प्रिय डॉ. नरेंद्र दाभोलकरजी
सप्रेम नमस्कार
जादूटोणा विरोधी कायद्याच्या विधेयकासंबंधी पत्र तसेच त्या सोबत कायद्याचा मसुदा तसेच त्यावरील आक्षेप व वस्तुस्थिती आणि कायद्यासंदर्भात व्यापक मांडणी या सर्वांसंदर्भात नेमकी नोंद असलेली आपली पुस्तिका मिळाली.
सदर विधेयकाला विरोध करण्यासाठी माझ्याकडे स्वत:ला वारकरी म्हणविणारे, साधु म्हणविणारे तथा हिंदुत्ववादी समजणारे कित्येक शिवसैनिक तथा आर. एस. एस.चे कार्यकर्ते येऊन गेले. विधेयकांच्या संदर्भात गैरसमज निर्माण करण्याचा, मनात संभ्रम निर्मण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण आपल्या पुस्तिकेमुळे तो संभ्रम निश्चितच दूर झाला.
हे विधेयक पारीत होण्यासाठी आपण करीत असलेले प्रयत्न निश्चित यशस्वी होतील व या चळवळीतील तो एक मैलाचा दगड ठरेल. सदर विधेयकास माझा संपूर्ण पाठींबा आहे. तसेच इतर आमदारांचा पाठींबा मिळविण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल, आभारी आहे.
आपला
आमदार राहुल सि. बोंद्रे, चिखली जि. बुलढाणा
मा. डॉ. नरेंद्र दाभोलकरजी
सप्रेम नमस्कार
आपले दि. 21/11/2011 चे पत्र व सोबत पाठविलेली पुस्तिका प्राप्त झाली. समाजातील अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. या आपल्या विचाराशी मी सहमत आहे. या हिवाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी कायद्याचे विधेयक मंजूरीसाठी येईल त्यावेळी मी त्याचे अवश्य समर्थन करील.
आपला
एस. क्यू. जमा, आमदार -गिरीपेठ, नागपूर.