विविधतेने नटलेला वार्षिक अंक!
सवार्ंपेक्षा उशिराने येऊन सर्वांपेक्षा चांगला असा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा वार्षिक अंक सर्वंच बाजूंनी जमून आलेला आहे. जातीवरचा परिसंवाद आणि त्यावर मान्यवरांची परखड मते, अण्णाभाऊ साठे सारख्या दिवंगत बुजुर्गाची कथा यांनी सजलेला अंक. यातील लक्ष्यवेधी ठरावी अशी वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांची ‘तीर्थक्षेत्र चिकित्सा’ ‘जैन धर्मियांची काशी : सम्मेद शिखरजी’ अशा प्रकारचं लेखन यापूर्वी अनिल अवचट यांनी केलंय. (त्यांचे एकत्रित लेख ‘संभ्रम’ या त्यांच्या पुस्तकात आहेत.) राहुल थोरात यांच्या या लेखातील चिकित्सक बाजू काहींना खटकणार्या वाटण्याचा संभव आहे. तरीही आपण तीर्थक्षेत्राच्या नावाखालचा श्रद्धेचा काळाबाजार उघड करायला हवा. यापुढेही विविध तीर्थक्षेत्रांवरील लेख त्यांनी लिहावेत ही इच्छा. डॉ. नरेंद्र दाभेळकरांनी कायद्यामागची वस्तुस्थिती समजावून दिलेली असली तरी विवेकवादापेक्षा ‘खोटं ते खोटं, आणखी मोठं’ करून सांगणार्या सनातनी धर्मांधाना ते पटणारे नाही. एकूण अंक हा वार्षिक अंक म्हणून वाचून बाजूला ठेवण्यापेक्षा संग्रही ठेवावा असाच जमून आलाय. त्याबद्दल अनिवाच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन…!
-संदेश शंकर बालगुडे घाटकोपर, मुंबई
प्रबोधनपर लेख
‘जैन धर्मियांची काशी : सम्मेद शिखरजी’ हा वार्षिक 2011 मधील राहुल थोरात यांचा लेख हा आम्हा जैन धर्मियांना प्रबोधन करणारा आहे. झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तेथे दरवर्षी लाखो जैन भाविक जात असतात. परंतु ज्या जैन धर्मांने अंधश्रद्धेला विरोध केला व मानवतावादी विचारांची पूजा केली त्याच धर्मात आज अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्रावर चाललेले अंधश्रद्धेचे प्रकार राहुल थोरात यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेले आहेत.
जैन धर्म मूळचा आणि आजचा यातील फरक आजच्या जैन श्रावकांना ओळखेनासा झाला आहे. ज्या चोवीस (24) जैन तीर्थंकरांनी, अंधश्रद्धेस व भोंदूगिरीस विरोध केला. त्याच तीर्थंकरांच्या नावाने सुरू झालेला अंधश्रद्धेचा बाजार थांबणे खूप गरजेचे आहे. भगवान महावीरांनी जगाला मानवतेची व अहिंसेची शिकवण दिली. त्याच महावीरांच्या जैन धर्मांमध्ये जैन तीर्थक्षेत्रावर चाललेला अंधश्रद्धेचा प्रकार थांबला पाहिजे. असे मला वाटते.
– प्रितम पाटील, मु. पो. टाकळी, ता. मिरज, जि. सांगली.
आत्मचिंतन करायला लावणारा लेख
वार्षिक 2011 अंकातील राहुल थोरात यांच्या ‘जैन धर्मियांची काशी : सम्मेद शिखरजी’ हा तीर्थक्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन लिहिलेला वास्तववादी लेख आवडला. आम्हा जैन धर्मियांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा लेख आहे. तुम्ही डोलीवाल्यांची मांडलेली करुण कहाणी हृदय हेलावून टाकते. कोणाच्यातरी खांद्यावर बसून 27 किमी डोंगर चढून उतरून खरेच पुण्य मिळेल काय? नवस करणे, गंडेदोरे बांधणे, सुखशांतीसाठी डोंगरातील माती आणणे ही अंधश्रद्धा आहे. हा मिथ्याधर्म आहे. आपण केलेली टीका ही खर्या धर्मावर नसून या मिथ्याधर्मावर आहे. जैन धर्मात अंधश्रद्धेला स्थान नाही. आपण मांडलेला श्वेतांबर – दिगंबर वाद जैन धर्मियांच्या प्रत्येक तीर्थक्षेत्रावर सुरू आहे. ‘शांतीचा संदेश देणार्या या पर्वतासाठी (सम्मेद शिखरजी) कोर्टबाजी होणे ही जैन धर्मासाठी भूषणावह नाही’ हे वाक्य आम्हाला आत्मचिंतनाला भाग पाडते. तीर्थक्षेत्रावर गांजाची झाडे, तीर्थक्षेत्रावर नक्षलवाद्यांचा वावर यावर आपण प्रकाश टाकला आहे. पुरोगामी जैन संघटनेचे बाळासाहेब पाटील व राहुल थोरात यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन लिहिलेला लेख मार्गदर्शक, विचारप्रवर्तक, वास्तववादी वाटला,. लेखकाला धन्यवाद!
– प्रा. नीता दिलीप आडके, मु. पो. चिखली, शिराळा, जि. सांगली
वार्तापत्रावरील बंदीची मागणी अवास्तव
लोकमत दि. 21/12/2011 च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार भा.ज.प.च्या मंगलप्रभात लोढा (मुंबई) या आमदारांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी विधानसभेत केली. या साठी त्या आमदारानी वार्षिक अंकात प्रसिद्ध झालेल्या राहुल थोरात यांनी लिहिलेल्या ‘जैन धर्मियांची काशी-सम्मेद शिखरजी’ आणि ‘त्र्यंबकेश्वर व दिंडोरी (अ)ज्ञान विद्यापीठ’ या दोन लेखांचा हवाला दिला आहे. या आमदार महोदयांच्या मते हे दोन लेख धार्मिक दहशतवाद व विद्वेष पसरविणारे आहेत. वास्तविक पहाता या दोनही लेखात धर्माच्या नावाखाली चालणार्या अनिष्ट बाबी आणि अंधश्रद्धेचा बाजार या विषयी भाविकांना जागरूक केले आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यात कोठेही हेतु दिसत नाही. विचारांचा प्रतिवाद विचाराने करता येतो. पण ते न करता वार्तापत्रावरच बंदीची मागणी करणे म्हणजे लेखातील मुद्यांचा प्रतिवाद करता येत नाही याची जाहीर कबुलीच देणे होय! धर्माच्या नावाखाली चालणार्या चुकीच्या गोष्टी दाखवून देणे म्हणजे धर्माची निंदा करणे होय, असे जर कोणाला वाटत असेल तर ते म्हणजे महाराष्ट्रातील 150 वर्षाची समाजसुधारकांची परंपरा नाकारणे होय. घटनेने धार्मिक आचाराचे स्वातंत्र्य जसे दिले आहे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे मार्गदर्शक तत्त्व ही सांगितले आहे. त्यासाठी धर्मचिकित्सा जर करावी लागली तर ती केलीच पाहिजे. एकंदरीत वार्तापत्रावर बंदीची मागणी ही अगदीच अवाजवी आहे!
-श्रीपाल कुं. ललवाणी, पुणे