Categories
चळवळ

‘अंनिस’ ही ‘चळवळ’ म्हणून उभी राहू शकेल का?

वार्षिकांक – २०१४

अंनिसने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, बौद्धिक व नैतिक अशा क्षेत्रांतील आपली भूमिका स्विकारली तर निश्चितच तिचे चळवळीत रूपांतर होईल. अंधश्रद्धा निर्मूलन हा एका व्यापक भूमिकेचा भाग राहील.

भारतामध्ये चळवळींचे, जनआंदोलनांचे फार महत्व आहे. जगात अनेक देशांमध्ये लोकशाही प्रणालीने राजकारण चालते. तथापि प्रत्येक देशाच्या लोकशाहीचा बंध वा पोत अलग अलग असतो. भारतामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीनी लोकमान्य टिळक, गोखले, महादेव गोविंद रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या मधून तथ्यांश घेऊन आपले आगळे वेगळे रसायन तयार केले. लोकसंग्रह हे त्यांचे मुख्य ब्रीद होते. साधारणपणे 10 वर्षाची गॅप देऊन ते एक राष्ट्रव्यापी आंदोलन करायचे. टकळी फिरवता फिरवता ते लोक संघटन करायचे आणि त्या सर्व टकळ्या ब्रिटिश राज्यसत्तेच्या विरोधात वापरायचे. हिंसेवाचून सत्तांतर झाल्याचा दाखला तो पावेतो जगात नव्हता. परंतु निःशस्त्र जनतेकडून सामुदायिक पुरूषार्थ घडवीत त्यांनी जगातल्या आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. त्यांचे आश्रम त्या सामाजिक प्रयोग शाळा होत्या. त्यातून प्राप्त झालेले सारतत्व ते संघर्षात वापरत.

दक्षिण आफ्रिकेत काम करताना त्यांना काही गोष्टी उमगल्या होत्या. हिंदू, मुस्लिम, तमिळ, गुजराती, मराठी, पंजाबी असे भेदाभेद करीत जगणार्‍या भारतीयांसाठी द. आफ्रिकेत गोर्‍यांच्या राजवटीत एक कायदा केला. त्याला काळा कायदा म्हणत. या कायद्याच्या विरोधात भारतीयांची एकजूट झाली. परकीय सत्तेविरुद्ध लढताना ती सत्ता जर सर्वांना भारतीय मानते तर भारत नावाचा आधुनिक देश तयार होऊ शकतो हा साक्षात्कार त्यांना झाला. अन्यथा भारत हा 650 राजा – बादशहा, 12 धर्म, 7-8 हजार जाती-उपजाती, 17-18 हजार बोली भाषा अस्तित्वात असलेला देश असल्यामुळे यातून आधुनिक राष्ट्र तयार होईल असा कोणालाही भरोसा नव्हता. ब्रिटिश विचारायचे की, आम्ही सत्ता संक्रमित करायची असल्यास कुणाकडे सोपवायची? हिंदू की मुस्लिम? हिदूंकडे म्हणजे सवर्ण की दलित? असे प्रश्न विचारत. जनता निःशस्त्र होती तर ही लढाई कशी करणार? हाही प्रश्न ते विचारायचे.

महात्मा गांधींचे परमशिष्य लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी स्वातंत्र्यानंतर संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. त्यातील गाभ्याचा भाग लक्षात घेतला पाहिजे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक व नैतिक अशा सातही क्षेत्रामध्ये परस्पराशी विसंगत होणार नाही अशी न्याय भूमिका कोणती याचा विचार करून काम करायला पाहीजे असे जयप्रकाश नारायण सांगत. अन्यथा एखादी संघटना एका क्षेत्रात काम करते; ती पुरोगामी असेल पण उर्वरीत क्षेत्रांमधून प्रतिक्रांती संघटित होते आणि पुरोगाम्यांचा पराभव होतो. त्यासाठी एकाचवेळी बहुआयामी व बहुपदरी भूमिका घेणे आवश्यक असते.

वरील पार्श्वभूमी लक्षात घेता जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील क्रांतीकारी भूमिका कोणती याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर केवळ एकच मुद्द्यावर टोकाची भूमिका घेत गेल्यास प्रतिक्रांती संघटित होते हे देखील लक्षात ठेवले पाहीजे. तसेच वैयक्तिक पुरुषार्थाच्या बळावर चळवळ पुढे जात नाही. सामान्य माणसाच्या हृदयाला हात घालून, त्यांचा सहभाग वाढवून पुढे जाणे म्हणजे चळवळ!

आपल्या समाजात जात व कुटुंब अशा अत्यंत बळकट संस्था आहेत. कुटुंब संस्था पुरोगामी तरुणांना परंपरेच्या चाकूने नष्ट करण्यात पुढाकार घेते. म्हणून तर्कशुद्धता, जगाबरोबर आपले विचार जुळवून घेणे, ही शक्ती त्याला प्रदान करणे हे कुटुंबाचे कर्तव्य आहे. हे आपल्या देशात कोणतेही आई वडील करत नाहीत. मुलांना मुलीपेक्षा लाडाने वाढवल्याने पुरुषप्रधान संस्कृती तयार होते, यात आईचा दोष आहे.

चळवळीत तरुणांची भरती करणे, त्यांना टिकवून ठेवणे आणि त्यांच्याकडून सामुदायिक पुरुषार्थ घडवून आणणे, हे नेतृत्वाचे उद्दिष्ट असले पाहीजे. तसेच या समाजात पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करताना हमखास तुमची जात काढली जाते. कारण या देशात कोणतीही जात 51 टक्के नाही. आपण सारेच अल्पसंख्यांक आहोत.

एखाद्या गावात वा प्रदेशात एखादी जात बहुसंख्येने असू शकते. त्यामुळे चळवळीच्या नेत्याने संघटन करताना इतर जातींना जोडले पाहिजे. म्हणजे जातीय समीकरण करणे नव्हे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. स्वतःमधील जात काढल्याशिवाय पुरोगामी चळवळीचा संघटक होऊ शकत नाही. ज्याच्या अंतःकरणात स्वतःच्या जातीचा दुराभिमान नाही, त्याच्या व्यक्तिमत्वाला सुगंध येतो, आणि संघटक होण्याच्या प्रक्रियेत एक पाऊल पुढे जातो. जाती व धर्म या विषयी नेत्याची भूमिका सहिष्णू असली पाहिजे. तरच तो लोकशक्ती संघटित करू शकतो. त्याचबरोबर आपल्या देशात अनंत क्लेश असल्यामुळे लोक आपली दुखणी घेऊन पुरोगामी वा प्रतिगामी चळवळींच्या नेत्याकडे आधारासाठी येतात. त्यावेळी अमुक विषय माझा नाही म्हणून त्यांनी टाळता कामा नये. याचा अर्थ तुम्ही जो मुद्दा ठसठशीतपणे घेतलेला आहे त्याच्या बाहेरची कामे करणे भागच असते. अन्यथा तुमची लोकप्रियता जशी वाढते त्याचबरोबर चावणारे लोक वाढतात असा समज होतो. यासाठी पुरोगामी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याला माणूस नावाच्या प्राण्याबद्दल अपार जिव्हाळा असणे आवश्यक आहे. पहिल्या भेटीत विचारांनी कुणालाही बांधता येत नाहीत. जिव्हाळ्याने आणि आधार दिल्याने माणसं जोडता येतात.

पुरोगामी चळवळ हा एक धर्म आहे. धर्म म्हणजे माणसाला माणसाशी जोडण्यासाठी जी सांगावी लागते ती भूमिका. माणसाला माणसापासून तोडण्यासाठी सांगितले जाते त्याला अधर्म म्हणतात. पुरोगामी चळवळीच्या अनेक क्षेत्रापैकी निवडक क्षेत्रात काम करत असल्यास अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी त्याने आपली बौद्धिक व नैतिक शक्ती वाढवावी लागते. जातीसंस्थेच्या दोषामुळे सामान्य भारतीयाची नीतिमत्ता जातीच्या रिंगणात फिरत राहते. आपल्या जातीच्या माणसाने भ्रष्टाचार केल्यास फारसा राग येत नाही. सामाजिक नीतीमत्ता जातीच्या रिंगणाबाहेर सुरु होते. जो जात मानतो तो अनैतिक असतो असे म्हणता येणार नाही, पण न-नैतिक असतो याबाबत संदेह असण्याचे कारण नाही.

अंनिसची लोक चळवळ होईल का या प्रश्नाचे उत्तर देताना चळवळीच्या पोटातच त्याचे उत्तर आहे. उदाहरणार्थ, लातूर येथे अंनिसचे कार्यकर्ते आंतरजातीय लग्ने घडवून आणणे हे मिशन मानतात. तेथे अंनिसचा प्रभाव तुलनेने अधिक आहे. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्याने प्रत्येक धर्माच्या नैतिक अंगाचा अभ्यास करून ती नैतिकता आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

धर्माला नैतिकता व कर्मकांडे अशी दोन अंगे असतात. भारतीयत्व म्हणजे सर्व धर्मातील नैतिकतेची बेरीज, असे समीकरण मान्य करावे लागते. हे समीकरण ज्याला मान्य नसेल तो धर्मद्वेष करू लागतो व परधर्माबद्दल घृणा बाळगतो. त्याक्षणी तो पुरोगामी चळवळीस अपात्र माणूस ठरतो.

भारतामध्ये स्त्रियांना गुलाम मानण्याची प्रथा 25 जानेवारी 1950 पर्यंत चालू होती. तोपर्यंत कोणत्याही धर्माने स्त्री व पुरूषांना समान दर्जा दिला नाही. ज्यांना स्त्रियांचा आदर प्राप्त करता येत नाही तो सुसंकृत असण्याची शक्यता कमी असते, हे सत्य कोणी नाकारु शकत नाही. जातीसंस्थेतून मुक्त होणे, स्त्रियांना समानतेने वागवणे, सर्व धर्मांतील नैतिकतेचा अंश घेऊन आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण करणे हे पुरोगामी कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. ज्या देशात स्त्रियांना आदराने वागवले जाते ते देश आर्थिकदृष्ट्या पुढे गेले आहेत. उदा. नार्वे, स्वीडन, डेन्मार्क इ. त्या देशांची कृषी अथवा खनिज संपत्ती नगण्य असली तरी केवळ स्त्रियांना परम आदराने वागवत असल्यामुळे जगात दरडोई उत्पन्नांत अग्रेसर आहेत. त्याच न्यायाने आपल्या आजूबाजूच्या लोकांची पाहणी केली तर ज्या घरात स्त्रियांना मारहाण होते ते घर दारिद्र्याकडे वाटचाल करते हे लक्षात येते.

कोणतीही पुरोगामी चळवळ भारत नावाच्या देशाच्या निर्मितीकडे वाटचाल करणारी असली पाहीजे. भारताच्या सार्वजनिक जीवनात भारतीय नामक नीतीमत्ता सर्वांना बंधनकारक आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीनीं या सार्वजनिक नीतीमत्तेचे संहितीकरण केले. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी अकरा व्रते सांगितली. भारताला संतांची व समाजसुधारकांची समृद्घ परंपरा आहे. त्यामधून त्यांनी ही संहिता तयार केली आहे. विशेष म्हणजे ही व्रते त्यांनी आपल्या जीवनात सिद्घ करून दाखवली. त्यांची व्रते हीच त्यांची हत्यारे होती. सत्य, अहिंसा, अपरीग्रह (जीवनातून जेवढे गरजेचे आहे तेवढेच घेणे.) ब्रम्हचर्य (परस्त्रीचा आदर करणे), अ-स्वाद (फार रूचकर खाण्याची इच्छा न करणे), सर्वत्र भयवर्जन, स्वदेशी, सर्वधर्म समानता, स्पर्श भावना, अस्तेय (चोरी न करणे) या व्रतांचे जो पालन करेल त्याला लोक संत मानतात. त्यामुळे पुरोगामी चळवळीचे अडथळे दूर होतात.

अंनिसने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, बौद्धिक व नैतिक अशा क्षेत्रांतील आपली भूमिका स्विकारली तर निश्चितच तिचे चळवळीत रूपांतर होईल. अंधश्रद्धा निर्मूलन हा एका व्यापक भूमिकेचा भाग राहील.

चळवळीची काही पथ्ये असतात. त्याचे काटेकोर पालन करावे लागते. त्यापैकी एक महत्वाचे पथ्य म्हणजे, अदिन्य दान न स्विकारणे, भगवान गौतमबुद्धाने सांगून ठेवलेले हे पथ्य आहे. अदिन्य दान म्हणजे जे दान स्विकारण्याने कार्य नाश होतो असे दान. महाराष्ट्रात व भारतात जे पुढारी बिघडले आहेत असे म्हणतो त्यांचा ल. सा. वि. काढल्यास असे आढळून येते की, ज्याक्षणी ते अदिन्य दान स्विकारू लागले तेव्हापासून ते भ्रष्टतेचे पूजारी झाले. त्या लोकांचा अल्पावधी भरभराटीचा असतो पण कालांतराने ते विस्मृतीत जातात.

एकवर्गीय चळवळ व्यापक नीतीमत्तेवर आधारलेली नसते. म्हणून त्याचा स्पर्श सामान्य जनतेला होत नाही. लोकचळवळीच्या छत्राखाली अनेक आंदोलनं करावी लागतात. त्यात व्यापक नीतीमत्तेचा एक मुद्दा फरक करावा लागतो अन्यथा ते आंदोलन फक्त लाभार्थी लोकांपुरते मर्यादित राहते. त्याचा अर्थ चळवळीमध्ये आपोआपच वर्ग व जात यामध्ये मुक्ती मिळवण्याचे सामर्थ्य असते.

अंनिसचे जवळपास सर्व प्रमुख कार्यकर्ते माझ्या ओळखीचे आहेत. दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर हे माझे सख्खे मित्र होते. ते मिरजेला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी आमच्या संघटनेत सामील व्हावे, एवढ्या एका कारणाकरता मी मिरजेला गेलो होते. तेव्हापासून सातत्याने एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना भिंतीवर डोके आपटावे लागले व अखेर प्रतिगाम्याच्या गोळीला बळी पडावे लागले.

कधीकधी मला वाटते हा अभिमन्यू चक्रव्युहात शिरला व व्यूह फोडून बाहेर येण्याआधीच त्याचा अंत झाला!

डॉ. कुमार सप्तर्षी

लेखक संपर्क: 9422549043

(लेखक युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

शब्दांकनः सम्यक बल्लाळ/प्रभाकर नानावटी