साधारण तीन महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात एक बातमी वाचनात आली. पश्चिम बंगालमधील धुपगुड़ी गावात थुंकी चाटण्याच्या शिक्षेस नकार देणाऱ्या मुलीवर सामुहिक बलात्कार करण्याचा आदेश जातपंचायतीने दिला. संपूर्ण बातमी वाचून मन अस्वस्थ झाले. सध्याच्या इंटरनेट युगात असं काही घडतंय यावर विश्वास बसेना. गुगल वर एका क्षणात धुपगुड़ी आलं मात्र नाशिक पासुनचे अंतर दोन हजार दोनशे कि.मी. होते. या मर्यादामुळे त्यांना न्याय मिळवून देण्याचा विचार करणंही अवघड होते; परंतु जातपंचायतच्या मनमानी विरोधातील लढ्यामुळे दाहक वास्तव समजल्याने मन आणखी संवेदनशील बनलं आहे. माझं मन मी अविनाश पाटील यांच्या कडे मोकळं केलं. त्या परीवाराशी प्रत्यक्ष बोलुन सहवेदना व्यक्त करावी, असं वाटत होतं. नाशिकच्या एका समविचारी संघटनाच्या प्रतिनिधीशी बोललो. त्यांचे तेथील कार्यकर्ते सोबत असावे, अशी अपेक्षा होती. दोन दिवसांनी त्यांनी सांगितले की माझ्या सारख्यानी तिथे जाणं धोकादायक आहे. तरीही अर्ज वरती पाठवतो.काही कारणांमुळे त्यांची मदत घेणे टाळले. दातरंगे व गोराणे सर यांच्याशी बोलल्यानंतर मी धुपगुड़ीला जाण्याचं ठरविले. विलास कांगुणे ने एका शब्दावर माझ्याबरोबर येण्याचं कबूल केले.तडक रेल्वेचं मिळेल त्या तारखेचं आरक्षण केले.अस्वस्थता थोडी कमी झाली होती. सलग छत्तीस तासांच्या प्रवासानंतर आम्ही चार नोव्हेंबर रोजी न्यू जलपाईगुड़ी या जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचलो. धुपगुडी पुढे साठ कि.मी. वर होते. तेथून एक कार भाड्याने केली. कारण त्या परीवाराचे नावही आम्हास माहिती नव्हते. शिवाय बंगाली बोलणारा दुभाषक असणं जरुरीचे होते. गर्द हिरव्या चहाच्या मळे ओलांडत पुढे जलढाका नदी दिसली. तिचा उगम भुतान देशात असल्याचे चालक भजनने सांगितले. निसर्गाचे किती छान असते. त्याला कशाचाच सीमा नसतात. माणसे मात्र सिमीत होतात. धर्मात, जातीत आणि जातीमधील जातीयवाद म्हणजे जातपंचायतीमधे याच विचारात असतांना धुपगुड़ीत पोहोचलो. धुपगुड़ी पासुन बांगलादेशची सीमा अवधी वीस किलोमीटर, नेपाळची सीमा तीस किलोमीटर तर भुतान देश दिडशे किलोमीटर असल्याचे समजले.बाधीत कुटुंबाचा शोध घेताना जातपंचायतच्या घटनेची दाहकता लोकांत स्पष्टपणे जाणवली. कारण स्पष्टपणे कुणीही बोलत नव्हते. कष्टकरी लोकांकडून पत्ता विचारत पुढे चालत राहिलो, मात्र त्या कुटुंबप्रमुखाचे नाव कुणीही सांगितले नाही. शेवटी गावाच्या बाहेर पोहचलो. शंभर एक घरांची वेगळी वस्ती होती. गावगाड्याने तथाकथित खालच्या जातीमुळे वेशीबाहेर ठेवण्याची अमानुष प्रथा येथेही असल्याची भिती वाटली. ती भितीही काहीवेळाने खरी ठरली. अर्धनग्न अवस्थेतील लोकांच्या भेदक नजरांना सामोरे जात आम्ही त्या नऊ नंबर वॉर्ड मध्ये पोहचलो.एक चटई व लाकडांच्या फळ्यांनी बनविलेल्या घरासमोर आम्ही थांबलो.चिकनमातीने सारवलेल्या अंगणातून भजनने बंगाली भाषेत हाक मारली. एक हडकुळे गृहस्थ बाहेर आले. भजनने आमची ओळख करून दिली व आमच्या येण्याचे कारण सांगितले. परंतु ती व्यक्ती मुख्य विषय काही केल्या सुरू करेना. काही वेळाने घरातुन दोन महिला आल्या. एक त्यांची बहीण तर दुसरी महिला पत्नी होती. मी महाराष्ट्रातील जातपंचायतीच्या मनमानी विरोधातील अंनिसच्या लढ्याची माहिती सांगितली. भजनने ती बंगाली भाषेत त्यांना समजावून सांगितली.कारण त्यापैकी कुणालाही हिंदी भाषा समजत नव्हती. ते ऐकून महिलांना अचानक रडू कोसळले. मग मात्र त्यांनी एक सप्टेंबरच्या भयाण रात्रीचा प्रसंग सांगितला. ते ऐकून आम्ही सुन्न झालो.ती अस्वस्थता अजुनही कायम आहे.
अनुकूल बर्मण हे मजूर असून अनुसूचित जातीतील (राजवंशी) आहेत. हिमानी व संपा या दोन मुली तर सर्वात छोटा मुलगा मनोज. सर्वात मोठी हिमानी या वर्षी दहावीच्या वर्गात गेली. दुसऱ्याची शेती ते बटाईने करतात. या वर्षी एका शेतकऱ्याकडून तीन एकर जमीन त्यांनी कसण्यासाठी घेतली. धान लावण्यासाठी शेतीची मशागत करणे अवश्यक होते. त्यासाठी त्यांनी अनिल बर्मण यांचा छोटा ट्रॅक्टर (पॉवर ट्रिलर) बोलविला. त्याचे भाडे आठशे पन्नास रुपये झाले होते.मात्र ट्रॅक्टर मालकाने जास्त पैसे मागितल्यामुळे वाद झाला. मग जातपंचायत बसली. बंगाली लोक जातपंचायतीला सालीसी सभा किंवा कांगारू कोर्ट म्हणतात.त्यांच्या जातीच्या नगरसेविका नमिता राय यांचे पती चंद्रकांत राय हे मुख्य पंच. जातपंचायतीने अनुकूल बर्मण यांना बोलावून घेतले. त्यात पैसे हिशोबा वरून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या पंधरा वर्षांच्या हिमानीने पंचांना पैशाचा संदर्भात बोला पण मारहाण करु नका, अशी विनंती केली. मुलीने जातपंचायतीत भाग घेउन उलटे बोलले म्हणून पंचांनी तिला खुप सुनावले. लग्न झाल्यावर सासरी असे उलटे बोलल्याने संसार तुटू शकतो. त्यामुळे पुन्हा उलटे बोलु नये यासाठी पंचांनी तिला शिक्षा सुनावली. दुसरे पंच गौतम भौमी यांनी जमीनीवर थुंकायचे व हिमानीने ती मातीवरची थुंकी चाटायची. ही शिक्षा किळसवाणी होती. शाळेत जाणाऱ्या हिमानीने त्यास नकार दिला. त्यामुळे पंचांचा संताप आणखी वाढला. मग त्यांनी शिक्षेचे शेवटचे शस्त्र बाहेर काढले. सहा महिन्यांपुर्वी शेजारच्या बिरभुम जिल्ह्यात प्रेम करणाऱ्या आदिवासी मुलीला झाडाला बांधुन तेरा पुरुषांनी सामुहिक बलात्कार करण्याची शिक्षा जातपंचायतने दिली होती. तोच अमानुष प्रकार येथे घडला. पंचानी शिक्षा सुनावली. त्यामुळे भितीने ती घराकडे पळत असताना पंचाच्या सांगण्यावरून काही लोकांनी तिला उचलून नेले. अनुकूल बर्मण यांनी रात्रभर शोधाशोध करूनही हिमानीचा शोध लागला नाही. पंचाची बायको सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची पदाधिकारी असल्याने पोलिसांनी मदत केली नाही. सकाळी गुराखी मुलांना रेल्वे पटरीच्या बाजूला हिमानीचे नग्न अवस्थेत मृत शरीर दिसले. डोक्याला किंचितशी जखम होती. पोलीसांनी आत्महत्येची नोंद केली. पाण्याची दलदल ओलांडून रेल्वे पटरीवर जावे लागते मग हिमानीच्या पायाला साधा चिखल सुद्धा का लागला नाही, या प्रश्नाचा पोलिसांनी विचारही केला नाही. मात्र डाव्या संघटनाच्या आंदोलनामुळे तेरा आरोपींना अटक झाली. आता केस कलकत्ता उच्च न्यायालयात चालू आहे. ही आपबीती ते रडतच सांगत होते. या आरोपींना फाशी देण्यात आली तर इतर मुलींचे जीव जाणार नाहीत, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी ते राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाणार होते. परंतु प्रवासासाठी त्यांच्याकडे पैसेही नव्हते. अनुकूल बर्मण हे अत्यंत गरीबीत जगत आहेत. त्यांच्यासाठी अंनिसने काय करावे, हे समजत नव्हते. अंतराच्या मर्यादामुळे त्यांना न्याय मिळवून देणे शक्य नसले तरी अंनिसच्या वतीने सहवेदना व्यक्त करणे जरुरीचे होते.
अत्यंत भावनिक होऊन आम्ही परत निघालो. आम्ही धुपगुड़ीला गेलो त्याच खर कारण मला माझ्या वेदना कमी करायच्या होत्या. परंतु झालं उलटंच.
नाशिकला परत आल्यावर मी ही घटना काही कार्यकर्त्यांना सांगितली. सरला दाभोलकर यांनी तत्काळ पाच हजार रुपये पाठविले. पैशाने दुःख विसरले जात नाही. मात्र पैशाने दुःख थोडसं हलकं जरूर होतं. कारण न्याय मिळविण्यासाठी लढावं लागत व लढण्यासाठी पैसा लागतो. याच विचाराने वृत्तपत्रात मदतीचे आवाहन केले. त्यासाठी बर्मण यांचा खाते नंबर दिला होता. अनेक वाचकांनी त्यांना पैसे पाठविल्याचे मला संपर्क करुन सांगितले.
स्वतःच्या उदरनिर्वाहाची भ्रांत असुनही मदतीसाठी पुढे सरसावलेले वायकर नंदीवाले हे एक प्रतिनिधिक म्हणता येईल. बाळासाहेब वायकर हे दररोज सकाळी दारोदारी नंदीबैल फिरवत मिळालेले धान्य अथवा पाच-पाच रूपये गोळा करतात. एका चहाच्या टपरीवर त्यांनी दै सकाळ वृत्तपत्रात प. बंगालमधील मधील जातपंचायतची बातमी वाचली. त्या बातमीत माझा मोबाईल क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी मला फोन केला. त्यांचे बोलणे ऐकून मला विलक्षण आश्चर्य व आनंद वाटला. ते म्हणाले आम्ही भटक्या समाजातील नंदीवाले आहोत. कधीकाळी तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस एका गावात राहता येत नव्हते. दुसऱ्या बाजूने जातपंचायतींचाही त्रास होता. आता मात्र दिवस बदलले आहे. अंनिसमुळे जातपंचायत बंद झाल्या. या वर्षी मढीच्या यात्रेत आमची जातपंचायत बसली नाही. आम्ही आता खूप खुश आहोत. तूमचे खूप उपकार आहेत आमच्या समाजावर…. प. बंगालची बातमी वाचली… तुम्हाला हजार रुपये द्यायचे आहेत…. जातपंचायत विरोधी लढ्यासाठी. मला अक्षरशः भरून आलं. आठ दिवसांपुर्वी मुंबईच्या एका महिलेने जातपंचायतीच्या लढ्याला लाखभर रुपये देण्याबाबत फोन केला होता. परंतु नंदीवालेंची गोष्ट निराळी होती. आपण ज्या लोकांसाठी हे काम करतो ते परिस्थितीने फाटके असले तरी अंनिसबद्दल त्यांना अशी कृतज्ञता वाटणे, याला मोल नाही. मी त्यांच्या पालाचा पत्ता घेतला. मग वेळ न दवडता त्यांची भेट घेतली. अंनिसच्या जातपंचायत मूठमाती अभियानात सहभागी करुन होण्याची विनंती त्यांनी केली. प. बंगालच्या बाधीत परीवारा साठी हजार रुपये त्यांनी पाठविले होते. हे सारं माझ्यासाठी अविस्मरणीय होते. मी त्यांना एवढेच विचारले की एक हजार रुपये गोळा करण्यासाठी किती दारी फिरावे लागेल? त्यावर ते म्हणाले त्याचा विचार करु नका. उरलेल्या आयुष्यात अशीच कामे करायची आहेत तुमच्या बरोबर….
पैशाने श्रीमंत असणाऱ्या असंवेदनशील वर्गाला व्यवस्थेने नाकारलेल्या गरीब परंतु मनाने श्रीमंत असणाऱ्या माणसाची ही खणखणीत चपराक होती.
आठ डिसेंबरला एका शिष्टमंडळा सोबत बर्मण कुटुंबीयांनी राष्ट्रपती व इतरांची भेट घेतली. बर्मण कुटुंबीयांनी वेळोवेळी दुभाषकाचा आधार घेत माहिती अंनिस ला दिली. अकरा डिसेंबरला लोकसभेत या गंभीर विषयावर चर्चा झाली. बिजू जनता दलाचे खासदार रविंद्र कुमार जेना यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर कायदा मंत्री डि. व्ही.सदानंद गौडा यांनी चिंता व्यक्त केली. जातपंचायत संविधान विरोधी असुन राज्यसरकारने तपास करत यावर कारवाई करावी, असे सुचविले आहे.
-कृष्णा चांदगुडे,नाशिक
संपर्क : मोबा. ९८२२६३०३७८