Categories
महिला

पुरोगामी महाराष्ट्रात बुवा-बाबांकडून महिलांचे लैंगिक शोषण

जादूटोणाविरोधी कायद्यानुसार बुवांच्या विरोधात कारवाई
मार्च - २०१४

तुळजापुरात महेबूब कुरणे या बुवाने विवाहित महिलेवर केला बलात्कार

तुळजापूर तालुक्यातील एका मुलीचे लग्न आलूर येथील रवी शंकर मडीवाळ यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर एक वर्ष रवी शंकर मडीवाळ यांनी या मुलीस व्यवस्थित नांदवले, त्यांनतर या मुलीस मूल होत नाही म्हणून तिला मानसिक व शारीरिक त्रास करू लागले. नंतर महानंदा मुनाळे हिने मुलीची सासू कमलाबाई हीस माहिती दिली की, आलूर गावात एक बुवा महेबूब लियाकत कुरणे हे राहतात. त्यांच्याकडून उपचार करून घेतल्यानंतर बर्‍याच महिलांना मुले झाली आहेत.

तिचे ऐकून मुलीच्या सासरच्या लोकांनी भोंदूबाबा महेबूब कुरणे याला घरी बोलावून घेतले व सप्टेंबर 2013 पासून प्रत्येक अमावास्येला या मुलीवर अनिष्ट व अघोरी उपचार केले जाऊ लागले. या मुलीने सदर प्रकरणाची वाच्यता केल्यास तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर बुवा महेबुब कुरणे यांनी या मुलीस मूल होण्याचे आश्वासन देऊन तिला गुंगीचे औषध देऊन दिनांक 3/11/2013 रोजी पिंपळा व देवकुरळी शिवारात तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ही मुलगी स्वत:ची सुटका करून माहेरी पळून आली व तिने तुळजापूर न्यायालयात कलम 498(अ), 323, 376, 504, 506 व 34 व कलम 11 महाराष्ट्र नरबळी व अनिष्ट अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा 2013 नुसार खाजगी फिर्याद अ‍ॅड. अमोल हणमंतराव गुंड यांच्या मार्फत दाखल केली. सदर फिर्यादीचे गांभीर्य ओळखून सदर प्रकरणाचा सखोल तपास करण्याची आवश्यकता असलेबाबत युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर मे.न्यायालयाने पोलीस स्टेशन तामलवाडी यांना कलम 156(3) फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्याचे आदेश दिले. सदर आदेशानुसार पोलीस स्टेशन तामलवाडीमध्ये आरोपी रवी शंकर मडीवाळ, जगन्नाथ मडीवाळ, कमलाबाई मडीवाळ, महानंदा मुनाळे व भोंदूबाबा महेबूब लियाकत कुरणे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 9/14, दिनांक 12/2/2014 रोजी दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलीस तपास चालू आहे.

फिर्यादीतर्फे अ‍ॅड.अमोल गुंड यांनी काम माहिले. त्यांना अ‍ॅड.जयंत इंगळे, अ‍ॅड.प्रशांत कोळेकर यांनी सहकार्य केले.

अ‍ॅड. अमोल गुंड, तुळजापूर


गृहमंत्र्यांच्या मतदार संघात भोंदू बाबांनी केला मुलीचा खून

कुंडलीत दोष असल्यामुळे लग्न जमविण्यासाठी पूजाविधी करावा लागेल ह्या बहाण्याने कर्नाटकमधील तरूणीस मिलिंद कांबळे ऊर्फ पंढरपूरकर महाराज रा. कुची ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ह्या भोंदूने पंढरपुरास आणले. तिच्या आई वडीलांचा डोळा चुकवून त्या तरूणीस पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला व तिचा कवठेमहांकाळ तालुक्यात आणून खून केला. या महाराजाने पहिल्यांदा मुलीच्या वडिलांशी ओळख वाढवून मुलीचे लग्न जमवण्यास मदत करतो अशी थाप मारून त्यांना पूजा विधी करण्यासाठी पंढरपूरला आणले. तेथे एका मठात त्यांची सोय केली. मुलीला विठ्ठल दर्शनाला घेऊन जातो असे सांगून तो विठ्ठल मंदिरात गेला. तेथून त्याने मुलीस कवठेमहांकाळला जबरदस्तीने पळवून आणून तिचा खून केला. पंढरपूर पोलीस ठाण्यात सुरवातीला हरविल्याची नोंद झाल्यानंतर कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक साळुंके यांनी मोठ्या हुशारीने ह्या गुन्ह्याची उकल केली. आरोपीचे नाव-गाव माहीत नसतांना, पूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे करणार्‍या कर्नाटकमधील हंपीजवळील एका मठात राहणारा व मुळचा सांगलीचा मिलिंद कांबळे ह्या भोंदूविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. विठ्ठल मंदिरातील सीसीटीव्हीवरून साळुंके यांच्या संशयाला पुष्टी मिळाली. सध्या हा भोंदू बाबा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


महिलेवर बलात्कार करणारा मांत्रिक जादूटोणाविरोधी कायद्याखाली अटकेत

भविष्य सांगत जीवन सुकर करण्याचे आमिष दाखवून एका मांत्रिक बुवाने एका विवाहित महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली ही घटना गेल्या एक वर्षापासून सोलापूर येथे विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळील नागोबा मंदिरासमोर असलेल्या एका झोपडीत घडली. याप्रकरणी त्या नराधम मांत्रिक बुवास पोलिसांनी अटक केली. नरसिंग नरसप्पा तंतलकर(वय 45, रा.थोरली इरण्णा वस्ती, सोलापूर) असे त्या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांनी 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तंतलकर याच्याकडून आणखी असे काही प्रकार झाले आहेत. त्याचा तपास पोलीस करत आहेत. मुळचा रायचूर-गुलबर्गा(कर्नाटक) येथील रहिवाशी असलेला आरोपी नरसिंग तंतलकर हा बुवा म्हणून सोलापुरात वर्षभरापूर्वी आला होता. त्यास पत्नी व तीन मुले, दोन मुली आहेत. सोलापुरात आल्यानंतर तो बुवाबाजी करू लागला. बुवाबाजी आणि भविष्य सांगण्यासाठी तो विजापूर रस्त्यावरील नागोबा मंदिरासमोरील झाडा लगतच्या झोपडीत बसू लागला. त्याच्याकडे गर्दीही वाढू लागली होती. वर्षभरापूर्वी त्याच्याकडे रामवाडी परिसरात राहणारी 40 वर्षीय पीडित महिला आली होती. सुमारे 12 वर्षांपूर्वी घरगुती कारणावरून बीड येथील सासरवाडीतून नवर्‍यास सोडून आलेली ती पीडित महिला आपल्याकडे आल्यानंतर आरोपी मांत्रिकाने तिचा हात पाहून तिला तुझ्या सासूने तुझ्यावर करणीधरणी केली आहे. तू काळजी करू नको, तुझा संसार चांगला उभा करतो, तुला नवर्‍याच्या घरी नांदण्यास पाठवितो. तुला आशिर्वाद देतो, असे सांगून त्याने तिला आमिष दाखवून मंत्राचे पाणी पिण्यास दिले. यानंतर झोपडीतच तिच्यावर बलात्कार केला होता. असे त्याने तीनवेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले यातून ती गरोदर राहिली. मांत्रिकाने आपल्याला फसवून बलात्कार केल्याने तिचे सदरबझार पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिंगटे करीत आहेत. आठ दिवसांपूर्वीच ती आपल्या बीड येथील सासूरवाडीत नांदण्यासाठी गेली होती. तेथे तपासणीत ती गरोदर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर तिने दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्र.46/14 ने भा.दं.वि.कलम 376, महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा करण्याबाबत त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठीचे अध्यादेश सन 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला. ऑगस्ट 2013 मध्ये हा कायदा लागू झाल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्यात हा गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

अ‍ॅड. गोविंद पाटील, सोलापूर


पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने तरूणींचे लैंगिक शोषण

अंगावर जखम नसलेल्या तरूणीची विशिष्ट अघोरी पूजा केल्यास पैशाचा पाऊस पडतो असा चमत्काराचा दावा करत तरूणींचे लैंंगिक शोषण करणार्‍या टोळीचा पर्दाफाश दापोलीला झाला. अंनिसचे कार्यकर्ते मुक्ता दाभोलकर, अनिश पटवर्धन व इतरांनी ह्या गंभीर प्रकरणाला वाचा फोडली. तरूणींना जाळ्यात ओढणार्‍या संगिता नार्वेकर ह्या मध्यस्थी महिलेस पोलिसांनी अटक केली. लांब केस व अंगावर कोणतीही जखम नसलेल्या मुलींची तपासणी रत्नागिरीच्या लोकांकडून केली जात असे. ह्यामध्ये वीसपेक्षा अधिक तरूणींचे लैंगिक शोषण झाल्याची चर्चा आहे. आणखी उकल होण्याची शक्यता आहे. ह्या गुन्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याचा आधार घेण्यात आला.


मुलीचे लग्न जमविण्यासाठी मौलवीने महिलेस फसविले

डोंगरी (मुंबई) येथील एका महिलेच्या मुलीचे लग्न जमत नव्हते, त्यासाठी ती सय्यद रहेमान अली या भोंदूकडे गेली. तंत्र मंत्र करून विवाह जुळविण्याचे अघोरी उपचार सुचवत त्याने तीन महिन्यात 2 लाख 4 हजार रूपये उकळले. मात्र मुलीचा विवाह काही जुळून आला नाही. पोलिसांनी ह्या भोंदूस उत्तरप्रदेशातील मुज्जपुरला जाऊन अटक करत मुंबईस आणले. भोंदूने ही रक्कम महिलेस परत केली. उच्च न्यायालयाच्या परवानगीने ही तक्रार रद्द करण्यात आली. न्यायालयाने ह्या भोंदूस सहा हजार रू.दंड ठोठावला. हे पैसे पोलीस कल्याण केंद्रात जमा होणार आहे. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आल्यामुळे येथून पुढे असे प्रकार चालणार नाहीत असे उच्च न्यायालयाने सुनावले आहे.