हे सत्पुरुषा, एकदाच बाई होऊन बघ
कशी असते, कशी वागते
अशीच का वागते, तशीच का बोलते, हसते
एकदाच उमगून बघ ॥धृ॥
फार वेळ नको!
सहा महिन्यातून एकदा
तुझी पाळी होऊ दे,
अंगावरून लाल-पांढरं भरपूर जाऊ दे
पायाच्या तळापासून
केसांच्या मुळा पावत
कळा सोसून बघ
एकदाच सत्पुरुषा…. ॥1॥
कधी दोन दिवस, कधी तीन
चार, पाच, सहा, सात दिवस
कधी काळ गाठाळलेले तर
लालभडक पातळलेले रक्त
वाहताना पाहून बघ
एकदाच सत्पुरुषा…. ॥2॥
फार वेळा नको एकदाच गरोदर राहून बघ
मळमळतंय, गरगरतंय, थरथरतंय
जडजड वाटतंय
ते जडत्व साहून बघ
एकदाच सत्पुरुषा…॥3॥
नऊ महिने, नऊ दिवस
ओझं वाहायचंय तुला
कधी हे संपणार? कंटाळा आलाय
जीव घाबरा झालाय दहा-दहा वेळा आईला
सगळ्यांना सांगून बघ
एकदाच सत्पुरुषा… ॥4॥
सर्वांगावर सूज येते. पाय पावाची लादी होते.
पायातली चप्पल तुटून जाते
बोचर्या भुईवर पाय ठेवून बघ
एकदाच सत्पुरुषा… ॥5॥
आता येईल प्रसवेची वेळ
श्वासोच्छवासाचा बसत नाही मेळ
होतोय जीव घाबरा अन्
घाम सुटतोय दरारा
धारा घामाच्या पुसून बघ
एकदाच सत्पुरुषा… ॥6॥
पोट, पाठ, मान अंग-अंग
सगळंच ताटलंय,
मरतो की काय असंच वाटतंय
घे श्वास, घे कळ, लाव जोर प्रयत्न कर….
आई, बाई, सुईणीचं, सांगणं ऐकून बघ
एकदाच सत्पुरुषा… ॥7॥
मूल आडवं झालंय, पाणटीळ
फुटलंय, पोट कोरडं झालंय
अंगावरनं भसाभस चाललंय
बाळ पायाकडनं आलंय, वार आत राहिलीय
काही न् बाही ऐकून घाबरून बघ
एकदाच सत्पुरुषा… ॥8॥
आता बाळंत होऊन बघ
पोरगाच हवा होता, पण पोरगी झाली
आजूबाजूचे आक्रोश ऐकून बघ
लिंगावरून ठरणारं स्वागत साहून बघ
एकदाच सत्पुरुषा… ॥9॥
आई झालास ना एकदाचा?
आता बाळ रात्रभर जागतंय
मनाला येईल, तेव्हा उठतंय
हगतंय, मुततंय, ओकतंय
सर्वांग घाणघूण करतंय
त्याही राडीत राहून बघ
एकदाच सत्पुरुषा… ॥10॥
आणि तरीही फुटतो तिला पान्हा
स्तनाला लुच्चू लागतो तान्हा
सर्वांगातलं रक्त शोषून होतो पुन्हा पुन्हा
तरीही त्याला माफ करत
मायेनं कुरवाळून बघ
म्हणून म्हणते सत्पुरुषा
एकदाच बाई होऊन बघ…॥11॥
–सीमा रामदास पाटील
संपर्क ः 9421202444