण पाठवतात, तसे गावात भगतही आहेत. मानेकाकू ओळखीच्या महिलेमुळे, रामदासी बैठकीस जातात; पण त्याचा लाभ काय झाला, हे त्यांना सांगता आले नाही.
बापूंना खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यात जेल झाली, तरी चौगुलेवहिनी भक्तीची कास सोडत नाहीत. त्यांच्या मते, ‘बापू स्वत:च कैद्यांचा उद्धार करण्यासाठी जेलमध्ये गेले असून, त्यांच्या इच्छेने ते कधीही बाहेर येऊ शकतात.” मालेगाव बाँबस्फोटातल्या आरोपींना जामीन मिळाल्यावर ‘त्यांच्या’ आशा पल्लवीत झाल्या असाव्यात. ठराविक इच्छा मनात धरून भक्तीची कास धरलेल्या महिलांचा भ्रमनिरास झाला, तर त्या परत फिरल्याचीही उदाहरणे आहेत.
आजारी वडिलांना बरे वाटावे ही माफक अपेक्षा पुरी न झाल्याने नीतावहिनींनी मठात जाणे सोडले. भगताकडे कोणतीही शक्ती नाही, तो मुलाला नोकरी लावू शकत नाही, हे मानसीताईंनी पटवून दिल्यावर, घरच्या मोलकरणीने भगताकडे जाणे बंद केले. आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, अनुभूती अशा बाबींचा जबरदस्त पगडा आणि गुरूशिवाय आध्यात्मिक उन्नती नाही, हा विश्वास यामुळे महिला बुवांकडे वळतात, असे निरीक्षण मानसी पाटकरांनी नोंदवले आहे.
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी जटानिर्मूलनाची चळवळ सीमा भागात सुरू झाली. आता जटा वाढविणे आणि मुली सोडणे बंद झाले; पण जोगत्यांच्या अथक प्रयत्नांनी घराघरांत यल्लमाचे जग दिसू लागले आहेत. जागरण घालणे, लिंब नेसणे यातून जोगत्यांच्या धनप्राप्तीची कायमची सोय झाली. शेकडो एसटी बस आणि हजारो खाजगी वाहनांना डोंगरावरच्या यात्रेसाठी प्रवासी वाहतुकीचे काम मिळाले. विशेेष म्हणजे सफाई कामगार असलेल्या जोगत्यांचा यात मोठा वाटा आहे. आजारपण, व्यसनी नवरा, आर्थिक नुकसान; अशा प्रसंगी यल्लमाने घरी प्रवेश केला, तो कायमचाच.
चौथा विभाग – वेद, मंत्र, यज्ञ, सूक्ते इत्यादींचे पठण करून अडचणींवर मात करू इच्छिणारा हा विभाग जातिभेद आणि वर्णवर्चस्वाचा समर्थक असतो.
आईमुळे रंजनाताई बांभुरीकरांना स्तोत्रे आणि प्रार्थना म्हणण्याची गोडी लागली. त्या एम.डी. इन आयुर्वेदिक अॅक्युप्रेशरचे शिक्षण घेऊन क्लिनिक चालवत होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपला व्यवसाय बंद केला. आता पंधरा ठिकाणी महिलांचे वर्ग घेतात. वर्गात वीसपासून दीडशेपर्यंत महिला असतात. अर्ध्या तासात रामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीसूक्त पठण इत्यादी शिकवतात. अर्धा तास आरोग्य विज्ञान, परिपूर्ण स्त्री, सुसंस्कृत पाल्य, अशा विषयांवर मार्गदर्शन करतात. शाळेच्या मुलांसाठीही त्या वर्ग घेतात. हे सर्व विनामूल्य सुरू असते. त्यांच्या मते, हे खरे अध्यात्माचे शिक्षण आहे. त्या कोणत्याही संत, बाबा किंवा गुरूंना ‘फॉलो’ करत नाहीत. कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक संघटनेशी नाते जोडत नाहीत. धर्मांध संघटनांच्या ऑफर त्यांनी नाकारल्या आहेत.
या कार्यामुळे त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते, कुटुंबातील नाती अतूट राहतात, शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकते.
त्यांच्या वर्गांना येणार्या महिला – धन मिळावे, सुख-शांती मिळावी, मूल व्हावे, अशा अपेक्षाही व्यक्त करतात. सुतार वहिनींनी मात्र संस्कृत श्लोक म्हणायला मिळतात, याचा आनंद व्यक्त केला.
जबडेवहिनींच्या घरी प्रत्येक भिंतीवर “कुलदेवो: नम:” “गणपतेय नम:” इत्यादी फलक लावले आहेत.
मनुस्मृतीचे समर्थन करणार्या आणि ईश्वरी राज्य स्थापणार म्हणणार्या संस्थेच्या सत्संगाला त्या दर आठवड्याला जातात. सततच्या कौटुंबिक चिंतेतून त्यांची तेवढीच सुटका होते.
या प्राथमिक अभ्यासातून काही बाबी समोर आल्या. लहानपणीचे संस्कार, कौटुंबिक वातावरण, मठ किंवा केंद्राची निकट उपलब्धता, मित्र-नातेवाईकांची शिफारस, कौटुंबिक कलह, घरगुती अडचणी, आर्थिक समस्या, आजारपण, तिरसट स्वभाव, मानसिक शांती, मूल व्हावे, मार्गदर्शन मिळावे, व्यसनाधिनता अशा कारणांनी महिला बाबा-बुवांकडे वळलेल्या दिसतात.
हे निष्कर्ष तपासण्यासाठी व त्यावर उपाय शोधण्यासाठी अजून सखोल अभ्यासाची गरज आहे. समाजातील विविध घटक उदा. डॉक्टर, प्राध्यापक, रिक्षाचालक, वडापवाले इत्यादी घेऊन त्यांचा अभ्यास, एकच बुवा निवडून त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास, बुवांच्या कचाट्यातून बाहेर पडलेल्या व्यक्तींचा अभ्यास इत्यादी प्रकारे अभ्यास प्रकल्प होऊ शकतील.
–मीना चव्हाण
मोबा. 8698521581