दि. 7 ऑगस्ट 2016 रोजी संत शंकर महाराज आश्रम, पिंपळखुंटा (जि. अमरावती) येथील विद्यामंदिरमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेला पीडित बालक कु. प्रथमेश अवधूत सगणे, वय 11 वर्षेहा आश्रमातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वरील मजल्यावर गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला होता. त्याचे गळ्यावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडिताचे मामा यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मंगरूळ द. येथे अप क्र. 182/16 कलम 307, 120 (ब), 34 भा. दं. वि. सहकलम 2 (1)(ख)(3) अनिष्ट व अघोरी कायद्यान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. लखमी गौतम यांनी या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीनिवास घाडगे यांच्याकडे सोपविला होता. तपासादरम्यान तपासअधिकारी यांच्या निदर्शनास आले की, सदर घटना ही अंधश्रद्धेतून झाली असून या बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे; तसेच हे कृत्य आश्रमशाळेत मेसमध्ये आचारी म्हणून काम करणारे आरोपी – सुरेंद्र रमेश मराठे (वय 30 वर्षे), निलेश जानराव उके (वय 22 वर्षे) यांनी केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान त्यांचा गुन्हा कबूल करून लहान मुलाला जीवे मारून त्याचे रक्तात आपली बोटे बुडविल्यास अलौकिक शक्ती प्राप्त होते, असे कुठल्यातरी पुस्तकात वाचल्याने अंधश्रद्धेपोटी हे कृत्य केले असल्याचे सांगितले होते.
या आरोपींविरुद्ध भक्कम पुरावा गोळा करून दोषारोपपत्र न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी दरम्यान सरकारी बाजू अधिवक्ता श्री. दीपक अंबुलकर यांनी भक्कमपणे मांडून अनिष्ट व अघोरी कृत्यांना लगाम बसण्याकरीता आरोपींना कडक शिक्षा करण्याची विनंती मा. न्यायालयास केली असता दि. 27 मे 2019 रोजी सुनावणी दरम्यान मा. श्री. तिवारी, न्यायाधिशी, वि. जिल्हा व सत्र न्यायालय क्र. 3 यांचे न्यायालयाने नमूद आरोपींना कलम 307 भा. दं. वि. अन्वये 7 वर्षे सश्रम कारावास 1000 रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा, कलम 120 (ब) भा. दं. वि. अन्वये 7 वर्षे सश्रम कारावास 1000 रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा; तसेच कलम 2(1)(ख)(3) अनिष्ट व अघोरी प्रतिबंधक कायद्यान्वये 7 वर्षेसश्रम कारावास 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा अशी प्रदीर्घ शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनिष्ट व अघोरी प्रतिबंधक कायद्यान्वये शिक्षा होण्याचे महाराष्ट्रातील हे प्रकरण पहिलेच आहे.
मा. श्री. दिलीप झळके (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण), मा. श्री. शाम घुगे (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण) यांनी सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करून; तसेच सहपोलीस निरीक्षक श्री. सतीश आडे (ठाणेदार पोलीस स्टेान मंगरूळ द.), शासकीय अभियोक्ता श्री. दीपक अंबुलकर व कोर्ट पैरवी अधिकारी श्री. योगेंद्र लाड यांनी अथक परिश्रम घेऊन पीडितास न्याय मिळवून देण्याची मोलाची कामगिरी केली आहे.