Categories
अघोरी प्रथा

जातीतून बहिष्कृत केल्याने महिलेची आत्महत्या

जानेवारी - २०१५

गावकीच्या बहिष्काराचा बळी, खाजणीत मोहिनी तळेकरांची आत्महत्या; . अंनिसच्या कार्यकर्त्यांची गावाला भेट

भारतीय न्याय व्यवस्थेला समांतर न्याय व्यवस्था (खरे तर अन्याय व्यवस्था) आपल्या आजूबाजूला गावागावात, शहराशहरात चालू आहे. जात पंचायत वा गावकी हे त्या व्यवस्थेचे नाव. सामाजिक न्यायात या संमांतर न्याय व्यवस्थेचा सर्वात मोठा अडथळा ठरतो. म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘जातपंचायतीला मूठमाती अभियान’ महाराष्ट्र अं.नि.स. ला सोबत घेऊन सुरू केल्यानंतर जातपंचायतीच्या सामाजिक बहिष्कार किंवा इतर अत्याचाराला बळी ठरलेल्या कित्येक घटना उजेडात येऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर माहितीच्या अधिकारातून रायगड जिल्ह्यात ही सामाजिक बहिष्काराच्या अनेक घटना घडल्याचे अं. नि. स. ला समजले. ही अमानुष प्रथा संपुष्टात यावी म्हणून सामाजिक न्याय परिषद आयोजित करून या अत्याचाराला संपूर्ण जगासमोर आणण्याचे ठरले. आणि सुरू झाल्या अं. नि. स. कार्यकर्त्यांच्या बहिष्कृत कुटुंबाच्या भेटी! अशाच एका भेटीतून ही समोर आलेली अत्यंत भयानक कहानी….
मानव हा समूहाने जगणारा प्राणी आहे असे म्हटले जाते. म्हणून कुणी आपल्याशी बोलणं सोडून दिलं तर.. ? ? ?
खरंतर कुणासाठीही ही गोष्ट त्रासदायक असते. त्यात आपल्या माणसांनीच आपल्याशी बोलणं थांबवलं, तर हीच गोष्ट अधिक क्लेशदायक होते. रायगड मधील रोहा तालुक्यातील खाजणी गावात हाच क्लेश सहन करत मोहिनीताईंनी अनेक दिवस काढले. पतीच्या निधनानंतर स्वतःच्या हिमतीवर मुलांना शिकवणाऱ्या मोहिनीताईंकडे गावानं अगदी थोडक्या कारणासाठी पाठ फिरवली आणि मोहिनीताईंचा धीर सुटला. आपल्या चिमुकल्यांना नशिबाच्या पदरात टाकून मोहिनीताईंनी जीवन संपवलं.. गावकीनं बळी घेतलेल्या मोहिनीताईंच्या कुटुंबाची व्यथा मनाला हेलावणारी आहे.
मुलाबाळांची, लहानमोठ्यांची नव्हे तर अगदी झाडाफुलांचाही संवेदनशीलतेनं विचार करणाऱ्या मोहिनीताईंना गावानं केलेली कुचंबणा आणि कोंडी सहन झाली नाही. आणि त्यांनी १८ नोव्हेंबरला विष पिऊन आपलं आयुष्य संपवलं. मायानगरी मुंबईपासून अवघ्या १०० / १२५ किलोमीटरवर असलेल्या खाजणीच्या अन्यायी गावकीनं मोहिनीताईंचा बळी घेतला. खरं तर अतिशय किरकोळ कारणावरुन गावकीनं त्यांच्यावर बहिष्कार टाकला. आणि गावाचा हा क्लेश सहन न झाल्यानं मोहिनीताईंनी आपली जीवनयात्रा संपवली.
होळी सणावेळी झालेल्या किरकोळ कारणावरुन मोहिनीताईंनी गावकीचा दंड भरायला नकार दिला. गावानं त्यांच्यावर बहिष्कार घातला. कालपर्यंत येता-जाता विचारपूस करणाऱ्या बायाबापड्या एका रात्रीत परक्या झाल्या. ज्यांनी मोहिनीताईंना मदत केली, त्यांच्यावरही गावगुंडांनी बहिष्कार घातला. मोहिनीताईंनी थेट पोलिसात धाव घेतली, त्यामुळं गावगुंडांचा इगो दुखावला.
मुंबई पाहिलेल्या मोहिनीताई खमक्या होत्या. त्यांनी गावाबाहेर हॉटेल चालवायला घेतलं. पण त्यावरुनही त्यांच्यावर भलते-सलते आरोप झाले. गावगुंडांनी त्यांचं जगणं मुश्कील केलं. पण, गावाच्या बहिष्कारानं त्यांची हिंमत खचली.. आपल्या हिंमतीवर ‘ऋणानुबंध’ नावाचं घर उभारणारी, दोन कच्च्याबच्च्यांना ताठ मानेनं जगायला शिकवणाऱ्या मोहिनीताई मोडून पडल्या. त्यांच्या आत्महत्येनंतर रोहा पोलिसात गुन्हा दाखल झाला. पंच मंडळींपैकी काही मंडळीना अटक झाली. परंतु स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसह सामाजिक, राजनैतिक व आर्थिक न्यायाची हमी देणारी राज्यघटना स्वीकारूनही शासनयंत्रणाही याबाबत पुरेशी जनजागृती वा प्रबोधन करू शकलेली नाही, असेच चित्र महाराष्ट्र अं.नि.स.ने गेल्या काही दिवसांपासून बहिष्कृत/ वाळीत कुटुंबाच्या सुरू केलेल्या भेटींदरम्यान समोर येत आहे.
मोहिनीताईंच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी महाराष्ट्र अं.नि.स.चे सरचिटणीस नितीनकुमार राऊत, निलेश घरत, महेंद्र नाईक आणि मोहन भोईर खाजणी गावात गेले होते. मोहिनीताई दिवेकर यांची दोन्ही मुले गाव सोडून गेल्याचे समजले. वरील सर्व माहिती इतर वाळीत महिलांकडून मिळाली!


-नितीनकुमार राऊत,अलिबाग

संपर्क : मोबा. ९०११०५५२७०