Categories
महिला

सुटे गिराण

मार्च - २०१८

अशिक्षित बाई ग्रहणाला भीत नाही; पण पदवीधर (तथाकथित शिकलेले) ग्रहणाला घाबरतात, या वास्तवावर आधारित ही सत्यकथा

“आज लवकर आली गं कामाला?”

“अवं ती तुमची मैत्रीण, तिचा नवरा नाय का डॉक्टर हाय, ती नाय घरी. तिचं काम नाय आज.”

“कोण? सुजाता?”

“व्हय, तीच.”

“का गं?”

“अवं, सकाळी नऊ वाजता गेलती, आता पण जाऊन आली तिच्याकडं, पण घराला कुलुप.”

“का गं? काय झालं?”

“अवं आज तिच्या देवघरातल्या गणपतीचा फोटो पडला, काच फुटली. ग्रहणाच्या दिवशी फोटो पडला, काच फुटली, आता कायतरी अशुभ होणार म्हणून नवरा-बायको जी घाबरलीती का नाय! मी म्हणालं त्यांना, अवं खिळा बारका, फोटो जड, निसटला खिळा, म्हणून पडला फोटो, कशाला घाबरताय? तरी पण ऐकनाती, सगळी कामं सोडून दोगं बी गेलीती त्यांच्या गुरुजींकडं, सकाळीच. अजूनबी घराला कुलूपच हाय बगा.”

मला सुजाताच्या वागण्याचं हसू आलं; पण सोनीच्या तर्कशुद्ध विचार करण्याचं कौतुक वाटलं.

“तरी पण आज लवकरच आलीयेस गं नेहमीपेक्षा.”

“व्हय, अवं ते आज चंद्रग्रहण हाय ना! सासू म्हणाली, ग्रहण अशुभ असतं, ते सुरू व्हायच्या आधी घरी जा. म्हणून मग कामं आवरून जाईन लवकर घरी.”

“अगं सूर्यग्रहण असू दे, नाहीतर चंद्रग्रहण; अशुभ वगैरे काही नसतं गं.”

“आसं काय? आमच्या इथल्या सगळ्या बाया पाळणारेत ग्रहण.”

मी तिला ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर आलेला चंद्रग्रहणाचा व्हिडीओ दाखवला आणि आजचं खग्रास चंद्रग्रहण कसं होणार आहे, हे तिला समजावून सांगितलं.

“ग्रहण ही अवकाशातली नैसर्गिक घटना, यात अशुभ काही आहे का सांग बरं?”

सोनी म्हणजे सुनंदा, माझी कामवाली विचारात पडली. तिच्या भुवया आक्रसल्या. बरेच प्रश्न पडू लागले असावेत बहुधा तिला.

“म्हणजे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य असे एका रेषेत दिसणार काय?”

“नाही गं! तू आता आमच्या घरात आहेस. आता. तुला आमचं घर बाहेरून दिसतंय का? नाही ना! तू जेव्हा या बिल्डिंगच्या बाहेर थोडं लांब जाशील, तेव्हा तुला आमचं घर बाहेरून दिसेल. तसं आपण जर पृथ्वीपासून लांब आकाशात गेलो, तर चंद्र, पृथ्वी, सूर्य आपल्याला एका रेषेत असल्यासारखे दिसतील ग्रहणाच्यावेळी.”

सोनी माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती.

“सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो, तसाच चंद्रावरही पडतो आणि चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जर पृथ्वी आली, तर चंद्राला मिळणारा प्रकाश अडतो आणि चंद्रग्रहण होतं.”

सोनीनं हे वाक्य समजून घेतलं आणि पुन्हा जसंच्या तसं मला म्हणून दाखवलं.

ग्रहण अशुभ नसतं हे तिला आता मनापासून पटलं. तिला आठवलं, तिच्या भावाला ज्या वेळी मुलगा झाला, त्यावेळी सूर्यग्रहण होत होतं.

“मग? तो मुलगा कसा आहे आता? काही झालं का त्याला?”

“नाय. काय सुदा नाय. अवं त्यो लई हुशार हाय शाळंत!”

तिला मग मी यावेळच्या चंद्रग्रहणाचं काय वेगळेपण आहे, सुपर मून, ब्ल्यू मून, ब्लड मून हेही समजावून सांगितलं.

150 वर्षांनंतर होत असलेलं आणि पुन्हा 150 वर्षांनंतर दिसणारं वैशिष्ट्यपूर्ण असं हे ग्रहण बघण्यासाठी आम्ही आमच्या सायन्स सेंटरच्या गच्चीवर दुर्बीण लावायचं ठरवलं होतं. सोनीला ये म्हटलं तिथं सात नंतर.

सोनीनं आमचं काम आवरलं आणि निघून गेली.

सायंकाळी सातच्या दरम्यान आमच्या सायन्स सेंटरच्या हॉलवर पोचलो. काही पालक-मुले आली होती. साडेसातच्या दरम्यान सोनी आली. येताना तिच्या दोन्ही मुलांना पण घेऊन आली. ती येईल असं खरं तर वाटलं नव्हतं मला.

मी माझ्या तिथून जवळच राहणार्‍या दोन मैत्रिणींना फोन केला. ग्रहण पाहायला बोलावलं.

एक मैत्रीण प्राध्यापक आहे. तिच्या नवर्‍याला कुठली गिफ्ट कूपन्स मिळाली होती आणि त्या कूपन्सची मुदत 31 जानेवारीला संपणार होती. म्हणून दोघं नवरा-बायको मुद्दाम वेळ काढून खरेदीला जाऊन आले होते, त्यामुळं ती दमली होती. म्हणून येत नाही म्हणाली.

दुसर्‍या मैत्रिणीला फोन केला. त्यावेळी तिची पूजेची तयारी चालली होती. तिला त्या दिवसाचं भविष्य तिच्या आणि तिच्या मुलाच्या राशीसाठी ग्रहण अशुभ आहे, असं कळलं होतं. तिचा एक मुलगा एम.बी.बी.एस.ला पुण्याला, दुसरा कराडमध्येच इंजिनिअरिंगला. दोघेही नवरा-बायको बँकेत. ती, तिचा नवरा, तिचा मुलगा तिघेही अशुभ म्हणून येणार नाही म्हणाले, घरीच बसून राहिले.

सोनीनं मग खूप उत्सुकतेनं दूर्बिणीतून ग्रहण पाहिलं. मुलींनाही दाखवलं. ग्रहण सुटतं म्हणजे काय, हेही समजून घेतलं.

दुसर्‍या दिवशी सोनी कामाला आली. चेहरा हसरा छान, उजळलेला.

“ताय, आज माझ्या इन्याला बक्षीस भ्येटलं. सा वह्या आणि पेन.” सोनीचा मुलगा विजय पाचवीत शिकत होता, तर मुलगी कल्याणी दुसरीत.

“अरे वा! छान! पण कशाबद्दल गं?”

“अवं, काल तुमी मला ग्रहणाची माह्यती सांगितली ना, ती मी माज्या मुलांना पण सांगितली. रात्री दूर्बिणीतून पण ग्रहण बगितलं आणि आज बगा माज्या इन्यानं त्ये सगळं त्याच्या वर्गात सांगितलं. त्याचं सर म्हणलं, तुला यवडं सगळं कसं माहीत? इन्या म्हणला, माज्या आईनं सांगितलं. तसं सर म्हणलं, तुझी आई तर धुणं-भांड्याची कामं करती, तिला कसं माहीत? तर बगा म्हणला, माजी आई त्या पुजारी मॅडमकडं कामाला जाती त्यांनी तिला सांगितलं. आन् त्यांच्याकडं दुर्बिणीतनं पण बगितलं. अवं ताय, सर लई खुश जालं आणि माज्या इन्याला बक्षीस दिलं.”

सोनीचं हे सगळं बोलणं ऐकताना मी अवाक् होऊन बघतच राहिले तिच्याकडे. भरपूर शिकलेल्या सुजाता आणि काल फोन केलेल्या दोघी मैत्रिणींची आठवण झाली. आम्ही जेमतेम चौथी पास असलेल्या सोनीचं फार-फार कौतुक वाटलं मला.

मी पर्समधून 50 ची नोट काढली, सोनीच्या हातावर ठेवली. सोनीला काही कळेना.

“सोने, हे तुझं बक्षीस आहे, घे.”

“अवं मी काय केलंय, बक्षीस द्यायला? भाषण तर माज्या इन्यानं केलं. या पैशातून त्याला कायतरी घेते.”

“अगं सोने, हे बक्षीस तुला दिलंय मी. शिक्षण कमी असलं, तरी खरी सुशिक्षित, विज्ञानवादी तर तू आहेस गं! आणि आणखी एक महत्त्वाचं काम केलंयस तू! काय माहितेय? मी तुला ग्रहणाची माहिती सांगितली. ती ऐकताना तुला प्रश्न पडले. तू ते विचारलेस. मी जी उत्तरं दिली, त्यावर तू विचार केलास, समजून घेतलेस आणि तुला स्वत:ला जेव्हा ते पटलं, तेव्हा तू ते मुलांना सांगितलंस. आपण जे ऐकतो, बघतो, वाचतो ते किती खरं, किती खोटं, योग्य की अयोग्य हे विचार करून ठरवणं आणि मग त्याप्रमाणे वागणं हा खरा सुशिक्षितपणा. आणि तुझा हा सुशिक्षितपणा, विज्ञानवादाचा विचार तू खूप छान पद्धतीने तुझ्या मुलांपर्यंत पोचवला आहेस. आता यापुढे तुझी मुलं कोणतीही गोष्ट दुसर्‍याचं केवळ ऐकून न करता, ती नीट पारखून, साधक-बाधक विचार करून योग्य त्या पद्धतीनेच करतील, म्हणून मी तुला बक्षीस दिलंय सोने.”

सोनीचा चेहरा आणखीनच उजळला. डोळे विस्फारले. मी काय बोलतेय हे समजून घ्यायचा प्रयत्न करत तिनं कामाला सुरुवात केली.

लेखिका संपर्क : 9226163260