Categories
कायदा

जगभरातील शास्त्रज्ञांचा कायद्याला पाठींबा

जानेवारी - २०१४

महाराष्ट्र जादूटोणाविरोधी अध्यादेश, 2013 चे कायद्यामध्ये रूपांतर व्हावे आणि अशाच प्रकारचा सक्षम कायदा राष्ट्रीय पातळीवर व्हावा अशा इंटरनेटवरील याचिकेमध्ये 600 हून अधिक जगविख्यात संस्थांमध्ये संशोधन करणार्‍या भारतीय शास्त्रज्ञांनी स्वाक्षरी केली आहे. यामध्ये भारतीय संशोधनातील सर्वोच्च सन्मान, शांती स्वरूप भटनागर पारितोषिकाने सन्मानित झालेल्या 25 हून अधिक शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

नोबेल पारितोषिकाच्या दुपटीहून अधिक रकमेचे आणि फिजिक्स मधील जगातील सर्वोत्तम सन्मान असलेल्या फंडामेंटल फिजिक्स प्राईझचे मानकरी प्रा. अशोक सेन यासारख्या जागतिक किर्तीच्या शास्त्रज्ञाचा समावेश आहे.

स्वाक्षरी केलेल्या शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये टाटा मूलभूत अनुसंधान संस्था(ata Institute of Fundamental Research), भारतीय विज्ञान संस्था(Indian Institute of Sciences), परमाणु ऊर्जा विभाग(Department of Atomic Energy), आयुका(Inter-University Centre for Astoronomy and Astrophysics) आय.आय.टी.या भारतीय तसेच हार्वर्ड(Harvard), कॅलटेल(Caltech), एम.आय.टी.( MIT), सर्न(CERN) अशा जगविख्यात शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील प्रथितयश शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर, डॉ.वसंत गोवारीकर यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला कायमच पाठींबा राहिला आहे.

या व्यतिरिक्त इंटरनेटवरून प्रसारित केलेल्या महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठीच्या याचिकेला केवळ काही आठवड्यांच्या कालावधीमध्ये इंटरनेटवरून आणि मिस कॉल द्वारा 40000 हून अधिक लोकांनी पाठींबा दिला आहे.

भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांमधील 51 (अ) (ह) अनुसार शास्त्रीय दृष्टिकोन जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे, या पार्श्वभूमीवर या विषयातील जागतिक दर्जाच्या तज्ञ शास्त्रज्ञांचा या विधेयकाला असलेला पाठींबा महत्वपूर्ण आहे.

सुगत दाभोलकर